मुखातील कठीण व टोकदार रचना म्हणजे दात. ते मुखात जबड्यातील हाडांना जोडलेले असतात. वरील जबड्यातील अग्रऊर्ध्वहनु अस्थी (Premaxilla), ऊर्ध्वहनु अस्थी (Maxilla) आणि खालील जबड्यातील दंतअस्थी (Dentary) यांवर असलेली दातांची रचना म्हणजे दंतविन्यास होय. मत्स्य, उभयचर आणि सरीसृप या वर्गांत असलेल्या पृष्ठवंशी प्राण्यांमध्येही दात असतात. आधुनिक कच्छप (कासव) आणि पक्ष्यांमध्ये दात नसतात. काही मुंगीखाऊ सस्तन प्राणी आणि बलीन व्हेल, पिग्मी व्हेल, हंपबॅक व्हेल आणि रॉर्क्वाल व्हेल यांमध्येही दात नसतात. सस्तन प्राण्यांचे वर्गीकरण त्यांच्या दातांवरून सुलभपणे करता येते.

दातांची निर्मिती दंतिनापासून (Dentine) झालेली आहे. तोंडातील बाह्यत्वचा पेशींच्या अस्थिभवनापासून दंतिन तयार होते. सस्तन प्राण्यांच्या प्रातिनिधिक दातांचे दंतशीर्ष (Crown) आणि दंतमूल (Root) असे दोन भाग होतात. दंतशीर्ष हा दाताचा बाहेर दिसणारा भाग असून तो दंतमुलावर आधारलेला असतो. दाताची वयोमानानुसार झीज होते. दंतमुलाचा काही भाग हिरड्यांनी झाकलेला असतो. दंतमूल आणि दंतशीर्ष जेथे एकत्र येतात, त्यास ग्रीवा असे म्हणतात.

मानवी दातांमध्ये दंतवल्क (Enamel), दंतिन आणि संधानक (Cement) अशा तीन प्रकारच्या ऊती असतात. यांपैकी दंतवल्क हे दातावरील आवरण अत्यंत पातळ, कठीण, चमकदार व पेशीविरहित असून ते भ्रूण बाह्यस्तरापासून (Extraembryonic layer) बनलेले असते. दात हिरडीतून बाहेर येण्यापूर्वीच दंतवल्काची निर्मिती झालेली असते. हिरडीच्या आतील बाजूस दंतमुलावर पातळ संधानक आणि चिवट संश्लेषीजन (Collagen) तंतूचे आवरण असते. संधानकामध्ये पेशी नसतात, परंतु त्याखालील परिदंत आवरणामध्ये वाहिन्या असतात. परिदंत आवरणाने दात हिरड्यांना घट्टपणे जोडलेले असतात. दंतमुलाचा भाग काही कारणाने उघडा पडला तर त्याची झपाट्याने झीज होते. दंतिन व संधानक हे भ्रूण मध्यस्तरापासून (Mesoderm) तयार होते.

पृष्ठवंशी प्राण्यांतील दंतवल्क कार्बोनेटेड हायड्रॉक्सी ॲपेटाईटच्या (Hydroxyapatite) स्फटिकांनी बनलेले असते. त्यामुळे ते अत्यंत कठीण असते. दंतवल्काच्या खाली दंतिन-ऊती असतात. दंतिन हे अस्थीहून मजबूत व तुलनेने दंतवल्काहून मृदू असते. हत्तीचे सुळे हे पटाशीच्या (कृंतक) दातांमध्ये परिवर्तन होऊन तयार झाले आहेत. दंतिन पांढऱ्या रंगद्रव्याने बनलेले असते. मानवी दंतिनामध्ये ६६.७२% कॅल्शियम फॉस्फेट व फ्लुराईड, तसेच २८.०१% कॅल्शियम कार्बोनेट असते. हा थर त्वचीय पेशींपासून बनलेला असतो.

प्राण्यांच्या दातांचे वर्गीकरण आकार, आकारमान आणि त्यांचे कार्य यांवरून केलेले आहे. एका ओळीत असलेल्या प्रत्येक दाताचे कार्य वेगवेगळे असू शकते. दात जबड्यात कसा गुंतलेला आहे त्यानुसारही सस्तन प्राण्यांच्या दातांचे वर्गीकरण कूटदंती, पार्श्वदंती व गर्तदंती असे केलेले आहे.

