बृहदांत्र विपुटीविकार (Diverticulosis) हा बृहदांत्रामध्ये म्हणजेच मोठ्या आतड्यात निर्माण झालेला दोष असतो.

बृहदांत्र विपुटीविकार (Diverticulosis) : पचनसंस्थेच्या नलिकाकृती अवयवाची रचना ही अन्ननलिका, जठर, पक्वाशय, लहान आतडे, मोठे आतडे आणि गुदाशय या क्रमाने असते. या प्रत्येक भागातील परिघाकृती स्नायूच्या त्रुटीमधून विपुटी (खळगा) तयार होऊ शकते आणि विकारग्रस्त होऊ शकते.

आ. १. बृहदांत्र विपुटी (कोलोनोस्कोपी प्रतिमाचित्रण)

बृहदांत्राव्यतिरिक्त संपूर्ण पचनसंस्थेला अंत:त्वचा आणि त्याभोवती परिघीय स्नायूंचे आवरण असते. त्याबाहेर लांब स्नायूंचे आवरण असते. त्यावरील अधिकांश भागावर एक तलम परंतु चिवट आवरण असते, त्याला पर्युदर (Peritoneum) असे म्हणतात. मात्र मोठ्या आतड्यावर हे लांब स्नायू तीन अरुंद लांबट पट्ट्यांच्या स्वरूपात असतात. त्यांना बृहदांत्र पट्ट (Taniea Coli) असे म्हणतात. अशा विशिष्ट रचनेच्या फरकामुळे मोठ्या आतड्याला होणाऱ्या विपुटीविकाराचे प्रमाण इतर भागांपेक्षा अधिक आढळून येते.

शरीरातील मोठ्या आतड्यात दाबाचे प्रमाण वाढल्याने मोठ्या आतड्याचे अंतर्वस्त्र त्याच्या बाहेरील परिघीय स्नायूतील त्रुटींमधून बाहेर डोकावू लागते. सुरुवातीला खाचेसारखे दिसणारे भाग खोल खळग्यासारखे दिसू लागतात. असे दोष बहुधा मोठ्या आतड्याच्या रक्तवाहिन्यांजवळ निर्माण होतात. याला ‘बृहदांत्र विपुटीविकार’ असे म्हणतात.

 कारणे : व्यायामाअभावी शरीरातील स्नायू कमकुवत होतात. ज्या व्यक्तींच्या आहारात तंतुमय पदार्थ कमी असतात, त्यांच्या आतड्यात मल (विष्ठा) कमी प्रमाणात निर्माण होते. ती पुढे ढकलण्याचे पुरेसे (व्यायामाचे) काम मोठ्या आतड्यास कमी प्रमाणात करावे लागते. परिणामी मोठ्या आतड्याची हालचालही मंदावते. त्यामुळे बद्धकोष्ठता येते, वायूचे (गॅस) प्रमाण वाढते. त्यामुळे मोठ्या आतड्यातील वाढलेला दाब बृहदांत्र विपुटीविकाराला कारणीभूत ठरतो.

लक्षणे : ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठता आणि वाढीव वायू यांचा त्रास फार आहे, अशा व्यक्तींमध्ये हा दोष उद्भवतो. मोठ्या आतड्याची मंदावलेली हालचाल यांमुळे पोटात सतत अस्वस्थता, बद्धकोष्ठ किंवा जुलाब अशी लक्षणे दिसतात. भूकही मंद होऊ लागते

आ. २. बृहदांत्र विपुटीशोथ

बृहदांत्र विपुटीशोथ (Diverticulitis) : बृहदांत्र विपुटीविकाराची तीव्रता वाढल्यास विपुटीशोथ हा आजार होतो. विपुटीमध्ये जंतुसंसर्ग होतो आणि शोथ उत्पन्न होतो, याला ‘बृहदांत्र विपुटीशोथ’ (Diverticulitis) असे म्हणतात.

 कारणे : खोल विपुटीमध्ये (Diverticulum) विष्ठा आणि जंतू यांचा शिरकाव होतो आणि जंतुसंसर्ग म्हणजेच विपुटीशोथ उद्भवतो.

लक्षणे : त्यामुळे ताप येणे, ओटीपोटात दुखणे, बद्धकोष्ठता वाढणे किंवा जुलाब होणे असा त्रास सुरू होतो. त्यांच्या शेजारील रक्तवाहिनीला इजा होऊन कमी-अधिक रक्तस्रावही होऊ शकतो. लक्षणांची तीव्रता वाढल्यास रक्त भरण्याची किंवा तातडीची शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते.

निदान : बृहदांत्र विकाराचे प्राथमिक निदान करण्यासाठी उदरपोकळी आणि श्रोणिभागाची तपासणी केली जाते. याकरिता ध्वनिलेखन (Sonography) आणि चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शन (MRI) या तंत्राचा वापर करतात. बृहदांत्राचे अंतर्दर्शन (Endoscopy) करण्यासाठी कोलोनोस्कोप (Colonoscope) ही लवचिक दुर्बीण वापरतात. व्यक्तीच्या गुदद्वारातून ही दुर्बीण आत घालून संपूर्ण मोठे आतडे पाहता येते, त्याचे छायाचित्र (Photograph) घेता येते तसेच आजारग्रस्त भागातील लहान तुकडे तपासणी करण्याकरिता घेता येतात.

