कार्ल मार्क्सची क्रांतीची कल्पना : क्रांतीच्या संकल्पना विविध आहेत. हिंसक क्रांती व अहिंसक क्रांती असे स्थूल मानाने वर्गीकरण केले जाते. राजवट बदलणे या मूलभूत अर्थाने क्रांती ही संकल्पना वापरली जाते.कार्ल मार्क्सने क्रांती हे  मानवी इतिहासाचे गतीतत्व मानले आहे. कोणत्याही समाजातील उत्पादन व्यवहार त्या समाजाचा पाया असतो व उत्पादन संबंधांमधील बदलांमधून त्या समाजाचा इतिहास घडत जातो. माणसे स्वतःच त्यांचा इतिहास घडवितात. या अर्थाने उत्पादन संबंधांमध्ये बदल करण्याची क्रांतिकारक कृती माणसे संकल्पपूर्वक करीत असतात. हा विचार कार्लमार्क्सने त्याच्या युरोपीय इतिहासाच्या अभ्यासावरून मांडला, असे दिसते. क्रांती होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण व्हावी लागते. दुसऱ्या शब्दात मनात येईल तेव्हा क्रांती करता येत नाही. मार्क्स म्हणतो की, कोणत्याही समाजामध्ये त्या समाजातील संपत्तीचे उत्पादन करणारे श्रमजीवी वर्ग आणि त्यांना दास्यात ठेवणारे प्रबळ वर्ग यांच्यात तणावाचे संबंध असतात. त्यांच्यात मधूनमधून संघर्षही होत असतो. पण श्रमिकांना त्यांचे दास्य संपविण्यासाठी प्रचलित उत्पादन संबंध बदलणे आवश्यक असते. या मुद्द्यावर क्रांती संकल्पनेत भर दिला जातो.हे संबंध पूर्णपणे ऐच्छिक नसतात. उत्पादनशक्तींचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊ लागला व प्रचलित उत्पादन संबंध ह्या विकासाच्या आड येऊ लागले तरच नव्या उत्पादन संबंधाची शक्यता निर्माण होते. एकीकडे नव्या उत्पादन शक्तींचा उदय व दुसरीकडेआपले शोषण संपविण्यास उत्सुक असलेला श्रमजीवी वर्ग या दोन परस्पर पोषक घटकांमधून क्रांती घडून येते असा कार्ल मार्क्सचा युक्तिवाद आहे.

भांडवलशाही समाजातील आर्थिक, राजकीय घडामोडींचा वेध घेऊन क्रांतीची शक्यता अजमावणे हा कार्लमार्क्सच्या अभ्यासाचा प्रमुख विषय होता. कामगारवर्गाचे शोषण करीत राहिल्याखेरीज भांडवलशाही टिकून राहू शकत नाही, हे शोषण थांबविण्यासाठी कामगार वर्गाला भांडवली उत्पादन संबंधाविरुद्धच उठाव करावा लागेल, त्यामुळे भांडवलदार वर्गाविरुद्धच्या त्यांच्या संघर्षामध्ये संपूर्ण समाजाच्या पुनर्रचनेचीच कल्पना अनुस्यूत आहे, असे दाखविण्याचा कार्लमार्क्सने प्रयत्न केला. भांडवलशाहीचा जसजसा विकास होत जातो तसतसा कामगार वर्ग संघटित होत जातो, त्याला राजकीय प्रगल्भता येते व अखेर तो क्रांतिकारक कृती करण्यास सज्ज होतो असा कार्लमार्क्सचा विचार आहे.

कार्ल मार्क्सची क्रांतीची संकल्पना राजवटी बरोबरच उत्पादन संबंध आणि उत्पादन शक्तीमध्ये बदल करण्याचा विचार मांडते. त्यामुळे या क्रांतीला राजकीय क्रांतीबरोबर सामाजिक क्रांती असेही म्हटले जाते. अनेक वेळा त्याच ग्रेट क्रांती असा शब्द वापरला जातो.

संदर्भ

  • व्होरा, राजेंद्र, सुहास, पळशीकर (संपा), राज्यशास्त्रकोश, दास्ताने प्रकाशन पुणे.
  • David A. Snow (ed), Encyclopedia of social and political movements (Online),Revolution, (Rene, Rojns, Jeff Goodwin),Blackwell publishing Ltd.