पुणे येथील पेशवेकालीन एक प्रसिद्ध कोतवाल. त्याच्या वडिलांचे नाव सावळादास (शामळदास). घाशीराम मुळचा औरंगाबादचा. नोकरी किंवा व्यापाराच्या निमित्ताने तो पुण्यात आला. पुढे पेशव्यांचे कारभारी नाना फडणीस (१७४२–१८००) यांच्याशी त्याची ओळख झाली आणि पुणे दरबारात त्याला प्रवेश मिळाला.

नाना फडणीस यांच्या मर्जीमुळे घाशीरामला कोतवालीची वस्त्रे मिळाली (१७७७) व पुढे त्याची कोतवालीवर कायमस्वरूपी नेमणूक झाली (१७८२). कोतवाल म्हणजे सध्याचा महापौर. घाशीरामची कोतवालपदी नियुक्ती करताना त्याच्याशी वीस कलमी करार केला गेला. या कलमांत घाशीरामच्या कामाचा उल्लेख केला आहे. त्यांमध्ये पुढील महत्त्वाची कलमे होती : १. कोतवालीचा अंमल ठरलेल्या रिवाजाप्रमाणे करावा, इमानेइतबारे वर्तन करून लोकांना सुरक्षित ठेवावे. २. नारायण व शनिवार पेठेत कोतवाल चावडी नसल्याने तेथील फंदफितुरी व हालचाल समजत नाही. त्यामुळे तेथे चावड्या घालून फंदफितुरीची बातमी सरकारकडे कळविणे. ३. शहरातील रस्ते चांगले करावे. नवीन पडवी, ओटे परवानगी शिवाय झाले असतील, तर ते काढून टाकणे व पुढे होऊ न देणे. ४. शहरात रात्री फिरून गस्त घालणे व शहराचा बंदोबस्त राखणे, तसेच बारकाईने चोरांचा पत्ता लावून चोर धरून आणून सरकारात देणे. ५. कोतवालीचा दरमहा हिशोब सरकारात जमा करणे.

घाशीरामने कारभार हातात घेण्याआधी पुण्यात चार पोलीस चौक्या होत्या. त्याने नारायण व शनिवार पेठेत दोन नवीन चौक्या बसवल्या. त्याच्या हाताखाली तीन अधिकारी होते व त्यांच्याकडे कोतवालीतील तीन खाती सोपविली होती. मुजुमदाराकडे दस्तैबज, अर्ज वगैरे लिहिण्याचे काम असे. दुसऱ्याकडे कागदपत्रे सांभाळण्याचे काम आणि तिसरा जमाबंदीचा अधिकारी असे. तिघांचा मिळून पगार वर्षाला ६४० रु. होता.

नवीन चौक्या व वाढलेला कारभार यांमुळे या पोलीस चौक्यांचे सुद्धा उत्पन्न वाढले. १७९० च्या आसपास या पोलीस ठाण्यांचे उत्पन्न जवळपास सु. २७ हजार रुपयांवर गेले. १७९१ साली पुण्यात दंडाला पात्र असे फक्त २३४ गुन्हे होते. यावरून घाशीरामचा कारभार किती चोख होता, याची कल्पना येते. या गुन्ह्यात सरकारच्या परवानगी शिवाय वेश्या होणे, परवानगी शिवाय बकरी मारणे, बेवारसी प्रेतांची विल्हेवाट लावणे, स्वतःची जात चोरणे, कुंटीणपणा करणे, वेश्या करण्याकरिता मुली विकत घेणे, एक नवरा जिवंत असताना दुसरा करणे, बायकोला काडी मोडून दिल्यानंतर तिला घेऊन राहणे, कोळ्यांना चाकरीस ठेवणे अशा गुन्ह्यांचा प्रामुख्याने समावेश होता.

