संगीताचा प्रचार व प्रसार याकरिता कार्यरत असणारे मंडळ. गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्या हस्ते ट्रिनिटी क्लबची सुरुवात १९०८ साली मुंबई येथील गिरगाव येथे झाली.  पुढे बालगंधर्व व मास्टर कृष्णराव हे ही या क्लबमध्ये येऊ लागले आणि ‘त्रिमूर्ती संगीत मंडळ’ या नावाने हा क्लब ओळखला जाऊ लागला. त्यावेळी कलाकारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित होता. बाहेर गावाहून कलाकार मुंबईत आले तर त्यांच्या रियाजाची तसेच निवासाची सोय करण्यास योग्य जागा नव्हती. ही गरज ओळखून कलाकारांच्या सोयीसाठी गिरगावातील चाळीतील एक खोली हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या एका चाहत्याने भास्करबुवांना दिली. पुढे याच जागी क्लबची स्थापना होऊन शास्त्रीय संगीताच्या चाहत्यांसाठी व कलाकारांसाठी हे एक हक्काचे ठिकाण झाले.

ट्रिनिटी संगीत विद्यालयाचा कक्ष

ट्रिनिटी क्लबमध्ये येऊन कार्यक्रम करण्यासाठी कोणतेही मूल्य असू नये, असे त्या काळात संस्थापकांनी व तत्कालीन संचालकांनी ठरविले. नियमितपणे क्लबमध्ये येणे हेच क्लबचे सभासदत्व. नवोदितांनी क्लबमध्ये यावे. बुजुर्गांनी आपली कला सादर करावी व जमेल तसे नवोदितांना मार्गदर्शन करावे. श्रोत्यांना शास्त्रीय संगीताचा लाभ देणे व क्लब गाता-जागता ठेवणे, असा क्लबचा प्रघात होता.

गेल्या शंभर वर्षांत क्लबच्या व्यासपीठावर संगीताची सेवा करणाऱ्यांमध्ये पं. भास्करबुवा बखले, मास्टर कृष्णराव, बालगंधर्व, गोविंद सदाशिव टेंबे, पाध्येबुवा, सवाई गंधर्व, कुमार गंधर्व, बी. आर. देवधर, मोगूबाई कुर्डीकर, अंजनीबाई लोलयेकर, अमीर हुसैनखाँ, पु. ल. देशपांडे, खादीम हुसैनखाँ, पं. सी. आर्. व्यास (चिंतामण रघुनाथ व्यास), वसंतराव देशपांडे, पं. राम मराठे, जितेंद्र अभिषेकी, रत्नाकर पै इत्यादींचा समावेश होतो. आपल्या कलेमुळे स्मृतीत राहिलेल्या कलावंतांपैकी काहींची छायाचित्रे क्लबच्या जागेत लावली आहेत.

सध्याच्या काळातही ट्रिनिटी क्लबमध्ये साप्ताहिक बैठकी सुरू असतात. गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. नाना बोडस, केदार बोडस, पं. सत्यशील देशपांडे, भातखंडे पितापुत्र, राजा काळे, रामदास कामत, भूपाल पणशीकर, पं. सुरेश तळवळकर, आरती अंकलीकर-टिकेकर, अरुण कशाळकर, कै. पं. बबनराव हळदणकर, बाळासाहेब टिकेकर इ. दिग्गज तसेच इतर होतकरू कलाकारांनी या क्लबमध्ये आपली सांगितिक सेवा सादर केली आहे.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा