मराठी विश्वकोशाबरोबरच मुलांसाठी कुमार विश्वकोश संपादित करण्याची योजना १९८० सालानंतर विचाराधीन होती. त्या अनुषंगाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ही योजना तयार केली. कुमार विश्वकोशाचा परिचय ग्रंथ प्रा. मे. पुं. रेगे व प्रा. रा. ग. जाधव यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत २००३ मध्ये तयार करण्यात आला. २००३ मध्येच विश्वकोशाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. श्रीकांत जिचकार यांनी या परिचय ग्रंथाचे तसेच त्याच्या सीडीचेही प्रकाशन केले. ९ वी ते १२ वी या इयत्तांचे विद्यार्थी म्हणजे सर्वसाधारणपणे १४ ते १८ वयोगटातील मुले-मुली हा कुमार विश्वकोशाचा वाचकवर्ग अभिप्रेत आहे. कुमार विश्वकोशाचा प्रत्येक खंड विशिष्ट विषयाला वाहिलेला आहे. कुमार विश्वकोशाचे पुढील १२ खंड प्रस्तावित आहेत.

१. भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान
२. जीवसृष्टी आणि पर्यावरण
३. विश्व आणि पृथ्वी
४. प्राचीन संस्कृती
५. आधुनिक जग
६. उद्योगधंदे आणि व्यापार
७. शेती आणि शेतकी
८. जागतिक साहित्य
९. ललित कला
१०. क्रीडा, खेळ, मनोरंजन
११. थोरांची चरित्रे
१२. महाराष्ट्र आणि भारत.

कुमार विश्वकोशाची विशेष संपादन समिती

समन्वयक : डॉ. हेमचंद्र प्रधान

डॉ. जयकुमार मगर
डॉ. शशिकांत प्रधान
डॉ. मोहन मद्वाण्णा
डॉ. राजा ढेपे
प्रा. वसंतराव चौधरी
श्री. विजय लाळे
श्री. वि. ल. सूर्यवंशी
श्री. अ. ना. ठाकूर
प्रा. सुहास गोडसे
प्रा. शिवाप्पा किट्ट्द
डॉ. प. वि. सोहनी
श्री. नरेंद्र देशमुख
डॉ. किशोर कुलकर्णी
श्री. मा. ल. चौंडे

जीवसृष्टी आणि पर्यावरण यांचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन कुमार विश्वकोशासाठी जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाची निवड अग्रक्रमाने करण्यात आली आहे. या खंडातील नोंदी सुटसुटीत, सोप्या भाषेत आणि रसपूर्ण असतील यावर भर देण्यात आला आहे. या खंडातील सर्व चित्रे रंगीत असावीत आणि प्रत्येक नोंदीला चित्र असावे असा कटाक्षही सर्वसाधारणपणे ठेवण्यात आला आहे. सध्याच्या विज्ञानयुगात कुमारवयीन वाचकांना संगणकाची ओढ अधिक असते. म्हणूनच कुमार विश्वकोश ग्रंथरूपाने तसेच मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावरही सर्वांना वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे. प्रकाशित खंडांची ब्रेल लिपीमधील आवृत्तीसुद्धा अंध व्यक्तींसाठी प्रसिद्ध आहे. तसेच ध्वनिमुद्रित स्वरूपातही हा खंड संकेतस्थळावर उपलब्ध आहे.