मानवी मेंदूचा एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे बदलशीलता होय. यालाच मज्जा बदलशीलता असेही म्हणतात. मानवी मेंदूत मज्जापेशींच्या लक्षावधी जोडण्या असतात. यातल्या काही जोडण्या जनुकांच्या आज्ञावलीनुसार होतात आणि काही जोडण्या अनुभवाने, शिक्षणाने तयार होतात किंवा बदलत राहतात. बदलशीलता हा सृष्टीक्रम आणि संवर्धन यांच्या मधला दुवा आहे.

अनुभवांनी किंवा अन्य कोणत्याही कारणांनी मेंदूतील पेशींच्या जोडण्या आणि आनुषंगिक मज्जामार्ग यांत बदल होतो. या मानवी मेंदूच्या क्षमतेला बदलशीलता असे म्हणता. ज्या कारणांमुळे या जोडण्यांमध्ये बदल होतात, त्यावरून याचे दोन प्रकार पडतात.

(१) कार्यात्मक बदलशीलता : मेंदूच्या एखाद्या भागाला काही कारणात्सव जर इजा झाली असेल, तर त्या भागाचे कार्य दुसऱ्या कार्यक्षम भागाकडून पेलले जाते. या कार्यक्षमतेला कार्यात्मक लवचिकता असे म्हणतात.

(२) संरचनात्मक बदलशीलता : मेंदूच्या रचनेत शिक्षणाने किंवा अनुभवाने बदल घडून येतात. अशा प्रकारचे बदल घडून येण्याच्या क्षमतेला संरचनात्मक लवचिकता असे म्हणतात.

मेंदूमध्ये शिक्षणामुळे किंवा अनुभवामुळे जे बदल घडून येतात, त्यामध्ये मेंदूतल्या मज्जापेशी, मज्जापेशीला ऊर्जा पुरविणाऱ्या ग्लियाल पेशी, तसेच रक्तभिसरणाशी संबंधित पेशी सहभागी होतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत असा समज होता की, जसजशी व्यक्ती प्रौढ होत जाते, तसतशी मेंदूतल्या पेशींची बांधणी पक्की होत जाते; परंतु आधुनिक संशोधनाने असे सिद्ध केले आहे की, शिक्षणामुळे होणाऱ्या या बदलाची प्रक्रिया आयुष्यभर सुरू राहते. यामध्ये मज्जापेशींच्या नवीन जोडण्या तयार होतात किंवा पूर्वीच्या जोडण्यांच्या रचनेत बदल होतो. मज्जापेशींच्या ज्या जोडण्या कमकुवत असतात, त्या कालांतराने नष्ट होतात आणि ज्या बळकट असतात, त्या टिकून राहतात. कोणत्या जोडण्या टिकून राहणार आणि कोणत्या नष्ट होणार, हे व्यक्तीला मिळणाऱ्या अनुभवांवर अवलंबून आहे. ज्या मज्जापेशी क्रियाशील आहेत आणि ज्या जोडण्या वारंवार वापरल्या जातात, त्या टिकून राहतात.

व्यक्ती करीत असलेल्या शारीरिक आणि मानसिक कृतींमुळे मज्जापेशींच्या जोडण्या होतात; परंतु एकदा एखाद्या अनुभवामुळे किंवा कृतीमुळे मज्जापेशी जोडल्या गेल्या की, ही जोडणी त्या विशिष्ट अनुभवापुरती मर्यादित राहत नाही. याच्या साह्याने मेंदू इतरही कामे करू शकतो. उदा., संगीताच्या प्रशिक्षणामुळे केवळ संगीतातच प्रभुत्व प्राप्त होते असे नाही, तर संगीत शिकताना मेंदूमध्ये जे बदल होतात, त्याच्या साह्याने गणित विषयाचे अध्ययन करणे सुकर होते. व्यक्तीचा बाह्य वातावरणाशी संबंध प्रस्थापित होत असताना ज्या जोडण्या तयार होतात, त्यांच्या साह्यानेच विचारांची निर्मिती होते. सामाजिक आंतरसंबंधांतून भावनांची निर्मिती होते, कल्पनांची देवाणघेवाण, नव्या माहितीचा शोध किंवा जुन्या माहितीचे नव्याने आकलन यांतून शिक्षण, तसेच स्मृती या प्रक्रिया अधिक परिपक्वपणे घडतात. एकूणच मानवी उत्कांतीच्या प्रवासात गुहेत राहणारा माणूस ते आजचा आधुनिक माणूस हा बदल मानवी मेंदूच्या बदलशीलतेमुळेच झाला आहे.

बदलशीलतेची ही प्रक्रिया जरी आयुष्यभर सुरू राहत असली, तरी वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या प्रकारच्या लवचिकतेचे प्राबल्य असते. उदा., वयाच्या साधारण दहा वर्षांपर्यंत भाषिक विकास जोमाने होतो. नंतरच्या वयात भाषिक विकास होऊ शकणार नाही, असे नाही; परंतु या विकासाचा वेग आधीच्या तुलनेत कमी होतो म्हणून अधिक श्रम घ्यावे लागतात. म्हणूनच विशिष्ट वयात विशिष्ट अनुभव मिळणे गरजेचे असते.

बुद्धीच्या पटलावर पूर्वानुभवामुळे तयार झालेले आकृतीबंध केवळ नव्या अनुभवामुळेच बदलू शकतात. ही वस्तुस्थिती शिक्षकाची भूमिका स्पष्ट करायला मदत करते. माहितीपासून सुरू झालेला प्रवास ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना सतत संधी उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी आवश्यक सुविधा पुरविणे, ही एकविसाव्या शतकातील शिक्षकांची प्रमुख भूमिका आहे. अनुभवाद्वारे मेंदूत बदल आणि बदललेल्या मेंदूद्वारे नव्या अनुभवांचा स्वीकार या शृंखलेतून माणसाला समज, परिपक्वता येत राहते. त्या आधारे व्यक्तीचे वर्तन होत राहते. कोणत्याही विद्याशाखेच्या शिक्षकाने मज्जाशास्त्रीय ज्ञानाच्या आधारे आपल्या आशयाची आखणी केली, तर शिक्षणाने निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यात अडसर येणार नाही. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मेंदूची लवचिकता हा आशेचा किरण आहे.

संदर्भ :

  • सहस्त्रबुद्धे, चंद्रकांत, गूढ उकलताना… आधुनिक मेंदू संशोधन – ४, पुणे, २०१५.
  • Flori, Nicole, Cognitive Neuroscience, Paris, 2006.
  • Sylwester, Robert, A Child’s Brain : The Need For Nurture, California, 2010.

समीक्षक : रमेश पानसे