प्रस्तावना : आधुनिक आरोग्यसेवा प्रणाली ही केवळ अनुभवाधारित किंवा परंपरागत उपचारपद्धतींवर अवलंबून न राहता, शास्त्रीय संशोधन, गुणवत्तेची हमी आणि रुग्णसुरक्षितता यांवर आधारित होत आहे. या बदलत्या आरोग्यपरिस्थितीत परिचर्या व्यवसायाची भूमिका अधिक जबाबदार, विश्लेषणात्मक व संशोधनाभिमुख बनली आहे. रुग्णाच्या उपचार प्रक्रियेत परिचर्या सेवांचा थेट आणि निर्णायक परिणाम होत असल्यामुळे परिचर्या व्यवहार वैज्ञानिक व पुरावाधारित असणे अत्यावश्यक ठरते.

या संदर्भात पुरावाधारित परिचर्या पद्धती (Evidence-Based Practice – EBP) ही संकल्पना परिचर्या व्यवसायात विशेष महत्त्वाची मानली जाते. पुरावाधारित परिचर्या म्हणजे केवळ वैयक्तिक अनुभव, रूढी किंवा तोंडी परंपरा यांवर आधारित निर्णय न घेता, उपलब्ध सर्वोत्तम संशोधन पुरावे, परिचर्या तज्ज्ञांचा व्यावसायिक अनुभव आणि रुग्णाच्या वैयक्तिक गरजा, मूल्ये व प्राधान्ये यांचा समन्वय साधून चिकित्सालयीन , रुग्ण विषयक निर्णय घेण्याची शास्त्रीय प्रक्रिया होय.

पुरावाधारित परिचर्या संकल्पना अर्थ : पुरावाधारित परिचर्या ही एक प्रणालीबद्ध, शास्त्रीय व विवेकाधिष्ठित क्लिनिकल निर्णयप्रक्रिया आहे. या पद्धतीत परिचर्या व्यवहाराशी संबंधित प्रश्न ओळखून, त्यावर आधारित संशोधन पुरावे शोधले जातात, त्यांचे चिकित्सक मूल्यमापन केले जाते आणि ते पुरावे प्रत्यक्ष रुग्णसेवेत प्रभावीपणे वापरले जातात. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, “रुग्णासाठी सर्वांत सुरक्षित, प्रभावी व योग्य परिचर्या हस्तक्षेप कोणता?” या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पुरावाधारित परिचर्या पद्धतीचा वापर केला जातो. ही प्रक्रिया अनुभव व संशोधन यांचा समतोल राखून, रुग्णकेंद्रित परिचर्या सेवा देण्यावर भर देते.

 पुरावाधारित परिचर्येचे मूलभूत घटक

पुराव्याधारित परिचर्या ही तीन प्रमुख घटकांच्या एकत्रित वापरावर आधारित असते—

१. सर्वोत्तम उपलब्ध संशोधन पुरावे : यामध्ये उच्च दर्जाचे, चिकित्सकदृष्ट्या उपयुक्त संशोधन अभ्यास, प्रणालीबद्ध आढावे (systematic reviews) व मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश होतो. हे पुरावे परिचर्या व्यवहार अधिक सुरक्षित व परिणामकारक बनवतात.

२. परिचर्या तज्ज्ञांचा व्यावसायिक अनुभव : परिचर्या कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य, निर्णयक्षमता व प्रत्यक्ष रुग्णसेवेतून मिळालेला अनुभव हा पुरावाधारित परिचर्येचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

३. रुग्णाची मूल्ये, प्राधान्ये व परिस्थिती : रुग्णाची सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी, अपेक्षा, चिंता, जीवनशैली आणि उपचार स्वीकारण्याची तयारी या घटकांचा परिचर्या निर्णयप्रक्रियेत समावेश करणे आवश्यक असते.

या तिन्ही घटकांचा समन्वय साधल्यास परिचर्या सेवा अधिक मानवी, नैतिक व प्रभावी ठरते.

