व्यक्ती, कृती किंवा घटना यांचे वास्तवदर्शन घडविणारे चित्रपट म्हणजे माहितीपट. काल्पनिकतेला स्थान न देता घडणाऱ्या घटनांपैकी, वास्तवापैकी काहींची नोंद करून, मुद्रित करून संकलित केलेले चित्र म्हणजे माहितीपट. ते तयार करण्याचे हेतू मुख्यत: मार्गदर्शन करणे, माहिती देणे, नोंद करणे किंवा दस्तऐवज म्हणून जतन करणे, हे असतात. असे चित्रपट घटना घडत असताना चित्रित होतात किंवा घटना घडून गेल्यावर त्यांची विविध माध्यमांतील उपलब्ध माहिती एकत्रित करून, मुलाखती घेऊन केले जातात.

१८९५ मध्ये ल्यूमेअर बंधूंनी दाखवलेल्या पहिल्या मूक-चलचित्रफिती हे माहितीपट किंवा नोंदपटच होते. स्थानकामध्ये येणारी आगगाडी, कारखान्यांतून बाहेर पडणारे लोक अशा घटना कॅमेरा समोर ठेवून चित्रित करणे, ही हालणारी हुबेहूब चित्रे पडद्यावर दाखवून प्रेक्षकांना अचंबित करणे एवढाच मर्यादित हेतू तेव्हा होता. अशा चित्रफीतींना प्रत्यक्षदर्शन (Actuality) म्हणत. त्यानंतर १८९८ ते १९०६ या काळात युजिन-लुई डॉयन या शल्यविशारदासाठी बोलिस्लाव्ह मातुझेव्हस्की (Boleslav Matuszewski) या पोलिश छायाचित्रकाराने अनेक शस्त्रक्रिया चलचित्रित केल्या. लक्षात न आलेल्या व्यावसायिक चुका सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो हे त्यामागील कारण होते.

बोलिस्लाव्ह मातुझेव्हस्की यांनी १८९८ मध्ये प्रकाशित केलेल्या ए न्यू सोर्स ऑफ हिस्टरी ( A New Source of History) आणि ॲनिमेटेड फोटोग्राफी (Animated photography) या पुस्तकांतून चित्रपट हे दस्तऐवजीकरण करण्याचे साधन असल्याची प्रथम दखल घेतली. रोमानियातील गेऑर्गे मरिनेस्यू मज्जातंतूतज्ञांनी मज्जासंस्थेच्या आजारांबद्दल चित्रफीती करून घेतल्या. त्याला त्यांनी ‘चलचित्रीकरणाद्वारे अभ्यास’ असे संबोधले.

१८९६ मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर ऊर्फ सावे दादा यांनी मुंबईतील हॅंगिंग गार्डन येथे कुस्तीचे चित्रण केले. द रेस्लर  हा भारतातला आणि भारतीयाने तयार केलेला पहिला माहितीपट होय. त्यांनी १९०३ पर्यंत सर रॅंगलर मि. आर. पी. परांजपे, मॅन अँड हिज मंकी, दिल्ली दरबार  इत्यादी सात माहितीपट केले.

