सर्व वनस्पतींतील विशेषत: फुलांचे आणि फळांचे नैसर्गिक रंग अँथोसायनिन (आ.१) आणि फ्लॅव्होन (आ.२) ह्या रसायनांमुळे दिसतात .

आ. (१)  अँथोसायनिन
आ. (२) फ्लॅव्होन

ह्या दोन्ही पदार्थांच्या रेणवीय रचनेतील फरक इतकाच की,  ज्यात केवळ ४ या ठिकाणी कीटोन (—C=O) असेल तर ते पदार्थ फ्लॅव्होन म्हणून ओळखले जातात अन्यथा त्यांना अँथोसायनिन म्हटले जाते. लॅटिनमधील ‘पिवळा’ या अर्थाच्या फ्लॅव्होस (flavos) या शब्दावरून फ्लॅव्होने तसेच ‘निळे फूल’ या अर्थाच्या ग्रीक (anthos म्हणजे फूल आणि kynos कायनोस म्हणजे गडद निळा) ह्या शब्दावरून अँथोसायनिन अशी संज्ञा वनस्पतींतील रंगीत पदार्थांना मिळाली.

विशेषत: ४ किंवा ६ या ठिकाणी —OH घटक असतो तेव्हा रंग आणखी खुलतात. त्याबरोबर आणखीही इतर ठिकाणी —OH किंवा —OCH3 हा घटक असतो. रंगातील विविधता या वेगवेगळ्या रासायनिक सूत्रातून प्रगटते.

बहुतेक वेळी —OH  या घटकाचा नैसर्गिक शर्करांबरोबर रासायनिक संयोग होऊन जो पदार्थ बनतो त्या स्वरूपात ही द्रव्ये वनस्पतीत असतात. त्यामुळेच ती पाण्यात विरघळू शकतात. त्यांच्या विद्रावाचा पीएच (pH)बदलल्यावर त्यांचा रंगही बदलतो. या प्रकारच्या अनेक रसायनांचे उत्पादन करून त्यांचा औषधविज्ञानात उपयोग करून घेतला जातो. मानवी शरीराला ही द्रव्ये अपायकारक नसल्याने खाद्यपदार्थांत हे रंग मिसळण्यास बहुतेक देशात मान्यता मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे उत्पादन आणि उपयुक्तता वाढली आहे. अनेकदा ह्या पदार्थांतील ऑक्सिजनची मॅग्नेशियम (Mg), लोह (Fe), तांबे (Cu) अशा धातूंबरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन आणखी रंगांची निर्मिती होते.

वनस्पती मात्र ह्या रंगांचा उपयोग फक्त विविध कीटकांना आकर्षित करण्यासाठीच करून घेतात. अशा आकर्षिलेल्या  कीटकांद्वारे परागवहन अतिशय सुलभ होते.

नेहमी उपलब्ध असलेली फळे आणि भाज्या ह्यांच्याशिवाय आतून पिवळे असलेले कलिंगड, आतून लाल असलेले संत्रे,पिवळ्या आणि लाल ढोबळ्या मिरच्या, निळे टोमॅटो, जांभळे फुलकोबी असे अनेक वनस्पतिजन्य पदार्थ सर्वत्र उपलब्ध आहेत. ह्यातील हे वेगळे रंग वनस्पतीच्या अंतरंगात झालेल्या अँथोसायनिन आणि फ्लॅव्होन किंवा त्यांच्या धातूंबरोबरही संयोगातून बनलेल्या पदार्थांमुळे दिसतात. आधुनिक जनुकीय विज्ञानाचा उपयोग करून अशा नव्या प्रजाती निर्माण करताना अँथोसायनिन आणि फ्लॅव्होन यांमधील रासायनिक सूत्रात बदल केला जातो आणि त्यामुळे अशा रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांची निर्मिती शक्य होते.

समीक्षक – भालचंद्र भणगे

 

Close Menu