अग्रणी वनस्पती उद्यान ही पर्यावरण आणि वनमंत्रालयाने जैवविविधता जतन-संवर्धन करण्याच्या दृष्टीने राबविलेली एक संकल्पना आहे. या मंत्रालयाच्या वित्तीय साहाय्यातून २०१३ पर्यंत १३ अग्रणी उद्यानांची  उभारणी करण्यात आली आहे. भारतातील प्रदेशनिष्ठ (Endemic), संकटग्रस्त व नष्ट (Rare Endangered and Threatened) होत चाललेल्या वनस्पतींच्या जतन-संवर्धन तसेच संशोधन करण्याच्या दृष्टीने अशा वनस्पती उद्यानांचे जाळेच उभारले आहे. जागतिक पातळीवर अशी उद्याने जैवविविधता संवर्धनाचे काम करतात.

अग्रणी वनस्पती उद्यानांची प्रमुख कार्ये : संकटग्रस्त व प्रदेशनिष्ठ वनस्पतींचे जतन आणि संवर्धन करणे; विविध तंत्रज्ञाने वापरून त्यांची नैसर्गिक अधिवासात पुनर्लागवड करणे;  या वनस्पतींच्या विविध पैलूंवर संशोधन करून अशा वनस्पती नामशेष होण्याची कारणे शोधून त्यावर विविध उपाययोजना करून त्या जगविण्याचा प्रयत्न करणे; संकटग्रस्त व प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या पुनर्वसनाचे विविध कार्यक्रम हाती घेणे; अशा वनस्पतींचा जिवंत आणि शुष्क संग्रह करणे; संकटग्रस्त आणि प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या मूलस्थानी आणि परस्थानी जतनासंबंधीची माहिती निर्माण करणे; वनस्पतींच्या ऋतुजैविकीचा आणि त्यांच्या वातावरणातील परिवर्तनशीलता किंवा बदलाला दिलेल्या प्रतिसादाचा अभ्यास करणे;  वनस्पतींच्या संवर्धनाच्या दृष्टीने प्रजातींचे पुनरुत्पादन आणि त्यांच्या जगण्यामध्ये बाधा आणणाऱ्या पर्यावरणीय, जैविक आणि आनुवांशिक अडथळ्यांचा अभ्यास करणे;  आधुनिक संवर्धन पद्धती, जनुक पेढ्या यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित संशोधन आणि विकास कौशल्य विकसित करणे; निवडक वनस्पतींच्या विविध पैलूंचा अभ्यास करून लाल प्रदत्त पृष्ठे ( Red Data Sheets ) आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या (International Union For Conservation Of Nature ) स्वरूपात तयार करणे;  तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतिविज्ञान आणि उद्याननिर्मितिशास्त्र यांचे प्रशिक्षण केंद्र म्हणून काम करणे; पर्यावरण संरक्षणाचे विविध उपक्रम राबवणे व त्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणे; शैक्षणिक कार्यक्रम आणि शैक्षणिक साहित्य यांच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाची पर्यावरण जागरूकता वाढविणे इत्यादी.

पश्चिम भारतातील पहिले अग्रणी वनस्पती उद्यान कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात ४२ एकरांमध्ये विस्तारलेले आहे. या उद्यानात ११०० पेक्षा जास्त वनस्पती जाती जतन करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने १०३० आवृतबीजी वनस्पती (Angiosperms), २२ अनावृतबीजी वनस्पती (Gymnosperms) आणि ६३ नेचेवर्गीय वनस्पतींचा (Pteridophyte) समावेश आहे.या अग्रणी उद्यानामध्ये प्रामुख्याने १५ विभाग आहेत.

  • नेचेवर्गीय वनस्पतींचा विभाग : या विभागात ६३ नेचेवर्गीय वनस्पतींचा समावेश असून त्यातील ११ प्रजाती प्रदेशनिष्ठ आणि औषधी गुणधर्म असणाऱ्या आहेत. अँजिओप्टेरिस एव्हेक्टा (Angiopteris evecta), इक्वीसेट्म रामोसीसिमम (Equisetum ramosissimum), सायलोटम नूडम (Psilotum nudum) आणि कोंबडनखी- टेक्टारिया फर्नान्डेन्सिस (Tectaria fernandensis ) इ. या महत्त्वाच्या प्रजाती या विभागात पाहावयास मिळतात.
  • अनावृत बीजी वनस्पतींचा विभाग : या विभागाच्या मध्यभागी पोडोकार्पेसीचा सदस्य मेसेम्ब्रोझायलोन महाबळी (Mesembryoxylon mahabalai) हे दोन दशलक्ष वर्षांपूर्वीचे अश्मीभूत जीवाश्म आहे. अनावृत बीजी वनस्पतींच्या २५ प्रजाती या विभागात आहेत. अगाथीस अल्बा (Agathis alba ), सायकस सर्सीनालीस (Cycas circinalis), जिवंत जीवाश्म-गिंगो बायलोबा (Living Fossil- Ginkgo biloba) आणि पोडोकारपस वॉलिचियानम (Podocarpus wallichianum ) या उल्लेखनीय प्रजाती आहेत.

  • कंदवर्गीय वनस्पतींचा विभाग : हा विभाग पश्चिम घाटातील ४० पेक्षा अधिक कंदवर्गीय वनस्पतींनी समृद्ध आहे. यामध्ये जंगली सुरण (Amorphophallus sp.), सापकांदा (Arisaema sp.), सफेद मुसळी (Chlorophytum sp.) आणि दीपकाडी (Dipcadi sp.) इ. महत्त्वपूर्ण वनस्पतींचा समावेश आहे.
  • जलीय वनस्पतींचा विभाग : या विभागात वनस्पती विश्वातील अद्वितीय वनस्पती अग्रणी वनस्पती उद्यानात कृत्रिम तलावांमध्ये जतन केल्या आहेत. उदा., राक्षस पाणलिली-व्हिक्टोरिया अमेझोनिका (Victoria amazonica), कमळाचे (Nymphaea sp.) विविध प्रकार इ.
  • औषधी वनस्पती विभाग : पंचाहत्तरपेक्षा जास्त शाकीय वनस्पतीचा समावेश असलेल्या या विभागात मंजिष्ठा (Rubia quadrifolia), कोरफड (Aloe vera), चित्रक (Plumbago zeylanica) यासारख्या औषधी गुणधर्मानेयुक्त अशा प्रजाती प्रामुख्याने पाहावयास मिळतात.
  • नारळवर्गीय वनस्पतींचा विभाग : या विभागात ६५ देशी नारळवर्गीय प्रजातींचा समावेश आहे. यामध्ये खासकरून अरेन्गा व्हायटी (Arenga wightii), बेंटिन्किया निकोबारिका (Bentinckia nicobarica), सेंचुरी पाम-कोरिफा अंब्र्याकॉलिफेरा (Corypha umbraculifera), पिनांगा मनी (Pinanga manii) आणि वॉलिचिया डेन्सिफ्लोरा (Wallichia densiflora) या प्रमुख प्रजातींचा समावेश आहे.

  • ऑर्किड वर्गीय वनस्पतींचा विभाग : या विभागात भूस्थानी तसेच अधिपादपीय गटातील सुमारे ८८ प्रजातींचे ऑर्किड त्यांच्या निसर्गसदृश्य  अधिवासांमध्ये जतन केलेल्या आहेत. उदा. युलोफिया निकोबारीका (Eulophia nicobarica), हाबेनारियाच्या (Habenaria sp.) विविध जाती,एरिड्स (Aerides), सीतेची वेणी (Rhynchostylis retusa) इ.
  • औषधी वनस्पतींचे वृक्षालय : या वृक्षालायात धावडा (Anogeissus latifolia), मेढशिंगी (Dolichandrone falcata), मोह (Madhuca latifolia), धूप (Vateria indica), यांसारख्या १०० औषधी वृक्षांची पद्धतशीर लागवड केली आहे.
  • दुर्मीळ, प्रदेशनिष्ठ आणि संकटग्रस्त वनस्पतींचे वृक्षालय : पश्चिमघाट आणि अंदमान-निकोबार बेटांवरील जवळजवळ ६३ दुर्मीळ, प्रदेशनिष्ठ आणि संकटग्रस्त वृक्षांची लागवड या विभागात केलेली आहे. उदा., मँजीफेरा अंदमानिका (Mangifera andamanica), वाटिका चायनेन्सिस (Vatica chinensis), सायझिजियम त्रावणकोरिकम (Syzygium travancoricum),प्लांचोनिया अंदमानिका (Planchonia andamanica) इत्यादी.
  • विविध राईंचा विभाग : या विभागात आंब्याच्या राईमध्ये (Mango grove) आंब्याच्या ३५ स्थानिक प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. तसेच कोकमाच्या राईमध्ये (Garcinia grove) १० पेक्षा जास्त कोकमच्या प्रजाती एकत्रितपणे लागवड केल्या आहेत. याबरोबरच वडाच्या (Ficus groove) राईमध्ये जवळपास वडाच्या जातीतील कृष्णवडासारख्या १० विविध प्रजाती पहावयास मिळतात.
  • कीटकभक्षी वनस्पतींचा विभाग : घटपर्णी (Nepenthes sp.), दवबिंदू (Drosera sp.), सरासिनिया (Sarracenias) आणि डायोनियास (Dionaeas) यांसारख्या कीटकभक्षी वनस्पती या विभागात काचपेटीमध्ये त्यांना पूरक अशा वातावरणात जतन करून ठेवल्या आहेत.
  • लतावर्गीय वनस्पतींचा विभाग : पश्चिमघाटातील महत्त्वपूर्ण अशा २५ पेक्षा जास्त लतावर्गीय वनस्पतींची लागवड या उद्यानाच्या कुंपणाभोवती केलेली आहे. चिनोमॉर्फा फ्रॅग्रन्स (Chonemorpha fragrans), बौहीनिया फोनिका (Bauhinia phoenicea), थंबर्गीया मायसोरेन्स (Thunbergia mysorensis), म्युक्युना संजप्पी (Mucuna sanjappae) इ. वनस्पती या विभागात पाहावयास मिळतात.
  • संकटग्रस्त आणि प्रदेशनिष्ठ वनस्पतींचा रोपमळा : अग्रणी वनस्पती उद्यानात ४ रोपमळे आहेत. त्यांमध्ये  स्थानिक, संकटग्रस्त आणि प्रदेशनिष्ठ अशा २३९ प्रजातींची २४,००० पेक्षा जास्त रोपे वाढविली आहेत. कॅनारीम स्ट्रिक्टम (Canarium strictum), डायसोझायलोन बायनेक्टरीफेरम (Dysoxylum binectariferum), होपीया पोंगा (Hopea ponga), ख्नेमा आटेन्युटा (Knema attenuata), मनिलखरा लिट्टोरीस (Manilkara littoralis), पोलियालथीया फ्रॅग्रन्स (Polyalthia fragrans), देवजांभूळ-सायझिजीयम लेटम (Syzygium laetum) इ. महत्त्वपूर्ण प्रजातींची रोपे तयार केली आहेत.
  • खारफुटी वनस्पतींचा रोपमळा : या रोपमळ्यामध्ये खारफुटी वनस्पतीच्या रोपांची पैदास केली जाते आणि ती रोपे ठराविक वयाची झाल्यानंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्स्थापित केली जातात. उदा., हेरिटेरा लिट्टोरीस (Heritiera littoralis).
  • नीलांबरी सभागृह : हे सभागृह म्हणजे अग्रणी वनस्पती उद्यानाची महत्त्वाची मालमत्ता आहे. जैवविविधता-पर्यावरण जतन, संरक्षण आणि संवर्धन यासंबंधीचे अनेक महत्त्वपूर्ण लोकसहभाग असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन या सभागृहात केले जाते.

समीक्षक – बाळ फोंडके