भारतातील प्राचीन ऐतिहासिक काळाचा प्रारंभ निश्चित करण्याचा निकष हा लिहिण्याची कला अवगत असल्याच्या पुराव्यांवर आधारित आहे, तर या काळाची मर्यादा गुप्त-वाकाटक काळाची अखेर ते इसवी सन ५५०, अशी मानली जाते. हा कालमर्यादानिश्चिततेचा निकष विस्ताराने मोठ्या असलेल्या साम्राज्यांचा शेवटचा टप्पा असा संबोधिला गेला आहे. ब्राह्मी व खरोष्ठी या भारतातील सर्वांत प्राचीन समजल्या जाणाऱ्या लिप्यांचा काळ सम्राट अशोक या मौर्य घराण्याच्या राज्यकर्त्याच्या जगप्रसिद्ध अभिलेखाच्या समकालीन असल्याचे इसवी सन १९९० पर्यंत ग्राह्य धरले जात होते. गेल्या काही दशकांत दक्षिण भारतात कोडुमनाल, पोरुन्थल इ. ठिकाणी तसेच श्रीलंकेत अनुराधपुर येथे झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनातून ब्राह्मी लिपीची प्राचीनता इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणजेच या नव्याने उजेडात आलेल्या माहितीच्या आधारावर प्राचीन ऐतिहासिक काळाचा आरंभ महाजनपदाच्या काळापासून, इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून, असल्याचे सांगितले जाते. प्राचीन ऐतिहासिक काळात, तीर्थंकर वर्धमान महावीर, गौतम बुद्ध यांसारखे युगपुरुष भारतात होऊन गेले. भारतात आणि जागतिक स्तरावर या काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशी विविध स्थित्यंतरे झाली. ही स्थित्यंतरे प्रामुख्याने भाषा व लिपी यांच्या माध्यमातून प्रभावीपणे घडून आली. भारत व सभोवती असलेल्या शेजारील राष्ट्रांशी वेगवेगळ्या स्तरांवर माहितीची देवाणघेवाण होत राहिली. याचा एकत्रित परिणाम म्हणजे जनपदे, छोटी तसेच मोठी राज्ये या काळात अस्तित्वात आली. शास्त्रशुद्ध शासनप्रणालीवर आधारित ‘परराष्ट्र धोरणʼ हे एक महत्त्वाचे अंग असलेली शासनव्यवस्था व त्या अनुषंगाने साम्राज्य प्रथमच उदयास आले. भारतभूमीवरचे पहिले एकसंध राष्ट्र याच कालखंडातील. याच काळात विविध परकीय आक्रमणेही झाली. कालांतराने हे परकीय भारताच्या भूमीत एकरूप झाले. विश्वातील पहिले विद्यापीठ भारतात या कालखंडात स्थापन झाले. ब्राह्मण व पौराणिक, बौद्ध व जैन इत्यादी धर्मांशी निगडित मंदिर तसेच मूर्तिसंकल्पनेला मूर्त स्वरूप या कालखंडात मिळाले. सुरुवातीला उत्तराभिमुख असलेला भारताचा प्राचीन इतिहास दक्षिणाभिमुख झाल्याचे याच कालखंडात दिसून येते. या अनुषंगाने येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण बाबींचा अंतर्भाव या भागात केला आहे. या भागातील नोंदींची व्याप्ती त्या त्या विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन ठरविली आहे. थोडक्यात, इसवी सन पूर्व ६०० ते इसवी सन ५५० हा काळ या ज्ञानमंडळाचा अभ्यासविषय राहील. मराठी विश्वकोशाच्या परंपरेनुसारच या ज्ञानमंडळातील नोंदींचा दर्जा उच्च राहील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून सर्व वाचकांसाठी प्राचीन इतिहासातील अद्ययावत ज्ञानाचे दालन आम्ही खुले करीत आहोत, आमच्या या प्रयत्नांचे निश्चित स्वागत होईल, अशी खात्री आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व प्राचीन ऐतिहासिक काळ ज्ञानमंडळ यांच्या धोरणानुसार हे टिपण कालपरत्वे तसेच विषयपरत्वे अद्ययावत केले जाईल.
हेलिओडोरसचा शिलालेख
ॲरेमियन