उपचारपद्धती : सौम्य आजारात प्रतिजैविके (Antibiotics) तसेच आवश्यकतेनुसार ज्वरशामक (Antipyretics) आणि वेदनाशामक (Pain-killers) औषधे दिली जातात. लक्षणांची तीव्रता वाढल्यास रक्त देण्याची किंवा तातडीची शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते. वेळीच उपचार न केल्यास गंभीर समस्या निर्माण होतात.

आ. ३. बृहदांत्र विपुटीविकार निदानात्मक प्रतिमाचित्रण : (अ) ध्वनिलेखित प्रतिमाचित्रण, (आ) सीटी-स्कॅन प्रतिमाचित्रण (विपुटी बाणांकनाने दर्शवली आहे).

गंभीर समस्या : आंतरिक भगेंद्र : बृहदांत्र ‍विपुटीमध्ये पू निर्माण झाला तर विकारग्रस्त भागाला सूज येते. अशा संसर्ग झालेल्या भागातील पू इतरत्र पोटात पसरू नये म्हणून निसर्गत: बाधित आतड्याभोवती मेदपटलाद्वारे (Omentum) आवरण तयार केले जाते. परिणामी लहान आतडे, मूत्राशय किंवा स्त्रियांमध्ये गर्भाशय यांचे बाधित भागापासून विलगीकरण करण्यात येते. परंतु हा पू लहान आतड्याची पोकळी, मूत्राशय, गर्भाशय किंवा योनिमार्ग यांमध्येही पसरल्यास याला आंतरिक भगेंद्र (Internal Fistula) असे म्हणतात. भगेंद्राचे एक मुख मूत्राशयात किंवा स्त्रीच्या जननेंद्रियात उघडले असता, लघवीत किंवा जननमार्गातून हवा (गॅस) आणि विष्ठा येण्यास सुरुवात होते. परिणामी त्या अवयवांमध्ये तीव्र जंतुसंसर्ग उद्भवतो. रुग्णाला आंतरिक भगेंद्र झाले तर त्यासाठीही तातडीने शस्त्रक्रिया करून मोठ्या आतड्याचा बाधीत भाग काढून टाकणे आवश्यक असते. अशा रुग्णांतही मृत्यूचे प्रमाण अधिक असते.

पर्युदरशोथ : काही वेळा बृहदांत्र विपुटीमधून मोठ्या आतड्यास छिद्र पडते आणि उदरपोकळीत पू आणि विष्ठा पसरते. याला पर्युदरशोथ (Peritonitis) असे म्हणतात. या गंभीर स्थितीमध्ये शस्त्रक्रिया हा एकमेव मार्ग आहे. परंतु तातडीने शस्त्रक्रिया करूनही या रुग्णांपैकी ५० % रुग्ण दगावतात.

अंत:स्थ रक्तस्राव : उदरपोकळीमध्ये रक्तस्राव झाल्यास त्वरित शस्त्रक्रिया करून मोठ्या आतड्याचा बाधित भाग काढून टाकावा लागतो.

आतड्याचा मार्ग पूर्ण बंद होणे : मोठ्या आतड्याच्या पूग्रस्त/बाधित भागाला लहान आतडे चिकटून, त्याला पीळ पडून आतड्याचा मार्ग पूर्ण बंद होऊ शकतो. यासाठी त्वरित शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.

वरीलपैकी एकापेक्षा अधिक गंभीर समस्या उद्भवल्यास क्रमवार शस्त्रक्रिया केल्या जातात.

प्रतिबंधात्मक उपाय : तंतुमय अन्नपदार्थ विशेषत: पालेभाज्या, गाजर, मुळा, बीट, फळे  यांचा समावेश मुबलक प्रमाणात आहारात असावा. नियमित शारीरिक व्यायाम आणि तणावरहित शांत झोप यांचाही एकंदरीत सकारात्मक उपयोग होतो. तसेच जीवनसत्त्व (Vitamin C) करिता उदा., लिंबू, संत्री, आवळा, टोमॅटो यांचा आहारात समावेश करावा. जीवनसत्त्व करिता सूर्यप्रकाशामध्ये किमान १५-२० मिनिटे रोज बसावे किंवा चालावे.

पहा : पर्युदर; बृहदांत्रशोथ.

 संदर्भ :

  • Ashley, Stanley W. ACS Surgery Volume 2, Decker Intellectual Properties Inc., 2014.
  • Brunicardi, F. Charles (Ed.) Schwartz’s Principles of Surgery, Eighth Edition, The McGraw-Hill Companies Inc., 2005.
  • Russell, R. C. G.; Williams, Norman S.; Bulstrode, Christopher J. K. (Ed.) Short practice of Surgery 24th edition, International Students’ Edition.
  • Zinner, Michael J. (Ed.) Maingot’s Abdominal operations, 10th Edition, A Simon & Schuster Company, 1997.
  • सौजन्य : थोरात, डॉ. विनय आ. १ बृहदांत्र विपुटी  पुणे.
  • सौजन्य : शाह, डॉ. मोहित आ. ३ (अ ) बृहदांत्र विपुटीविकार निदानात्मक प्रतिमाचित्रण  अभिप्राय प्रगत ध्वनिलेखन केंद्र, मुंबई.
  • सौजन्य : माहेश्वरी, डॉ. शरद आ. ३ (आ ) बृहदांत्र विपुटीविकार निदानात्मक प्रतिमाचित्रण  कोकिलाबेन हॉस्पिटल, मुंबई.

समीक्षक : यशवंत तोरो