विल्यम आर्थर लेविस : (२३ जानेवारी १९१५ – १५ जून १९९१). कृष्णवर्णीय अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्र विषयाच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. विकसनशील देशांच्या आर्थिक विकासासंदर्भातील संशोधनासाठी अमेरिकन अर्थतज्ज्ञ थीओडोर जेम्स शुल्झ (Theodore James Schulz) यांच्या बरोबरीने प्रथम कृष्णवर्णीय अर्थशास्त्रज्ञ म्हणून लेविस यांना १९७९ मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

लेविस यांचा जन्म त्या वेळच्या ब्रिटिश वसाहत असलेल्या कॅस्ट्रीस, सेंट लूसिया बेटावर झाला. त्यांच्या बालपणीच कुटुंबियांनी इंग्लंडकडे प्रयाण केले. शालेय शिक्षणानंतर १५ वर्षांच्या वयात काही काळ लेखनिक म्हणून काम करीत असताना त्यांनी विद्यापीठीय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा दिली. London School Of Economics या संस्थेत त्यांना शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळाला. तेथून त्यांनी १९३७ मध्ये बी. एससी. ही पदवी प्राप्त केली. १९४० मध्ये त्याच संस्थेतून त्यांनी पीएच. डी. पदवी मिळविली. ‘The Economics Of Loyalty Contractsʼ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्यांनी १९३८ – १९४८ या काळात लंडन विद्यापीठात अर्थशास्त्राचा व्याख्याता म्हणून काम केले. पुढे १९४८ – १९५९ या काळात मँचेस्टर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनकार्य केले. १९५९ मध्ये वेस्ट इंडिजच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये ते प्राचार्य झाले. नंतर त्याच विद्यापीठात त्यांची कुलगुरुपदी नियुक्ती झाली. त्या पदावर १९६३ अखेर त्यांनी काम केले. १९६३ मध्ये अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात सार्वजनिक व आंतरराष्ट्रीय व्यवहार या विषयाचा प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी पत्करली. तेथून निवृत्त होईपर्यंत (१९८३ पर्यंत) अनेक नामवंत भावी अर्थतज्ञांना त्यांनी मार्गदर्शन केले. १९७० – १९७३ या मधल्या काळात ते कॅरिबिअन विकास बँक तसेच कॅरिबिअन संशोधन परिषद या संस्थांचे अध्यक्ष म्हणून काम केले. संयुक्त राष्ट्रसंघ, आफ्रिका, आशिया खंडातील अनेक विकसनशील देशांचे तसेच वेस्ट इंडिजचे आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या सन्मानार्थ कॅस्ट्रीस, सेंट लुसिया या त्यांच्या जन्मगावातील महाविद्यालयाचे आर्थर लेवीस कम्युनिटी कॉलेज असे नामकरण केले गेले.

लेविस यांच्या १९५४ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘Economics Development With Unlimited Supply Of Labourʼ या गाजलेल्या लेखात त्यांनी विकसनशील अर्थशास्त्राबाबत विचार मांडले. त्यालाच पुढे ‘Dual Sector Modelʼ किंवा ‘Lewis Modelʼ असे संबोधले गेले. सदरच्या प्रणालीत विकसित देशांच्या अनुभवांच्या विश्लेषणाद्वारे विकासप्रक्रियेसंबंधीचे स्थूल चित्र त्यांनी रंगविले. भांडवलशाही किंवा खाजगी क्षेत्र अभांडवलशाही किंवा विकसित क्षेत्राकडून श्रमिकांना आकृष्ट करते. सुरुवातीच्या काळात श्रमिकांच्या अमर्याद पुरवठ्यामुळे भांडवलशाही क्षेत्राला जादा वेतन न देता आपला विकास साधता येतो. भांडवलदारांना त्यामुळे अधिक फायदा होतो. फेरगुंतवणूक करून त्यांचा भांडवलसंचयात वाढ होते. थोडक्यात, भांडवलवृद्धीमुळे भांडवलदारांना अविकसित क्षेत्राकडून आणखी जादा श्रमिकांना आपल्याकडे ओढता येते. परिणामत: ‘लेविस प्रणालीʼतील गृहीतके खरी ठरल्यास भांडवलशाही क्षेत्र स्वतंत्रपणे विकासप्रक्रिया राबवते व आर्थिक विकासाचे आधुनिकीकरण होते. जेव्हा असंघटित क्षेत्रातील जादा कर्मचारी विकसित क्षेत्रात पूर्णपणे सामावून घेतले जातात, तेव्हा पुढील भांडवलसंचयामुळे श्रमिकांच्या वेतनात वाढ होते, त्यास ‘लेविसन टर्निंग पॉईंटʼ असे संबोधले जाते. चीनच्या आर्थिक विकासाच्या संदर्भात ‘लेविस प्रणालीʼची व्यापक चर्चा केली जाते. त्यांचे श्रमाधिक्य सिद्धांत (Labour Surplus Model) हे अतिशय साधे, स्पष्ट व विकासाशी प्रत्यक्ष संबंध असणारे मानले जाते. विकासनीतीची चर्चा करण्यासाठी किचकट अशा सांख्यिकी अगर गणिती प्रणालीची आवश्यकता नाही, तर अंत:प्रेरणा व आर्थिक विकासाची भूतकालीन स्थिती या गोष्टींची माहिती महत्त्वाची आहे. श्रमिकांचे स्थलांतर केवळ देशांतर्गत होते असे नाही, तर ते आंतरराष्ट्रीय पातळीवरही होत राहते.

