भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक लहान-मोठे स्टॉक एक्सचेंज आहेत. त्यांपैकी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई – स्थापना इ. स. १८७५) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) हे दोन स्टॉक एक्सचेंज महत्त्वाचे मानले जातात. यांच्या मार्फत आपल्या देशाचा मोठा व्यापार चालतो. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा आशियातील सर्वांत जुना स्टॉक एक्सचेंज आहे. प्राथमिक बाजारात इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) द्वारा आपले भागरोखे (शेअर) वितरित करून एखादी कंपनी जेव्हा आपले नाव कोणत्याही स्टॉक एक्सचेंजच्या यादीत समाविष्ट करून घेते, तेव्हाच अशा कंपनीचे भागरोखे खरेदी-विक्रीसाठी दुय्यम बाजारात उपलब्ध होतात. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये विविध क्षेत्रांतील अनेक कंपन्यांचा समावेश होतो.  बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांकाला ‘एस अँड पी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेटिव्ह इंडेक्स’ किंवा ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ३०’ किंवा फक्त ‘सेन्सेक्स’ असेही संबोधले जाते. सेन्सेक्स मोजण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील सर्वोत्तम कामगिरी असणाऱ्या अशा विविध क्षेत्रांतील ३० कंपन्या विचारात घेतल्या जातात. निर्देशांकावरून आपल्याला बाजाराचा रोख समजतो,  म्हणजे बाजारातील चढ-उतारांची माहिती मिळते. सेन्सेक्सप्रमाणे निफ्टी हासुद्धा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक आहे. निफ्टी मोजण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील सर्वोत्तम अशा ५० कंपन्यांचा विचार केला जातो.

सेन्सेक्स मोजण्याची पद्धती : सुरुवातीला सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील सर्वोत्तम कामगिरी असणाऱ्या ३० कंपन्यांच्या बाजार भांडवलावर (मार्केट कॅपिटालायझेशन) आधारित होता; परंतु १ सप्टेंबर २००३ पासून सेन्सेक्स मोजण्यासाठी मुक्त अस्थायी बाजारभांडवल पद्धती (फ्री फ्लोट मार्केट कॅपिटालायझेशन) अवलंबिण्यात आली. निर्देशांकातील कंपन्यांची निवड ही सरलता आणि पारदर्शकता या तत्त्वांवर आधारित असते. अशा कंपन्यांची निवड करताना पुढील मार्गदर्शक तत्त्वांचा वापर केला जातो.

  • बाजार भांडवल : बाजार भांडवलावर आधारित सर्वोत्तम कामगिरी असलेल्या १०० कंपन्यांच्या यादीत अशा कंपनीचा समावेश असावा. मुक्त अस्थायी बाजार भांडवलावर आधारित निर्देशांकात समावेश असलेल्या प्रत्येक कंपनीचा भार गुणक हा निर्देशांकाच्या कमीत कमी ०.५% इतका असावा.
  • खरेदी-विक्रीची वारंवारता : गत वर्षात व्यापाराच्या प्रत्येक दिवशी अशा कंपनीच्या भागरोख्यांची खरेदी-विक्री झालेली असावी.
  • दर दिवशीचे सरासरी व्यापारी : गतर्षातील दर दिवशीच्या सरासरी व्यापाऱ्यांच्या संख्येवर आधारित सर्वोत्तम अशा १५० कंपन्यांच्या यादीत अशा कंपनीचा समावेश असावा.
  • दर दिवशीची सरासरी उलाढाल : मागील वर्षात प्रत्येक दिवशी भागरोख्यांची सरासरी खरेदी-विक्री झालेल्या सर्वोत्तम अशा १५० कंपन्यांच्या यादीत या कंपनीचा समावेश असायला हवा.
  • कालावधी : अशा कंपनीचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये समावेश होऊन कमीत कमी एक वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला असावा.

कंपनीचे मुक्त अस्थायी बाजारभांडवल म्हणजे त्या कंपनीच्या एकूण भागरोख्यांपैकी जे भागरोखे त्या कंपनीच्या मालकाकडे किंवा सरकारकडे आहेत, अशा भागरोख्यांची संख्या वगळून बाजारात उपलब्ध असलेल्या भागरोख्यांची संख्या गुणिले प्रति भागरोखे किंमत. उदा., एखाद्या ‘क्ष’ कंपनीचे एकूण १,००० भागरोखे आहेत. पैकी १०० भागरोखे हे त्या कंपनीच्या मालकाकडे आहेत. म्हणजे एकूण ९०० भागरोखे हे बाजारात खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जर या कंपनीची प्रति भागरोखे किंमत रुपये ११० असेल तर, कंपनीचे एकूण बाजार भांडवल = १,००० x ११० = १,१०,०००. तसेच कंपनीचे मुक्त अस्थायी बाजारभांडवल = ९०० x ११० = ९९,०००.

कंपनीचे बाजारभांडवल = कंपनीच्या भागरोख्यांची संख्या x प्रति भागरोखे किंमत

सेन्सेक्स मोजण्याच्या महत्त्वाच्या पायऱ्या :

  • (१) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील सर्वोत्तम कामगिरी असणाऱ्या अशा ३० कंपन्यांपैकी प्रत्येक कंपनीचे बाजारभांडवल मोजणे.
  • (२) त्यांचे मुक्त अस्थायी बाजारभांडवल मोजणे.
  • (३) यानंतर निर्देशांकात समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या एकूण मुक्त अस्थायी बाजारभांडवलास इंडेक्स डिव्हायजरने भागणे (इंडेक्स डिव्हायजर = आधारभूत वर्षाचा निर्देशांक/आधारभूत वर्षाचे भांडवल). उदा., एखाद्या दिवशी या कंपन्यांचे बाजारभांडवल हे ९०,६०,००० आहे आणि सेन्सेक्सचा १९७८-७९ साठीचा आधारभूत वर्षाचा निर्देशांक हा ६०,००० आहे, तर इंडेक्स डिव्हायजर = १००/६०,००० आणि त्या वेळेचा सेन्सेक्स निर्देशांक = ९०,६०,००० x १००/६०,००० = १५,१००.

सेन्सेक्सचे फायदे :

  • सेन्सेक्समुळे आपल्याला भागरोखे बाजारातील तेजी-मंदीची, चढ-उताराची माहिती मिळते.
  • भारतात सर्वप्रथम १९७८-७९ मध्ये सेन्सेक्स ठरविण्यात आला. तो १०० अंश इतका होता. सेन्सेक्समुळे आपल्याला देशातील विविध क्षेत्रांतील सर्वोत्तम ३० कंपन्यांच्या कामगिरीबाबत माहिती मिळते.
  • सर्वसामान्य समज असा की, सेन्सेक्समुळे देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत माहिती मिळते; परंतु देशाच्या आर्थिक प्रगतीचे मापन करण्यासाठी जीडीपी, जीएनपी, एचडीआय यांसारखे इतर जास्त समर्पक निकष वापरले जातात.

सेन्सेक्सच्या वाढण्याला भागरोखे बाजारात ‘बुल मार्केट’ असे म्हणतात. याला भागरोखे बाजार तेजीत असणे, असेही म्हटले जाते. या काळात लोक जास्तीत जास्त भागरोखे खरेदी करतात. निर्देशांकात समाविष्ट असलेल्या कंपन्यांची कामगिरीही चांगली दिसून येते. याउलट, जेव्हा सेन्सेक्समध्ये घसरण होते, तेव्हा त्याला ‘बेअर मार्केट’ असे म्हणतात. यालाच भागरोखे बाजारातील मंदी असेही संबोधले जाते. अशा वेळी निर्देशांकातील कंपन्यांची कामगिरीही ढासळलेली दिसून येते. लोक जास्तीत जास्त भागरोखे विकतात. थोडक्यात, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये समावेश असलेल्या सर्वोत्तम अशा ३० कंपन्यांच्या कामगिरीतील चढ-उतारांवर सेन्सेक्स हा उपयुक्त निर्देशांक आधारलेला असतो.

सेन्सेक्सवर परिणाम करणारे घटक : देशातील विविध आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घटकांचा सेन्सेक्सवर परिणाम दिसून येतो.

