माठ ही वर्षायू वनस्पती अॅमरँटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अॅमरँथस ट्रायकलर आहे. हे झुडूप मूळचे दक्षिण अमेरिकेतील असून जगात सर्वत्र त्याची लागवड पालेभाजीसाठी तसेच काही वेळा शोभेसाठी केली जाते. भारतात पालेभाजी म्हणून तिची लागवड करतात.
माठ वनस्पतीचे दोन प्रकार आहेत : तांबडा माठ व हिरवा माठ. तांबडा माठ १५०–१८० सेंमी. उंच वाढतो व त्याचे खोड मऊ असते. हिरवा माठ ९०–१२० सेंमी. वाढतो व त्याचे खोड तांबड्या माठापेक्षा लवकर निबार होते. सामान्यपणे दोन्ही प्रकारांचे खोड सरळ व ताठ असून कमी फांद्यांचे असते. पाने साधी, एकाआड एक व अंडाकृती असून ती ४–१२ सेंमी. लांब आणि ३–७ सेंमी. रुंद असतात. पानांचा रंग हिरवा, लाल, जांभळा, पिवळा किंवा हिरव्यावर वेगवेगळ्या रंगांच्या छटा असलेला असा असतो. फुले असीमाक्ष फुलोऱ्यात येतात. ती लहान व भडक गुलाबी किंवा लाल रंगाची असून चटकन नजरेत भरतात. नरफुले आणि मादीफुले एकाच वनस्पतीवर येतात. फळ करंड्यासारखे असते. बिया काळ्या, मसुरासारख्या चपटगोल व चकचकीत असून दोन्ही बाजू निमुळत्या असतात.
माठ वनस्पतीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न (लोह) व पोटॅशियम यांची संयुगे तसेच
अ, क आणि ब-समूह जीवनसत्त्वे असतात. ती औषधी असून हगवण, मूळव्याध, दातदुखी, तसेच पडल्यामुळे झालेल्या दुखापतीवर उपयुक्त असते.