प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपतींचे दानशूर घराणे. आधुनिक खनिज तेल उद्योगाचा विकास करण्याचा, त्याचप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणावर परोपकारी व जनहितकारक कृत्ये करण्याचे श्रेय या उद्योगसमूहाला द्यावे लागेल. विशेषत: अमेरिकन वैद्यकशास्त्राला आधुनिकीकरणाचा साज देण्याचे कर्तृत्व या घराण्याचेच होय.

जॉन डेव्हिसन रॉकफेलर

जॉन डेव्हिसन रॉकफेलर (John Davison Rockefeller) : (८ जुलै १८३९−२३ मे १९३७). जॉन हे या घराण्यातील पहिले उद्योगपती, Standard Oil उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेलउद्योगाचा संस्थापक. त्यांचा जन्म न्यूयॉर्क राज्यातील टिओगा परगण्यातील रिचफर्ड या गावी झाला. त्यांचे वडील एक छोटेसे व्यापारी होते. १८५३ मध्ये रॉकफेलरकुटुंब न्यूयॉर्कहून ओहायओ राज्यातील क्लीव्हलँड शहरी स्थायिक झाले. बॅप्टिस्ट संस्कारांखाली वाढलेल्या जॉन यांनी माध्यमिक शालेय शिक्षण व व्यावसायिक महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर १८५९ मध्ये क्लार्क यांच्या भागीदारीत दलालीचा धंदा सुरू केला. पेनसिल्व्हेनियातील टिट्‌सव्हिल येथे १८५९ मध्ये ड्रेक यांनी पहिल्या खनिज तेल विहिरीचे यशस्वी रीत्या वेधन केले. १८६३ मध्ये जॉन यांनी ‘अँड्रूज, क्लार्क अँड कंपनी’ स्थापन करून तेलशुद्धीकरण उद्योग सुरू केला. दोन वर्षांनी ‘रॉकफेलर अँड अँड्रूज कंपनी’ स्थापण्यात आली.

विल्यम रॉकफेलर (William Rockefeller) : (३१ मे १८४१−२४ जून १९२२). हे जॉनचे भाऊ. त्यांचा जन्म रिचफर्ड येथे झाला. त्यांनी जॉन यांच्या भागीदारीत क्लीव्हलँड येथे ‘विल्यम रॉकफेलर अँड कंपनी’ या नावाची दुसरी तेल कंपनी उभारली. १८६७ मध्ये वरील दोन्ही कंपन्या ‘रॉकफेलर, अँड्रूज, फ्लँग्लर अँड  कंपनी’ मध्येच एकत्र करण्यात आल्या व पुढे तीन वर्षांनी वरील कंपनीऐवजी ‘Standard Oil Company Of Ohio’ नावाची एक संयुक्त भांडवली कंपनी उभारण्यात येऊन जॉन डी. रॉकफेलर तिचा अध्यक्ष झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कंपनीने संयुक्तीकरण, अनुकूल मालवाहतूक दर, सूट अशा तत्कालीन बेकायदेशीर न समजल्या जाणाऱ्या विविध उपायांचा अवलंब करून सबंध तेल उद्योगावर आपले एकमेव नियंत्रण ठेवले. १८८२ मध्ये ‘Standard Oil Trust’ या मोठ्या उत्पादनसंस्थेची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या नियंत्रणाखाली अमेरिकेतील ९५% तेलउद्योग, लोहधातुकाच्या खाणी, लाकूड कारखाने, वाहतूक उद्योग यांसारखे अनेक उद्योग होते. १८९९ मध्ये ओहायओच्या सर्वोच्च न्यायालयाने शेर्मन ट्रस्टविरोधी कायद्यांनुसार वरील ट्रस्ट अवैध ठरविल्यामुळे त्याचे रूपांतर ‘Standard Oil Company Of New Jersey’ या नियंत्रक कंपनीत करण्यात आले. ही कंपनी १९११ पर्यंत निर्वेध कार्य करीत राहिली. त्या काळी खनिज तेल पदार्थांचे संबंध जगभर अत्यंत कार्यक्षम पद्धतीने उत्पादन व विपणन करणारी सर्वांत मोठी कंपनी म्हणून तिची प्रसिद्धी होती. १९११ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने या नियंत्रक कंपनीचे अनेक स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजन करण्याचा आदेश दिला.

