आंतरजालाच्या माध्यमातून लोकांकडून छोट्या रकमा मोठ्या संख्येने गोळा करणे. जनसमूह निधी मिळवून एखादा लोकहितार्थ प्रकल्प किंवा उपक्रम राबविला जातो. जनसमूह निधी ही संकल्पना प्रामुख्याने आंतरजालावर आधारित निधी
प्रणालीशीच निगडित आहे. जनसमूह निधी हा जनसमूह स्रोत आणि पर्यायी वित्तपुरवठ्याचा एक प्रकार आहे. जनसमूह निधीचा वापर करू पाहणारा उद्योजक शक्यतो अशा आंतरजालीय समुदायांचा वापर करतो की, जेथे व्यावसायिक गुंतवणूकदार नसलेले लोक छोट्या रकमेची गुंतवणूक करू शकतात. या निधीचे विविध प्रकार असू शकतात. अशा प्रकारच्या संकल्पना मेल ऑर्डर सबस्क्रिप्शन किंवा कार्यक्रमांद्वारे राबविल्या जाऊ शकतात. या आधुनिक जनसमूह निधी उभारणीच्या प्ररूपात तीन मुख्य बाबी सहभागी असतात :
- (१) प्रकल्प प्रवर्तक : ज्याला निधीची गरज आहे आणि जो आपली कल्पना किंवा प्रकल्प मांडतो त्याला प्रकल्प प्रवर्तक म्हणतात. प्रकल्प प्रवर्तक हा आधुनिक जनसमूह निधी उभारणीच्या प्ररूपात सहभागी असतो.
- (२) देणगीदार किंवा गुंतवणूकदार : देणगीदार किंवा गुंतवणूकदार किंवा त्यांचा गट हे नेहमी नवनवीन कल्पनेचे समर्थन करत असतात. ते प्रकल्प प्रवर्तकांना आधुनिक जनसमूह निधी उभारणीच्या प्ररूपात निधी देऊन प्रोत्साहित करत असतात.
- (३) मध्यस्थ संस्था : प्रकल्प प्रवर्तक आणि देणगीदार किंवा गुंतवणूकदार किंवा त्यांचा गट यांना सर्व बाजूंनी एकत्र आणण्याचे काम मध्यस्थ संस्था करत असते.
जनसमूह निधीचा वापर कलात्मक प्रकल्प, वैद्यकीय खर्च, प्रवास आणि सामाजिक उद्योजकतेसारख्या अनेक फायदेशीर उपक्रमांसाठी केला जातो; मात्र काही वेळा याचा वापर चुकीच्या किंवा फसव्या कामांसाठी (क्वॅकरी) केला जात असल्याने यावर टीकासुद्धा केली जाते.
आधुनिक काळ : सामाजिक माध्यमांपूर्वी वर्गणीदार प्रत्यक्ष फिरून, देणगीदाराशी थेट भेटून म्हणजे पारंपरिक पद्धतीने जनसमूह निधी मिळवीत असे; मात्र आता आंतरजाल आणि ई-वाणिज्य यांच्या उदयामुळे विना नफा संस्थांसाठी निधी उभारणे सोपे झाले आहे. लोकांचा आंतरजालीय व्यवहारांवरील विश्वास वाढल्यामुळे त्यांना वेळ आणि पैशांची बचत करणे सोपे झाले आहे. तसेच त्यांना जनसमूह निधी मिळविण्यासाठी जगभरातील विविध भौगोलिक क्षेत्रांत आणि उद्योगांत पोहोचणे शक्य झाले आहे.
जनसमूह निधी उभारणीचे मार्ग : किकस्टार्टर, गो फंड मी, रॉकेट हब, इंडिगो, पॅट्रिऑन, फंडेबल इत्यादी आंतरजालावरील संकेतस्थळावरून जनसमूह निधी मिळविला जातो. जनसमूह निधीच्या जलद प्रसारामागे वेब २.० किंवा सामाजिक वेबचा मोठा वाटा आहे. वेब १.० मध्ये फक्त माहिती वाचणे आणि व्यवहार करणे शक्य होते; मात्र फ्रेंडस्टर, मायस्पेस, लिंक्डइन, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स ॲप, इंस्टाग्राम, टेलिग्राम इत्यादी समाज माध्यमांमुळे वेब हे केवळ माहितीचे साधन न राहता, ते संवाद साधण्याचे आणि नातेसंबंध निर्माण करण्याचे एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे. त्यामुळे देणगीदार ज्यांना मदत करतात, त्यांच्याशी थेट जोडला जात असल्यामुळे त्यांना समाधान मिळते.
