डेटन, सर अँगस एस. (Deaton, Sir Angus S.) : (१९ ऑक्टोबर १९४५). प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्काराचा मानकरी. त्यांनी उपभोग, दारिद्र्य आणि कल्याण यांसंदर्भात सर्वस्वी वेगळ्याप्रकारे केलेल्या आर्थिक विश्लेषणासाठी २०१५ मध्ये त्यांना ‘नोबेल स्मृती पारितोषिक’ देण्यात आले.

डेटन यांचा जन्म ब्रिटनमधील एडनबर्ग येथे वडील लेस्ली हॅरॉल्ड व आई लिली वूड या दाम्पत्यापोटी झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण हॉआइक हायस्कूल आणि फेटेस कॉलेज येथून पूर्ण केले. त्यानंतर १९६७ मध्ये बी. ए.; १९७१ मध्ये एम. ए. आणि १९७४ मध्ये पीच.डी. या तीनही पदव्या त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून संपादित केल्या. ‘मॉडेल्स ऑफ कंन्झ्युमर डिमांड ॲण्ड देअर ॲप्लिकेशन टू दि युनायटेड स्टेट्सʼ हा त्यांच्या पीच. डी. प्रबंधाचा विषय होता. पीच. डी.नंतर त्यांनी फिट्झविल्यम कॉलेज येथे अधिछात्र (Fellow) म्हणून व नंतर सर रिचर्ड स्टोन व टेरी बार्कर यांच्या बरोबरीने व्यावहारिक अर्थशास्त्र या विभागात संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत होते. १९७६ साली त्यांनी ब्रिस्टॉल विद्यापीठात अर्थमिती प्राध्यापक म्हणून काम केले. या कालावधीत त्यांनी आर्थिक समस्यांच्या विश्लेषणाचे महत्त्वाचे काम पूर्ण केले. इकॉनॉमेट्रिक सोसायटीमार्फत दर दोन वर्षांनी दिला जाणारा ‘फ्रिश्च मेडलʼ हा पुरस्कार १९७८ साली त्यांना प्रदान केला गेला. सेवनकार्याच्या विविध बाबींच्या मागणीवर किंमत व उत्पन्नाचा कसा परिणाम होतो, त्यांचा हा शोधनिंबध १९८० मध्ये दि अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू या नियतकालिकात प्रसिद्ध झाला. १९८३ मध्ये ते ब्रिस्टल विद्यापीठातून बाहेर पडून प्रिन्स्टन विद्यापीठात आंतरराष्ट्रीय घडामोडी व अर्थशास्त्राचे ड्वाइट डी. आयसेनहॉवर प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे ब्रिटन व अमेरिका अशा दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. त्यांची पत्नी ॲन केस हीसुद्धा अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहे.

डेटन यांनी ‘आर्थिक सिद्धांता’ला ‘अनुभवाधिष्ठित अभ्यासपद्धती’ची (Empirical Method) जोड देऊन दारिद्र्य आणि मानवी कल्याणासंबंधीचे आर्थिक विश्लेषण अधिक वस्तुनिष्ठ पद्धतीने केले. डेटन यांनी अर्थशास्त्रातील योगदानामध्ये तीन गोष्टींची एकत्रित मांडणी केली.

  • वेगवेगळ्या वस्तुंना असलेल्या निरनिराळ्या व्यक्तींच्या मागणीचे भविष्यकालीन मोजमाप कसे करायचे, याविषयीची एक वेगळी अभ्यासपद्धती डेटन यांनी विकसित केली. वस्तुंचे स्वरूप, त्यांची किंमत आणि व्यक्तींच्या उपभोगातील त्यांचे प्रमाण या बाबी भिन्न असतील, प्रौढांना व लहान मुलांना किती वस्तू लागतील, काही वस्तूंच्या संदर्भात बाजारातील किंमत उपलब्ध नसेल अशा वेळी काय करायचे इत्यादी गोष्टींचा आपल्या अभ्यासपद्धतीत अंतर्भाव करून मागणीचा आकृतीबंध कसा तयार करायचा आणि भविष्यकालीन मागणीचे मोजमापन कसे करायचे, हे डेटन यांनी आपल्या अर्थशास्त्रातील योगदानात सर्वप्रथम दाखवून दिले.
  • डेटन यांचे ‘एकूण उपभोग वर्तन’ कसे समजावून घेता येईल, यासंबंधीचे वस्तुनिष्ठ आर्थिक विश्लेषण महत्त्वाचे आहे. ‘समग्र उपभोग वर्तन’ समजावून घेत असताना वेगवेगळ्या स्तरांवर आढळणाऱ्या आणि पुनरावृत्ती होणाऱ्या आकडेवारीचे समूह (Panel) तयार करून उपभोग वर्तनाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासपद्धती विकसित करता येऊ शकते, हे डेटन यांनी दाखवून दिले. डेटन यांचे हे योगदान विकसनशील देशांच्या संदर्भात अधिक महत्त्वाचे आहे. डेटन यांनी विकसनशील देशांतील लोकांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेचा आणि दारिद्र्याचा अभ्यास ‘कुटुंबाधिष्टित पाहणी अभ्यास’ या चौकटीत विकसित केल. त्यामुळे विकसनशील देशांतील राहणीमानाच्या गुणवत्तेतील व दारिद्र्याच्या आकारमानातील व्यक्तिसापेक्ष फरक समजून घेण्यास अधिक व्यवहार्यपूर्ण मदत झाली. त्यांनी २०११ मध्ये डुप्रिझ यांच्याबरोबर एकूण ६२ विकसनशील देशांतील ‘कुटुंबाधिष्ठित पाहणी अभ्यासा’तून  ‘Purchasing Power Parity Sensex’ तयार केला आहे. या निर्देशांकानुसार ‘जागतिक दारिद्र्य रेषा’ निश्चित करण्यात येईल.
  • दारिद्र्याचे मोजमापन हे व्यक्तीचे उत्पन्न व त्यांचे अन्नसेवन यांतून मिळणाऱ्या उपमांकाचा (Calories) परस्परसंबंध आणि कुपोषण व दारिद्र्य यांतील नाते या सर्व बाबींसंबंधीचा आहे. दारिद्र्य निवारणासाठी आर्थिक विकास ही गोष्ट आवश्यक असली, तरी ती पुरेशी नाही, अशी मांडणी करणाऱ्यांमध्ये डेटन यांची प्रामुख्याने गणना होते. त्यांना मिळालेले नोबेल पारितोषिक एका अर्थाने जगातील सर्व गरीब जनता आणि गरिबीचा संवेदनशीलपणे विचार करणाऱ्या सर्वांना आनंद आणि अभिमान वाटावा अशी घटना आहे. डेटन आणि भारतीय अर्थतज्ञ अरवींद सुब्रमण्यन (Arvind Subramanian) यांनी १९९६ मध्ये असे दाखवून दिले की, सरकारने उत्पन्न वाढीचे धोरण राबविले, तर गरीब लोकांच्या कुपोषणाच्या समस्येची तीव्रता कमी करता येईल. डेटन यांनी असेही दर्शविले की, उत्पन्नाच्या पातळीकडून जीवनसत्त्वाची पातळी निश्चित होत असते. तसेच कुपोषणाच्या समस्येतून दारिद्र्याची समस्या निर्माण होत नाही. कुपोषण हे कारण नसून ते दारिद्र्याचा परिणाम आहे, असे डेटन यांनी दर्शवून त्यांनी ‘जीवनसत्त्व आधारित कार्यक्षमता सिद्धांत’ नाकारला. डेटन यांनी ‘कुटुंबातील भेदाभेद’ या आपल्या सिद्धांताचे स्पष्टीकरण करण्यासाठी दारिद्र्याच्या कारणमीमांसेची जोड दिल्याचे दिसते. विकसनशील देशात मुलगा आणि मुलगी असा भेद केला जाऊन मुलाला अधिक प्राधान्य दिले जाते. मुलाला आणि मुलीला देऊ केल्या जाणाऱ्या सुखसुविधांमधून हा भेद स्पष्ट होतो; मात्र ‘कुटुंबाधिष्ठित पाहणी अभ्यास’ यातून मिळणाऱ्या आकडेवारीच्या आधारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या उपभोगाची माहिती मिळत नाही. या समस्येवर उपाय म्हणून डेटन यांनी ‘अप्रत्यक्ष अभ्यासपद्धती’ सुचविली. डेटन यांच्या अभ्यासातून असे आढळून आले की, कुटुंबात जन्माला येणाऱ्या प्रत्येक आपत्यामागे कुटुंब गरीब होत जाऊन प्रत्येक कुटुंबामागे ‘प्रौढ वस्तुंचा’ (Adults Goods) उपभोग कमी होतो.