घाशीरामच्या कार्यकाळात रात्रीच्या वेळेस पुण्याच्या रस्त्यांवर जागता पहारा, शहरात येणार्‍या-जाणार्‍यांची कसून तपासणी, शहराची सुरक्षा, शहरातील फंदफितुरी शोधणे, चोर्‍या-जुगार रोखणे, शहराची स्वच्छता इत्यादी कामे बिनाकसूर केली जात होती. याबाबत पेशव्यांचा बखरकार म्हणतो, “ऐसी कोतवाली मागे कोणी केली नाही व पुढेही करणार नाही.” मात्र एका गोष्टीमुळे घाशीरामच्या या सर्व कृत्यांवर पाणी फेरले. पेशव्यांच्या बखरीत याबद्दल उल्लेख आढळतो. १७९१ च्या ऑगस्ट महिन्यात श्रावण संपल्यानंतर काही द्राविडी ब्राह्मण दक्षिणा घेऊन आपल्या प्रदेशात जाण्यास निघाले. ते घाशीरामच्या बागेत उतरले. तेथे त्यांनी माळ्याच्या परवानगी शिवाय काही कणसे तोडली. त्यावरून तंटा झाल्याने माळी घाशीरामकडे आला व त्याने सांगितले की, चोर व कोमटी यांनी बागेत दंगा केला. हे कळताच घाशीरामने शिपाई पाठवून, त्या तैलंगी ब्राह्मणांना पकडून स्वत:च्या (भवानी पेठेतील) वाड्यात एका भुयारात कोंडले. त्यामुळे त्यांतील काही ब्राह्मण मृत्यू पावले. कोठडीत लहानशी खिडकी होती. त्या खिडकीजवळ जे उभे होते, त्यांचा प्राण कसाबसा वाचला. ही घटना पेशव्यांचे सरदार मानाजी फाकडे याला समजली. त्याने कुलूप तोडून ब्राह्मणांना बाहेर काढले आणि झालेला प्रकार पेशवे सवाई माधवराव (१७७४–१७९५) यांच्या कानी घातला. पेशव्यांनी नाना फडणीस यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले. फडणीस यांनी घाशीरामास विचारले, तेव्हा ते कोमटी चोर होते असे उत्तर घाशीरामने दिले. त्यावरून नानांनी मुडदे जाळण्यास परवानगी दिली. परंतु मानाजीने मुडदे उचलू दिले नाहीत. दरम्यान अन्य तैलंगी ब्राह्मण नाना फडणीस यांच्या वाड्यापुढे येऊन दंगा करू लागले. त्यानंतर घाशीरामची चौकशी करून अखेर न्यायाधीश अय्याशास्त्री यांनी त्यास देहान्ताची शिक्षा दिली; शिवाय त्याची धिंड काढून त्याला दगडाने ठेचून मारल्याच्याही हकीकती आहेत. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी चार्ल्स मॅलेट यानेही याबाबत लिहून ठेवले आहे.

घाशीराम कार्यक्षम अधिकारी होता. कोतवाली व पोलीस खाते सुधारण्यासाठी त्याने परिश्रम घेतले. नजरबाज (गुप्त पोलीस) लोक ठेवून त्याने फितुरांस आळा घातला. तसेच नवापुरा नावाची एक नवी पेठ वसविली होती; तथापि त्याचे जुलमी वर्तन त्याच्या नाशास कारणीभूत ठरले.

संदर्भ :

  • Sardesai, G. S. English Records of Maratha History – Poona Residency Correspondence, Vol.2, Mumbai, 1936.
  • खरे, वासुदेव वामन, ऐतिहासिक लेखसंग्रह, भाग ९, पुणे, १९३८.
  • खरे, वासुदेव वामन, नाना फडणवीसांचे चरित्र, मिरज, १९२७.
  • मंगुडकर, मा. प. पुणे नगर संस्था शताब्दी ग्रंथ, पुणे, १९६०.
  • वाड, ग. चि. सातारकर महाराज व पेशवे यांची रोजनिशी , भाग – ८, पुणे, १९११.

                                                                                                                                                                                    समीक्षक : गिरीश मांडके