बदलत्या वातावरणास आणि वाढत्या वैश्विक उष्णतेशी जुळवून घेणे, तसेच तृणभक्षी प्राणी, कीटक, कवक यांसारख्या विविध शत्रूंपासून स्वत:चे रक्षण करून जीवनचक्र पूर्ण करणे हे दोन उद्दिष्टे प्रामुख्याने वनस्पतींच्या अंतर्गत संरक्षण यंत्रणेच्या निर्मितीमध्ये समोर येतात.

सर्व एकपेशीय व उच्चवर्गीय वनस्पतीमध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, न्यूक्लिक अम्ल आणि मुलभूत विकर असतात, तसेच हरित वनस्पतीमध्ये हरितद्रव्यही असते. हे सर्व प्राथमिक चयापचयीय घटक आहेत आणि त्यांची निर्मिती ही उर्जेवर आधारित जीवरासायनिक क्रिया आहे. वनस्पतीमध्ये पुढे जशी उत्क्रांती होत गेली तसे प्राथमिक चयापचयात बदल होत गेले आणि नवी जैवरासायनिक द्रव्ये पेशीमध्ये तयार झाली. या द्रव्यांचा उपयोग वनस्पतीमध्ये प्रामुख्याने प्राथमिक चयापचय घटकांचे संरक्षण करण्यासाठी होत होता; त्याचबरोबर त्यांच्यावरची दुसरी महत्त्वाची जबाबदारी म्हणजे प्रजोत्पादन व त्यासाठी करावे लागणारे बदल आणि त्यासोबत फळे पिकविण्याची प्रक्रिया.

वनस्पतींच्या प्रजोत्पादन क्रियेमध्ये फूलनिर्मिती, पाकळ्यांचे आकर्षक रंग आणि सुवास, पराग सिंचन, फलधारणा, फलपक्वता आणि बीजनिर्मिती असे विविध प्रकार क्रमवारपद्धतीने येतात. पराग सिंचनासाठी कीटकावर अवलंबून असणार्‍या वनस्पती त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची जैविक रसायने तयार करत असतात. टर्पिने आणि उडनशील द्रव्ये (Volatile oils) याच प्रकारात मोडतात. ही दुय्यम चयापचयी रसायने वनस्पतींच्या अतंर्गत संरक्षणप्रणालीचा भाग असून प्रत्येक सपुष्प वनस्पतीमध्ये आढळतात. आकर्षणाबरोबरच संरक्षणाचे कामही हे करत असतात. गुलाब, मोगरा, सोनचाफा, सुरंगी यांचा गोड सुवास हा या द्रव्यापासूनच असतो. लिंबूवर्गीय फळांच्या सालीचा आगळावेगळा वासही यांच्यामुळेच येतो.

टर्पिने हे फक्त फुले आणि फळांच्या सालीपुरतेच मर्यादित नसून अनेक सुगंधित वनस्पतींच्या पानामध्येसुद्धा असतात. उदा., तुळस, पुदिना, मरवा, पचौली. अनेक सूचिपर्णी वृक्ष मोठया प्रमाणावर टर्पिनेची निर्मिती करतात. टर्पिने हे हायड्रोकार्बन आहे, तर टर्पिनॉइडे हे टर्पिनेचे ऑक्सिडेटीव्ह रूप आहे आणि टर्पिनेएवढेच तेसुद्धा कार्यक्षम असते. टर्पिने हे उडनशील द्रव्य असल्यामुळे त्याचा स्वाद आणि सुवास लगेच जाणवतो. हा एक स्निग्ध पदार्थ असून त्याची निर्मिती ठराविक ठिकाणी असणार्‍या सजीव पेशीमध्ये होते. उपलब्ध नैसर्गिक द्रव्यामधील ६० टक्के द्रव्ये टर्पिनेमध्ये येतात. सपुष्प आणि अपुष्प वनस्पतीच्या विश्वामध्ये आज हजारो प्रकारची टर्पिने आढळलेली आहेत. एकटया भांग (Cannabis sativa) या वनस्पतीमध्ये १४० प्रकारचे टर्पिने आढळतात. टर्पिनेचे भव्य विश्व विविध प्रकारचे सुगंधी गवत, निलगिरीची पाने, दालचिनीची साल, कोथिंबीर, लव्हेंडर, लवंग, वेलची, चहा, रोझमेरी, आलिव्ह, आद्रक, सुंठ, हळद, मोहरी, कापूर, मेंथॉल यांत विखुरलेले आढळते. सूर्यफुलाचा पिवळा रंग, टोमॅटोचा लाल रंगसुसुद्धा टर्पिनेमुळेच आकर्षक असतो.