१९०० ते १९२० या दरम्यान रम्यस्थळांच्या प्रवासविषयक चित्रफिती लोकप्रिय झाल्या. १८९६ मध्ये सुरू झालेली Pathe ही फ्रेंच कंपनी १९०० पासून माहितीपटांची निर्मिती, वितरण करणारी सगळ्यात मोठी संस्था होती. ती अजूनही कार्यरत आहे. १९१४ मध्ये इन द लँड ऑफ हेडहंटर्स  हा एडवर्ड हंटर यांनी कॅनडातल्या मूळवासी (इंडियन) लोकांना अभिनेते म्हणून घेऊन वास्तवदर्शी पद्धतीने माहितीपट केला होता. त्यानंतर १९२२ मध्ये रॉबर्ट फ्लाहर्टी यांनी नानुक ऑफ द नॉर्थ हा कॅनेडियन आर्क्टिक प्रदेशातल्या कुटुंबावर माहितीपट केला. या काळापर्यंत चित्रपटांचे ललितनाट्य आणि माहितीपट असे स्वतंत्र प्रकार धरले जात नसत; परंतु आता अशा चित्रपटांना नाट्यीकृत-माहितीपट (डॉक्युड्रामा) म्हणतात. उपलब्ध असलेल्या सामग्रीतले काय नोंदवून घ्यायचे, ते विशिष्ट कॅमेरा तंत्राने कसे घ्यायचे, काय वगळायचे, निवडलेल्या चित्रणाची जोडणी कोणता अर्थ ध्वनित व्हावा म्हणून कशी करायची, याचा निर्णय दिग्दर्शक घेत असतो. त्यामुळे माहितीपट पूर्ण, खरेखुरे वास्तव नोंदवतात का? अशा प्रश्नावरील चर्चा याचकाळात सुरू झाल्या. याच काळात चित्रपट रंगीत करण्याचे प्रयोग करणाऱ्यांनी माहितीपट केले. विथ अवर किंग अँड क्वीन थ्रू इंडिया  हा १९१२ मधला ब्रिटिश माहितीपट किनेमाकलर या पद्धतीने केलेला होता. चित्रपटनिर्मितीच्या नवनव्या तंत्रातून काय-काय आणि कसे अभिव्यक्त करता येते याचे पडताळे येऊ लागले, तसतसे माहितीपटांचे स्वरूप बदलू लागले. १९२० ते ३० या काळात सिटी सिंफनी  या प्रकारचे शहरे आणि त्यातली माणसे चित्रित करणारे, आवा गार्दे (Avant-Garde) चित्रपट तयार झाले. त्यावर अमूर्त चित्रकलेचा प्रभाव होता. उदा., वॉल्टर रटमन यांचा बर्लिन सिंफनी ऑफ अ ग्रेट सिटी (१९२७) आणि झिगा वेर्तव यांचा द मॅन विथ द मूव्ही कॅमेरा (१९२९) होय.

झिगा वेर्तव यांनी रशियात किनो प्रावदा (चित्रपटीय सत्य) नावाचा न्यूज रील (बातम्यांची मालिका) प्रकार सुरू केला. उपलब्ध असलेले वैविध्यपूर्ण छायाचित्रणतंत्र वापरून वास्तवाचे केलेले चित्रण हे डोळ्यांनी पाहता येणाऱ्या गोष्टींपेक्षा अधिक दाखवत असते, असा त्यांचा दावा होता. न्यूज रील हा प्रकार अनेक देशांत युद्धाच्या आणि इतर बातम्या देण्यासाठी दूरचित्रवाणीचा प्रसार होईपर्यंत वापरला जात होता. यांमध्ये मुद्दाम घडवून आणलेले प्रसंगही असत तसेच वास्तवाची प्रत्यक्ष नोंद किती आणि प्रचार किती याबद्दल मतांतरे असत.

१९२० ते चाळीसच्या दशकात प्रचारपटांची खूप निर्मिती झाली. विशिष्ट माहिती, विचारसरणी प्रसृत करून प्रेक्षकांना त्यांच्या प्रभावाखाली आणणे, या हेतूने ते तयार केले जात असत. हिटलरच्या नाझी जर्मनीतील सरकारसाठी जोसेफ गोबेल्स यांनी मानसशास्त्रीय तंत्र वापरून असे चित्रपट करून घेतले. लेनी यांचा ट्रायंफ ऑफ द विल (१९३५) हा हिटलरसाठी करवून घेतलेला महत्त्वाचा माहितीपट अथवा प्रचारपट. जॉन ग्रिअरसन यांनी कॅनडात फिल्म बोर्ड स्थापन करून नाझी प्रचाराला प्रत्युत्तर देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती ब्रिटिश वसाहतींतील सरकारांसाठी केली. अमेरिकेतही दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने सहभागी व्हावे असा मतप्रवाह तयार करण्यासाठी फ्रँक काप्रा या दिग्दर्शकाने १९४२–४४ या काळात सरकारसाठी बातमीदारी पद्धतीचे प्रचारपट तयार केले.

डाव्या विचारसरणीच्या जोरिस इवेन्स, हेन्री स्टोर्क यांचा बेल्जियन कोळसा खाणीतील कामगारांच्या संपाविषयीचा माहितीपट महत्त्वाचा मानला जातो. इवेन्स यांनी सोव्हिएत रशिया, कम्युनिस्ट चीन आणि नंतर उत्तर व्हिएतनामसाठी राजकीय माहितीपट केले.

भारतातही १९३०–४५ या काळात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील घटना, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनांची चित्रणे, आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक-कलावास्तव, महायुद्धातला सहभाग, नागरिकांना मार्गदर्शन अशा तऱ्हेचे माहितीपट इन्फर्मेशन फिल्म्स ऑफ इंडियाच्या अखत्यारित तयार होत होते. एझरा मीर, भास्कर राव, कृष्णा गोपाल हे त्याकाळातील महत्त्वाचे दिग्दर्शक.

