मूळ भाषेतील मजकूर अथवा आशय आपल्याला अपेक्षित असलेल्या दुसऱ्या (म्हणजे लक्ष्य) भाषेत व्यक्त करण्याची कला म्हणजे भाषांतर किंवा अनुवाद होय. विज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र यांसारख्या विषयांतील मजकुराचे भाषांतर करणे तुलनेने काहीसे सोपे असते. कारण यात केवळ वाच्यार्थ अपेक्षित असतो. संकेतार्थ, गूह्य वा गूढ अर्थ, भाषेच्या शैलीची वैशिष्ट्ये यांसारख्या अवघड गोष्टींचा संबंध अशा भाषांतरात कमी येतो. परंतु या विषयात नित्यनव्या संकल्पनांची, शोधांची, माहितीची व त्याला अनुसरून शब्दांची भर पडत असल्याने, त्यांसाठी मराठी प्रतिशब्द शोधणे व रूढ करणे हे आव्हानात्मक काम आहे. विविध धर्मांची तत्त्वज्ञान, दर्शने, इतर तत्त्वज्ञाने यांच्या संकल्पनेची विशिष्ट परिभाषा असते, ज्यांचे जसेच्या तसे भाषांतर होण अशक्य असते. ललित साहित्याचे भाषांतर अधिक अवघड असते कारण त्यात लेखकाची मानसिकता, त्या भाषेतील शब्दांचा पोत, संकेत, वाक्प्रचारांचे संदर्भ, भाषेची लय इत्यादी गोष्टींचा विचार करावा लागतो.

भाषांतर, रूपांतर, सारांश किंवा विस्तार करणे ही भाषेची प्रगत नैपुण्ये होत. जगात अनेक भाषा वापरल्या जातात. तथापि, जगातील बहुसंख्य ज्ञान व पर्यायाने माहिती इंग्रजीत एकवटली आहे. त्यामुळे इंग्रजीतून इतर भाषांत मोठ्या प्रमाणावर भाषांतरे होत असलेली दिसतात. याला मराठी भाषा आणि पर्यायाने मराठी विश्वकोश अपवाद नाही, यामुळे मराठी विश्वकोशात इंग्रजी या ज्ञानभाषेतून मराठी भाषेत अनेक प्रकारची भाषांतरे झाली आहेत. यांमध्ये वैज्ञानिक, ललित, तसेच वैचारिक साहित्याची भाषांतरे झाली आहेत.

भाषांतरकाराची नैपुण्ये : भाषांतरकार मूळ आणि ज्या भाषेत भाषांतर करणे अपेक्षित आहे, त्या दोन्ही भाषांत पारंगत असावा लागतो. दोन्ही भाषांतील शब्द, शब्दच्छटा, अर्थ, व्याकरण, बोलीभाषेतील प्रचलित शब्द यांसारख्या गोष्टींचा विचार करून भाषांतर केले जाते. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अर्थाचे संक्रमण होताना मूळ आशयाला कोणताही धक्का लागणार नाही, याची दक्षता भाषांतरकार घेतो. भाषांतरणाच्या अपेक्षित भाषेतील शब्द चपखलपणे वापरून भाषांतरकार मूळ आशय व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे वाचकाला मूळ साहित्यकृती वाचल्याने समाधान व आनंद मिळतो. हीच खऱ्या अर्थाने भाषांतरकाराची कसोटी मानतात. थोडक्यात हे भाषांतर आहे, असे वाचकाला वाटत नाही.

भाषांतर करताना भाषांतरकाराला सर्वसामान्य लोकांची बोली, व्यावसायिकांची भाषा, शास्त्रीय व तांत्रिक शब्दरचना यांची जाण असावी लागते. या कामांत दोन्ही भाषांतील शब्दकोश, परिभाषा कोश यांचा भाषांतरकाराला सतत आधार घ्यावा लागतो. भाषेतील म्हणी, वाक्प्रचार, अलंकार, शैली यांच्यावर भाषेचे वैभव अवलंबून असते व यांचा वापर मुख्यत्वे ललित वाङ्मय प्रकाशनात केला जातो. कारण शब्द, पद, वाक्ये इत्यादींचा उपयोग त्यांच्या मूळ वाच्यार्थाहून भिन्न अर्थाने भाषेत रूढ झालेला असतो. तसेच म्हणी, वाक्प्रचार, लोकानुभव हे लोकांच्या व्यवहारांतून रूढ होत असतात.

भाषांतरणाच्या मर्यादा व अडचणी : भाषांतर करण्याचा हेतू, दर्जा या सर्व गोष्टींचा विचार करून विविध कारणांसाठी भाषांतर करतात, एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत आणताना भाषांतरकार दोन्ही भाषा, तसेच संबंधित साहित्य, संस्कृती यांच्याशी समरस झालेला असतो. अर्थच्छटा, लक्ष्यार्थ, व्यंगार्थ यांच्यासह तो मुळाबरहुकूम भाषांतर करू शकतो. अर्थात भाषांतराच्या व्यापक क्षेत्राला व्यवहार्य रूप देताना पुढील प्रकारच्या मर्यादा व अडचणी येऊ शकतात.