जनसमूह निधी उभारणीचे प्रतिमान व फायदे : बक्षीस आधारित निधी, समभाग आधारित निधी, स्वामित्व हक्क जनसमूह निधी, संमिश्र जनसमूह निधी, प्रणाली मूल्य अग्रिम निधी, कर्ज आधारित निधी, कायदेशीर खटला आधारित निधी, देणगी आधारित निधी असे जनसममूह निधी उभारणीचे विविध प्रतिमान असून जनसमूह निधी उभारणीचे पुढील फायदे सांगता येतील :
- वेगवान प्रक्रिया : निधी उभारण्याचा हा एक वेगवान मार्ग आहे आणि यात सुरुवातीला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही.
- विपणन : आंतरजालीय मध्यस्थ संस्थांद्वारे प्रकल्पांची मांडणी केल्यामुळे विपणनास मदत होते आणि माध्यमांचे लक्ष आकर्षित होऊ शकते.
- पाठपुरावा : तुमची कल्पना सर्वांसमोर मांडल्यामुळे तुम्हाला ती सुधारण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि लोकांचे मत मिळू शकते.
- चाचणी : उत्पादनाच्या कल्पनेची बाजारात काय प्रतिक्रिया असेल, हे तपासण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे.
- नाममुद्रा प्रोत्साहन : गुंतवणूकदार तुमच्या प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असतात, ज्यामुळे त्यांच्या नेटवर्कद्वारे तुमच्या नाममुद्रेचा प्रचार व प्रसार होऊ शकतो.
- पारंपरिक गुंतवणूकदारांची गरज नाही : अशा कल्पना ज्यांना नियमित बँका किंवा गुंतवणूकदार नाकारतात, त्यांना येथे वित्तपुरवठा मिळू शकतो.
- निष्ठावान ग्राहक : गुंतवणूकदार हेच तुमचे भविष्यातील सर्वांत विश्वासू ग्राहक बनू शकतात.
- पर्यायी वित्तपुरवठा : जर तुम्हाला बँकांकडून कर्ज मिळत नसेल, तर हा एक उत्तम पर्याय आहे.
जनसमूह निधी उभारणीचे तोटे : जनसमूह निधी उभारणीचे काही महत्त्वाचे तोटे पुढील प्रमाणे :
- कठिण प्रक्रिया : सर्व प्रकल्पांना जनसमूह उभारणी व्यासपीठावर संधी मिळत नाही. त्यामुळे हे नेहमीच सोपे असते, असे नाही.
- श्रम आणि वेळ : व्यासपीठावर प्रकल्प प्रसारित करण्यापूर्वी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, वेळ आणि पैसे खर्च करावे लागतात.
- लक्ष्यपूर्तीची जोखीम : जर तुम्ही ठरविलेले निधीचे लक्ष्य गाठले गेले नाही, तर जमा झालेली रक्कम गुंतवणूकदारांना परत करावी लागते. त्यामुळे तुम्हाला काहीच मिळत नाही.
- प्रतिष्ठेला धोका : प्रकल्प अयशस्वी झाल्यास तुमच्या व्यवसायाच्या आणि गुंतवणूकदारांच्या प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो.
- कल्पनाचौर्याचा धोका : जर तुम्ही तुमची कल्पना ही स्वामित्व हक्क (पेटंट किंवा कॉपीराइट) करून सुरक्षित केली नसेल, तर ती समकेतस्थळावर पाहून कोणीही तिचा दुरूपोयोग करू शकतात.
- चुकीचे मानधन : जर तुम्ही गुंतवणूकदारांना चुकीचे मानधन दिले, तर व्यवसायातील मोठा हिस्सा त्यांना द्यावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्हाला तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संदर्भ :
- Cumming, Douglas; Hornuf, Lars, The Economics of Crowd Funding, Startups, Portals and Investor Behavior (eBook), Germany, 2018.
- Dresner, Steven, CROWDFUNDING, New Jersey 2014.
समीक्षक : अविनाश कुलकर्णी
अनुवादक : रिता शेटीया
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