पुरावाधारित परिचर्या प्रक्रिया : पुराव्याधारित परिचर्या ही सामान्यतः पाच टप्प्यांमध्ये राबविली जाते—

१. प्रश्न विचारणे (Ask) : वैद्यकीय समस्येवर आधारित स्पष्ट, उत्तरयोग्य प्रश्न तयार केला जातो. यासाठी प्रामुख्याने PICO प्रतिमान (model) पद्धतीत प्रश्न विचारले जातात ज्यात रुग्ण, हस्तक्षेप , तुलना, परिणाम  (Patient, Intervention, Comparison, Outcome) वापरले जाते.

२. पुरावे मिळवणे (Acquire) : पुरावाधारित परिचर्या पद्धती संबंधित प्रश्नांसाठी सर्वोत्तम, विश्वासार्ह आणि अद्ययावत संशोधन पुरावे शोधले जातात.

३. पुराव्यांचे मूल्यांकन (Appraise) : पुरावाधारित परिचर्या पद्धतीमध्ये मिळालेल्या पुराव्यांची गुणवत्ता, वैधता व प्रत्यक्ष उपयोगिता यांचे चिकित्सक मूल्यमापन केले जाते.

४. वैद्यकीय व्यवहारात अंमलबजावणी (Apply) : पुरावाधारित परिचर्या पद्धतीमध्ये निवडलेले पुरावे परिचर्या तज्ज्ञांचा अनुभव व रुग्णाच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्यक्ष रुग्णसेवेत लागू केले जातात.

५. परिणामांचे मूल्यांकन (Assess) : पुरावाधारित परिचर्या पद्धतीमध्ये राबविलेल्या हस्तक्षेपामुळे रुग्णसेवेत अपेक्षित सुधारणा झाली आहे का, याचे मूल्यमापन केले जाते आणि आवश्यकतेनुसार बदल केले जातात. ही प्रक्रिया सातत्यपूर्ण असून गुणवत्ता सुधारण्याचा पाया घालते.

पुरावाधारित परिचर्येची गरज महत्त्व :

पुरावाधारित परिचर्येची गरज पुढील कारणांमुळे प्रकर्षाने जाणवते—

रुग्णसुरक्षिततेचे संरक्षण, परिचर्या गुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा, क्लिनिकल निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, कायदेशीर व नैतिक उत्तरदायित्वाची पूर्तता, संसाधनांचा कार्यक्षम व योग्य वापर. संस्थात्मक व व्यावसायिक महत्त्व, पुरावाधारित परिचर्येमुळे आरोग्यसंस्थेमध्ये शिस्तबद्ध, मानकाधारित व गुणवत्तापूर्ण परिचर्या सेवा प्रस्थापित होते. परिचर्या कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो, संशोधनवृत्ती विकसित होते आणि संस्थेची विश्वासार्हता व कार्यक्षमता उंचावते. तसेच ही पद्धत परिचर्या शिक्षण, नेतृत्व विकास आणि गुणवत्ता हमी कार्यक्रमांसाठी भक्कम आधार ठरते.

पुरावाधारित परिचर्येसाठी उपयुक्त संसाधने (Resources) :

पुरावाधारित परिचर्या प्रभावीपणे राबविण्यासाठी परिचर्या व्यावसायिकांना विश्वासार्ह, अद्ययावत व संशोधनाधारित माहिती स्त्रोतांची आवश्यकता असते. खालील संसाधने परिचर्या शिक्षण, संशोधन आणि वैद्यकीय व्यवहारासाठी अत्यंत उपयुक्त मानली जातात—

१. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संस्था :

(i) अमेरिकन परिचारिका संघटना (ANA) – पुरावाधारित परिचर्या मानके, मार्गदर्शक तत्त्वे व व्यावसायिक विकासासाठी अधिकृत संसाधने उपलब्ध करून देते. (ii) जागतिक आरोग्य संघटना (WHO) – आरोग्यसेवा गुणवत्ता, रुग्णसुरक्षितता व पुराव्याधारित धोरणांबाबत जागतिक मार्गदर्शन प्रदान करते. (iii) आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषद (ICN) – परिचर्या व्यवहारात संशोधन व पुराव्यांचा वापर प्रोत्साहित करते.

