वाघोलीकर, अर्जुनबुवा (जन्म : १८५३ – मृत्यू : मार्च १९१८) :-नामांकित मराठी शाहीर. मूळ नाव अर्जुना भिवा वाघमारे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामधील वाघोली नावाच्या गावामध्ये महार जातीत अर्जुन वाघोलीकरांचा जन्म झाला. अर्जुनबुवांना जन्मतः तल्लख बुद्धी, अफाट स्मरणशक्ती आणि पहाडी आवाज लाभला होता. त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना वाघोलीकरांनी वाघोलीच्या शाळेत पाचवीपर्यंत शिक्षण घेतले व शिकता शिकता रामायण, महाभारत, पांडवप्रताप इत्यादी महाकाव्ये, विविध पुराणे आणि संतसाहित्य ह्यांचा बारकाईने अभ्यास केला. ह्या अभ्यासातून हिंदू धर्माचे पारंपरिक तत्त्वज्ञान व सहिष्णू भारतीय संस्कृती वाघोलीकरांच्या लक्षात आली आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक तेजस्वी बंडखोरपणा निर्माण झाला.
प्रौढपणात वाघोलीकरांनी कलगी संप्रदायातील राघोबा इंदुरीकर ह्यांना गुरु मानून भेदिक लावण्यांचा अभ्यास केला आणि कवने रचता रचता स्वतःचा स्वतंत्र तमाशा फड काढला. अर्जुनबुवांच्या फडामध्ये दादू तुळजापूरकर नावाचा प्रसिद्ध नाच्या होता. अर्जुनबुवांची कवने आणि तुळजापुरांचा अभिनय ह्यांमुळे अर्जुनबुवांच्या तमाशा फडास मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली. इ. स. १८९८नंतर वाघोलीकरांचा फड हा महाराष्ट्रातील एक प्रमुख तमाशा फड म्हणून नावारूपास आला. अर्जुनबुवांच्या काळात तमाशाकला ही फक्त पुरूषांसाठीची कला मानली जात असे. पण अर्जुनबुवांनी खास स्त्रियांसाठी तमाशा भरवून प्रचलित परंपरेस छेद दिला. त्यामुळे स्त्रियांसाठी तमाशा करणारे पहिले तमासगीर म्हणून अर्जुनबुवा वाघोलीकर प्रसिद्ध झाले.
थोर शाहीर पठ्ठे बापूराव ह्यांच्या फडाशी वाघोलीकरांच्या फडाची स्पर्धा चालत असे. एकदा आळंदीतील ब्राह्मणांनी पठ्ठे बापूराव व अर्जुन वाघोलीकर ह्यांच्यात अधिक सरस कोण हे ठरविण्यासाठी ह्या दोन्ही शाहिरांना आळंदीत बोलावून घेतले आणि त्यांच्यासमोर स्वतःच्या कलाविष्कारातून ब्रह्माची उकल करण्याची कसोटी ठेवली. तेव्हा ‘मी ब्राह्मण असलो तरी ब्रह्माची उकल करणार नाही, तूसुद्धा ब्रह्माची उकल करू नकोस.’ असे म्हणून पठ्ठे बापूरावांनी वाघोलीकरांना ब्रह्माची उकल करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण अर्जुनबुवांनी पठ्ठे बापूरावांची आज्ञा फेटाळून आपल्या रचनेतून ब्रह्मतत्त्व उलगडून दाखविले आणि ब्रह्माची उकल करण्याची स्पर्धा जिंकली, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. ह्यावरून सर्वसामान्य जनतेच्या मनातील अर्जुनबुवांची बंडखोर प्रतिमा लक्षात येते.
अर्जुनबुवांनी अनेक वग, लावण्या, कवने, गौळणी असे विपुल साहित्य लिहिले होते. पण त्यांतील बरेचसे कालौघात नष्ट झाले. त्यामुळे आज अर्जुनबुवांची काही कवनेच उपलब्ध आहेत. ‘बॅलिस्टरची लावणी’, ‘निळावंतीचा वग’ ह्या अर्जुनबुवांच्या रचना महत्त्वपूर्ण मानल्या जातात. त्यांमधून शंभर वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील लोकांचे छंद-फंद, बदलती कुटुंबव्यवस्था ह्यांची कल्पना येते. इ. स. १९१८मध्ये वयाच्या ६५व्या वर्षी अर्जुन वाघोलीकर ह्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
संदर्भ :
- काळे ,पंढरीनाथ, मराठी तमाशा : उगम आणि वाटचाल, लोककला प्रतिष्ठान, इ. स. १९९५.