विल्यम रॉकफेलर

जॉन यांनी १८९५ च्या सुमारास Standard Oil Company चे दैनंदिन व्यवस्थापन आपल्या सहकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यास प्रारंभ केला होता. तेलउद्योगातून मिळणाऱ्या प्रचंड नफ्यापैकी बराचसा भाग बाजूला काढून तो लोहधातुकाच्या खाणी व न्यूयॉर्कमधील व्यापारी बँकिंग व्यवसाय या दोन अतिशय विकासक्षम उद्योगांकडे त्यांनी वळविल्याचे आढळते. मोठ्या प्रमाणावरील लोकोपकारविषयक कार्ये, हे जॉन यांच्या जीवनातील दुसरे मोठे वैशिष्ट्य होते. त्यामुळे ते तेलउद्योगापेक्षा या कार्याबद्दल अधिक ख्यातकीर्त झाले होते. आपल्याजवळील अफाट संपत्तीचा काही भाग जनकल्याणार्थ खर्च करणे आवश्यक आहे; नव्हे, ते आपले कर्तव्यच आहे, अशी त्यांची भावना होती. केवळ आपल्या वारसदारांना सर्व संपत्ती मिळणे इष्ट नसल्याचे त्यांचे ठाम मत होते. परिणामी त्यांनी अमेरिकेतील वैद्यकशास्त्र, शिक्षण तसेच संशोधन यांचा विकास व उन्नती यांकरिता लक्षावधी डॉलर खर्च केले. अनेक धर्मादाय निगम उभारून त्यांचे संचालन सुयोग्य विश्वस्तांच्या हाती ठेवले व त्यांच्या दैनंदिन कार्यवाहीसाठी लोककल्याणाची तळमळ व आस्था असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी नेमले. अशा निगमांद्वारा जॉन यांनी सुमारे साठ कोटी डॉलर रकमेचा विनियोग केला. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमधील अतिशय हलाखीची शैक्षणिक अवस्था सुधारण्यासाठी ‘जनरल एज्युकेशन बोर्ड’ हे मंडळ व ‘शिकागो विद्यापीठ’ या दोन्ही संस्था त्यांच्या प्रचंड देणग्यांमधून स्थापन झाल्या. शिकागो विद्यापीठास त्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत सुमारे आठ कोटी डॉलर देणगीरूपाने दिले.

जॉन यांनी १९०२ मध्ये स्थापन केलेल्या ‘General Education Board’ या शैक्षणिक मंडळाचा अमेरिकेतील शिक्षणाचा वंश, धर्म, जात, लिंग यांचा विचार न करता विकास करणे हे उद्दिष्ट होते. १९५२ अखेर या मंडळाने आर्थिक अडचणीमुळे आपले कार्य थांबविले. पन्नास वर्षांच्या कालखंडात महाविद्यालये व विद्यापीठे, वैद्यकीय शाळा, शैक्षणिक संशोधन प्रकल्प व शिष्यवृत्त्या अशा विविध शैक्षणिक कार्यक्रमांसाठी मंडळाने पैसे खर्च केले. १९०१ मध्ये रॉकफेलर वैद्यकीय संशोधन संस्था न्यूयॉर्कमध्ये स्थापण्यात आली. आरोग्यशास्त्र, शस्त्रक्रिया, वैद्यक व तदनुषंगिक शास्त्रे यांच्या संशोधन कार्यात मदत, रोगांचे स्वरूप, कारणे व निवारण या कार्यात मदत व संशोधन आणि यांविषयी झालेल्या व होणाऱ्या संशोधनाचा व ज्ञानाचा सार्वजनिक कल्याणार्थ प्रसार करणे अशी या संस्थेची उद्दिष्टे होती. पुढे याच संस्थेचे रॉकफेलर विद्यापीठामध्ये रूपांतर करण्यात आले. जगातील मानवजातीच्या कल्याणाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉकफेलर प्रतिष्ठान या लोकोपकारी संघटनेची १४ मे १९१३ रोजी स्थापना करण्यात आली.