जबड्यातील दातांच्या रचनेनुसार दातांचे वर्गीकरण

(१) कूटदंती (Acrodont) : मासे व उभयचर प्राण्यांमध्ये कूटदंत जबड्याच्या हाडाच्या वरच्या पृष्ठभागाला संलग्न असतो. परंतु, तो बळकट नसून पडतो आणि त्या जागी नवीन येतो. उदा., शार्क, बेडूक.

(२) पार्श्वदंती (Pleurodont) : यामध्ये जबड्याच्या हाडाच्या आतील कडेवर पार्श्वदंत फडताळाच्यावर तळाच्या बाजूला तसेच एका बाजूला संलग्न असतो. उदा., यूरोडेल व सरडे.

(३) गर्तदंती (Thecodont) : सस्तन प्राण्यांचे दात जबड्यातील खोल खाचेत (दंतउलूखल; Alveolus) बसवल्यासारखे दिसतात, त्यांना गर्तदंत असे म्हणतात. दंतमुलातून अशा दातांमध्ये रक्तवाहिन्या आणि चेता उघडतात. याप्रकारचा दात काही मासे, मगर व बराचश्या सस्तन प्राण्यांत आढळतो. उदा., हत्तीचा सुळा, कृंतक गणातील प्राण्यांचे पटाशीचे दात.

दातांच्या संच पुन:स्थापनेनुसार (जुन्या दातांच्या ठिकाणी नवीन दात येणे किंवा दातांचा क्रम यानुसार) एकवारदंती, द्विवारदंती व बहुवारदंती असे तीन प्रकार पडतात.

(१) एकवारदंती (Monophyodont)  : काही सस्तन प्राण्यांमध्ये त्यांच्या जीवनकालात एकच दातांचा संच उगवतो, यास एकवारदंत म्हणतात. उदा., शिशुधान प्राणी (यांच्यात शेवटची दाढ उगवेपर्यंत दुधाचे सर्व दात शाबूत असतात.), दात असलेले व दात नसलेले व्हेल (उदा., बलीन व्हेल), खारीसारखे कृंतक आणि मोल (चिचुंद्री) यांसारखे कीटकभक्षी, प्लॅटिपस, समुद्र गाय.

(२) द्विवारदंती (Diphyodont) : बहुतेक सस्तन प्राणी द्विवारदंती आहेत. पहिला दातांचा संच तात्पुरता असून त्यास दुधाचे दात म्हणतात. दुधाच्या दातांचा संच पडून कायमचे दात येतात. उदा., मानव. वटवाघूळ व गिनी पिग या प्राण्यांत दुधाचे दात तयार होतात; परंतु, पिलाच्या जन्माआधीच ते गळून पडतात.

(३) बहुवारदंती (Polyphyodont) : निम्न पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये त्यांच्या जीवनकालात अनेक वेळा दात सतत पुन:स्थापित होत असतात. उदा., मुशी (शार्क). असा प्रकार सस्तन प्राण्यांमध्ये आढळत नाही.

असमदंती दातांचे प्रकार

बाह्यस्वरूपावरून प्राण्यांच्या दातांचे समदंती व असमदंती असे दोन प्रकार पडतात.

(अ) समदंती (Homodont) : या प्रकारात प्राण्यांचे दात एकाच आकाराचे असतात. स्तनी प्राणी सोडून बहुतेक सर्व पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये समदंती दात असतात. असे दात सामान्यत: शंक्वाकृती व अणकुचीदार असून कित्येकदा थोडे वक्राकार असतात. हे दात अन्न (भक्ष्य) चावण्यापेक्षा ते पकडून ठेवण्यासाठी व निसटून जाऊ नये यासाठी वापरले जातात. उदा., मासे, बेडूक, सरडा व सुसर.

(आ) असमदंती (Heterodont) : या प्रकारात सस्तन प्राण्यांचे दात वेगवेगळ्या आकाराचे असतात. सामान्यत: यामध्ये स्तनी प्राण्यांचा समावेश होतो. असमदंती दातांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

(१) पटाशीचे (कृंतक) दात (Incisors) : हे दात वरील जबड्याच्या अग्रऊर्ध्वहनु अस्थी व खालील जबड्याच्या दंतअस्थी यांच्या पुढील बाजूस असतात. त्यांचा आकार शंकूप्रमाणे असून त्यांना एकच मूळ व एक दंताग्र (Monocuspid) असते. अन्न तोडण्यासाठी किंवा कापण्यासाठी या दातांचा वापर होतो. शेळी, मेंढी व बैल यांच्या वरील जबड्यात, तर स्लॉथच्या दोन्ही जबड्यात पटाशीचे दात नसतात. कृंतक गणातील प्राणी आणि ससा यांमध्ये दातांचा आकार पटाशीसारखा असून त्यांच्या दातांची मुळे उघडी असतात आणि ते दात आयुष्यभर वाढतात.