वनस्पतीमधील टर्पिने फक्त स्वाद आणि सुवासांचेच काम करतात असे नाही, तर वनस्पतींचे रक्षणसुद्धा करतात. तुळशीच्या पानामधील टर्पीन द्रव्य कवकापासून तुळशीचे रक्षण तर करतेच, पण मानवाच्याही उपयोगी पडते. गजकर्ण आणि सोरायसीस यांच्या उपचारपद्धतीत त्यांचा समावेश होतो. जेव्हा वातावरण बदल, पाण्याचा अभाव किंवा वाढत्या उष्णतामानास वनस्पती सामोरे जातात तेव्हा त्यांच्यामधील टर्पिने वाढलेले असतात. औषधी वनस्पतीचे उत्पादन घेताना आणि त्यांच्यापासून औषधी गुणधर्म प्राप्त करताना उत्पादक त्यांना मुद्दाम पाण्याचा ताण देतात तो याचसाठी. भांग या वनस्पतीमधील टर्पिनेपासून विविध मादक पदार्थ तयार करून त्याचे सेवन केले जाते. मानसोपचार तज्ञांच्या मते ते अस्त्र औषध म्हणून  नैराश्यवादावर अतिशय  गुणकारी आहे. टर्पिनेचा उपयोग वनस्पती स्वरक्षणाबरोबरच जीवनसत्व – अ निर्मितीमध्येसुद्धा करतात.

टर्पिने आणि वातावरण बदल, वाढते तापमान यांचा जवळचा संबंध आहे. परिस्थितीशी सामना करण्यासाठी वनस्पती टर्पिनेचे प्रमाण पेशीमध्ये वाढवितात. याच गुणधर्माचा फायदा घेत कृषिशास्त्रज्ञ दुष्काळ व तापमान प्रतिबधंक प्रजातीच्या संशोधनास महत्त्व देत आहेत. वनस्पतीमधील टर्पिनेच्या या गुणांचा उपयोग मानवाने विविध प्रकारचे कीडनाशक, जैविक उर्जानिर्मिती, रंग, लाकूड पॉलिश, स्वच्छतागृहामधील प्रसाधने, सुगंधी अत्तरे, अन्नाचा स्वाद वाढविणे यासाठी केला असून त्यांचा वैद्यकीय क्षेत्रामधील अस्थमा, श्वासनलिका प्राणवायुसाठी मोकळ्या करणे, मेंदूस उत्तेजन देणे हे उपयोग आजही अधोरेखित आहेत. टर्पिने या नैसर्गिक द्रव्यांनी अन्न प्रक्रिया, रंग प्रसाधने आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांती केली आहे. वातावरण बदल, पिकांच्या नवीन जाती – प्रजाती तयार करण्यासाठी टर्पिनेच्या संशोधनाचे नवे दालन यासाठीच आशादायी ठरू शकते.

संदर्भ :

  • Firm, Richard. Natures Chemicals, Oxford Publication, 2010.
  • Tholl,D. Biosynthesis and biological functions of terpenoids in plant in Adv. Biochem Eng, Biotechnol, 148:63-106. 2015.
  • https://www.youtube.com/watch?V=e31wycet06Q

समीक्षक : शरद चाफेकर