जॉन यांच्यामध्ये व्हिक्टोरियाकालीन व्यावसायिकाची सर्व वैशिष्ट्ये एकवटलेली होती. व्यवसायातून मिळणारा नफा व त्याचे सामाजिक महत्त्व यांची समानता ओळखण्याची त्यांची आधिभौतिक वृत्ती असली, तरी धर्मश्रद्धा व वैयक्तिक गुण यांना पैसा हा पर्याय ठरू शकत नाही, हे त्यांनी पुरेपूर जाणले होते. वडिलांपासून घेतलेला बॅप्टिस्ट वारसा पुरेपूर अंगी वसल्यामुळे मद्य वा तंबाखू यांच्या सेवनापासून ते पूर्णत: अलिप्त होते. स्वत: जॉन किंवा त्यांची पत्नी या दोघांनाही उच्च खाद्यपदार्थ, उत्तम फर्निचर यांबाबत अजिबात पर्वा नव्हती; मात्र न्यूयॉर्क राज्यातील टॅरीटाउन गावाजवळील ‘Pocantico Hills’ ह्या आपल्या वसाहतीचा (Estate) उत्कृष्ट तऱ्हेने विकास करण्यात त्यांनी मोठी रुची बाळगली. त्यांनी दीर्घायू आयुष्य व्यतीत केले.

जॉन यांचे फ्लॉरिडा राज्यातील ऑर्मंड बीच येथे निधन झाले.

जॉन डेव्हिसन रॉकफेलर, दुसरा (John Davison Rockefeller, Second) : (२९ जानेवारी १८७४−११ मे १९६०). जॉन दुसरा हे संस्थापक रॉकफेलर यांचा एकुलता एक मुलगा आणि रॉकफेलर औद्योगिक साम्राज्याचा एकमेव वारस. त्यांचा जन्म ओहोयओ राज्यातील क्लीव्हलँड येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लॉरा स्पेलमन असे होते. १८९७ मध्ये ब्राउन विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यावर ते आपल्या वडिलांच्या उद्योग-व्यवसायांत शिरले. आपल्या वडिलांप्रमाणे उद्योग, दानशूरत्व आणि लोकहितपर कार्ये यांच्यात ते गढून गेले. १९३० नंतर जॉन दुसरा यांनी मॅनहॅटम विभागात ‘रॉकफेलर सेंटर’ या गगनचुंबी वास्तुसमूहाची उभारणी करण्याकडे लक्ष दिले. हा वास्तुसमूह १९२९−१९४० या काळात न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन विभागात सुमारे पाच हेक्टर क्षेत्रात १४ इमारतींच्या स्वरूपात रचण्यात आला.

