भारतातील एक अग्रगण्य फिल्म सोसायटी. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट-दिग्दर्शक सत्यजित राय यांनी स्थापन केलेल्या ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडिया’ या शिखर संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे तिचे कार्य सुरू असते. प्रभात चित्र मंडळाची स्थापना ५ जुलै १९६८ रोजी चित्रपट प्रसिद्धीकुशल पत्रकार वसंत साठे यांच्या नेतृत्त्वाखाली झाली. प्रभात चित्र मंडळाच्या उभारणीमध्ये सुधीर नांदगावकर, दिनकर गांगल, जयंत धर्माधिकारी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. जगभरातले उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून चित्रपटसंस्कृतीचा प्रसार करणे हे मंडळाचे प्रमुख ध्येय आहे. गेली पन्नास वर्षे हे कार्य अविरतपणे सुरू आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय चित्रपटसृष्टीचे वैभव म्हणून समजल्या गेलेल्या प्रभात फिल्म कंपनीचे स्मरण कायम राहावे, या उद्देशाने संस्थापकांनी फिल्म सोसायटीला प्रभात चित्र मंडळ असे नाव दिले.

वसंत साठे यांच्यानंतर अमोल पालेकर यांनी प्रभातचे अध्यक्षपद भूषविले. सध्या किरण व्ही. शांताराम प्रभात चित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत. सुरुवातीपासून ते आतापर्यंत सुधीर नांदगावकर, विनय नेवाळकर, अशोक राणे आणि संतोष पाठारे यांनी प्रभात चित्र मंडळाच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळली आहे. १९७० मध्ये दादासाहेब फाळके जन्मशताब्दी साजरी करण्यात प्रभातने पुढाकार घेतला. दादासाहेब फाळके निर्मित राजा हरिश्चंद्र (१९१३) या पहिल्या भारतीय चित्रपटाची चार रिळे पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयास उपलब्ध करून देण्यासाठी प्रभातने विशेष प्रयत्न केले. जागतिक तसेच भारतीय दिग्दर्शकांच्या दर्जेदार चित्रपटांचे प्रदर्शन व त्यांवरील चर्चासत्रे या प्रमुख कार्याच्या बरोबरीनेच चित्रपट अभ्यास वर्ग, चित्रपट रसास्वाद कार्यशाळा यांचे आयोजन करणे, महाराष्ट्रातील प्रेक्षकांमध्ये चित्रपट साक्षरतेचा प्रसार व्हावा यासाठी रसिक मेळावा, चित्रपटसृष्टीतील कलावंतांचा कार्यगौरव, चित्रपटांवरील परिसंवाद, आदिवासी भागात चित्रपटमेळा, मुंबईतील गृहिणींसाठी त्यांच्या सोयीच्या वेळात खास चित्रपटांचे खेळ यांसारखे उपक्रम प्रभात चित्र मंडळाने राबवले आहेत. चित्रपटसंस्कृतीचा प्रसार मराठीतून करण्यासाठी वास्तव रूपवाणी या चित्रपट अभ्यासविषयक नियतकालिकाचे गेली पंचवीस वर्षे सातत्याने प्रभातकडून प्रकाशन केले जात आहे. विजय तेंडुलकर, श्री. पु. भागवत, विजया राज्याध्यक्ष, भालचंद्र नेमाडे, वसंत आबाजी डहाके, अरुण खोपकर, कमलाकर नाडकर्णी , रत्नाकर मतकरी, नीला भागवत, पुष्पा भावे, अमरेन्द्र धनेश्वर, गणेश मतकरी, श्यामला वनारसे, श्रीकांत बोजेवार यांसारख्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी वास्तव रूपवाणीसाठी लेखन केले आहे. वास्तव रूपवाणी या नियतकालिकाच्या संपादनाची धुरा सुधीर नांदगावकर, अभिजित देशपांडे व संतोष पाठारे यांनी सांभाळली आहे.

मुंबईतील पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मामी (मुंबई अकादमी ऑफ द मुव्हिंग इमेज) व आशियायी महोत्सव सुरू करून मुंबईत चित्रपट महोत्सवाची संस्कृती रुजविण्याचे श्रेय प्रभात चित्र मंडळाकडे जाते. भारतीय चित्रपटाच्या शतकपूर्तीच्या वर्षापासून प्रभात चित्र मंडळ ‘चित्रभारती’ या पुरस्कार विजेत्या प्रादेशिक चित्रपट महोत्सवाचे आयोजन करत असते. नवोदित दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रभाततर्फे दरवर्षी लघुपटांची स्पर्धा आयोजित केली जाते.

प्रभात चित्र मंडळ ही चित्रपटरसिकांची चळवळ आहे. आज चित्रपटमाध्यम मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्याद्वारे आपल्या घरात आलेले आहे. या माध्यमाचा प्रभाव पाहता चित्रपटसाक्षरतेची आत्यंतिक गरज आहे. प्रभात चित्र मंडळ हे कार्य निष्ठेने पार पाडत आहे.

समीक्षक : अभिजित देशपांडे