२. महत्त्वपूर्ण शास्त्रीय माहितीचे संकलन व नियतकालिके (database and journal) :

(i) पब मेड (pubmed) / मेड लाइन  – परिचर्या व आरोग्यविज्ञानातील समकालीन संशोधन लेखांसाठी महत्त्वपूर्ण माहिती. (ii) सीनहाल (Cumulative Index to Nursing and Allied Health Literature; CINAHL) – परिचर्या व सहयोगी आरोग्यशास्त्रासाठी विशेष माहिती, प्रणालीबद्ध आढावे व उच्च दर्जाचे पुरावे उपलब्ध करून देते.

३. मार्गदर्शक तत्त्वे व वैद्यकीय शिष्टाचार (clinical protocol) :

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय अभ्यासाची मार्गदर्शक तत्त्वे (Clinical Practice Guidelines), मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedures; SOPs) आणि काळजी पॅकेजेस हे पुराव्यावर आधारित परिचर्या पद्धतीचे महत्त्वाचे घटक आहेत आणि  ही सर्व तत्त्वे पुरावाधारित परिचर्या पद्धतीच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची साधने ठरतात.

४. शैक्षणिक व प्रशिक्षण संसाधने :

ऑनलाईन अभ्यासक्रम, कार्यशाळा, निरंतर  व्यावसायिक विकास (CPD) कार्यक्रम . परिचर्या प्रशिक्षण विद्यालये व प्रशिक्षण संस्थांमार्फत राबविले जाणारे पुरावा आधारित मॉड्यूल्स ही संसाधने परिचर्या कर्मचाऱ्यांना अद्ययावत ज्ञान, संशोधन कौशल्ये व गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा देण्यासाठी सक्षम करतात.

निष्कर्ष : पुरावाधारित परिचर्या पद्धती ही आधुनिक परिचर्या व्यवसायाचा कणा मानली जाते. सर्वोत्तम संशोधन पुरावे, व्यावसायिक अनुभव आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन यांचा समन्वय साधून दिलेली परिचर्या सेवा अधिक सुरक्षित, प्रभावी व दर्जेदार ठरते. बदलत्या आरोग्यसेवा गरजांच्या पार्श्वभूमीवर पुरावाधारित परिचर्येशिवाय गुणवत्तापूर्ण परिचर्या व्यवहार शक्य नाही. पुराव्यावा आधारित परिचर्या प्रभावीपणे राबविण्यासाठी केवळ संशोधन उपलब्ध असणे पुरेसे नाही, तर त्या संशोधनाचा योग्य अर्थ लावून, तो प्रत्यक्ष रुग्णसेवेत नैतिक व व्यवहार्य पद्धतीने वापरणे आवश्यक असते. योग्य संसाधनांचा वापर केल्यास परिचर्या सेवा अधिक सुरक्षित, परिणामकारक व रुग्णकेंद्रित ठरते.

सारांश : पुरावाधारित परिचर्या ही परिचर्या व्यवसायातील एक शास्त्रीय, संशोधनाधारित व रुग्णकेंद्रित पद्धत आहे. यामुळे रुग्णसेवेची गुणवत्ता, सुरक्षितता व संस्थात्मक कार्यक्षमता वाढते तसेच परिचर्या व्यवसायाचा व्यावसायिक दर्जा उंचावतो.

संदर्भ : 

  • American Nurses Association,  Nursing professional development : Scope and standards of practice, 4th ed., 2021.
  • International Council of Nurses, Nursing and evidence-based practice : Position statement, 2024.
  • Melnyk, B. M.; Fineout-Overholt, E. Evidence-based practice in nursing and healthcare: A guide to best practice, 5th ed., 2023.
  • Stevens, K. R. The impact of evidence-based practice in nursing on quality outcomes, 2021.
  • Toney-Butler, T. J.; Thayer, J. M. Evidence-based practice, 2023.
  • World Health Organization, Evidence-informed policy-making for health systems, 2022.

समीक्षक : सिद्धी गणेश बांदेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.