कॅड सॉफ्टवेअरच्या साहाय्याने तयार करण्यात आलेला इमारतीचा अभिकल्प

संगणकसाधित अभिकल्प म्हणजेच CAD या संगणकीय सॉफ्टवेअरचा उपयोग विविध अभिकल्प तयार करणे, त्यांमध्ये सुधारणा करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्याचे सर्वोत्तमीकरण करणे याकरिता केला जातो. कॅडच्या साहाय्याने तयार करण्यात येणाऱ्या रचनांमध्ये भौमितिक परिमाणांद्वारे (Geometric Dimensions) परिभाषित संगणक नमुना तयार करणे किंवा प्रतिकृती तयार करणे आवश्यक असते. कॅड सॉफ्टवेअर स्वयंचलित प्रक्रियेमुळे हाताने तयार केलेल्या मसुदाची जागा घेते. या सॉफ्टवेअरचा वापर द्विमितीय (2D) रेखाचित्र किंवा त्रिमितीय (3D) नमुना किंवा प्रतिकृती तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे उपयोजन अभियांत्रिकी व वास्तुशास्त्र या क्षेत्रांत प्रामुख्याने वापरले जाते. जेव्हा ते प्रथम सादर केले गेले तेव्हा कॅड हा एक आर्थिक प्रस्ताव नव्हता, कारण त्या वेळी संगणक महाग होते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संगणकाची वाढलेली क्षमता आणि सूक्ष्मप्रक्रियकाच्या (Microprocessor) आगमनाने अभियंत्यांना कॅड अनुप्रयुक्ती (Application) वापरण्याची मुभा मिळाली.

 

द्विमितीय कॅड रेखांकन

कॅडची वैशिष्ट्ये  :

  • सादरीकरण चिन्हे आणि वर्णनात्मक मजकूर यांसह रेखाचित्र तयार करता येतात .
  • स्क्रीन सादरीकरण तयार करण्यासाठी कॅडचा उपयोग होऊ शकतो.
  • रेखाचित्रांमध्ये त्वरित बदल करण्याची लवचिकता (Flexibility) या सॉफ्टवेअरमध्ये असते.
  • रेखाचित्राचे घटक हलवता किंवा कॉपी करता येतात, रेखाचित्राचा आकार वाढवता किंवा कमी करता येतो, रेखांकनांची एकापेक्षा जास्त प्रत बनवता येते इ. संपादन क्षमता यामध्ये असते.
  • कॅड रेखांकन आयोजित करणे जलद आणि सोयीस्कर असते. संगणकाच्या हार्ड डिस्कवर हजारो रेखाचित्रे असू शकतात आणि ती काही सेकंदांमध्ये उघडता येणे शक्य असते.

त्रिमितीय कॅड अभिकल्प

त्रिमितीय कॅड अभिकल्प

कॅडचे उपयुक्तता :

  • पारंपरिक हस्तलिखित रेखांकन पद्धतींपेक्षा कॅड प्रणालीचा वापर करून रेखांकन तयार करण्यास कमी वेळ लागतो.
  • माहिती एका तबकडीवर (Disk) संग्रहित केली जाऊ शकते.
  • या सॉफ्टवेअरमध्ये काम करणे कमी खर्चिक असून अचूकता अधिक आहे.
  • विद्यमान कल्पनेत सुधारणा करून वेळेची बचत होते.
  • मोटारगाड्या व विमानांचे अभिकल्प करण्यामध्ये हे उपयोजन आणि त्याची प्रगत स्वरूपे वापरली जातात.

 

संदर्भ :

  1. https://www.inc.com/encyclopedia/computer-aided-design-cad-and-computer-aided-cam.html
  2. https://www.autodesk.in/solutions/cad-software
  3. https://whatis.techtarget.com/definition/CAD-computer-aided-design
  4. https://www.designtechcadacademy.com/knowledge-base/introduction-to-cad
  5. https://slideplayer.com/slide/6655105/

समीक्षक : विजयकुमार नायक