मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासून मानवाच्या जीवनाशी संलग्न अशा विविध क्षेत्रांत मिळविलेले ज्ञान संघटितपणे आणि शिस्तीने संपादित करणे आणि ते नवीन पिढीपर्यंत पोहोचविणे हा कोशाचा हेतू असतो. कोशातील माहिती परिपूर्ण असावी असा आग्रह धरला जातो, मात्र कोशातील नोंद लिहिल्यावर ती प्रकाशित होईपर्यंतच्या काळात आणि नंतरही ज्ञानात सारखीच भर पडत असते. शिवाय सारांशात कथन केलेली माहिती असेच कोशातील नोंदीचे स्वरूप असते. सर्वसामान्य वाचकाची ज्ञानाची भूक भागविणे हा जरी नोंदीचा हेतू असला, तरी विद्वानांची भूक तेवढ्यानेच शमत नाही व त्यांना सविस्तर माहितीची अपेक्षा असते. मात्र प्रत्येक विषयाला एका मर्यादेच्या पलीकडे विश्लेषण करणे शक्य नसल्याने, नोंदीची शब्दसंख्या निश्चित करावीच लागते.

‘नोंद’ या संकल्पनात्मक संज्ञेचा वाच्यार्थ टिपण, टाचण असा होतो; तथापि मराठी विश्वकोशाच्या संदर्भात व परिभाषेत त्याचा अर्थ ‘लेख’ (एन्ट्री) असा अभिप्रेत आहे. मराठी विश्वकोशात नोंदींचे विषयवार अनेक प्रकार आढळतात. प्रतिपादित करण्याच्या विषयानुसार त्या नोंदीचे स्वरूप ठरत असते.

विश्वकोशातील नोंदीचे वाचन मुख्यतः चार हेतूने करण्यात येते :

  • जगातील कुठल्याही विषयाची माहिती घेण्याकरिता वाचक विश्वकोशाकडे येतात.
  • एखादा अपरिचित शब्द अथवा संकल्पना ऐकल्यावर त्याची माहिती करून घेण्याच्या उद्देशाने.
  • एखाद्या गोष्टीची जुजबी माहिती असल्यावर, त्या बाबतीत विस्तृत माहिती कशी मिळविता येईल व त्यासाठी कोणकोणते संदर्भ शोधावे लागतील याचा विचार करण्यासाठी
  • आपल्याला एखाद्या गोष्टीची जी माहिती उपलब्ध आहे, त्याची सत्यता पडताळण्यासाठी अथवा खरेखोटेपणाचा शहानिशा करण्यासाठी

लेखकाला घ्यावी लागणारी काळजी 
विश्वकोशातील नोंदीतून वर्ण्यविषयाचा पुरेसा परिचय करून द्यावयाचा असतो,  तसेच नोंद संक्षिप्त अथवा साररूपातील असल्यामुळे विस्तृत माहिती प्राप्त करण्यासाठी त्यातून मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याने, असे मार्गदर्शन सूचकपणे नोंदीतून घडणे आवश्यक असते. अन्यथा अपुऱ्या माहितीवरच वाचकाला समाधान मानावे लागेल. यासाठी नोंदीत समाविष्ट माहितीची लेखकाने पुरेशी खातरजमा करणे आवश्यक असते.[नोंद लेखन सूचना]

नोंदींची शब्दसंख्या 
नोंद लिहिताना शब्दसंख्येचे बंधन घालणे आवश्यक आहे. शब्दसंख्येवरून नोंदीचा विस्तार लक्षात येतो आणि विस्तारावर विषयाचे महत्त्व अवलंबून असते. लेखकाच्या दृष्टीने तो लिहीत असलेला विषय हा महत्त्वाचाच असतो आणि त्या विषयातील तो विद्वान व अधिकारी व्यक्ती असतो, त्यामुळे आपल्या विषयाचे महत्त्व दुसऱ्याने निश्चित करावे हे काहीसे त्याला पटणारे नसते. त्यामुळे नेमकी कोणती माहिती वाचकाला प्रेषित करायची आहे आणि ती नेमकेपणाने किती शब्दांत प्रेषित करता येऊ शकते या निकषावरच नोंदीची शब्दसंख्या अवलंबून असावी. हा मुद्दा खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल.

