महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध जलदुर्ग. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ हा किल्ला असून बंदर ते किल्ला हे अंतर एक किमी. आहे. मोटरबोटीने २५ मिनिटांत किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. किल्ल्याचे क्षेत्रफळ ४.५ हेक्टर असून किल्ल्याची उत्तर-दक्षिण लांबी ४८० मी. आणि रुंदी १२३ मी. आहे.
किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मुख्य दरवाजापासून १०० मी. अंतरावर समुद्राजवळ तुरळक तटबंदी व एका भग्न दरवाजाचे अवशेष दिसतात. या भग्न दरवाजातून आत डावीकडे दोन तोफा अर्ध्या गाडलेल्या स्थितीत आहेत. तसेच पुढे ७ फूट लांबीची एक तोफ आहे. पुढे सु. ३० फूट उंचीचे दोन भक्कम बुरूज व त्यांमधून दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. या पायऱ्यांच्या वाटेने बुरुजांमधून डावीकडून मुख्य दरवाजाजवळ जाता येते. मुख्य दरवाजा कल्पकतेने बांधलेला असून तो अद्यापि उत्तम स्थितीत दिसून येतो. दरवाजाच्या आसपास अनेक शिल्पाकृती पाहायला मिळतात. दरवाजाची कमान पूर्णावस्थेत असून कमानीच्या शेजारील भिंतीवर हनुमानाचे शिल्प कोरलेले आहे. सध्या हनुमानाचे हे शिल्प शेंदूर लावून रंगविले आहे. दरवाजा उत्तराभिमुख असून हनुमानाचे शिल्प पूर्वाभिमुख आहे. या महादरवाजाच्या कमानीवर मध्यभागी फुलाचे शिल्प कोरलेले आहे. कमानीच्या वरच्या भागात नक्षीकाम केलेले दिसते. या दरवाजात दिसणारी सर्वांत महत्त्वाची आणि वेगळी गोष्ट म्हणजे महादरवाजाच्या पायरीवर असलेले कासवाचे शिल्प. इतर कोणत्याही सागरी किल्ल्यावर किंवा जलदुर्गावर अशा प्रकारे कासवाचे शिल्प कोरल्याचे दिसत नाही. दहा ते बारा बांधीव पायऱ्या चढून महादरवाजापर्यंत पोहोचता येते. दरवाजाच्या आतील बाजूने सैनिकांसाठी प्रशस्त देवड्या बांधलेल्या आहेत. महादरवाजाच्या कमानीतून आत गेल्यावर डावीकडे जी देवडी आहे त्यामध्ये दोन मोठ्या खोल्या बांधलेल्या आहेत.
किल्ल्यात प्रवेश केल्यावर डावीकडे देवडीतील खोलीलगतची बांधीव पायऱ्यांची एक वाट पूर्वेकडील तटबंदीवर जाते. किल्ल्यामध्ये गवत व बोरांच्या झाडांचे जंगल वाढलेले दिसून येते. पश्चिमेकडील तटाच्या वाटेवर खडकात खोदलेले तीन तलाव दिसून येतात. हे तीनही तलाव एकमेकांना जोडलेले आहेत. हे तलाव पश्चिमेकडील तटबंदीलगतच आहेत. तलावाच्या जवळ तटबंदीमध्ये एक चोरदरवाजा आहे. सु. ४ फूट उंच असा हा चोरदरवाजा उत्तम स्थितीत दिसून येतो. या चोरदरवाजाची किल्ल्याच्या आतील बाजूची कमान सुंदर आहे. या कमानीतून पायऱ्यांची वाट चोरदरवाजाने पश्चिमेकडील समुद्रात बाहेर पडते. चोरदरवाजातून किल्ल्याबाहेर पडण्यासाठी खडकात खोदलेल्या पायर्यांचे अवशेष दिसतात. पश्चिमेकडील तटबंदीत असलेल्या पाच बुरुजांची रांग अप्रतिम दिसते. प्रत्येक बुरूज साधारणतः २५-३० फूट उंचीचा असून सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीत एकूण २४ बुरूज बांधलेले दिसतात.
पूर्वेकडील तटावरून गडाच्या दक्षिण टोकाकडे जाताना उजवीकडे एक कोरडा तलाव दिसतो. तसेच पुढे याच तटबंदीजवळ आणखी एक खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. पुढे अर्धवट बुजलेल्या स्थितीतील एक विहीर आहे. सर्वांत शेवटी दक्षिण टोकाला कोठारसदृश बांधकामाचे अवशेष दिसतात. गडाच्या उत्तर भागातही दाट झाडीने झाकलेली बांधकामाची काही जोती दिसतात. ही जोती वाड्याची, घरांची की कोठारांची आहेत, याबाबत माहिती मिळत नाही.
इ. स. १६४० मध्ये कान्होजी आंग्रे यांचे वडील तुकोजी आंग्रे शहाजीराजांकडे होते. निजामशाही संपल्यावर दक्षिण कोकणातील भाग हा आदिलशाहीत समाविष्ट झाला. पुढे तो भाग लगेचच छ. शिवाजी महाराजांनी घेतला. त्यामुळे आदिलशाहीत सुवर्णदुर्गसारख्या किल्ल्याचे बांधकाम झाले, असे वाटत नाही. तुरळक तटबंदी निजामशाहीत बांधली गेली असावी. इ. स. १६५९ पर्यंत तुकोजी आंग्रे छ. शिवाजी महाराजांबरोबर होते. इ. स. १६७४ मध्ये मराठी आरमाराकडून सुवर्णदुर्गची पद्धतशीरपणे दुरुस्ती केली गेली. कान्होजी आंग्रे यांचे बालपण अंजनवेल येथे गेले. कान्होजींनी सुवर्णदुर्गाच्या किल्लेदाराच्या हाताखाली काम करण्यास सुरुवात केली. कान्होजींचा पराक्रम पाहून छ. राजाराम महाराजांनी सुवर्णदुर्गाच्या काराभारात त्यांना बढती दिली. एका लढाईत सुवर्णदुर्गाचा किल्लेदार फितुर झाला, तेव्हा त्या लढाईची सर्व सूत्रे कान्होजींनी आपल्या हाती घेऊन पराक्रम गाजविला होता.
कान्होजी आंग्रे यांना ताराबाईंच्या पक्षाकडून सरखेल ही पदवी १६९४ मध्ये मिळाली. इ. स. १६९८ मध्ये सिदोजी गुजर यांच्या मृत्युमुळे कान्होजी आंग्रे मराठी आरमाराचे मुख्य अधिकारी झाले. या आरमाराच्या छावण्या सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग येथे होत्या. इ. स. १७१३ मध्ये कान्होजी आंग्रे छ. शाहू महाराजांच्या पक्षात आले. तेव्हा सुवर्णदुर्ग छ. शाहू महाराजांकडे आला. इ. स. १७३१ पर्यंत कोणतीही लढाई न होता सेखोजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग मराठ्यांकडेच होता. इ. स. १७५५ च्या आसपास सुवर्णदुर्ग तुळाजी आंग्रे यांच्याकडे होता. पेशवे व इंग्रज यांच्या एकत्रित फौजांनी मिळून इ. स. १७५५ मध्ये सुवर्णदुर्गावर स्वारी केली. रामाजी पंत महादेव हे मराठा सरदार जमिनीमार्गे, तर इंग्रजांनी सागरामार्गे हल्ला केला. यामध्ये तुळाजी आंग्रेंना पलायन करावे लागले. सुवर्णदुर्गावर आगीच्या गोळ्यांचा मारा केल्यामुळे किल्ल्यातील गवत पेटले. गवतांमुळे दारू कोठारानेही पेट घेतला. याच दरम्यान गोवा म्हणजे हर्णे किल्ल्यावरही मारा करण्यात आला. प्रथम गोवा पेशव्यांना मिळाला. आंग्र्यांच्या सैन्याने २२ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत सुवर्णदुर्ग झुंजवला. अखेर कमांडर जेम्सने किल्ला जिंकून पेशव्यांच्या स्वाधीन केला. इ. स. १८०२ मध्ये दुसरे बाजीराव काही काळासाठी सुवर्णदुर्गमध्ये राहिले होते.
इ. स. १८०३ मध्ये एका मराठा सरदाराने पेशव्यांकडून सुवर्णदुर्ग घेतला; पण लगेचच इंग्रजांनी किल्ला परत जिंकून पेशव्यांना दिला. इ. स. १८१८ मध्ये कर्नल केनेडी याने सुवर्णदुर्ग किल्ला पेशव्यांच्या शिबंदीकडून पुन्हा जिंकून घेतला.
संदर्भ :
- गोगटे, चिं.ग. महाराष्ट्र देशातील किल्ले (भाग – २), पुणे,१९०५.
- जोशी, सचिन विद्याधर, दुर्गजिज्ञासा, पुणे,२०१३.
समीक्षक : जयकुमार पाठक