ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डस- बी.आय.एस. : ( स्थापना – १९४६ / २३ डिसेंबर १९८६ ) बी.आय.एस. ही भारतीय राष्ट्रीय मानक संस्था सुरूवातीला ‘इंडियन स्टँडर्डस’ (आय.एस.) या नावाने ओळखली जात असे. तिची स्थापना १९४६ मध्ये झाली होती. प्रारंभी, १८६० च्या सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट अंतर्गत ही संस्थेची नोंदणी झाली होती. पुढे, १९८६ मध्ये नवे नाव घेऊन ती केंद्रीय ग्राहकहित, अन्न आणि सार्वजनिक वाटप या खात्याच्या अखत्यारीत आली. या सांघिक संस्थेत राज्य व केंद्रीय सरकार, विज्ञान संशोधन संस्था, ग्राहक पंचायत यामधून निवडलेले २५ सदस्य सहभागी असतात. या संस्थेचे मुख्यालय दिल्लीला आणि शाखा कोलकता, चेन्नई, मुंबई व चंदिगढ येथे आहेत. या संस्थेवर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या टेक्निकल बॅरीयर टु ट्रेड या कराराची भारतात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २०१५ साली मंजूर झालेल्या इंडियन स्टँडर्डस बिलानुसार निरनिराळी उत्पादने, विविध सेवा, भिन्न पदार्थ, प्रक्रिया आणि पद्धती यांचे मानकीकरण करण्याची जबाबदारी या संस्थेवर सोपविण्यात आली.

याशिवाय, औद्योगिक संस्थांना प्रमाणपत्रे देणे, प्रशिक्षण देणे, विकसित देशांना प्रशिक्षणासाठी सहकार्य करणे आणि मानकीकरण ही कामेही बी. आय. एस. करते. बी.आय.एस.च्या देशभर ८ प्रयोगशाळा आहेत व त्यात रसायने, अन्न, विद्युत, यंत्रे यांच्याशी निगडीत नमुने संबधित मानकानुसार तपासले जातात. या संस्थेतर्फे विविध प्रयोगशाळांना दर्जा प्रमाणपत्र देण्याचे कार्य देखील होते. ही संस्था लघुउद्योगांना उत्तेजन देण्याची जबाबदारी सुद्धा घेते. ही संस्था इंटरनॅशनल स्टँडर्डस ऑर्गनायझेशन (ISO) या आंतरराष्ट्रीय मानकसंस्थेची संस्थापक-सदस्य आहे व तिचे देशात प्रतिनिधित्व देखील करते. तसेच, इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन * (IEC) आणि दी वर्ल्ड स्टँडर्डस सर्व्हीस नेटवर्क (WSSN) या संघटनांचे ती देशातील प्रतिनिधी आहे.

विविध क्षेत्रासाठी भारतीय मानके निर्माण करणे, त्यांची अचूकतेसंबधी शहानिशा करणे आणि प्रसार करणे हे बी.आय.एस.चे पायाभूत कार्य होय. जानेवारी २०१९ पर्यंत, ही संस्था २०,००० मानकांची धनी झालेली आहे. गुणवत्ता, पर्यावरण, अन्न, व्यावसायिक स्वास्थ्य व सुरक्षा, वैद्यकीय साधने, रस्ते, दुग्ध उत्पादने, सामाजिक बांधिलकी, आपत्ती निवारण, ऊर्जा सवंर्धन अशा क्षेत्रात सुयोग्य व्यवस्थापसाठी ही संस्था मार्गदर्शन करते. आपले उत्पादन निर्यात करणार्‍या तसेच देशात आयात होणार्‍या उत्पदनासाठी बी.आय.एस.ने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

हायपरलिंक साठी मजकूर: * इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन (IEC) ही आंतरराष्ट्रीय संस्था इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रोनिक व संबंधित विषयावर मानके तयार करून प्रकाशित करत असते. ही संस्था ऊर्जानिर्मिती, तिची वाहतूक आणि वाटप यासंबधीच्या क्षेत्रात मार्गदर्शन करते. (हे प्रमाणपत्र IEC –इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल संघटनेशी निगडीत कमिशन आहे.)

समीक्षक : हेमचंद्र प्रधान