जॉन डेव्हिसन रॉकफेलर, दुसरा

दुसरे महायुद्ध (World War Second) काळात त्यांनी अमेरिकन लष्करातील सैनिक व त्यांचे कुटुंबीय यांच्या साहाय्यार्थ ‘United Service Organizations’ ही संस्था उभारण्यात पुढाकार घेतला. युद्धोत्तर काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांचे प्रधान कार्यालय न्यूयॉर्क शहरात बांधण्यासाठी आपल्या मालकीची जमीन देऊ केली. १९५८ मध्ये त्यांनी न्यूयॉर्कमध्ये ‘Lincoln Center For The Performing Arts’ या संस्थेसाठी ५० लक्ष डॉलरची देणगी दिली. तसेच त्यांनी ‘लॉरा स्पेलमन रॉकफेलर स्मारक’ उभारण्यास मदत केली. १९२३ मध्ये त्यांनी निसर्गविज्ञाने, मानव्यविद्या व शेती या क्षेत्रांसाठी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ’ स्थापिले; परंतु १९३७ मध्ये पैशाच्या अभावी ते बंद करण्यात आले. नैसर्गिक साधनसंपत्ती व ऐतिहासिक वास्तू यांचे रक्षण व संवर्धन करण्याबाबत अतिशय आस्था व आवड असल्याने जॉन दुसरा यांनी त्यासाठी मोठमोठ्या रकमा खर्च केल्या. त्यांची इतर लोकोपकारी कार्ये पुढीलप्रमाणे : व्हर्जिनिया राज्यातील वसाहतकालीन विल्यम्सबर्ग शहराची पुनर्रचना; न्यूयॉर्क सिटीमधील गरीब भागातील लोकांसाठी कमी भाड्याची घरे बांधून देण्याच्या प्रकल्पाची कार्यवाही; याच शहरातील ‘रिव्हरसाइड चर्च’ व ‘म्यूझीयम ऑफ मॉर्डन आर्ट’ यांकरिता देणग्या. जॉन दुसरा यांनी दोन वेळा विवाह केले. ॲबी ग्रीन ॲल्ड्रिच या त्यांच्या पहिल्या पत्नीला ९ नोव्हेंबर १९०३ मध्ये ॲबी ही एक मुलगी आणि जॉन डी. तिसरा, नेल्सन, लॉरेन्स, विन्थ्रॉप व डेव्हिड असे पाच मुलगे झाले. ही रॉकफेलर घराण्याची तिसरी पिढी होय.

जॉन दुसरा यांचे टक्सन अरिझोना येथे निधन झाले.

जॉन डेव्हिसन रॉकफेलर, तिसरा (John Davison Rockefeller, Third) :

जॉन डेव्हिसन रॉकफेलर, तिसरा

(२१ मार्च १९०६−१० जुलै १९७८) जॉन डी. दुसरा यांचा जॉन तिसरा हा सर्वांत मोठा मुलगा. जॉन तिसरा यांचा जन्म न्यूयॉर्क सिटी येथे झाला. १९२९ साली प्रिन्स्टन विद्यापीठातून पदवी मिळवून ते रॉकफेलर उद्योगसमूहात शिरला. १९३१ सालापासून ते रॉकफेलरस्थापित विविध संस्था व समित्या यांचा विश्वस्त म्हणून काम पाहू लागले. दुसऱ्या महायुद्धकाळात (१९४२−१९४५) त्यांनी अमेरिकन नौदलात काम केले. यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवन टाळून स्वत:स परोपकारी कार्यास वाहून घेतले. त्यांनी पुढील संस्थांसाठी कार्य केले : न्यूयॉर्क सिटीमधील ‘लिंकन सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्‌स’; नवी दिल्ली येथील ‘Indian International Center,’ ‘The International House Of Japan’ व ‘Asia Society’. ‘रॉकफेलर प्रतिष्ठाना’च्या अध्यक्षीय कारकीर्दीत त्यांनी आंतरराष्ट्रीय संस्थांना भरघोस आर्थिक साह्य दिले. त्याचबरोबर १९५२ मध्ये कुटुंब नियोजन संशोधन केंद्र म्हणून ‘लोकसंख्या परिषद’ (Population Council) ही संस्था उभारली व तिच्या विकासार्थ स्वत:च्या निधीतून भरपूर अर्थसाह्य केले.

जॉन तिसरा यांचे माउंट प्लेझंट (न्यूयॉर्क) येथे निधन झाले.

जॉन (जे.) डेव्हिसन रॉकफेलर, चौथा (John (J.) Davison Rockefeller, Fourth) : (१८ जून १९३७). जॉन तिसरा यांचा हा मुलगा. यांचा वेस्ट व्हर्जिनिया राज्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग होता. १९७७ मध्ये ते त्या राज्याचे गव्हर्नर बनले.

