१. मराठी विश्वकोशाच्या वाचकांमध्ये मुख्यत: सर्वसामान्य वाचकवर्ग असून या विषयात स्वारस्य असणारे अभ्यासू, संशोधक वाचक वर्ग असू शकतो. तसेच संदर्भ साहित्याचा वापर गरजेचा मानणारे, उदा., पदव्युत्तर विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थीही लक्ष्य असण्यास हरकत नाही. विश्वकोशातील नोंदी वाचताना विकिपीडिया किंवा महाजालकावरील तत्सम माध्यमे वाचकांच्या हाताशी असून ते त्यांचाही वापर करू शकतात, हे गृहीत धरले पाहिजे. त्यामुळे मुद्यांशी तडजोड न करता सोप्या, सुगम व नेमक्या भाषेत विश्वकोशातील लेखन असावे अशी अपेक्षा आहे.

२. मराठी विश्वकोशाच्या नोंदींचे लेखन करताना मागील आवृत्तीतील नोंदी जरूर वाचाव्यात. (मराठी विश्वकोशाचे सर्व १ ते २० खंड महाजालकावरील https://vishwakosh.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या खंडांची सीडी/डीव्हीड, कार्ड पेनड्राईव्ह व मोबाईल ॲप स्वरूपात उपलब्ध आहेत. तसेच बहुतेक सर्व ग्रंथालयांमध्ये विश्वकोशाचे खंड उपलब्ध आहेत.) मराठी विश्वकोशातील लेखन अद्ययावत माहितीचे, वस्तुनिष्ठ, तटस्थ व समतोल असावे, त्यात धर्म-जात-पंथ-लिंग-प्रदेश-पक्ष अशा कोणत्याही निकषावरून पूर्वग्रह नसावा. त्यात कोणत्याही बाजूने टोकाची मते नसावीत. मागील आवृत्तीतील लेखन बारकाईने वाचल्यास लेखनाची धाटणी/भूमिका कशी असावी याची कल्पना येईल.

३. नोंदींमधील विधानांचा खरेपणा, बिनचूकपणा याबद्दल लेखकाने विशेष काळजी घ्यावी. गणित, सांख्यिकी, अंकांच्या अथवा कोष्टक रूपाने देण्‍यात येणाऱ्या माहितीतील आकडेवारी यांबाबतीत मजकुरातील विश्लेषण तपासून त्या मांडणीतील अचूकतेची खात्री केली जावी. यासाठी विषयाशी संबंधित पुस्तकांची/संदर्भग्रंथांची मदत घेतली जावी. शक्य तेथे संदर्भासाठी प्राथमिक स्रोतांचा आधार घ्यावा. आपले लेखन वाङ्मय चौर्यापासून दूर असावे. (Free from plagiarism)

४. मराठी विश्वकोशाने पारिभाषिक संज्ञांचा खंड यापूर्वीच प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला परिभाषा कोशही आहे. पारिभाषिक संज्ञांसाठी त्यांचा आधार घ्यावा. पाठ्यपुस्तकांमध्ये आढळणाऱ्या, वृत्तपत्रात किंवा रूढ असलेल्या पारिभाषिक संज्ञा शक्यतो लेखनात वापराव्यात. मात्र नव्या पारिभाषिक संज्ञा बनविण्यास हरकत नाही पण त्या अर्थवाही आणि व्याकरणशुद्ध असाव्यात. मराठी विश्वकोशाच्या नवीन संकेतस्थळावर उपयुक्त दुवे अंतर्गत अशा पारिभाषिक संज्ञांची लिंक देण्यात आली आहे.

५. नोंदींचे स्वरूप लघु, मध्यम आणि दीर्घ असे असणार आहे. लेखनावेळी शब्दांची मर्यादा कळविली जाईल. ती शब्दमर्यादा पाळावी. यासाठी अर्थातच शब्दसंख्येचा विचार करून विषयांची प्रस्तावना, सारांश, स्पष्टीकरणासाठी उदाहरणे देणे यांची मांडणी करावी. तसेच विश्वकोशातील मूळ नोंदीचा संबंध हा इतर आनुषंगिक नोंदींशीही असतो आणि काही पूरक संदर्भही नोंदीत अंतर्भूत करावे लागतात, अशावेळी मूळ नोंदीचा उद्देश आशय कळावा, अनुषंगिक मुद्दे सुटू नयेत आणि लेखात प्रमाणबद्धता असावी असा आहे.

