हब्बा खातून : (सु. सोळावे शतक). मध्ययुगीन कालखंडातील प्रसिद्ध काश्मीरी कवयित्री. जन्म चंद्रहार (काश्मीर) येथे. मूळ नाव ‘झून. हब्बा खातून हे टोपणनाव. वडील शेतकरी होते. त्यांनी तिला अरबी आणि फार्सी भाषांत पारंगत केले. पाचव्या वर्षीच तिने कुराणा चे शिक्षण घेतले. एका अर्धशिक्षित मुलाशी तिचा विवाह झाला मात्र तेथे केवळ वेदनाच तिच्या वाट्याला आल्या. तिला संगीताचे पुरेसे ज्ञान होते. पुढे तिच्या सुमधुर गायनाने प्रभावित झालेला चकवंशीय राजा युसुफशाह याच्याशी ती विवाहबद्ध झाली.
राजघराण्याच्या पाठबळामुळे हब्बा खातूनला आपल्या संगीत व काव्यरचनांसाठी सर्व साधने उपलब्ध झाली. दरबारातील संगीतकारांच्या मदतीने तिने फार्सी संगीतावर प्रभुत्व मिळविले, तसेच काश्मीरी साहित्याला राजदरबारात प्रतिष्ठा मिळवून दिली. तिने काश्मीरी ‘वचुन’ लिहिले. काश्मीरमधील स्थानिक संगीत आणि फार्सी संगीत यांचा मेळ घातला आणि त्यातून वचुनमध्ये मकाम-ए-रास्त हे अभिनव काव्य रचले. तिच्या वचुनमध्ये रोव्ह, भक्तिगीत, चरित-काव्य यांचा मिलाफ पाहायला मिळतो. तत्कालीन प्रतिकूल राजकीय परिस्थितीत काश्मीरमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना तिच्या देशभक्तिपर भावगीतांनी जागविली. इ. स. १५८७ मध्ये मोगल सम्राट अकबराने युसुफशाहचा पराभव केला आणि त्याला निर्वासित म्हणून बिहारमध्ये पाठवले. त्यानंतर हब्बा खातून चंद्रहारला परतली. ती संन्यस्त वृत्तीने राहू लागली. जनतेला स्थिर शासन देण्यात अपयशी ठरलेला युसुफशाह, पराभवाने व मानभंगाने खचलेली काश्मीरी जनता या सर्व घडामोडींबद्दल वाटणारे दुःख तिने आपल्या काव्यातून व्यक्त केले आहे.
हब्बा खातूनचे साहित्य लिखित स्वरूपात उपलब्ध नाही. तिच्या मृत्यूनंतरच्या तीन शतकांत तिच्या साहित्याचे मौखिक स्वरूपातच जतन झाले आहे. तिच्या काव्यातील भाषा सुलभ आणि करुणरसभरित असल्याने ते लोकगीतांप्रमाणे पारंपरिक पद्धतीने गायिले जाते. प्रणयाच्या कोमल भावना, मानसिक यातना आणि त्या काळातील स्त्रीच्या सामाजिक स्थितीचे प्रतिबिंब तिच्या काव्यातून आढळते. तिच्या काव्यातील शृंगाररसभरित रचनाही अप्रतिम आहेत. त्यांत विरहशृंगार प्रामुख्याने मांडलेला दिसतो. तिच्या विरहगीतांना काश्मीरीत ‘लोलकाव्य’ म्हणतात. काश्मीरी प्रेमकवितेची ती उद्गाती मानली जाते. या कवितांना काश्मीरी भाषेत ‘वत्संस’ म्हणतात. काश्मीरच्या इतिहासातील अतिशय खडतर काळात तिने लिहिलेल्या कविता तत्कालीन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीच्या निदर्शक ठरतात. काव्यरचनेच्या रूढ वाटेने न जाता तिने आपली भावनिक आंदोलने प्रामाणिकपणे मांडून वेगळेपण जपले. फार्सी ही शासकीय भाषा होती तथापि तिने मातृभाषेतूनच काव्यरचनेस प्राधान्य दिले. अनेक मिथके, दंतकथा तिच्या व्यक्तिमत्त्वाभोवती दिसतात. झेलमच्या काठी तिने देहत्याग केला, असे म्हटले जाते.
संदर्भ :
- Kalla, Krishan Lal, Nightingale of Kashmr: The Literary Heritage of Kashmir, Mittal Publications.(1985).