कामगार संघटनांनी चालविलेले महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी दैनिक वृतपत्र. देशातील श्रमिकांचे एकमेव दैनिक असा लौकिक श्रमिक विचार या दैनिकाने मिळविला होता. या दैनिकाची स्थापना १९७८ मध्ये पुण्यात झाली आणि त्याचा पहिला अंक २८ नोव्हेंबर १९७९ रोजी निघाला. हे वृत्तपत्र पुण्यातून प्रसिद्ध होत. सुरुवातीला लाल निशाण पक्षाचे भास्कर जाधव यांनी संपादक म्हणून या वृतपत्राची धुरा वाहिली. त्यानंतर याच पक्षाच्या ए. डी. भोसले यांनी ही जबाबदारी पार पाडली.

महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी ग्रामीण श्रमिक परिषदेचे आयोजन २८ जानेवारी १९७८ मध्ये पुण्यात करण्यात आले होते. त्यात श्रमिक विचार या दैनिकाबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. या परिषदेत जवळपास शंभर कामगार संघटनांनी भाग घेतला होता. लाल निशाण पक्षाशी संबंधित युनियन्स, विविध महानगरपालिकांच्या कामगार संघटना, साखर कामगार संघटना, औद्योगिक कामगारांच्या युनियन्स, ग्रामीण श्रमिकांच्या संघटना इत्यादींचा या परिषदेत पुढाकार होता. श्रमिकांचे स्वतःचे हक्काचे दैनिक असावे, या विचारधारेतून श्रमिक विचार हे दैनिक सुरू झाले. यासाठी ‘श्रमिक जागृती मंडळ’ स्थापन करण्यात आले. सहकारी तत्त्वावर ५९ ट्रेड युनियन संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रवर्तक मंडळ तयार करून आर्थिक उभारणीचे नियोजन केले गेले. प्रारंभी १२ लाख रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. श्रमिक विचार या दैनिकाचे स्वरूप ठरविण्यासाठी प्रत्यक्ष कामगारांशी चर्चा करण्यात आली. यात योगदानाबाबत विचारमंथन करण्याचे आवाहन एका बुलेटीनद्वारे करण्यात आले. या आवाहनाला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भागधारकांसाठी ११ रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली होती. कामगार मोठ्या संख्येने भागधारक बनले आणि त्यांनी स्वतः भांडवल उभारणी केली.

दैनिक श्रमिक विचार कोणत्याही राजकीय पक्षाचे असणार नाही, भेदभाव न करता श्रमिक चळवळीसाठी काम करेल, असे धोरण आखण्यात आले होते. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या कामगारवर्गात पोहोचविणे, त्यांचे सांस्कृतिक जीवन संपन्न बनविणे, पुरोगामी विचारांचा प्रचार करणे आणि सर्वसमावेशक चळवळीत कामगारांचा सहभाग वाढविणे हे उद्दिष्ट ठरविण्यात आले. अशा प्रकारे श्रमिकांचा आवाज बनून श्रमिक विचार या दैनिकाने समाजिक परिवर्तनासाठी योगदान दिले. भांडवली लोकशाहीऐवजी लोकांसाठी लोकशाही निर्माण करणे आवश्यक आहे, अशी भूमिका श्रमिक विचार या दैनिकाच्या माध्यमातून ठामपणे मांडण्यात येत होती. देशातील आर्थिक आणि सामाजिक रचनेतील अरिष्ट दूर करण्यासाठी आर्थिक चौकट बदलली पाहिजे, असा विचार श्रमिक विचार दैनिकात प्रखरपणे मांडला जात.