जॉन (जे.) डेव्हिसन रॉकफेलर, चौथा

नेल्सन ॲल्ड्रिच रॉकफेलर (Nelson Aldrich Rockefeller) : (८ जुलै १९०८−२६ जानेवारी १९७९). जॉन डेव्हिसन रॉकफेलर, दुसरा यांचा हा द्वितीय क्रमांकाचा मुलगा. त्यांचा जन्म मेन राज्यातील बार हार्बर येथे झाला. त्यांनी १९३० मध्ये न्यू हँपशर राज्याच्या हॅनोव्हर शहरातील डार्टमथ महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी मिळविली. पुढे त्यांनी ‘Chess National Bank (पुढे Chess Manhattan)’, ‘Rockefeller Center’, ‘Creole Petroleum’ इत्यादी विविध रॉकफेलर समूहातील संस्थांमध्ये काम केले. १९३५ ते १९४० या काळात Creole Petroleum या Standard Oilच्या व्हेनेझुएला येथील संलग्न कंपनीचा संचालक म्हणून काम करीत असताना नेल्सन यांनी स्पॅनिश भाषा आत्मसात केली. तसेच लॅटिन अमेरिकेविषयी त्यांच्या मनात मोठा जिव्हाळा निर्माण झाला. म्हणूनच १९४० मध्ये आंतर-अमेरिकन घडामोडींचा समन्वयक या पदावर ते स्टेट डिपार्टमेंटमध्ये काम करू लागले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक्लिन डेलॅनो रूझवेल्ट (Franklin Delano Roosevelt) यांच्या कारकीर्दीत स्वत: रिपब्लिकन पक्षाचा असूनही नेल्सन हे पुढे १९४८ मध्ये उपपरराष्ट्रमंत्री पदावर पोचले. १९४५ मध्ये नेल्सन यांनी केंद्रशासनाची सेवा सोडली व पुढच्याच वर्षी लॅटिन अमेरिकेतील विकसनशील देशांना साह्य करण्याच्या उद्देशाने आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत ना नफा तत्त्वावर त्यांनी एक खाजगी संस्था स्थापिली. १९५० मध्ये हॅरी एस. ट्रूमन यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत आंतरराष्ट्रीय विकास सल्लागार मंडळाचा अध्यक्ष या नात्याने ते पुन्हा शासकीय सेवेत रुजू झाले. १९५२ मध्ये नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ड्‌वाइट डेव्हिड आयझनहौअर (Dwight David Eisenhower) यांनी शासकीय संघटनांसंबंधीच्या राष्ट्राध्यक्षीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नेल्सन यांची नियुक्ती केली. १९५३ ते १९५५ या काळात नेल्सन यांनी नवनिर्मित आरोग्य-शिक्षण-कल्याण या खात्यांचा अवर सचिव म्हणून काम पाहिले. सक्रिय राजकारणात भाग घेण्याच्या उद्देशाने नेल्सन यांनी १९५६ मध्ये शासकीय सेवा सोडली.

