उत्तर आफ्रिकेत व अरेबियन द्वीपकल्पात आढळणारा गरम, शुष्क व धुळीचा वाळवंटी वारा. तो ईजिप्तमध्ये व तांबड्या समुद्रावर वाहताना आढळतो. प्रामुख्याने ईजिप्तमध्ये या वाऱ्याला खामसीन या नावाने ओळखले जात असून भूमध्य समुद्राच्या परिसरात याला हबूब, आजेज, हरमॅटन, आफ्रिको, सिरोको इत्यादी वेगवेगळ्या स्थानिक नावांनी ओळखले जाते. हिवाळ्याच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या (वसंत ऋतू) सुरुवातीस म्हणजे उन्हाळा-हिवाळा या संक्रमण काळात तो वाहताना आढळतो. वसंत ऋतूच्या आरंभी व शरद ऋतूत हा दक्षिणेकडून वा आग्नेयीकडून वाहात येतो. उत्तर आफ्रिकेवरून व आग्नेय भूमध्य समुद्रावरून पूर्वेकडे जाणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या पुढे हा आढळतो. हा वारा प्रत्येक वेळी तीन ते चार दिवसांपर्यंत सलगपणे वाहू शकतो. त्यानंतर यात पुष्कळच अधिक थंड वाऱ्याचे अंतर्वहन होते. खामसीनमुळे एप्रिलमध्ये कैरो (ईजिप्त) शहराचे तापमान दोन तासांत ३८° से. पर्यंत वाढते. खामसीनचे तापमान पुष्कळ वेळा ४०° से. पेक्षा अधिक होते. या वाऱ्याचा वेग प्रतितास १४० किमी. पर्यंत आढळतो. यामुळे पिकांचे नुकसान होते.

जेव्हा हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचे केंद्र पूर्वेकडे सहारावर किंवा दक्षिण भूमध्य समुद्रावर सरकते, तेव्हा खामसीन वारा निर्माण होतो. या केंद्रामुळे पुढील बाजूस उबदार, शुष्क व गरम हवा वाळवंटातून उत्तरेकडे जोराने वाहते आणि तिच्यात मोठ्या प्रमाणात धूळ व वाळूही वाहात येते. मागील बाजूस या केंद्रामुळे भूमध्य समुद्राकडून थंड हवा दक्षिणेकडे येते.

खामसीन वारा वर्षातून सरासरी ५० दिवस वाहतो आणि ५० या संख्येसाठी असलेल्या अरबी शब्दावरून खामसीन हे नाव आले आहे.

समीक्षक : वसंत चौधरी