भांडवलशाही देशांत नियोजनाची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय ज्या थोड्या अर्थशास्त्रज्ञांना दिले जाते, त्यांमध्ये लेविस यांचा निश्चितच अंतर्भाव करण्यात येतो. त्यांचे असे प्रतिपादन आहे, की जनतेचा अमाप उत्साह म्हणजे नियोजनाचे वंगणतेल व आर्थिक विकासाचे खनिज तेल आहे. हा उत्साह म्हणजे गतिशील प्रेरणा असून त्यायोगे सर्व काही शक्य होते. प्रगत राष्ट्रांपेक्षा मागास राष्ट्रांत नियोजनाची आवश्यकता अधिक असली, तरी त्याची कार्यवाही अवघड आहे. त्यांच्या मते, काही अर्धविकसित राष्ट्रांतील नेते रुबाबदार गणवेश, सैन्यदले, दूरचित्रवाणी, अगणित दूतावास, सैनिकी कवायती यांसारख्याच आणखी भव्य अशा गोष्टींवर भरमसाट खर्च करीत असतात; तर काही अर्धविकसित देशांत प्रतिष्ठेच्या नावाखाली विमानतळ, आदर्श नगरे, भव्य सरकारी इमारती यांच्या उभारणीवर पैशाची उधळपट्टी केली जाते. एखादा विकासकार्यक्रम-प्रकल्प उभारण्याच्या कामात वरील प्रकारच्या खर्चासाठी केवळ दहा टक्के रक्कम वापरण्यात यावी, असे त्यांचे सांगणे आहे.

तुटीच्या अर्थकारणाचा उत्पादक गुंतवणुकीसाठी उपयोग केला, तर त्या किंमतींवर विपरीत परिणाम होत नाही; कारण वाढते उत्पादन वाढत्या क्रयशक्तीस सामावून घेऊ शकते, असे लेविस यांचे प्रतिपादन आहे. व्यापक नियोजन व आंशिक नियोजन यांमध्ये फरक असल्याचे स्पष्ट करून आंशिक नियोजन हे खंडश: नियोजन असून मागणी व पुरवठा ही दोन्ही प्रभावक्षेत्रे ज्यांत असंतुलित असतात, अशा अर्थव्यवस्थेच्या भागांकरिता त्याचा अवलंब करता येतो, असे त्यांनी म्हटले आहे.

लेविस यांच्या मते, ‘आर्थिक विकास’ व ‘विकास’ या दोन्ही संज्ञा समानार्थी आहेत. काटकसरीचे प्रयत्न, उत्पादनासाठी वाढीव ज्ञानाचा वापर व दरडोई साधनसामग्रीत वाढ, अशा विकासाच्या तीन प्रमुख गरजा असून आर्थिक क्रियांना प्रोत्साहन देण्यात वा त्यांना परावृत्त करण्यात शासनाचा फार महत्त्वाचा वाटा असतो, असे त्यांचे मत आहे. हुषार शासनकर्त्याकडून प्रोत्साहन मिळाल्यावाचून कोणतेही राष्ट्र प्रगती करू शकत नाही. विकासात्मक नियोजन साध्य व्हावयाचे असेल, तर त्यासाठी कार्यक्षम, भ्रष्टाचाररहित प्रशासनाची आवश्यकता असते. असे प्रशासन मागास राष्ट्रांत असणे दुरापास्त आहे. यावर उपाय म्हणून शासनांनी निरंकुश अर्थव्यवहाराचे धोरण अवलंबिले पाहिजे; कारण लेविस यांच्या मते, समंजस राजकारण व सम्यक लोकप्रशासन या दोहोंवर नियोजनाचे यश अवलंबून आहे.

लेविस यांच्या मते, गरीब राष्ट्रे बचत कमी का करतात, या प्रश्नाचे अचूक उत्तर ही राष्ट्रे गरीब आहेत हे नसून त्यांमधील भांडवलशाही क्षेत्र मूलत: लहान आकाराचे असते, हे आहे. नफ्यावर जर उच्च दरांनी कर बसविण्यात आले आणि हे कररूपाने मिळालेले उत्पन्न शासनाने बचत न करता तसेच अधिक उत्पादक उद्योगांमध्ये न गुंतविता चालू कामांवर खर्च करण्याचे ठरविले, त्याचप्रमाणे व्यवस्थापकीय वर्गांना आर्थिक व सामाजिक अशा दोन्ही दृष्टींनी योग्य त्या प्रमाणात मोबदला देण्याचे टाळले गेले, तर त्याचा विकासावर प्रतिकूल परिणाम होईल, असे लेविस ठामपणे म्हणतात. त्यांच्या मते, भांडवलनिर्मितीसाठी चलनवाढीचे धोरण आत्मघातकी ठरते.

