एक सर्वपरिचित फुलझाड. रुई वनस्पती ॲपोसायनेसी कुलाच्या ॲस्क्लेपीएडेसी उपकुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव कॅलॉट्रॉपिस जायगँशिया आहे. ती मूळची कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स, थायलंड, श्रीलंका, चीन व भारत या देशांतील आणि आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशातील आहे. महाराष्ट्रात पडीक पण रुक्ष जागी ती वाढलेली दिसून येते. कॅलॉट्रॉपिस  प्रजातीत एकूण सहा जाती असून त्यांपैकी रुई (कॅ. जायगँशिया) आणि रुईमांदार (कॅ. प्रोसीरा) या जाती भारतात विशेषकरून आढळतात.

रुई (कॅलॉट्रॉपिस जायगँशिया) : (१) वनस्पती आणि (२) फळ व फुले यांसह फांदी

रुईचे बहुवर्षायू झुडूप मोठे असून ते सु. ४ मी. उंच वाढते. वनस्पतीच्या सर्व भागांवर मऊ व पांढरी लव असते. तिची साल पिवळट पांढरी असून खोडावर साधी, समोरासमोर, जाड, लहान देठांची व खोडांना वेढून घेणारी पाने असतात. पाने वडाच्या पानासारखी लंबगोलाकार असून ती खुडली असता त्यांच्या देठांतून पांढरा चीक बाहेर पडतो. फुले पानांच्या बगलेत चवरीसारख्या फुलोऱ्यात येतात. त्यांच्या कळ्या लंबगोल असतात. फुले जांभळट किंवा पांढरी आणि त्यांच्या पाकळ्या पसरट असून ती बिनवासाची असतात. फुलांत पाच पुंकेसर असून ते दलपुंजाला चिकटलेले असतात. फुलांच्या मध्यभागातून मुकुटासारखा दिसणारा भाग वर आलेला असतो. हा भाग पुंकेसरांच्या देठांपासून बनलेला असतो. जायांग दोन संयुक्त अंडपींचे व ऊर्ध्वस्थ असून त्यातील बीजांडे व कुक्षीवृंत सुटे असतात. कुक्षी एकसंध व पंचकोनी असते. तिच्या कोपऱ्यावर परागकणांचे झुबके असतात. या झुबक्यांना परागपुंज म्हणतात. पेटिका फळे पिंगट, चपटी व हलकी असून त्यात अनेक लंबगोल व गुच्छरोमी (नरम तंतूंचा झुबका असलेल्या) बिया असतात. फळे तडकल्यावर बिया वाऱ्याने हवेत पसरतात.

रुईच्या मुळाची साल कडू, उष्ण, वांतिकारक, कफ बाहेर काढणारी व दाहजनक असते. पाने गरम करून पोटीस म्हणून वापरतात. चीक रेचक आहे. चीक पोटात गेल्यास जुलाब होतात व अंगाला लागल्यास दाह होऊन फोड येतात. तो कातडी कमाविण्यासाठी वापरतात. रुईची विषबाधा झाली तर चिंचेचा पाला प्रतिविष म्हणून वापरतात. बियांवरील नरम, हलके व तलम तंतू उश्या व गाद्या भरण्यासाठी वापरतात.

रुईमांदार (कॅलॉट्रॉपिस प्रोसीरा) : (१) वनस्पती आणि (२) पाने व फुले यांसह वनस्पती

रुईमांदार : पश्‍चिम भारतात व मध्य भारतात रुईच्या प्रजातीतील कॅ. प्रोसीरा ही जाती आढळून येते. तिला रुईमांदार म्हणतात. रुईमांदारचे झुडूप रुईपेक्षा लहान असून ते १·८–२·४ मी. उंच वाढते. अनेक बाबतींत ते रुईसारखे दिसते. त्यांच्या कळ्या गोलसर असतात. फुले सुगंधी व पांढरी असतात. फुलांच्या पाकळ्या उभट असून त्यांवर जांभळे ठिपके असतात. चीक, कापूस, तंतू व औषधी गुणधर्म यांबाबतीत रुईमांदार आणि रुई यांमध्ये फार फरक नसतात. रुईमांदार अनेकदा शेतजमिनीत तणाप्रमाणे वाढते. तणनाशक वापरून त्यावर नियंत्रण राखता येते.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा