(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
सर्व साधारणपणे अभ्यासक असे मानतात की, आधुनिक इतिहासाची सुरुवात इ. स. १५व्या शतकातील युरोपमधील प्रबोधनकाळानंतर झाली. पुढील काळात या चळवळीमुळे झालेले बदल सर्व जगात प्रसृत झाले. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड्स यांसारख्या देशांनी लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. ह्या युरोपियन देशांच्या वसाहतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकतेचे बरे वाईट परिणाम सर्व जगभर पसरले. भारतामध्ये देखील ब्रिटिशांनी बंगाल इलाख्यात १८व्या शतकाच्या मध्यास आपली सत्ता स्थापन केली. पुढे १८१८ साली इंग्रजांनी मराठी सत्तेचे केंद्रस्थान असलेली पेशवाई खालसा केली आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली. मराठी विश्वकोशाच्या ‘आधुनिक इतिहास : जागतिक व भारतीय’ या विभागात आधुनिक जग, आधुनिक भारत व आधुनिक महाराष्ट्र अशा तीन स्तरांतर्गत इतिहासाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत.

इतिहास माहीत असणे हे महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे आपल्याला आपला भूतकाळ समजण्यात मदत होते. आपल्याला भूतकाळ समजला की वर्तमानकाळ समजणे सोपे जाते. आजचे जग का व कसे असे आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर त्याचे उत्तर इतिहासात शोधावे लागते. इतिहास माहीत असला की, आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या संकृतीबद्दल माहिती होते. यामुळे साहजिकच वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये समंजसपणा निर्माण होतो.

इतिहास म्हणजे नुसत्या सनावळ्या व घटनांची क्रमवार मांडणी नव्हे, तर इतिहास ही संपूर्ण मानवतेची गोष्ट आहे. आपण आत्ता आहोत ते का व कसे आहोत याची गोष्ट म्हणजे इतिहास होय. इतिहास हा स्वतःला, स्वतःच्या समाजाला आणि जगाला समजण्याचा मार्ग आहे. इतिहास अभ्यासल्यामुळे आपल्याला परिवर्तनाची कारणे समजतात. दैनंदिन जीवन का व कशा प्रकारे बदलले हे कळते. भूतकाळातील थोरांच्या गोष्टी कळल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. भूतकाळातील धोकादायक घटना व संकटे समजल्यावर आपण वर्तमान काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज होतो.

इतिहासामुळे आपल्याला स्वतःची ओळख होते. मानवाच्या परिस्थितीमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल माहिती मिळते. आपले राष्ट्र आणि नागरिक यांच्या खास वैशिष्ट्यांचे आकलन होते. थोडक्यात इतिहासाच्या माहितीमुळे व्यक्तीमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या समूहाबद्दल जाणीव जागृत होते. इतिहासाची जाणकारी लोकांना राष्ट्र आणि जगाचे नागरिक म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिकांबद्दल भान निर्माण करते. जगाचा इतिहास आणि जगामध्ये घडणाऱ्या समकालीन घटनांची व घडामोडींची माहिती एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला एक चांगला ‘ग्लोबल सिटीझन’ बनवते.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लोक मोठ्याप्रमाणात जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करू लागले आहेत. अशा परिस्थितीत समकालीन जागतिक समाजाने निर्माण केलेले प्रश्न समजून घेण्यासाठी आधुनिक इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.

ॲलाबॅमा-प्रकरण (Alabama Claims)

ॲलाबॅमा-प्रकरण

अमेरिकेच्या यादवी युद्धातून उद्भवलेले युद्धनौकांबाबतचे प्रसिद्ध प्रकरण. यादवी युद्धाच्या काळात इंग्‍लंडने बांधलेल्या ‘ॲलाबॅमा’, ‘फ्लॉरेडा’, ‘शेनँडोआ’ वगैरे युद्धनौका अमेरिकेतील बंडखोर घटक-राज्यांच्या गटाने खेरदी ...
ॲल्सेस-लॉरेन (Alsace-Lorraine)

ॲल्सेस-लॉरेन

ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध असलेला फ्रान्सचा ईशान्येकडील एक प्रदेश. क्षेत्रफळ १५,१८५ चौ.किमी. लोकसंख्या २५,०२,१४९ (१९६८). उत्तरेस लक्सेंबर्ग व जर्मनी, पूर्वेस जर्मनी व दक्षिणेस ...