डेटन यांनी दारिद्र्याचे मोजमाप करताना कुटुंबाच्या दरडोई खर्चाच्या संकल्पना आणि अभ्यासपद्धती यांच्या मर्यादा, तसेच कुटुंबाच्या कल्याणाच्या पातळीमध्ये तुलना करताना कुटुंबाच्या आकारमानातील मर्यादा निदर्शनास आणून दिल्या. त्यांनी कुटुंबाच्या आकारमानातील फरक लक्षात घेऊन कुटुंबपरत्वे येणाऱ्या आपत्याच्या खर्चाचे मोजमापन कसे करता येते, यासंबंधीचे आर्थिक विश्लेषण केले. ज्या ठिकाणी वस्तूंच्या किंमती बाजारातील वस्तुंच्या किंमतीप्रमाणे उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी उपभोग खर्च आणि वस्तूंच्या भागाकारातून जे सरासरी ‘एकक मूल्य’ तयार होईल, त्याचा किंमत फरक परिस्थितीत कसा प्रभावीपणे उपयोग करून घेता येईल, हे डेटन यांनी दाखवून दिले. त्यामुळे या ‘एकक मूल्या’चा दारिद्र्य मोजमापनात खूप उपयोग झाल्याचे दिसून येते.

भारताने २००० पासून ‘किंमत अनुमान’ निश्चित करण्यासाठी डेटन यांची अभ्यासपद्धती स्वीकारली. जगातील काही प्रदेशात सातत्याने आर्थिक प्रगती होत असतानाही आर्थिक विषमतेमुळे जगाची श्रीमंत देश व दरिद्री देश अशी विभागणी कशी झाली, याचे सखोल विश्लेषण त्यांनी केले. भारतातील आर्थिक विषमता, दारिद्र्य, आरोग्याची समस्या इत्यादींबाबत सखोल चिंतन व संशोधन केले आहे. यासंबंधीचे त्यांचे अनेक लेख इकॉनॉमिक ॲण्ड पोलिटिकल विकली या जगप्रसिद्ध साप्ताहिकात प्रसिद्ध झालेले आहेत.

डेटन यांचा आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे, आर्थिक विषमतेची परिणिती राजकीय विषमतेत होते. त्यामुळे आधिक श्रीमंत असलेली मंडळी देशातील राजकीय निर्णय-प्रक्रिया स्वत:च्या फायद्यासाठी अधिक सक्रियपणे वापरतात.

डेटन यांचे स्वतः आणि सहकाऱ्यांसमवेत लिहिलेले अनेक ग्रंथ असून त्यांपैकी पुढील ग्रंथ प्रसिद्ध आहेत : मॉडेल्स ॲण्ड प्रोजेक्शन्स् ऑफ डिमांड इन पोस्ट-वॉर ब्रिटन (१९७५), इकॉनॉमिक्स ॲण्ड कन्झ्युमर बिहेव्हिअर (१९८० – सहलेखक), अंडरस्टॅंडिंग कंझम्प्शन (१९९२), दि ॲनालिसिस ऑफ हाउसहोल्ड सॅर्व्हेज (१९९६), गाईडलाइन्स फार कन्स्ट्रक्टिंग कंझम्प्शन ॲग्रीगेट्स फॉर वॉलफेअर ॲनॅलिसीस (२००२), दि ग्रेट इंडियन पॉव्हर्टी डिबेट (२००५), दि ग्रेट इस्केप (२०१३).

डेटन यांना त्यांच्या संशोधन कार्याबद्दल पुढील सन्मान लाभले. फ्रिश्च मेडल (१९७८), अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (२००७), बीबीव्हीए फाउंडेशन फ्रंटिअर्स ऑफ नॉलेज अवॉर्ड (२०११), अमेरिकन फिलॉसॉफीकल सोसायटीचे सदस्यत्व (२०१४), नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य (२०१५), फेलो ऑफ इकॉनॉमेट्रिक सोसायटी, फेलो ऑफ ब्रिटिश ॲकेडमी, फेलो ऑफ अमेरिकन ॲकेडमी ऑफ आर्टस् ॲण्ड सायन्सेस, त्याचबरोबर रोम विद्यापीठ (टोर वेर्गाटा), युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्र्यूज आणि युनिव्हर्सिटी ऑफ एडनबर्ग या विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केले आहे.

डेटन हे सध्या युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅलिफोर्निया येथे अर्थशास्त्र विषयाचे प्रमुख प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

संदर्भ :

  • डेटन, अँगस; म्युएलबाऊर, जॉन, इकॉनॉमिक्स अँड कन्झ्युमर बिहेव्हिअर, न्यूयॉर्क, १९८०.
  • डेटन, अँगस, अंडरस्टँडिंग कन्झम्शन, ऑक्सफर्ड, १९९२.
  • डेटन, अँगस; कोझेल, व्हॅलरी, दि ग्रेट इंडियन पॉव्हर्टी डिबेट, न्यू दिल्ली, २००५.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा