मराठी भाषा विभाग/प्रशासकीय

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

डॉ. श्रीधर दीक्षित, अध्यक्ष, महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळ

प्रा. डॉ. श्रीधर (राजा) दीक्षित हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात सुप्रतिष्ठित प्राध्यापक (Emeritus Professor) आहेत. 'भारतीय इतिहास अनुसंधान परिषद (ICHR), नवी दिल्ली' या संस्थेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले आहे. शालेय स्तरापासून विद्यापीठीय स्तरापर्यंत अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मितीच्या क्षेत्रात सुमारे तीन दशके त्यांनी योगदान दिलेले आहे. त्यांच्या चाळीस वर्षांच्या अध्यापन कारकिर्दीत त्यांनी मुख्यतः इतिहास या विषयाचे अध्यापन व संशोधन केले. ते त्यांच्या आंतरविद्याशाखीय अभ्यासामुळेसुद्धा ओळखले जातात. त्यांनी विपुल प्रमाणात काव्य आणि ललित व वैचारिक लेखन केलेले असून विविध ग्रंथांचे लेखन व संपादनही केलेले आहे. 'राजा दीक्षित' या लेखन-नामानेच ते मुख्यतः ओळखले जातात. प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार व सन्मान त्यांना प्राप्त झालेले आहेत. 'नवभारत' या वैचारिक मासिकाचे ते संपादक आहेत. नोंदींच्या लेखन-संपादनाच्या निमित्ताने राजा दीक्षित हे मराठी विश्वकोशाशी गेली सुमारे पस्तीस वर्षे संबंधित आहेत. २७ मे २०२१ पासून मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख संपादक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे.