आजारपणामुळे, जखमेमुळे अथवा जीवाणूबाधेमुळे शरीराच्या एखाद्या भागातील ऊती रक्तपुरवठ्याअभावी मृत होतात. त्यावर पूतिक्रिया (Putrefaction) झाली तर या अवस्थेला कोथ असे म्हणतात. कोथ होण्याच्या आधी बहुतेक वेळा रक्तापूर्तिअवरोधामुळे घनीकरण ऊतकमृत्यू (Coagulative necrosis) झालेला असतो आणि त्यानंतर पूतिकारक जीवाणूंमुळे त्यात क्लेद होतो.

कारणे : मधुमेह, रक्तवाहिन्यांचे आजार, धूम्रपान, अतिमद्यपान, एड्स, रेनो रोग (Raynaud’s disease) आणि हिमदंश (Frostbite) या कारणांमुळे कोथ उद्भवतो.

प्रकार : कोथाचे तीन प्रकार असतात : (१) शुष्क कोथ (Dry gangrene), (२) आर्द्र कोथ (Wet/moist gangrene) आणि (३) वायुकोथ (Gas gangrene).

(१) शुष्क कोथ : हा कोथ आर्द्र कोथाच्या तुलनेत सौम्य स्वरूपाचा असतो. तीव्र प्रमाणातील मेदलेपनधमनीकाठिण्यामुळे (Atherosclerosis) —‍ विशेषत: वार्धक्यातील — रक्तापूर्तिअवरोध (Obstruction to blood supply) झाला तर शुष्क कोथ निर्माण होऊ शकतो. मधुमेही रूग्णांमध्ये मेदलेपनधमनीकाठिण्याची व पर्यायाने हा कोथ निर्माण होण्याची प्रवृत्ती अधिक असते. याशिवाय ब्यूर्गर रोग (Buerger’s disease) हा रक्तवाहिन्यांचा आजार, हिमदंशामुळे होणारे हाता-पायाच्या छोट्या रक्तवाहिन्यांचे आकुंचन, शारीरिक इजा, अरगट या पदार्थाची विषबाधा यामुळेही शुष्क कोथ होऊ शकतो.

या कोथाची सुरुवात शरीराच्या दूरस्थ भागांमध्ये होते. उदा., हाताची किंवा पायाची बोटे. या भागांमध्ये रक्तप्रवाह मुळातच कमी असतो. शिवाय रक्तापूर्तिअवरोधामुळे हा रक्तपुरवठा आणखी कमी होतो आणि ऊतकमृत्यू होतो. हा कोथग्रस्त भाग शुष्क, संकुचित आणि काळपट दिसतो. अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे यामध्ये जीवाणूंचा प्रादुर्भाव आणि वाढ मर्यादित प्रमाणात असतात. हा कोथ हळूहळू शरीराच्या वरच्या भागांकडे पसरू लागतो. ज्या ठिकाणी रक्तपुरवठा पुरेसा असेल त्या ठिकाणी ही पसरण्याची प्रक्रिया थांबते. यामध्ये कोथग्रस्त ऊतीला जिवंत ऊतीपासून वेगळे करणारी मर्यादारेखा स्पष्ट असते.

उपचारपद्धती  : प्रतिजैविके, रक्तप्रवाहपुनर्प्रस्थापना (Revascularization) आणि मृत ऊती काढून टाकण्याची शस्त्रक्रिया या उपचार पध्दतींनी हा कोथ आटोक्यात आणता येतो.

(२) आर्द्र कोथ : हा गंभीर प्रकारचा कोथ आहे. मुळातच ओलसर असलेल्या ऊती किंवा अवयवांमध्ये हा कोथ होतो. शुध्द रक्तवाहिनीसह अशुध्द रक्तवाहिनीमध्येही अडथळा निर्माण झाल्यास ऊतींमधून रक्ताचा निचरा होत नाही आणि रक्त ऊतींमध्ये साठून राहते.