  • व्याजदर : व्याजदरात वाढ झाली की, कर्ज महाग होते. त्यामुळे गुंतवणुकीत घट दिसून येते. वाढत्या खर्चाला निर्बंध घालण्यासाठी कंपन्या आपल्या कामगारांच्या संख्येत कपात करू लागतात. कमी गुंतवणुकीचा कंपन्यांना फटका बसून त्यांचे उत्पन्न कमी होते व याचा प्रतिकूल परिणाम भागरोखे बाजारावर आणि पर्यायाने सेन्सेक्सवर होतो. याउलट, व्याजदर कमी झाले की, कंपन्यांची आर्थिक गुंतवणूक वाढते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढून याचा सेन्सेक्सवर चांगला परिणाम दिसून येतो.
  • चलनवाढ : चलनवाढीमुळे लोकांची क्रयशक्ती कमी होते. लोक भागरोखे बाजारात कमी गुंतवणूक करतात. वाढत्या व्याजदरामुळे कंपन्यांच्या गुंतवणुकीतही घट दिसून येते. वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने त्यांची मागणी कमी होते. याचा विपरित परिणाम कंपन्यांच्या उत्पन्नावर आणि सेन्सेक्सवर दिसून येतो.
  • जागतिक पेठेतील चढ-उतार : जागतिक बाजारपेठेत अनेक देश हे व्यापाराने जोडले गेलेले आहेत. त्यामुळे प्रगत देशातील तेजी किंवा मंदीचे लोण सहजपणे इतर देशांत पसरते. एखाद्या देशाच्या भागरोखे बाजारातील चढ-उतारांचा परिणाम इतर देशांच्या भागरोखे बाजारावर दिसून येतो. यात सट्टेबाजांची प्रमुख भूमिका असते. उदा., ब्रेक्झिटमुळे भारतीय बाजारपेठेत फार मोठी घट झाली होती. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक कोसळले होते. या मागचे मुख्य कारण हे ब्रेक्झिटमुळे भविष्यात होणाऱ्या उलाथापालथीचा सट्टेबाजांनी लावलेला अंदाज होय.
  • विदेशी वित्तीय गुंतवणूक : विदेशी वित्तीय गुंतवणूक वाढली की, सेन्सेक्स सुधारतो. तसेच ती कमी झाली की, सेन्सेक्स घसरतो.
  • राजकीय घडामोडी : देशांतर्गत राजकीय घडामोडींचाही सेन्सेक्सवर परिणाम दिसून येतो. जेव्हा देशाचा अर्थसंकल्प जाहीर होतो, तेव्हा सेन्सेक्समध्ये भरपूर चढ-उतार दिसून येतात. अर्थसंकल्पातील तरतुदी जर भागरोखे बाजारास अनुकूल असतील, तर सेन्सेक्समध्ये तेजी दिसून येते, अन्यथा सेन्सेक्स घसरतो. निवडणुकांच्या काळातही आपल्याला सेन्सेक्समधील वाढ आणि घट मोठ्या प्रमाणात दिसून येते. उदा., २०१४ च्या निवडणुकीनंतर जेव्हा मोदीसरकार सत्तेवर आले, तेव्हा त्यांनी प्रतिपादित केलेल्या ‘मेक इन इंडिया’सारख्या औद्योगिक, तसेच इतर आर्थिक, राजकीय धोरणांचा सेन्सेक्सवर चांगला परिणाम दिसून आला. या काळात सेन्सेक्समध्ये बरीच तेजी दिसून आली. या महत्त्वाच्या घटकांशिवाय अजूनही काही गोष्टींचा सेन्सेक्सवर प्रभाव होतो. उदा., सोन्याच्या भावातील चढ-उतार, कच्च्या खनिज तेलाच्या भावातील अस्थिरता, एखाद्या देशावरील दहशतवादी हल्ल्याची बातमी इत्यादी.

सेन्सेक्सचे महत्त्वाचे टप्पे : १९७८-७९ मध्ये जेव्हा सर्वप्रथम सेन्सेक्स ठरविण्यात आला, तेव्हा तो १०० अंश इतका होता. सेन्सेक्सने आज सुमारे ६१,००० अंशाच्या वर आकडा पार केला (२०२२). सेन्सेक्सच्या या जडण-घडणीतील महत्त्वाचे टप्पे आपल्याला खालील तक्त्यामधून स्पष्ट होतात.

वर्ष सेन्सेक्स आकडा वर्ष सेन्सेक्स आकडा
२५ जुलै १९९० १,००० अंश ६ जुलै २००७ १५,००० अंश
१५ जानेवारी १९९२ २,००० अंश ११ डिसेंबर २००७ २०,००० अंश
२९ फेब्रुवारी १९९२ ३,००० अंश १६ मे २०१४ २५,००० अंश
३० मार्च १९९२ ४,००० अंश ४ मार्च २०१५ ३०,००० अंश
११ ऑक्टोबर १९९९ ५,००० अंश १६ जून २०१८ ३५,००० अंश
११ फेब्रुवारी २००० ६,००० अंश नोव्हेंबर २०१९ ४१,००० अंश
२१ जून २००५ ७,००० अंश १६ जानेवारी २०२० ४२,००० अंश
८ सप्टेंबर २००५ ८,००० अंश ऑक्टोबर २०२१ ६२,२४५ अंश
९ डिसेंबर २००५ ९,००० अंश नोव्हेंबर २०२२ ६१,२२३ अंश
७ फेब्रुवारी २००६ १०,००० अंश

समीक्षक : सुहास सहस्त्रबुद्धे