प्राचीन पर्शियन (इराणी) जलदेवता. पौराणिक कथांमधून तिला पाणी, सुपीकता, सुफलता, समृद्धी आणि बुद्धीची एक अत्यंत महत्त्वाची आणि पूजनीय देवी मानली जाते. ‘अनहित’ या शब्दाचा अर्थ निर्मळ, शुद्ध, अपवित्रतेपासून मुक्त असा होतो. कमळाचे फूल हे तिचे प्रतीक आहे. तिचे पूर्ण नाव अर्दवी सुरा अनहिता असून ज्याचा अर्थ आर्द्रता, बलवान आणि पवित्र असा होतो. तिला अनाहिद, अनाहिता आणि अनायटिस या नावांनीही ओळखले जाते. तिचे वर्णन एक सुंदर, सशक्त, उंच आणि पवित्र मुलगी असे केले जाते.

अनहितचा उल्लेख प्रामुख्याने ‘अवेस्ता’ या पर्शियन धर्मग्रंथात आढळतो. ती स्त्रियांची संरक्षकदेवता आहे. तसेच ती पाण्याची देवी असून, वारा, पाऊस, ढग आणि गारा या चार घोड्यांनी ओढलेल्या रथातून ती प्रवास करते. शिवाय ती प्रजननक्षमता आणि आरोग्य यांचीही देवी आहे. कबूतर आणि मोर हे तिचे पवित्र प्राणी आहेत.

अहुर मज्द आणि मिथ्र या दोन प्रमुख झोरोस्ट्रिअन देवतांप्रमाणेच अनहित ही देवीही महत्त्वाची मानली जाते. जिचे नाव पर्शियन पौराणिक कथांमध्ये अमर झाले आहे. सुसा आणि हामादान येथील इ.स.पू. चौथ्या शतकातील शिलालेखांमध्ये याचा पहिला लिखित पुरावा मिळतो. अनहितची तुलना इतर संस्कृतींतील काही देवतांशी केली जाते. भारतीय परंपरेत सरस्वती आणि गंगा या नद्यांच्या देवता तिच्यासारख्या मानल्या जातात. तर ग्रीक संस्कृतीत आर्टेमिस व अथेना या देवतांशी तिची तुलना केली जाते.

मेसोपोटेमियामध्ये उगम पावलेल्या तिच्या पंथाला पर्शियन राजा द्वितीय आर्टक्झक्र्सीझ (इ.स.पू. पाचवे-चौथे शतक) याने बळकटी दिली आणि तिच्या सन्मानार्थ मंदिरे बांधली. तिला धर्मनिष्ठ राजांची संरक्षक मानले जात असे आणि संपूर्ण पर्शियन साम्राज्यात तिची पूजा केली जात असे. अनहित ही जलदेवता असल्याने भारतातील बहुतेक आधुनिक पारशी लोक ऑक्टोबर महिन्याच्या आठव्या दिवशी समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी प्रार्थना केल्यानंतर पाण्याला फुले आणि दार-नी-पोरी (मसूरच्या डाळीचे गोड मिश्रण असलेली एक प्रकारची पेस्ट्री) अर्पण करतात. जरी पुरुषही हा सण साजरा करत असले, तरी हा विधी विशेषतः स्त्रियांशी संबंधित आहे. अनहितचा प्रभाव केवळ धार्मिकच नव्हता, तर सामाजिक जीवनातही दिसून येतो.

संदर्भ :

  • Boyce, Mary, Zoroastrians : Their Religious Beliefs and Practices, London, 1979.
  • Choksy, Jamsheed K. Evil, Good, and Gender : Facets of the Feminine in Zorastrian Religious History, New York, 2002.
  • Darmesteter, James, The Zend-Avesta (Part II : The Sirozahs, Yasts and Nyayis), Oxford, 1883.
  • Hinnells, John R. Persian Mythology, London, 1973.
  • Widengren, Geo, The Religions of Iran, Columbia, 1965.
  • Zaehner, R. C. The Dawn and Twilight of Zoroastrianism, London, 1961.

समीक्षक : आनंद गेडाम


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.