(२) सुळे (Canines) : पटाशीच्या दातालगत आतील बाजूस सुळ्यांची जोडी असते. जबड्याच्या डाव्या व उजव्या बाजूस एक सुळा असतो. बहुधा सुळा लांब, थोडा वक्र आणि टोकदार असतो. सुळा एका मुळावर आधारलेला असतो. मांसाहारी प्राण्यांच्या जबड्यातील सुळ्यामुळे भक्ष्य पकडणे व भक्ष्याचे कठीण भाग फाडणे यांस मदत होते. कृंतक प्राणी आणि सशाच्या जबड्यात सुळे नसतात. त्याऐवजी पटाशीचे दात आणि उपदाढा यांच्यामध्ये पोकळी असते, त्यास दंतावकाश म्हणतात. घोड्यासारख्या प्राण्यात सुळे लहान आकाराचे असतात; तर वाघ, मांजर, सिंह यांचे सुळे मोठे, कट्यारीच्या आकाराचे व तीक्ष्ण असतात. भक्ष्याच्या शरीरात घुसवणे व प्रतिस्पर्ध्याला जखमी करण्यास त्यांचा उपयोग होतो.

(३) उपदाढा (Premolars) : सुळ्यानंतर उपदाढा असून त्यांना दोन अग्रे (द्विदंताग्रे) व दोन मुळे असतात. उपदाढांचा उपयोग अन्न बारीक करण्यास होतो.

(४) दाढा (Molars) : दाढा उपदाढांच्या मागे असतात. त्यांना तीन किंवा अधिक दंताग्रे (त्रिदंताग्रे) किंवा अधिक मुळे आणि अनेक उंचवटे असतात. मानवाच्या दोन्ही जबड्यातील शेवटची दाढ उशीरा बाहेर पडते, तिला अक्कलदाढ असे म्हणतात. दाढा अन्न बारीक करण्यास उपयोगी पडतात.

उपदाढा आणि दाढा यांना एकत्रितपणे गालदंत (Cheek teeth) म्हणतात. मांसाहारी सस्तन प्राण्यांमध्ये गालदंताचा आकार लहान असतो. काही मांसाहारी सस्तन प्राण्यांच्या वरील जबड्यातील शेवटची उपदाढ आणि खालच्या जबड्यातील पहिली दाढ यांचा आकार तीक्ष्ण पटाशीसारखा झालेला असतो, या दातांना कर्तकदंत (Carnassial teeth) म्हणतात. यांचा उपयोग हाडे बारीक करण्यासाठी आणि अस्थिबंध कातरण्यासाठी होतो.

बाह्यस्वरूपावर आधारित गालदंताचे प्रकार

वरील व खालील जबड्यातील दाढा जेथे एकमेकांवर येतात त्या पृष्ठभागावर उंचवटे आणि खड्डे असतात, त्याना दंताग्रे (Cusp) म्हणतात. दंताग्रांना कोन असेही म्हणतात. त्यांची संख्या आणि आकार यांवरून दाढांना नावे दिलेली  आहेत. अन्न खाण्याची पद्धत आणि अन्नप्रकार यांवरून उपदाढा आणि दाढा यांच्या आकारात गालदंतामध्ये बदल झाले आहेत. बाह्यस्वरूपावरून गालदंताचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात.

(१) गिरिकादंत (Bunodont) : गालदंतावरील अग्रे वेगळी आणि गोलाकार असतील तर त्यांना गिरिकादंत म्हणतात. मानव आणि काही सर्वभक्षी सस्तन प्राणी यांचे दात गिरिकादंती प्रकारातील असतात.

(२) कटकदंत (Lophodont) : दंताग्रे एकत्र येऊन त्यांच्या खाचा बनलेल्या असतात. हत्तीचे दात या प्रकारातील असतात. त्यावर दंतवल्क आणि दंतिन यांच्या घड्या पडल्यासारख्या दिसतात. अशा दातांमुळे गवत आणि सर्व प्रकारच्या वनस्पती चर्वण करून बारीक करता येतात. बारीक करण्याचा पृष्ठभाग मोठा असतो.

