भारतीय संगीताच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा प्रमुख संगीतपद्धती आपआपली आगळीवेगळी वैशिष्ट्ये जपत व जोपासत प्राचीन काळापासून विकसित होत गेल्या. त्यांच्या गायन, वादन, नृत्य इत्यादी उपविभागांचा आणि या प्रत्येकाची घराणी होऊन त्यांतील प्रत्येकाचा पुन्हा वेगळा ठसा उमटवणारा प्रवास सुरू झाला आणि परंपरेच्या पायावर नवविचारांची उभारणी करत तो अखंड प्रवाहीत राहिला.
पाश्चात्त्य संगीत जे सामान्यत: यूरोप, अमेरिकेतील लोकांचे संगीत म्हणून ओळखले जाते, याच्या अभिजात वा कलासंगीत व लोकप्रिय संगीत या दोन शाखा आहेत. यांमध्ये सिंफनी रचना, ऑपेरा, बॅले, ग्रामीण व लोकसंगीत, जॅझ, रॉक, चित्रपट आणि सुखात्मिका यांकरिता केलेल्या संगीतरचनांचा समावेश होतो.
संगीतक्षेत्रामध्ये इतरत्रही अशाच प्रकारची प्रक्रिया सुरू राहिली. गायन, वादन, नर्तन, संगीतसंयोजन इत्यादींमध्ये असंख्य कलाकारांनी तसेच संगीतातील काही प्रमुख घराण्यांनी आपापली परंपरा आणि स्वअभ्यास या सर्वांचा अजोड मेळ घालत अलौकिक रचनांची निर्मिती केली आणि या सर्वांनी मिळून अखिल मानवजातीला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनंतर आवश्यक असणारे मानसिक स्थैर्य आणि समाधान देण्याचे अतिशय मोलाचे कार्य संगीताद्वारे केले……. तेही अव्याहतपणे! या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा हा मनापासूनचा प्रयत्न.