  • भाषांतरकाराला दोन्ही भाषा, बोली, संबंधित रूढी, परंपरा यांची उत्तम जाण नसल्यास विपर्यास होऊ शकतो.
  • भाषांतराचा विषय व्यवस्थितपणे समजून न घेतल्यास आशयाच्या आविष्कारात चुका होऊन त्रुट्या राहू शकतात.
  • भाषांतर करावयाच्या विषयासंबंधीचे संदर्भ विश्लेषण लक्षात घेणे गरजेचे असते. भाषांतराचा वाचकवर्ग, त्याची बोली भाषा ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन भाषांतर करावे लागते.
  • नवनवीन पारिभाषिक शब्द, संज्ञा, संकल्पना लक्ष्य भाषेत वापरताना त्यांच्या अर्थच्छटांचा विचार करावा लागतो. शिवाय या गोष्टी वाचकाच्या माहितीतील असाव्या लागतात. दोन्ही भाषकांच्या संस्कृतीचे आकलन करून आशयाची मांडणी करावी लागते, असे आकलन नसल्यास चुका संभवतात.
  • शास्त्रीय संकल्पना, विषयातील संज्ञा वापरताना शब्दकोश, परिभाषा कोश यांचा आधार घेतल्यास नेमकेपणा जपला जातो. पाल्हाळ व क्लिष्टता टाळणे गरजेचे असते.
  • भाषांतरित आशय कठीण झाल्यास त्याचे वाचकाला आकलन होत नाही व भाषांतर करण्यामागील हेतू साध्य होत नाही. थोडक्यात, भाषांतर साधे, सोप्या भाषेतील आणि मुळाबरहुकूम असावे लागते.

मराठी विश्वकोशासाठी भाषांतर : भाषांतराविषयीची काहीशी तात्त्विक व तांत्रिक माहिती वर आली आहे. मात्र विशेषत: मराठी विश्वकोशातील नोंदींसाठी (लेखांसाठी) भाषांतर करताना पुढील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते.

  • नोंदीचे स्वरूप, तिच्यात येणारे मुद्दे आणि तिच्याशी निगडित असलेल्या विश्वकोशातील सर्व नोंदी लक्षात घेऊन भाषांतर करावे लागते.
  • मराठी विश्वकोशात येणारी बरीच माहिती इंग्रजी संदर्भग्रंथ व साहित्य यांत उपलब्ध असते आणि त्यांतून ती मराठीत आणायची असते. कर्मणी प्रयोग, अनेक उपवाक्ये ही इंग्रजी भाषेची वैशिष्ट्ये असून ती भाषांतर करताना जशीच्या तशी मराठीतून आणून चालत नाही. कारण मराठी भाषेच्या शैलीत ती चपखलपणे बसणारी नाहीत. म्हणजे मराठी भाषेच्या प्रकृतीशी ती जुळणारी नाहीत.
  • मराठी विश्वकोशासाठीचे लेखन व्यासंगपूर्ण व काटेकोर असावे लागते. म्हणून भाषांतर अभ्यासपूर्ण रीतीने, कसोशीने व नेमकपणाने व्हायला हवे. अशा रीतीने नवनवीन ज्ञानशाखांतील विविध व अपरिचितही विषयांची मूलतत्त्वे आणि त्यांत घडत असणारे महत्त्वाचे अर्थपूर्ण बदल सर्वसाधारण सुशिक्षित मराठी वाचकाच्या प्रथमच वाचनात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला त्यांचा परिचय सहजपणे होईल, अशा प्रकारे भाषांतर होणे अपेक्षित आहे. थोडक्यात, सर्वसामान्य सुशिक्षित, तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या व त्या पातळीच्या वाचकांच्या संदर्भासाठी हे भाषांतर करायचे आहे हे लक्षात घ्यावे. त्यासाठी विविध विषयांतील तत्त्वे व विचारप्रवाह यांच्या लेखनात आढावा घ्यायचा आहे, हे भाषांतरकाराने लक्षात ठेवायला हवे. अवघड विषयांचेही भाषांतर सुबोध रीतीने करण्याचा प्रयत्न भाषांतरकाराने केला पाहिजे. अर्थात, अगदी थोडे, अतिशय अवघड विषयही विश्वकोशात येणार आहेत व ते जेवढे सुलभ करता येतील तेवढे करावेत. गुंतागुंतीच्या महत्त्वाच्या संकल्पना किंवा विशिष्ट अवघड पारिभाषिक संज्ञा यांचे सुबोध विवेचन विश्वकोशात अन्यत्र कोठे मिळू शकेल, याचे दिग्दर्शन भाषांतरकाराला करता आल्यास वाचकाची सोय होईल, हे लक्षात असू द्यावे.