(३) कर्तनीदंत (Secodont) : गालदंतावर तीक्ष्ण उंचवटे असतात. मांसाहारी प्राण्यांमध्ये मांस कातरण्यासाठी आणि फाडण्यासाठी या दातांचा वापर होतो. उदा., लांडगा, वाघ, तरस.

(४) चंद्रकोरदंत (Selenodont) : गालदंतावर चंद्रकोरीसारखे उंचवटे असतात. रवंथ करणारे प्राणी उदा., शेळी, मेंढी आणि घोडा यांचे दात या प्रकारचे असतात. अशा प्रकारचे दात वनस्पती बारीक चावण्यासाठी वापरात येतात.

(५) लघुदंतमूल (Brachydont) : दंतशीर्ष लहान असून दंतमुले त्यामानाने खोल असतात उदा., मानवी दात.

(६) तुंगकिरीटदंत (Hypsodont) : दंतशीर्ष उंच (मोठे) आणि दंतमूल लहान व उघडे असल्यास त्यास तुंगकिरीटदंत म्हणतात. उदा., घोडा आणि हत्तीचे पुढे बाहेर आलेले दात. या दाताला सुळे असे म्हणतात; परंतु, ते प्रत्यक्षात पटाशीचे दात आहेत.

(७) त्रिकोणदंती (Triconodont) : आरंभीचे प्रोटोथेरियनमध्ये (Early prototherians) गालदंतावरील दंतशीर्षावर असलेल्या तीन कोनांसारखी पुढे आलेल्या भागाची रचना सरळ रेषेत असते. उदा., ट्रायकोनोडॉन मॉरडॅक्स (Triconodon mordax).

(८) त्रिगुलिकामयदंती (Trituberculate) : आरंभीचे थेरियनमध्ये (Early therians) गालदंतावरील कोनाची रचना त्रिकोणी असते. उदा., जुरामिया (Juramaia).

दंतसूत्र (Dental formula) : सस्तन प्राण्यांचे वर्गीकरण आणि ओळख दंतसूत्रावरून करण्यात येते. स्तनी प्राण्यांत असमदंती दातांची निश्चित संख्या असल्याने त्यांची माहिती सूत्ररूपाने देण्याच्या पद्धतीस दंतसूत्र म्हणतात. सूत्रात दंतप्रकाराचे आद्याक्षर आणि त्यानंतर वरील व खालील जबड्याच्या अर्धभागातील दातांची संख्या देऊन शेवटी एकूण सर्व दातांची संख्या दिली जाते. एखाद्या दंतप्रकाराचा अभाव असेल तर शून्य लिहिले जाते. एकाच जातीतील प्राण्यांच्या वरील व खालील जबड्यातील दातांची संख्या स्थिर असते; परंतु, भिन्न जातींत ती बदलते. असमदंती सस्तन प्राण्यांतील दातांची सर्वाधिक संख्या ४४ आहे. काही सस्तन प्राण्यांतील दातांची संख्या याहून कमी असते. त्यांच्या जबड्यात काही दात प्रकारांचा अभाव असतो. दंतसूत्रामध्ये दातांचा क्रम पुढून पटाशीचे दात (I), सुळे (C), उपदाढा (P) आणि दाढा (M) असा असल्याने प्रत्येक वेळी दंतप्रकार लिहावा लागत नाही. काही प्राण्यांचे दंतसूत्र खाली दिले आहे.

रानडुक्कर : २ (I ३/३, C १/१, P ४/४, M ३/३) किंवा २ (३१४३/३१४३) = ४४

सिंह : २ (I ३/३, C १/१, P ३/२, M १/१) किंवा २ (३१३१/३१२१)= ३०

ससा : २ (I २/१, C ०/०, P ३/२, M ३/३) किंवा २ (२०३३/१०२३) = २८.

उंदीर : २ (I १/१, C ०/०, P ०/०, M ३/३) किंवा २(१००३/१००३) = १६.

पहा : मानवी दात; दंतवैद्यक (पूर्वप्रकाशित नोंद); दात (पूर्वप्रकाशित नोंद).

संदर्भ :

  • https://animaldiversity.org/collections/mammal_anatomy/kinds_of_teeth/
  • https://www.biologydiscussion.com/zoology/mammals/dentition-in-mammals-definition-origin-types-and-unusual-teeth-in-mammals/41558
  • https://www.notesonzoology.com/mammals/dentition-in-mammals-vertebrates-chordata-zoology/8471
  • https://www.oxfordreference.com/view/10.1093/oi/authority.20110803095710822

समीक्षक : सुहास गोडसे