नेल्सन ॲल्ड्रिच रॉकफेलर

१९५८ मध्ये न्यूयॉर्क राज्याच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत ॲव्हरेल हॅरिमन यांच्याविरुद्ध उभे राहून नेल्सन यांनी ५ लाखांच्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली. यामुळे १९६० च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे त्यांची निवड निश्चित करण्यात आली; परंतु रिचर्ड एम. निक्सनसाठी त्यांनी आपले नाव मागे घेतले. न्यूयॉर्क राज्याच्या गव्हर्नरपदी आणखी तीन वेळा (१९६२, १९६६ व १९७०) निवडून आलेल्या नेल्सन यांनी न्यूयॉर्क राज्यात अनेक वित्तीय, सांस्कृतिक व शैक्षणिक सुधारणा अमलात आणल्या. १९६४ मध्ये निक्सन हे राजकारणातून निवृत्त झाल्यावर नेल्सन यांनी पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षातर्फे राष्ट्राध्यक्षपदाकरिता आपली उमेदवारी जाहीर केली; परंतु पुराणमतवादी गटाचा नेता म्हणून बॅरी गोल्डवॉटर यांनी रिपब्लिकन पक्षातीलच उदारमतवादी मवाळ गटाचा नेता असलेल्या नेल्सन यांचा अल्प मतांनी पराभव केला. पुढे १९६८ मधील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीसाठी नेल्सन यांनी दुसऱ्यांदा आपली उमेदवारी जाहीर केली; परंतु निक्सन यांच्कयाडून ते पराभूत झाले. १९७० मध्ये नेल्सन यांना न्यूयॉर्क राज्याचा गव्हर्नर म्हणून चौथ्या वेळेस विजय मिळाला. या वेळी त्यांनी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा प्रधान न्यायाधीश आर्थर गोल्डबर्ग यांचा सुमारे ७ लक्ष मताधिक्याने पराभव केला. नेल्सन हे १९७३ साली गव्हर्नरपदावरून निवृत्त झाले व त्यांनी ‘National Commission On Critical Choices For America’ व ‘Commission ON Water Quality’ या दोन आयोगांचे काम पाहण्यास प्रारंभ केला; परंतु निक्सन यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने व १९ डिसेंबर १९७४ रोजी जेराल्ड आर. फोर्ड हा उपराष्ट्राध्यक्षपदावरून राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे नेल्सन यांची उपराष्ट्राध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. फोर्ड प्रशासन जानेवारी १९७७ मध्ये संपुष्टात येईपर्यंत नेल्सन हे दोन वर्षांपर्यंत उपराष्ट्राध्यक्ष होते. नेल्सन  रॉकफेलर हे कलेचा आश्रयदाता तसेच कलावस्तुसंग्राहक म्हणून प्रख्यात होते. ते ‘Museum Of Modern Art’ या संग्रहालयाचा विश्वस्त आणि ‘Museum Of Primitive Art’ या संग्रहालयाचा संस्थापक-अध्यक्ष होते. नेल्सन यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन झाले.

लॉरेन्स स्पेलमन रॉकफेलर

लॉरेन्स स्पेलमन रॉकफेलर (Laurance Spelman Rockefeller) : (२६ मे १९१०−११ जुलै २००४). जॉन डेव्हिसन रॉकफेलर, दुसरा यांचा हा तिसरा मुलगा. त्यांचा जन्म न्यूयॉर्क सिटी येथे झाला. त्यांनी १९३२ मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची पदवी मिळवली. नंतर त्यांनी वकिली शिक्षणासाठी हॉर्व्हर्ड लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला; परंतु त्यांनी ते अर्ध्यातच सोडले. पाचही रॉकफेलर भावंडांमध्ये लॉरेन्स हे सर्वाधिक व्यवसायाभिमुखी बनले. त्यांनी १९३८ मध्ये ‘ईस्टर्न एअरलाइन्स’ ही विमान कंपनी स्थापन करण्यात पुढाकार घेतला व अल्पावधीतच कंपनीचे भाग सर्वाधिक प्रमाणात मिळवून ते जवळजवळ तिचा मालकच बनले. ‘McDonald Aircraft Corporation’ या विमान कंपनीतही त्यांची भागीदारी होती. दुसऱ्या महायुद्धकाळात त्यांनी अमेरिकन नौदलात सेवा बजावली. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात लॉरेन्स यांनी हॉटेलव्यवसायाप्रमाणेच आण्विक उपकरणे व संगणक यांच्या उद्योगांमध्ये प्रचंड गुंतवणूक केली. अनेक पर्यावरणविषयक समित्या, आयोग, संस्था तसेच अनेक प्रतिष्ठाने, धर्मादाय संस्था यांच्याशी ते अध्यक्ष, उपाध्यक्ष, सल्लागार अशा विविध नात्यांनी संबद्ध होते. ‘रीडर्स डायजेस्ट असोसिएशन’चा ते १९७३ पासून संचालक होते. ते १९८० ते १९८२ या काळात ‘रॉकफेलर ब्रदर्स फंड’ य संस्थेचा उपाध्यक्ष व नंतर अध्यक्ष होते. त्यांना अनेक मानसन्मान लाभले . त्यांचा मेरी फ्रेंच हिच्याशी विवाह झाला होता. त्यांना चार अपत्ये झाली.

लॉरेन्स यांचा न्यूयॉर्क सिटी येथे निधन झाले.

विन्थ्रॉप रॉकफेलर

(Winthrop Rockefeller) : (१ मे १९१२−२२ फेब्रुवारी १९७३). जॉन डेव्हिसन रॉकफेलर, दुसरा यांचा हा चौथा मुलगा. त्यांचा जन्म न्यूयॉर्क सिटी येथे झाला. १९३४ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण सोडून टेक्ससच्या तेलखाणींवर, चेस नॅशनल बँक, ग्रेटर न्यूयॉर्क फंड अशा विविध संस्थांमध्ये त्यांनी काम केले. १९४१ मध्ये ते अमेरिकेच्या भूदलात होते. दुसऱ्या महायुद्धानंतर ते काही काळ न्यूयॉर्क सिटीत वास्तव्यास होते. १९५३ मध्ये आर्कन्सास राज्यात जाऊन तेथे त्यांनी प्रचंड प्रमाणावर प्रायोगिक शेती करण्यास सुरुवात केली. स्थानिक क्षेत्रात त्यांची परोपकारी कृत्ये चालूच होती. १९६७ ते १९७१ या काळात आर्कन्सास राज्याचा गव्हर्नर असताना त्यांनी राज्यातील पहिला किमान वेतन कायदा संमत करून घेतला. त्यांनी तुरुंगामध्ये व्यापक प्रमाणावर सुधारणा केल्या आणि राज्यातील सर्व शाळा सर्व जातींच्या मुलांमुलींसाठी खुल्या करण्यात यश मिळविले. आर्कन्सासमध्ये एका नमुनेदार शाळेसाठी त्यांनी १२.५० लक्ष डॉलरची देणगी दिली. अनेक नागरी प्रकल्प व वैद्यकीय चिकित्सालये यांना भरघोस देणग्या दिल्या; तसेच लिटल रॉक शहरात आर्ट्‌स सेंटरच्या वास्तूसाठी मोठी देणगी दिली. त्यांचा जीन्नीट मॅक्डोनेल हिच्याशी विवाह झाला. त्यांना एक मुलगा होता.

विन्थ्रॉप यांचे पाम स्प्रिंग्ज (कॅलिफोर्निया राज्य) येथे निधन झाले.

डेव्हिड रॉकफेलर (David Rockefeller) : (१२ जून १९१५−२० मार्च २०१७ ). जॉन डेव्हिसन रॉकफेलर, दुसरा यांचा हा सर्वांत धाकटा व पाचवा मुलगा आणि रॉकफेलर घराण्याच्या निकटवर्तीय वंशजांपैकी अखेरचा दुवा. त्यांचा जन्म न्यूयॉर्क सिटी येथे झाला. त्यांनी १९३६ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठातून बी. एससी. ही पदवी प्राप्त केली. हार्व्हर्ड येथे व लंडन अर्थशास्त्र संस्थेत अर्थशास्त्र विषयाचा त्यांनी अभ्यास केला. १९४० मध्ये त्यांनी शिकागो विद्यापीठातून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट मिळविली. त्याच वर्षी त्यांचा विवाह मार्गारेट मॅकग्रॉथ हिच्याशी झाला. त्यांना रिचर्ड, डेव्हिड ज्यूनिअर, नेव्हा, पिग्गी, ईलीन व ॲबी ही सहा अपत्ये होती. मार्गारेट मॅकग्रॉथ हिचा १९९६ मध्ये मृत्यू झाला.

