फ्ल्यूटचे विविध प्रकार

सुषिर वाद्यवर्गातील एक प्रमुख पाश्चात्त्य वाद्य. तोंडाने हवा फुंकून वाजविण्याच्या या दंडगोलाकार वाद्याचे अनेक प्रकार आहेत. हे प्रकार सामान्यत: त्याची लांबी, छिद्र (रंध्र) संख्या तसेच वादनतंत्रे यांतील भिन्नतेमुळे पडले आहेत. त्यांपैकी सांप्रत यूरोप-अमेरिका खंडांत पिक्कोलो, ॲल्टो आणि बास हे फ्ल्यूटप्रकार अधिक प्रचलित असून कन्सर्ट फ्ल्यूट-इन्-सी हा प्रकार सर्वाधिक लोकप्रिय आहे. हे वाद्य लाकूड, एबोनाईट, ॲल्युमिनियम, सोने आणि चांदी इत्यादी विविध प्रकारच्या धातूंपासून बनविले जाते. सामान्यत: फ्ल्यूटची लांबी ६० सेंमी. असून २ ते २.५ सेंमी. व्यासांची छिद्रे असलेली ही गोलाकार नळी असते.

वादनपद्धतीनुसार आडवे धरून वाजविण्याचे फुंकणीवजा नळीसारखे हे वाद्य असल्याने नळीमधील हवेचा स्तंभ स्वररंध्रांतून किंवा शिट्टीवजा असा तोंडातून चलित केला जातो आणि स्वर निर्माण होतो. दोन्ही हातांच्या बोटांनी वाजविण्यासाठी ६ ते ८ ध्वनिरंध्रे (छिद्रे) व शिवाय अष्टमस्वर काढण्याकरिता खालचा स्वर घेण्यासाठी अधिक छिद्रे असतात. त्यांच्या उघडझापीने स्वरस्तंभाची लांबी कमीजास्त करून विविध स्वरांची निर्मिती करता येते. कोमल स्वर वाजविण्यासाठी ‘क्रॉस फिंगरिंग’ तंत्र वापरतात. त्यात कोमल स्वर काढताना बोटाखालील उघडे रंध्र (छिद्र) सोडून त्याखालचे रंध्र बंद करतात. आधुनिक फ्ल्यूटला कळचाव्यांची जोड देण्यात आलेली असल्यामुळे वादनतंत्रामध्येही आमूलाग्र क्रांती घडून आली आहे. यूरोपमध्ये शास्त्रीय संगीतात मोठमोठ्या संगीतरचनाकारांनी या वाद्याचा उपयोग करून घेतला आहे.

फ्ल्यूट ही वाद्यसंज्ञा मूळ लॅटिन ‘फ्लाऊटा’ या शब्दावरून इंग्रजीत रूढ झाली आहे. ‘फ्लाऊटा’ हा लहान मासा असून

आधुनिक फ्ल्यूट

तो सॅम्प्री या जलचर पृष्ठवंशीय कुळीतील असून त्याला सात श्वसनेंद्रिये (छिद्रे) असतात. त्याचा अपभ्रंश होऊन सात छिद्रांचा फ्ल्यूट ही वाद्यसंज्ञा रूढ झाली. फ्ल्यूटवादकाला त्यामुळेच फ्लॉटिस्ट म्हणतात आणि फ्लॉटेन्डा म्हणजे फ्ल्यूट होय. प्राचीन ईजिप्त, बॅबिलोनिया, ग्रीस, चीन आदी देशांतून-प्रदेशांतून फ्ल्यूट वापरात असल्याचे पुरावे आढळतात. हे लोक हे सुषिर वाद्य मुख्यत्वे हाडे आणि लाकूड यांपासून बनवून वापरीत असत. यूरोपात अकराव्या शतकापासून हे वाद्य संगीतात प्रविष्ट झाल्याचे संदर्भ ज्ञात होतात. पुढे बाराव्या-तेराव्या शतकांत फ्रान्स-इटलीमध्ये गावोगाव भ्रमंती करणाऱ्या संगीतजथ्यांतून हे वाद्य प्रचलित असल्याचे दाखले मिळतात. पंधराव्या-सोळाव्या शतकांतील संगीतावरील ग्रंथांतून याचा उल्लेख आढळतो. त्या वेळी हे वाद्य नळकांडीसदृश दंडगोलाकार असून ठराविक अंतरावर विवक्षित व्यासाची सहा छिद्रे (रंध्रे) ठेवलेली असत. झां बातिस्त लली (१६३२–१६८७) या संगीतरचनाकाराने १६७२ मध्ये प्रथमच फ्ल्यूट वाद्याचा अंतर्भाव ऑपेराच्या ऑर्केस्ट्रामध्ये केला. सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत यूरोपात लाकडी फ्ल्यूटच प्रचारात होता. चौदाव्या लूईच्या कारकीर्दीत (कार. १६४३–१७१५) फ्रान्समध्ये फ्ल्यूटवादकांचे एक विद्यालयही होते. एकोणिसाव्या शतकात प्रसिद्ध जर्मन फ्ल्यूटवादक टेओबाल्ट बम (बोहम) याने फ्ल्यूटच्या रचनेत बदल करून नवीन शंक्वाकृती धातूचे मॉडेल बनविले (१८३२). त्यामुळे वादनतंत्रामध्ये आमूलाग्र बदल होऊन माधुर्य आले. यातही त्याने आणखी काही बदल व सुधारणा १८४७ मध्ये केल्या आणि वृत्तचिती व्यासाच्या (सिलिंड्रिकल बोअर) समांतर शीर्षे (पॅराबोलिक) असलेल्या फ्ल्यूटची रचना केली. त्याला कळचाव्यांची (कीज) जोड देऊन त्याची लांबी  ६७ सेंमी. आणि छिद्रांचा व्यास  २.५  सेंमी. ठेवला. त्यामुळे बँड, ऑर्केस्ट्रा आणि वायुवाद्यांच्या समूहात फ्ल्यूटचा वापर उच्च स्वर आणि संगीतसाथीसाठी उपयुक्त ठरू लागला.

भाषांतरकार – शुभेन्द्र मोर्डेकर

समीक्षक – सु. र. देशपांडे

#ओबो #बसून

प्रतिक्रिया व्यक्त करा