एंग्‍लर, हाइन्‍रिक गुस्टाफ आडोल्फ : (२५ मार्च १८४४ – १० ऑक्टोबर १९३०)

जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पति वर्गीकरण आणि भू-वनस्पतीशास्त्र यांमध्ये कार्ल फोन प्रँट्ल (Karl A. E. von Prantl) यांच्यासह केलेल्या कार्याबद्दल प्रसिद्ध.

एंग्‍लर यांचा जन्म प्रशियातील सागान (सध्याचे पोलंडमधील झागान;  Żagań) येथे झाला. आडोल्फ एंग्‍लर यांनी ब्रेस्लॉ विद्यापीठात पीएच.डी केली (१८६६). तेथे काही वर्षे शिकवल्यानंतर ते म्यूनिक येथील वनस्पतिशास्त्र संस्थेत वनस्पती संग्रहालयाचे व्यवस्थापक म्हणून नेमले गेले.६-७वर्षे तेथे काम केल्यावर कील विद्यापीठात प्रोफेसर म्हणून ते रुजू झाले. पुढे लिओपोल्दीन  येथील जर्मन ॲकॅडमी ऑफ नॅचरल हिस्ट्री येथेही त्यांची निवड झाली (१८७८). तेथे त्यांनी वनस्पती वर्गीकरण याविषयावर अध्यापन केले. नंतर ते ब्रेस्लॉ येथे वनस्पती उद्यानाचे संचालक आणि प्रोफेसर झाले(१८८४). या कालावधीत त्यांनी बर्लिन- डालेम वनस्पती उद्यानाचे संचालक म्हणूनही काम केले. बर्लिन-डालेम वनस्पती उद्यान हे जगातील सर्वोत्तम उद्यान म्हणून नावाजले गेले. जगातील विविध ठिकाणी जाऊन त्यांनी वनस्पतींच्या प्रचारासंबंधी भाषणे दिली.

एंग्‍लर त्यांच्या वनस्पती वर्गीकरणाची पध्दत अनेक वनस्पती संग्रहालयात तसेच विशिष्ट प्रदेशातील किंवा कालखंडातील वनस्पतींच्या वर्गीकरणासाठी (फ्लोरा; Flora) वापरात आहे. त्यांनी वनस्पती वर्गीकरणाचे प्रचंड काम केले आहे. त्यांच्या पुस्तकातील चित्रांसाठी त्यांनी विविध चित्रकारांची, प्रामुख्याने जोसेफ पोहल (Joseph Pohl) यांची मदत घेतली. पोहल यांनी एंग्‍लर यांच्याकडे लाकडावरचे कोरीव काम शिकून घेतले. दोघांनी ४०वर्षे एकत्र काम केल्याने पोहलने  ६०००प्लेटसाठी ३३,०००हून अधिक चित्रे रेखाटली.

एंग्‍लर यांच्या वनस्पतीसंदर्भातील कामाव्यतिरिक्त ते वनस्पती वर्गीकरणाच्या उदा., ॲरेसी(Araceae), बर्सेरेसी (Burseraceae), कुलावर तज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. सेक्सीफ्रागा प्रजातीवर त्यांचे प्रभुत्त्व होते. डी. केंदोलबरोबर सपुष्प वनस्पती तसेच मार्तीउसबरोबर ब्राझीलमधील वनसंपदेवर त्यांनी ग्रंथ लिहिले. त्यांनी १८८१पासून चालू केलेली शास्त्रीय मासिके आजपर्यंत लाइपसिक प्रसिद्ध होत आहेत. पुढे या मासिकाचे नाव प्लांट डायव्हर्सिटी अँड फायालॉजेनी, बायाग्राफी, स्ट्रक्चर अँड फंक्शन असे बदलण्यात आले. भूशास्त्राच्या विविध घटकांवर आधारीत जैवविविधता निरनिराळ्या प्रदेशांप्रमाणे कशी आढळते हे समजावण्याचे मूलभूत कार्य त्यांनी केले आहे.

एंग्‍लर यांना लिनयन पदकाने सन्मानित करण्यात आले (१९१३). एंग्‍लर यांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय वनस्पती वर्गीकरण मंडळाने एंग्‍लर पदक देण्यास सुरुवात केली (१९८६). वनस्पती वर्गीकरण क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्यांना हे पदक देण्यात येते. त्यांच्या नावाने इंग्लेरा नावाचे शास्त्रीय मासिक बर्लिन – डालेम वनस्पती उद्यानामार्फत प्रसिद्ध केले जाते. अनेक वनस्पतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे. वनस्पती नामकरण पद्धतीमध्ये लेखक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

एंग्‍लर यांचे बर्लिन, जर्मनी येथे निधन झाले.

संदर्भ :

 समीक्षक – मोहन मद्वाण्णा.

प्रतिक्रिया व्यक्त करा