भारताच्या समृद्ध संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे योग. आधुनिक काळामध्ये उत्तम स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी आसने, प्राणायाम आणि विविध क्रिया या स्वरूपात योगाचा जगभरात प्रसार झालेला असला तरी योगाचे मूळ प्राचीन वैभवशाली परंपरेत दडलेले आहे. योगाचे तत्त्वज्ञान आणि योगामधील मानसशास्त्र अगाध आहे, तर योगामधील विविध परंपरांचा विस्तार एखाद्या वटवृक्षाप्रमाणे प्रचंड आणि नित्य नूतन आहे. परिणामी योगाच्या परिभाषांना विस्तृत परिमाण लाभले आहे. हडप्पा आणि मोहेंजोदडो या ऐतिहासिक स्थळी उत्खनन केल्यानंतर ज्या प्रतिमा मिळाल्या, त्यापैकी काही प्रतिमांच्या स्वरूपाचा अभ्यास केल्यावर त्यांचे योगातील मुद्रांशी साधर्म्य दिसून आले आहे. दर्शन म्हणून योगाचा उदय पतंजलीच्या काळात झाला असला, तरीही योगाच्या तत्त्वज्ञानाची बीजे वैदिक साहित्यात दिसून येतात. उपनिषदांमध्येही योगसाधना स्फुट रूपात विखुरलेली आहे. रामायण, महाभारत व पुराणे यामधील विविध आख्यानांच्या अनुषंगाने येणारी योगविषयक चर्चा अतिशय विस्तृत आहे. महाभारतातील भगवद्गीता व अन्य गीता यामध्ये योगतत्त्वज्ञान विस्ताराने सांगितले आहे. सुमारे दुसऱ्या शतकात महर्षी पतंजलींनी लिहिलेली योगसूत्रे योगदर्शनाचा मूलभूत पाया आहेत व आजही ती प्रमाणभूत मानली जातात. योगासूत्रावरील भाष्ये, वार्त्तिक आणि विवरणात्मक अन्य ग्रंथांची संख्या अगणित आहे. हठयोगप्रदीपिका, घेरंडसंहिता, सिद्धसिद्धान्त पद्धती यासारख्या ग्रंथांनी योगसाधनेचा मार्ग प्रशस्त केला. बौद्ध दर्शन तसेच जैन दर्शन यामध्ये साधनेच्या अनुषंगाने योगाचे विवेचन आढळते. वैदिक काळापासून आधुनिक काळापर्यंत योगविषयक ग्रंथरचना पाहिल्यास एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की योगाचे ज्ञान हे केवळ ग्रंथांपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यामध्ये वर्णित साधना, उपासना आणि क्रिया यांद्वारे समाजात प्रचलित होते. आधुनिक काळातही प्रादेशिक भाषांमध्ये योगविषयक मौलिक साहित्याची निर्मिती झालेली आहे. योगाभ्यासाची उद्दिष्टे कालानुरूप बदलल्यामुळे योगाचे अनेक संप्रदाय उदयाला आले. विसाव्या शतकामध्ये अनेक योगधुरिणांनी योग-परंपरा पुनरुज्जीवित केली व त्यामुळे योगाभ्यासाला एक नवीन आयाम प्राप्त झाला.
सदर योगविषयक ज्ञानकोशाच्या माध्यमातून योगामध्ये अनुस्यूत असणाऱ्या सर्व विषयांचे ज्ञान वाचकाला प्राप्त होईल.