कॅमेरा अधिक लहान, हलका, सहज खांद्यावर ठेवून चित्रीकरण करता येण्यासारखा झाला आणि चित्रीकरणाबरोबरच ध्वनीमुद्रण (sync sound) उपलब्ध झाल्याने १९५०–६० च्या दशकात वास्तव नोंदणारा चित्रपट (cinema Verite), निरीक्षणात्मक चित्रपट (Observational films) आणि सामान्य चित्रपट अशा माहितीपटांच्या विधा वापरल्या जाऊ लागल्या. या काळातला चिल्ड्रन ऑफ हिरोशिमा  हा कांटो शिंटो यांचा माहितीपट महत्त्वाचा आहे. वसाहतवाद, हुकूमशाही यांच्या विरोधात राजकीय माहितीपटही या काळात तयार झाले.

भारतात ब्रिटिश काळात ‘फिल्म ॲडव्हायजरी बोर्ड’ ‘इन्फर्मेशन फिल्म्स ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन न्यूज परेड’ या संस्थांतर्फे माहितीपटांची निर्मिती होत असे. स्वातंत्र्यानंतर १९४८ साली ‘फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना झाली. १९१६ सालातल्या सिनेमॅटोग्राफ कायद्याचे भारतीयीकरण १९५२ मध्ये झाले आणि चित्रपटगृहांत मुख्य चित्रपटांच्या आधी माहितीपट/बातमीपत्रे दाखवणे अनिवार्य झाले. दूरचित्रवाणीचा प्रसार होईपर्यंत हे चालू होते. नंतर सरकारी अखत्यारीतील दूरदर्शन या वाहिनीवरून माहितीपट प्रसारित केले जाऊ लागले. स्वतंत्र भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक इतिहासाच्या नोंदी करण्याचे महत्त्वाचे काम फिल्म्स डिव्हिजनने निर्मिती केलेल्या माहितीपटांनी केले. त्याचबरोबर कलात्मक माहितीपटही तयार झाले. हे माहितीपट संस्थेतल्या आणि बाहेरच्या नामांकित निर्माता-दिग्ददर्शकांनीही केले. सरकारसाठी केलेली निर्मिती असल्याने काही माहितीपटांवर/बातमीपत्रांवर सरकारचे प्रचारपट असल्याची टीका बहुतांश देशांत होत राहते. खाजगी निर्मितीतही वास्तव किती आणि ‘निर्मितरचित’ किती अशा तऱ्हेची टीका होते. माहितीपट निर्माण करणारे बी. डी. गर्ग यांनी माहितीपटांचा औपचारिक अभ्यास करून माहितीपटांसंबंधीच्या विविध पैलूंचे अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे.

भारतात विविध वाहिन्यांचा आणि महाजालकाचा (इंटरनेटचा) प्रसार झाल्यावर माहितीपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही माध्यमे मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ लागली. त्यामुळे खाजगी/वैयक्तिक निर्मिती वाढली; परंतु निश्चित आर्थिक परतावा देणारी वितरणासाठीची पद्धती विकसित झाली नाही. त्यामुळे नव्वद मिनिटे किंवा त्याहून मोठे असलेले (फीचर लेंग्थ) काही थोडेच माहितीपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होतात. अमेरिकेत आणि इतर देशांत प्रदर्शित होऊन खूप लोकप्रिय झालेल्या, मोठा आर्थिक परतावा देणाऱ्या माहितीपटांच्या यादीत मायकेल मूर यांचे सर्वाधिक चित्रपट आहेत. रॉजर अँड मी (१९८९) आणि फॅरनहाईट 9/11 (२००४) हे त्यांतील महत्त्वाचे माहितीपट. जागतिक पातळीवर चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेले आणि चांगला आर्थिक परतावा मिळवणारे काही अमेरिकन चित्रपट पुढीलप्रमाणे मार्च ऑफ पेंग्विन (२००४), अर्थ (२००९), द इनकन्व्हीनिअंट ट्रुथ (२००६). चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेले भारतातील काही माहितीपट असे – जंग और अमन (आनंद पटवर्धन), मालेगावके सुपरमॅन (फैझा अहमद), कटियाबाज (दीप्ती कक्कर, फहाद मुस्तफा), वर्ल्ड बिफोर हर (निशा पहुजा) इत्यादी.

समीक्षण : अभिजीत देशपांडे