डेव्हिड रॉकफेलर.

डेव्हिड हे दुसऱ्या महायुद्धात (१९४२−१९४५) भूदलात होते. युद्धसमाप्तीनंतर १९४६ मध्ये ते न्यूयॉर्क सिटीमधील Chess National Bank मध्ये काम करू लागले. विविध अधिकारपदांवर काम केल्यावर ते १९५२ मध्ये Chess National Bankचा ज्येष्ठ उपाध्यक्ष झाले. Chess National Bank व Bank Of Manhattan Company या दोन्ही बँकांच्या विलीनीकरणात व Chess National Bank च्या (सध्या JP Morgan Chess) स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. या बँकेच्या संचालक मंडळाचा ते १९६९ ते १९८१ या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात बँकेने १९५६ च्या सुएझ युद्धानंतर ईजिप्तमध्ये, तर १९७४ साली तत्कालीन सोव्हिएट महासंघ आणि चीन या देशांत शाखा उघडल्या. आंतरराष्ट्रीय बँकिंगवर त्यांचा विशेष अभ्यास होता. ते अनेक धर्मादाय संस्था, समित्या यांच्याशी विविध नात्यांनी संबद्ध होते. त्यांनी न्यूयॉर्क शहर आणि जगातील अनेक संस्था व प्रकल्पांना मुक्त हस्ताने मदत केली आहे. तसेच ‘World Trade Center’च्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.

रॉकफेलर घराण्याच्या दानशूरतेचे व समाजकार्याचे संस्कार डेव्हिड यांच्यावर लहानपणापासूनच झाले होते. ती परंपरा अबाधित राखत २०१५ मध्ये आपला शंभरावा वाढदिवस साजरा करताना त्यांनी अमेरिकेतील मेन राज्याला तेथील राष्ट्रीय उद्यानाजवळील हजार एकर जमीन दान दिली. त्यांनी आपल्या हयातीत शंभराहून अधिक देशांना सन्मानाने भेटी दिल्या; मात्र दक्षिण आफ्रिकेच्या तत्कालीन वर्णद्वेषी राजवटीशी व्यावसायिक संबंध ठेवल्यामुळे, तसेच १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर पदच्युत झालेल्या इराणच्या शाह यांना अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी मदत केल्यामुळे त्यांना वादाशीही सामना करावा लागला.

डेव्हिड हे अमेरिकी भांडवलशाहीचा पुरस्कर्ता होते; मात्र भांडवलशाही अर्थव्यवस्थेला अधिक कार्यक्षम आणि भ्रष्टाचारमुक्त केले पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यांना अनेक विद्यापीठांकडून डॉक्टरेट व इतर मानसन्मान लाभले आहेत. त्यांचे अनयूज्ड रिसोर्सेस ॲण्ड इकॉनॉमिक वेस्ट (१९४०), क्रिएटिव्ह मॅनेजमेंट इन बँकिंग (१९६४) हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी २००२ मध्ये डेव्हिड रॉकफेलर मेमरीज नावाचे स्वत:चे आत्मचरित्र लिहिले.

डेव्हिड यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी पोकँटिको हिल्स (न्यूयॉर्क) येथे निधन झाले.

रॉकफेलर घराण्याने वैद्यक, शिक्षण, कला, सांस्कृतिक घडामोडी इत्यादी क्षेत्रांना प्रचंड प्रमाणावर आर्थिक साह्य देऊन मानवजातीचे कल्याण व विकास अव्याहत होत राहील यासाठी प्रतिष्ठाने व विविध निधी उभारून दानशूरतेचे कार्य अखंडपणे चालू ठेवले आहे.

संदर्भ :

  • Collier, Peter; Horowitz, David, The Rockefellers : An American Dynasty, New York, 1976.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content