लहान आतड्याला पीळ पडणे (Volvulus), आतड्याचा एक भाग दुसऱ्या भागामध्ये शिरणे (Intussusception) किंवा गुंतागुंतीची आंत्रगळ (Strangulated hernia) या परिस्थितीत आतड्याचा आर्द्र कोथ संभवतो. मधुमेहींमध्ये विशेषत: पायाच्या दूरस्थ भागांमध्ये आर्द्र कोथ होण्याचा मोठा धोका असतो.

आर्द्र कोथामध्ये रक्त साचून राहिल्यामुळे पूतिकारक जीवाणूंची झपाट्याने वाढ होते. मधुमेहींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यानेही जीवाणूंचा प्रादुर्भाव जलद होतो. आर्द्र कोथ झालेला भाग ओलसर आणि सुजलेला दिसतो. जीवाणूंच्या प्रादुर्भावामुळे त्याला दुर्गंधी येते. यामध्ये कोथग्रस्त ऊती आणि जिवंत ऊती यांमधील मर्यादारेखा स्पष्ट नसते. हा कोथ वेगाने पसरतो.

उपचारपद्धती  : जीवाणूंपासून निर्माण झालेले विषारी पदार्थ पसरल्यामुळे जंतुजन्य रक्तदोषाचा (Septicemia) धोका संभवतो आणि तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणूनच प्रतिजैविके, कोथग्रस्त आतडे काढून टाकण्याची शस्त्रक्रिया म्हणजेच अंगच्छेदन (Amputation) या उपचारपध्दती तातडीने सुरू कराव्या लागतात.

आ. ३. वायुकोथ

(३) वायुकोथ : हा आर्द्र कोथाचाच एक प्रकार असून क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स (Clostridium perfringens) नावाच्या वायुजनक जीवाणूमुळे होतो. शरीरावरील उघड्या, खोलवरच्या दूषित जखमेद्वारे हे जीवाणू शरीरात प्रवेश करतात. हे जीवाणू ऑक्सिजनच्या संपर्कात जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे ऊतकमृत्यू झालेल्या भागात त्यांची वेगाने वाढ होते. हे जीवाणू अनेक विकरे आणि विषकारक पदार्थ स्रवतात. त्यामुळे स्नायूंमध्ये मोठ्‌या प्रमाणावर ऊतकमृत्यू होतो. तसेच द्रव पदार्थांचा नि:स्राव (Exudate) होऊन सूज येते आणि त्वचेवरही द्रवाने भरलेले फोड तयार होऊन फुटतात. जखम झाल्यानंतर एक ते दोन दिवसांत हा परिणाम दिसून येतो.

तसेच ऊतींमधील साखरेवर या जीवाणूंमुळे किण्वन क्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायू निर्माण होतो. त्यामुळे सूज येते, वेदना होतात आणि ऊतींमधून वायूचा आवाज येतो. प्रभावित भाग काळा-निळा दिसतो आणि त्यातून दुर्गंधी येते. रक्तवाहिन्यांना इजा होऊन रक्ताच्या गुठळ्याही होऊ शकतात. विषकारक पदार्थ शरीराच्या इतर भागात पसरल्याने (विषजन्यरक्तदोष) ताप येतो आणि जिवाला धोका संभवतो.

उपचारपद्धती  : वायुकोथासाठी प्रतिजैविके (Antibiotics), मृत ऊती काढून टाकणे, अंगच्छेदन शस्त्रक्रिया या उपचारपद्धती आहेत. ऑक्सिजन चिकित्सा पद्धतीचा देखील वापर केला जातो. या पद्धतीमध्ये ऑक्सिजनच्या संपर्कात हे जीवाणू जिवंत राहू शकत नसल्याने प्रभावित भागास ऑक्सिजनचा पुरवठा करून या जीवाणूंना नष्ट केले जाते.

पहा : अंगच्छेदन; कोथ (पूर्वप्रकाशित); पेशीमृत्यू; ब्यूर्गर रोग; रेनो रोग; हिमदंश.