अव्वैयार : अव्वैयार (औवैयार) हे तमिळ साहित्यातील अतिशय लोकप्रिय नाव असून त्याचा अर्थ ‘आई’ अथवा ‘जैन भिक्षुणी’ असा होतो. ‘म्हातारी’ असाही या शब्दाचा अर्थ असून, ‘सायंकाळचा पाऊस आणि अव्वैयारचा (म्हातारीचा) आजार सहसा सुटत नाहीत’ अशी तमिळ म्हण आहे. ‘वेळाळ’ जातीतील काही स्त्रिया दरवर्षी दोनदा, मंगळवारी मध्यरात्री एक गुप्त व्रत पाळतात, त्यालाही ‘औवै-नोंबु’ (औवै-व्रत) असे नाव आहे. अव्वैयार नावाच्या तीन कवयित्री वेगवेगळ्या कालखंडांत होऊन गेल्याचा संदर्भ अभिधान चिंतामणी  या ग्रंथात मिळतो. त्यांपैकी पहिली अव्वैयार ख्रिस्तशकाच्या सुरुवातीस संगम काळात होऊन गेली. आदर्श प्रेम व काही राजांचे ऐश्वर्य आणि दातृत्व यांवर तिच्या एकूण पन्नास कविता उपलब्ध असून त्यांत उच्च प्रकारचे काव्यगुण आढळतात. अदियमान ह्या चेरवंशीय राजाच्या दरबारात तिने राजदूत म्हणूनही काम केले होते.

अव्वैयार : काल्पनिक पुतळा

भक्तिकाळात संत सुंदरर (सु. ९ वे शतक) यांची समकालीन अशी आणखी एक अव्वैय्यार होऊन गेल्याचे सांगतात. पुढील प्रख्यात अव्वैयार बाराव्या शतकात होऊन गेलीचोल राजवटीमध्ये या अव्वैय्यारचे वास्तव्य होते. कंबार आणि ओट्टाकुथर या राजांच्या कारकिर्दीत तिला आश्रय मिळाला होता. तिने औवे-कुरळ्  नावाचा गूढात्मक ग्रंथ लिहिलेला आहे. आणखी एका अव्वैयारने लिहिलेले चार नीतिपर काव्यग्रंथ उपलब्ध असून त्यांची अक्षरवाङ्मयात गणना होते. त्यांची नावे आत्तिशूडि, कौन्‍रैवेन्दन, मूदुरै आणि नल्‌वळि ही होत. नीतिपर आणि व्यवहारोपयोगी तत्त्वांची सूत्रबद्ध वचने त्यांत असून ती सुबोध आहेत. ह्या नीतिपर कविता आजही शाळकरी मुले आवडीने शिकतात व प्रौढ माणसे अभिमानाने त्या पाठ म्हणून दाखवितात. ह्या अव्वैयारलाही राजाश्रय लाभला होता. तथापि गरीब शेतकऱ्यांची व कामकऱ्यांची कवयित्री म्हणून तिची विशेष ख्याती आहे. ती अत्यंत साधेपणाने राही. राजवाड्यापासून तो गरिबाच्या झोपडीपर्यंत तिचा सारख्याच सहजतेने संचार होता. तिच्या बाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. त्यांतून तिच्या स्वतंत्र आणि उदात्त व्यक्तिमत्त्वाचा प्रकाश पडतो. तिच्याविषयीच्या आख्यायिका आणि तिची वचने यांचा तरुण मनावर कायमचा सखोल ठसा उमटतो.

 

 

 

संदर्भ :

                                                                                                                भाषांतरकार : श्री. दे. ना. इनामदार