दैनिक श्रमिक विचारमध्ये असीम त्याग, अन्यायाविरुद्धचा लढा, सांस्कृतिक-साहित्यिक परिवर्तन आणि विविध आंदोलनांचे नेतृत्व यांचा संगम आढळतो. तसेच नवोदित लेखकांना प्रतिष्ठित साहित्यिक बनविणे, कष्टकऱ्यांचे साहित्य प्रसिद्ध करणे, परखड विचार, नि:पक्ष बातम्या, वैचारिक लेख, कविता, कथा हे श्रमिक विचार या वृतपत्राचे वैशिष्ट्य होते. भास्कर जाधव आणि ए. डी. भोसले यांनी वृत्तपत्रसृष्टीत या माध्यमातून अनोखा ठसा उमटविला. श्रमिक विचारचा दरवर्षी ‘दिवाळी अंक’देखील प्रसिद्ध केला जात असे. मराठी साहित्य आणि वृत्तपत्रक्षेत्रातील हा प्रवास उल्लेखनीय आहे.

श्रमिक विचारचा वैचारिक पाया पक्का होता. हा वैचारिकतेचा ठेवा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातून आविष्कृत झालेला दिसतो. त्यात समग्र परिवर्तनासाठी प्रेरक ठरणारे साहित्य प्राधान्याने प्रकाशित झाले. एकाच वेळी कामगार, कष्टकऱ्यांच्या बातम्यांमधून सद्यस्थितीची जाणीव करून द्यायची, त्याच वेळी जागतिक पातळीवरून होणाऱ्या पक्षीय वर्गीय लढ्याबाबतही जागरूक ठेवायचे आणि सर्वसमावेशकताही निर्माण करायची, अशी व्यापक व्यूहमांडणी श्रमिक विचार या दैनिकामध्ये असायची. त्याच प्रमाणे समाजजीवनाचे, व्यक्तिजीवनाचे, राजकारणाचे वर्तमानस्थितीतील समस्यांचे विविधरंगी चित्र उभे करण्याचे कार्य दैनिक श्रमिक विचारने अत्यंत कुशलतेने पार पाडलेले दिसते.

श्रमिक विचारने वैचारिक साहित्यातून अभिरुची विकसित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हे करताना श्रमिकांच्या जीवनात नवी मूल्ये पेरण्याची कामगिरी या दैनिकाने पार पाडली आहे. हे वृत्तपत्र सामाजिक परिवर्तनाचे साधन बनले, ज्याची सामग्री समाजशास्त्रीय संशोधन, चळवळींचे मूल्यमापन आणि भाषिक अभ्यासासाठी महत्त्वाची ठरली. दुर्बल घटकांचे प्रश्न संयत भाषेत मांडण्याचा आदर्श या दैनिकाने निर्माण केला. छोटे वृत्तपत्रही प्रभावीपणे सामाजिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकू शकते, हे सिद्ध केले. भांडवली विकासाच्या घोडदौडीत दुर्बल घटकांचे कल्याण आवश्यक आहे, हे श्रमिक विचारने अधोरेखित केले. लोकशक्ती उभारून चळवळींना बळकटी देण्याचा मार्ग दाखविला. निर्भयपणे लोकसंवाद टिकवून ठेवण्याचा आदर्श निर्माण केला. प्रभावी अग्रलेख, वैचारिक लेख, कथा, कविता यांचा वापर करून सामाजिक व्यथा आणि शोषितांचे अंतरंग मांडले.

श्रमिक विचार हे वृत्तपत्र श्रमिक, कष्टकरी, असंघटित कामगार आणि सामाजिक चळवळींच्या हितासाठी समर्पित होते. या वृत्तपत्राने शेतकरी, शेतमजूर, गिरणी कामगार, बालकामगार, सफाई कर्मचारी, विडी कामगार, टपरीधारक इत्यादी विविध वर्गांच्या प्रश्नांवर आवाज उठविला आहे. मार्क्स-लेनिनवादी विचारधारा, जागतिक चळवळी, सरकारी धोरणांचे परिणाम आणि राजकीय प्रवाहांबद्दल श्रमिकांना जागृत करण्याचे मौलिक कार्य श्रमिक विचार या वृत्तपत्राने केले. तसेच भांडवली पत्रकारितेच्या विरोधात ध्येयवादी आणि प्रामाणिक पत्रकारितेचे उदाहरण या वृत्तपत्राने घालून दिले.

श्रमिक विचार या दैनिकाने, विशेषतः त्याच्या दिवाळी अंकांनी, साहित्यिक दृष्ट्या कथा, कविता, लेख, पुस्तक परीक्षणे, साहित्यविषयक चर्चा यांद्वारे मराठी साहित्याला समृद्ध केले. ‘रविवारची कथा’ या सदरातून नवोदित कथाकारांना नियमित प्रसिद्धी दिली. आंतरराष्ट्रीय कवींच्या अनुवादित कवितांद्वारे मराठी वाचकांचे साहित्यविश्व रुंदावले. लॅटिन अमेरिकन, आफ्रिकन-अमेरिकन कवींच्या रचनांनी वैचारिक विस्ताराला चालना दिली. अशा प्रकारे या दैनिकाचे भाषिक व वाङ्मयीन योगदानही मोलाचे आहे.

श्रमिक विचार या तत्त्वनिष्ठ दैनिकाचा ऱ्हास पुढे अनेक सामाजिक-आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे झाल्याचे दिसते. श्रमिकांच्या देणग्यांवर चालणाऱ्या या दैनिकाला सतत आर्थिक तूटीचा सामना करावा लागला. इतर कोणत्याही प्रकारची आर्थिक आवक नसल्यामुळे त्याचे आर्थिक बळ क्षीण झाले. सरकारच्या नव्या नीतींनी कामगार संघर्ष दडपून टाकले, ज्यामुळे आर्थिक बळ पुरविणाऱ्या कामगार संघटना कमकुवत झाल्या. प्रसारमाध्यमांच्या संरचनात्मक वाढीत गुणवत्ता आणि सामाजिक प्रभावाचा अभाव असल्याने श्रमिक विचार या वृत्तपत्राचा लढा एकाकी ठरला. १९८० नंतरच्या काळात जागतिकीकरण, उदारीकरण आणि वैचारिक गोंधळामुळे परिवर्तनवादी चळवळी धूसर झाल्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम या दैनिकावर झाला. याशिवाय डाव्या आणि परिवर्तनवादी चळवळींनी श्रमिक विचारला पुरेसा पाठिंबा दिला नाही, त्यामुळे त्याची स्थिरता धोक्यात आली. श्रमिक विचार या दैनिकाचा शेवटचा अंक ३१ जुलै १९८८ मध्ये प्रकाशित झाला. अखेरीस आर्थिक संकटामुळे ११ लाख रुपये तोटा सहन करून १ ऑगस्ट १९८८ मध्ये हे दैनिक बंद पडले.

श्रमिक विचार या वृत्तपत्राचे कार्यक्षेत्र मर्यादित होते आणि वाचकवर्गही ठरावीक होता. याच्या सुमारे आठ ते दहा हजार प्रती छापल्या जात आणि त्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या माध्यमातून त्या गावोगावी, तसेच औद्योगिक क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहोचत. चहाच्या टपऱ्यांवर आणि चावडींवर हे दैनिक वाचले जात. या दैनिकाने घेतलेला ध्यास आणि समोर ठेवलेल्या उद्दिष्टांचे मोल समाजसेवेचे होते. स्वातंत्र्य चळवळीत ज्याप्रमाणे पत्रकारिता केवळ हौस किंवा धंदा म्हणून केली जात नव्हती, त्याच आदर्शांना डोळ्यांसमोर ठेऊन श्रमिक विचार हे दैनिक चालविले गेले. या वृत्तपत्राने श्रमिक शिक्षकाची भूमिका यथोचितपणे पार पाडली.

संदर्भ : https://map.sahapedia.org

समीक्षक : दिलीप चव्हाण