पारिभाषा शब्दांची निवड : महाराष्ट्राविषयीच्या माहितीला मराठी विश्वकोशाने प्राध्यान्य दिले आहे व त्याखाली भारताविषयीच्या माहितीला प्राधान्य दिले आहे. अर्थात, सामाजिक शास्त्रे, कला, विज्ञान व तंत्रविद्या यांसारख्या विषयांच्या बाबतीत अशी प्रादेशिकता लागू होत नाही. भाषांतर करताना परिभाषेची गरज असतेच. मराठी विश्वकोशात परिभाषेत सर्वत्र एकसारखेपणा किंवा एकवाक्यता रहावी म्हणून मराठी विश्वकोशाने स्वीकारलेल्या परिभाषेला प्राधान्य देण्यात यावे. नवीन पारिभाषि‍‍क शब्द आढळल्यास त्याचा मराठी प्रतिशब्द घडविण्याचाही प्रयत्न भाषांतरकार करू शकतो. त्यासाठी तांत्रिक शब्दकोशातील व्याख्य, महाराष्ट्र शासनाचा शासन व्यवहार कोश, पुणे व इतर विद्यापीठांचे परिभाषाविषयक कार्य, केंद्रीय शासनाचा परिभाषासंग्रह, डॉ. रघुवीर यांचा इंग्रजी–हिंदी शब्दकोश, महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेले विविध विषयनिहाय परिभाषा कोश यांचा आधार घेता येतो. अर्थात नवीन परिभाषिक संज्ञा मराठी विश्वकोशातील इतर परिभाषिक संज्ञांशी ताळमेळ राखणारी किंवा सुसंगत असावी.

मराठी विश्वकोशात विशिष्ट पदार्थवाचक शब्द आंतरराष्ट्रीय स्वरूपात वा इंग्रजीतच ठेवले आहेत. उदाहरणार्थ, ऑक्सिजन, हीलियम, युरेनियम, कारब्युरेटर इत्यादी. तसेच मराठीत रूढ झालेले इंग्रजी शब्दही तसेच ठेवले आहेत. उदाहरणार्थ, स्क्रू, नट, बोल्ट, एंजिन, रेल्वे, रॉकेट, रोबॉट इत्यादी.

काही मराठी पारिभाषिक शब्दांचा अर्थ वाचकाला सहजपणे लक्षात येणार नाही. त्यामुळे त्याच्यापुढील कंसात त्याचे थोडक्यात केलेले सुलभीकरण देण्याचे ठरले आहे. उदाहरणार्थ, इंग्रजी ‘टिशू’साठी मराठी ‘ऊतक’ हा प्रतिशब्द असून तो ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा ­ पेशींचा ­ समूह) असा सोपा करून देतात. सुलभीकरणाचा असा कंस हा वाचनातील खंड ठरू शकतो, हे खरे असले, तरी त्यामुळे वाचकाची काही प्रमाणात सोय होते., जिज्ञासू अभ्यासकाला विशिष्ट विषयाच्या अभ्यासासाठी किंवा माहितीसाठी विश्वकोश या संदर्भग्रंथाची मदत होते. अखेरीस विश्वकोश हा संदर्भग्रंथ असून ललित लेखन नाही. त्यामुळे वाचक विश्वकोश समजून घेण्याची तयारी ठेवूनच वाचेल, अशी अपेक्षा असते. शक्य झाल्यास भाषांतरकाराने असे सुलभीकरण देण्याचा प्रयत्न करावा अथवा पारिभाषिक शब्दाचा आशय लेखनात आणावा.

भाषांतर करताना महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाचे मराठी शुध्दलेखनविषयक नियम पाळणे गरजेचे आहे.

मराठी विश्वकोशातील नोंदींमध्ये मजकुराशिवाय रेखाचित्रे, छायाचित्रे, रंगीत व साधी चित्रपत्रे,आलेख, आकृती, कोष्टक, नकाशे यांसारखी सुनिदर्शने देऊन वर्ण्यविषय अधिक परिणामकारक व स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. अशा सुनिदर्शनांत असणाऱ्या (उदाहणार्थ, आकृतीच्या खाली, वर व मध्यभागी) मजकुराचेही भाषांतरकाराने भाषांतर करायचे असते. तसेच भाषांतरकाराने मजकुरातील अशा सुनिदर्शनांचे स्थान योग्य आहे की नाही, हे सुचवायचे असते. नोंदीत आलेली शीर्षके, उपशीर्षके, उपउपशीर्षके व्यवस्थित आहेत ना हेही भाषांतरकार सांगू शकतो.

सामान्यपणे मोठ्या नोंदीच्या शेवटी त्या विषयाशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या इतर नोंदी ‘ पहा म्हणून दिलेल्या असतात. शिवाय मोठ्या नोंदींच्या अखेरीस त्या विषयाची अधिक माहिती कोठे मिळू शकेल, हे दर्शविणारे संदर्भग्रंथ दिलेले असतात. त्यांतही भाषांतरकार भर घालू शकतो. अशा प्रकारे मराठी विश्वकोशातील नोंद सर्व अंगांनी परिपूर्ण कशी होईल, यासाठी भाषांतरकाराकडूनही योगदानाची अपेक्षा असते.

मराठी विश्वकोशातील नोंदींचे भाषांतर सुबोध व अगदी काटेकोरपणे करण्याची दक्षता भाषांतरकाराने घेतली पाहिजे.