डी.आय.एन. : ( स्थापना –१९१७, बर्लिन )

डी.आय.एन.ची इमारत, बर्लिन.

डी.आय.एन. ही संज्ञा Deutsches Institutfur Normung या जर्मन प्रमाणसंस्थेचे संक्षिप्त रूप आहे. डी.आय.एन. ही जर्मन देशाची राष्ट्रीय पातळीवरची जीवनावश्यक वस्तूंची प्रमाणे तयार करणारी संस्था आहे व ती आय.एस.ओ.* (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टन्डर्डायझेशन ) ह्या आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्थेत जर्मन देशाचे प्रतिनिधित्व करते. या संस्थेचे मुख्यालय बर्लिनला असून, तिच्या खाती ३०,००० विविध मानके जमा आहेत व त्यात तंत्रज्ञानातील सर्व क्षेत्रे समाविष्ट आहेत. ह्या संस्थेचा प्रारंभ जरी १९१७ साली झाला तरी १९७५ पासून ती डी.आय.एन.या नावाने ओळखू लागली. या संस्थेतर्फे निर्माण होणार्‍या प्रमाणांना डीन (DIN) म्हणून संबोधिले जाते. उदा., DIN 476 हे कागदांच्या आकारासंबधी असली प्रमाण होय. अशा प्रकारच्या या जर्मन संस्थेच्या प्रमाणांचा प्रारंभीचा मसुदा E DIN # असा अधोरेखित केलेला असतो, तर प्राथमिक प्रमाण DIN V # असे निर्देशित करतात (व म्हणजे Vornorm चा अर्थ प्रसिद्धपूर्व असा आहे). जर एखादे प्रमाण यूरोपियन प्रमाणाची (EN) आवृत्ती असेल तर ते DIN EN# असे ओळखले जाते आणि ते एखाद्या आय.एस.ओ. प्रमाणाची आवृत्ती असेल तर DINISO# अशा क्रमांकाने नोंदले जाते. जर एखादे प्रमाण यूरोपियन EN आणि आंतर राष्ट्रीय ISO प्रमाणाशी सुसंगत असेल तर  त्याचा उल्लेख DINENISO# असा केला जातो.

ही प्रमाणे तयार करण्याची ठराविक प्रक्रिया असते व त्यात कुणालाही भाग घेता येतो. मात्र, ही प्रमाणे निर्माण करताना सुरक्षा, पर्यावरण, आरोग्य, ग्राहकांचे हित या बाबी कटाक्षाने विचारात घेतल्या जातात. एखाद्या उत्पादक कंपनीने या प्रमाण निर्मिती प्रक्रियेत भाग घेतला तर त्या कंपनीला अन्य क्षेत्रातले तज्ञ व त्यांच्याच क्षेत्रातले स्पर्धक यांच्याशी संपर्क साधता येतो आणि आपला वरचढपणा सिद्ध करता येतो.

हायपरलिंकसाठी मजकूर: आय.एस.ओ.ही आंतरराष्ट्रीय प्रमाणसंस्था असून तिचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आहे. जगातील १६३ देशांच्या राष्ट्रीय पातळीवरील मानक संस्था या सर्वात मोठ्या संस्थेशी जोडलेल्या आहेत. तिची तीन लोकप्रिय प्रमाणे आहेत; ISO/IEC 17025 हे प्रमाण इयत्तीकरण आणि विश्लेषण करणार्‍या प्रयोगशाळांना मार्गदर्शन करते, (हे प्रमाण IEC-इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन या संघटनेशी निगडीत आहे), ISO 9001 हे प्रमाण व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वे विशद करते आणि ISO/IEC 27001 हे प्रमाण सुरक्षा व्यवस्थापनाची माहिती पुरविते. याशिवाय, ISO 14001 हे पर्यावरण व्यवस्थापन, ISO 26000 हे कंपन्यांची सामाजिक बांधिलकी, ISO 31000 हे आपत्ती प्रबंधन, ISO 50001 हे ऊर्जा व्यवस्थापन, ISO 45001 हे व्यावसायिक आरोग्य व सुरक्षा, ISO 13485 हे वैद्यकीय उपकरणे, ISO 37001 हे लाचलुचपतविरोधी कृतीसंबधी योजनांची आखणी विशद करणारे, अशी  ही काही वैशिष्टपूर्ण मानके आहेत.

संदर्भ :

समीक्षक : हेमचंद्र प्रधान