६. मराठी विश्वकोशातील नोंदींच्या शब्दसंख्येनुसार लेखन, समीक्षण आणि भाषांतर या कामाच्या मानधनाचे दरही निश्चित करण्‍यात आले आहेत. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्‍यात आलेली नोंद ही अंतिम स्वरूपात स्वीकारण्‍यात आलेली आहे, असे समजण्यात येईल आणि त्याअनुषंगाने लेखन/समीक्षण/भाषांतर या कामाचे मानधन निश्चित करण्‍यात येईल.

७. नोंद लेखनामध्ये आकृत्या, तक्ते, आलेख, चित्र, रंगीत चित्रपत्र, दृक-श्राव्य यांचा वापर जरूर करावा, लेखाच्या शेवटी निवडक अशा इंग्रजी-मराठी संदर्भग्रंथांच्या स्रोतांची यादी देण्‍यात यावी. त्यात पुस्तके, वेबसाईट यांचे संदर्भ असावेत. मात्र क्रमिक पुस्तकांचे संदर्भ यात नसावेत. मजकूर अद्ययावत असावा, त्यात नैमित्तिक संदर्भ नसावेत. उदा., नुकतेच जाहीर झाले…… असे उल्लेख लेखात नसावे.

८. इंग्रजीतील विशेष नामांचे उच्चार जसे स्पेलिंगनुसार होतात किंवा जसे प्रचलित आहेत तसेच असावेत. संपादनाच्या वेळी जरूर पडल्यास त्यात दुरुस्ती अथवा फेरफार केला जाईल.

९. नोंद लेखन करीत असतांना व्यक्तिगत संदर्भ त्यात असू नयेत. उदा., माझ्या मते….., असे आमचे मत आहेत……, अशी वाक्यरचना येऊ देऊ नये. लेखनात बोली भाषा, बोली वाक्यप्रचार हे टाळणे आवश्यक आहे. वाक्यरचना व्याकरणशुद्ध असावी व त्यात शुद्धलेखनाचे नियम पाळले जावेत अशी अपेक्षा आहे.

१०. नोंदींचे काम मंडळाकडून आपल्याकडे सोपवल्यानंतर लेखन पुरे करण्‍याची कालमर्यादाही आपल्याला कळविली जाईल, ती कृपया पाळली जावी.

११. मराठी विश्वकोशातील नोंदीमध्ये येणारा मजकूर/आकृत्या/तक्ते/आलेख/चित्रे/दृक-श्राव्य इ. बाबतींत कॉपी राईटच्या निर्बंधाचा भंग होणार नाही. याची खबरदारी सुद्धा घेणे जरूरीचे आहे.

१२. मराठी विश्वकोशातील नोंद ही संकेतस्थळावर प्रथम प्रकाशित करावयाची असल्याने शक्यतो ती मराठी युनिकोड (unicode) मध्ये टंकलिखित करून या ज्ञानमंडळाकडे पाठवावयाची आहे.

१३. नोंदीतील व्यक्ती नाम, स्थलनाम, संकीर्ण शब्दांचे उच्चार कंसात इंग्लिश उच्चाराचे देवनागरी रूपांतरण करून नोंदीतच समाविष्ट करावे

नोंद लेखन झाल्यानंतर नोंदीचे लेखन तज्ज्ञ समीक्षकांकडून तपासावे लागणार आहे त्यानंतर नोंदीचे अंतिम संपादन विश्वकोश संपादकांकडून करावयाचे आहे. नंतरच ती नोंद महाजालकावर प्रकाशित होणार आहे. नोंदींचे संकेतस्थळावर अधिक प्रभावीपणे सादरीकरण होईल, या दृष्टीनेच आपले लेखन असायला हवे असे अभिप्रेत आहे.