कोणता पदार्थ अस्तित्वात आहे, हे पाहण्याची सोपी कसोटी जॉर्ज बर्क्लीने (१६८५‒१७५३) दिली आहे. त्याचे सूत्र म्हणजे लॅटिन भाषेत “एसे एस्ट पर्सिपी”(किंवा पर्किपी/पर्चिपी) या नावाने दिले आहे. इंग्रजीतल्या ‘Existence is Perception’ साठी मराठीत ‘असणे म्हणजे अवलोकन’ असा शब्दप्रयोग केला जातो.

अवलोकन झाले किंवा नाही झाले तरी झाडे, पाने, फळे, फुले, नद्या, पशु-पक्षी, माणसे, तारे, चंद्र, सूर्य अस्तित्वात असतात अशी आपली सर्वसाधारण समजूत असते. वास्तववाद त्यास पुष्टी देतो. मात्र बर्क्लीसारखे चिद्वादी ह्या समजुतीचा पुनर्विचार करण्यास भाग पाडतात.

सफरचंदाच्या उदाहरणाने हा मुद्दा स्पष्ट केला जातो. सफरचंद म्हणजे आकार, रंग, रूप, स्पर्श, चव, स्वाद, वगैरे गुणधर्मांचा समुच्चय. ह्या गुणधर्मांव्यतिरिक्त सफरचंद नसते. त्यापलीकडे सफरचंद नावाची अशी काही वस्तू नसते. बर्क्लीपूर्वी जॉन लॉक ह्या ब्रिटिश तत्त्वज्ञाने असा जड द्रव्यपदार्थ  मानला. तो कसा असतो हे माहीत नसले, तरीही त्याचे अस्तित्व लॉकने स्वीकारले नि बर्कलीने नाकारले. बर्क्लीच्या मते अस्तित्व म्हणजे अवलोकन. अस्तित्वाचे दोन प्रकार असतात : १. ज्याचे अवलोकन केले जाते तो विषय व २. जे अवलोकन करतात ते विषयी : जो सतत अवलोकन करतो, तो नित्य विषयी परमेश्वर. तो अखंड, निरंतर अवलोकन करतो म्हणून त्याला नित्य अवलोकन-कर्ता (Eternal Perceiver) म्ह्टले जाते. तो सतत अवलोकन करत असल्यामुळे समुद्र, नद्या, डोंगर-दऱ्या, सूर्य, चंद्र, तारे वगैरे जड पदार्थांना सातत्य मिळते. त्यामुळे अवलोकन केल्यास अस्तित्व व नसल्यास अस्तित्वनाश होण्याचा धोका टळतो. सभोवतीचे पदार्थ काही क्षणोक्षणी नष्ट होत नाहीत तसेच निर्माणही होत नाहीत. परिवर्तन होत असले, तरी मुळात अस्तित्व टिकून राहते ते परमेश्वरी अवलोकनामुळे, असे बर्क्लीचे म्हणणे आहे व तो बिशप असल्याने त्याच्या भूमिकेशी अत्यंत सुसंगत आहे. परमेश्वर मानल्याने व तसे स्पष्ट केल्याने माझ्याखेरीज अन्य कुणी अस्तित्वात नाही अशी धारणा असणाऱ्या अहंमात्रवादास थारा मिळत नाही.

एकंदरीत, हात गरम करून बर्फाच्या पाण्यात घातला, तर पाणी फार थंड वाटत नाही. अशा प्रकारच्या अनुभवांच्या आधारे बर्क्लीने व्यक्तिनिष्ठ चिद्वादाची मांडणी केली आहे. संभाव्य आक्षेपांना उत्तरे देऊन हा प्रकार म्हणजे धूळ उडवून मग ती डोळ्यात गेल्यावर दिसत नसल्याचा कांगावा करणे होय, असेही त्याने म्हटले आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जॉर्ज एडवर्ड मूरने आपल्या ‘Refutation of Idealism’ ह्या लेखात बर्क्लीचे म्हणणे खोडून काढले व धादांत वास्तववाद (Common-sense Realism) मांडला.

व्यक्तिनिष्ठ चिद्वादाची सांगड तौलनिक तत्त्वज्ञानात बौद्धांच्या विज्ञानवादाशी, शंकराचार्यांच्या केवलाद्वैती भूमिकेशी व सूफी संत रूमी यांच्या तत्त्वविचारांशी घातली जाते. ‘एसे एस्ट पर्सिपी’ मानणे हा बर्क्लीच्या व्यक्तिनिष्ठ चिद्वादाचा कणा आहे.

संदर्भ :

                                                                                                                                                                  समीक्षक : वृषाली कुलकर्णी