आर्थर लेविस हे जगभर सर्जनशील प्रायोगिक विद्वान म्हणून ओळखले जात असून त्यांचे लक्ष आर्थिक समृद्धीचे मूलस्थान जे शेतजमीन, तिच्यावर दृढपणे खिळलेले आढळते. कोणत्याही अर्थव्यवस्थेमधील ‘मानवी भांडवला’चे असणारे महत्त्व त्याचप्रमाणे अल्पविकसित राष्ट्रांमधील कृषिकार्याचे महत्त्व या दोन्ही गोष्टी त्यांच्या लेखनातून सातत्याने प्रतिबिंबित होत असतात.

लेविस यांना नोबेल पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अकादमी निवड मंडळाने त्यांच्याविषयी असे लिहिले आहे की, ‘लेविस यांना सबंध जगामधील दारिद्र्य व गरज यांसंबंधी मोठी आस्था व कळकळ आहे. त्याचप्रमाणे अर्धविकसित राष्ट्रांचा विकास कसा होत राहील, या राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमात उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण कसे करावे, याचा सतत शोध घेण्याचा लेविस यांचा प्रयत्न दिसतो. विकसनशील राष्ट्रांत आढळणारी आर्थिक धोरणे तसेच त्यांनी अंगिकारलेल्या लोकशाही, समाजवाद, साम्यवाद यांसारख्या विविध राजकीय प्रणाल्या यांबाबतचा प्रदीर्घ व विस्तृत अनुभव लेविस यांच्या गाठीशी असल्यामुळे या विकसनशील राष्ट्रांपुढील समस्या व आव्हाने यांची यथार्थ मांडणी ते करू शकतात. सल्लागार व विद्वान अशा दुहेरी नात्याने त्यांनी जगातील अल्पविकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांशी अतिशय बळकट स्नेहबंध जोडले. घानाच्या प्रधानमंत्र्यांचा संयुक्त राष्ट्रनियोजित सल्लागार तसेच कॅरिबियन विकास बँकेचा एक संस्थापक म्हणून त्यांनी अनेक राष्ट्रीय सरकारांसाठी कामे यशस्वीपणे पार पाडली’. भारतातील औद्योगिकीकरणाचे अपयश पाहून भक्कम शेतीच्या पायावरच यशस्वी औद्योगिकीकरण सिध्द होत असते, असे लेविस यांचे ठाम मत बनले.

द थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या अत्यंत प्रभावी ग्रंथाचे लेखक आणि ‘लूइस प्रतिमाना’चे जनक म्हणून लेविस यांची जगभर ख्याती आहे. कृषिप्रधान अर्थव्यवस्था उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेत संक्रामित होत असताना पारंपरिक भांडवलापेक्षा जोमदार, वाढत्या आणि स्वस्त श्रमबळावर हे परिवर्तन अवलंबून असते, असे लेविस प्रतिमान दाखवून देते. अविकसित तसेच विकसनशील देशांची विकासविषयक धोरणे ठरविण्याबाबत संयुक्त राष्ट्रे, जागतिक बँक तसेच अक्टाड ह्या संस्थांवर आपला ठसा उमटविणाऱ्या काही मोजक्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये लेविस यांचा अंतर्भाव होतो.

लेविस यांचे महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : ओव्हरहेड कॉस्ट्स : सम एसेज इन इकॉनॉमिक ॲनॅलिसीस आणि दि प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग (१९४९), दि थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ (१९५५), पॉलिटिक्स इन वेस्ट आफ्रिका (१९६५), डेव्हलपमेंट प्लॅनिंग : दि इसेन्शीअल्स ऑफ इकॉनॉमिक पॉलिसी (१९६६), रिफ्लेक्शन्स ऑन दि इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ नायजेरिया (१९६८), (७) सम ॲस्पेक्ट्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (१९६९), ट्रापीकल डेव्हलपमेंट : १८८० – १९१३ (१९७१), ग्रोथ ॲण्ड फ्लक्चुएशन्स  १८७० – १९१३ आणि दि इव्होल्यूशन ऑफ दि इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर (१९७८), रेशल कॉन्फ्लिक्ट ॲण्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (१९८५). यांशिवाय लेविस यांनी अनेक मौलिक शोधनिबंध व लेख विविध वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून लिहिले आहेत.

लेविस यांना नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त इंग्लंडच्या राणीकडून सर (नाइट) किताब (१९६३),  लंडन (१९८२), येल (१९८३), हार्व्हर्ड (१९८४) इत्यादी विद्यापीठांकडून अर्थशास्त्र विषयातील सन्मान्य डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले.

लेविस यांचे ब्रिजटाऊन, बार्बेडोस येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content