समजा, एखाद्याला ‘संगीत’ या विषयावर नोंद लिहायची आहे. तसा पाहिला तर हा विषय खूप ढोबळ आहे. तो नेमकेपणाने सादर होण्यासाठी त्याची शब्दसंख्या निश्चित करणे आवश्यक आहे. आपण संगीत या विषयाचा विचार केला तर त्यात अनेक उपविषय येतात व हे पूर्ण नोंदीचेच विषय आहेत.

संगीताचे भारताच्या दृष्टीने स्थूलमानाने दोन भाग पडतात  : उत्तर हिंदुस्थानी संगीत व कर्नाटकी संगीत.

प्रकाराच्या दृष्टीने संगीताचे उपप्रकार असे आहेत :

  • शास्त्रीय संगीत
  • उपशास्त्रीय संगीत
  • सुगम संगीत
  • नाट्यसंगीत
  • भक्ती संगीत
  • लोकसंगीत

एवढेच नव्हे तर संगीत हा तीन विषयांचा समुच्चय आहे – गायन, वादन आणि नर्तन.

गायन हा विषय जरी घेतला तर गायनातही विविध प्रकार आहेत. विविध घराणी आहेत. प्रत्येक घराण्यावर स्वतंत्र नोंद होऊ शकते. त्याचप्रमाणे ख्याल, टप्पा, होरी, ठुमरी, प्रबंध, कीर्तन, भजन अशा प्रकारांचीही स्वतंत्र नोंद होऊ शकते. आणखी पुढे संगीत विषयाचा विचार करीत गेलो तर येथेच मोठी नोंद तयार होईल. आपला उद्देश केवळ नोंदीचा विस्तार व त्यासाठी लागणारी शब्दसंख्या यावर विचार करणे हाच आहे.

एकंदर विषयाचा आवाका लक्षात घेता त्यातील विविध विषय नेमके कसे आणता येतील याचे एक ढोबळ चित्र, आराखडा मनासमोर असतोच. त्यामुळे विषयातील सर्व अंगोपांगाना समुचित न्याय देण्याच्या दृष्टीने  विविध विषयांची शब्दसंख्या ठरविणे आवश्यक असते.

शब्दसंख्या आणि विषयाचे महत्त्व एखाद्या नोंदीची शब्दसंख्या जास्त, त्यामुळे विषय अत्यंत महत्त्वाचा या मिथकातूनही बाहेर यावे लागेल. अत्यंत महत्त्वाचे विषयही कमी शब्दसंख्येत व्यवस्थित मांडता येतात. तसेच काही बिनमहत्त्वाच्या अथवा कमी महत्त्वाच्या विषयाचा विस्तार जास्त शब्दसंख्येत करण्याची गरज त्या विषयाला स्पष्ट करण्याच्या दृष्टीने असते. उदा., कापूस जास्त जागा व्यापतो म्हणून महत्त्वाचा व सोने कमी जागेतही राहू शकते म्हणून बिनमहत्त्वाचे असे मानता येत नाही.

शब्दांची निवड प्रत्येक ‘शब्द’ अर्थवाही असतातच असे म्हणता येत नाही. शब्दाच्या परिचयाने त्याचा अर्थ वाचकाला उमगत असतो. अपरिचित शब्द असतील तर तो संदर्भाने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो अथवा त्याचा अभिप्रेत नसलेला अर्थही लावण्याची  शक्यता नाकारता येत नाही. शब्दार्थांची मनात स्पष्टता नसल्यामुळे अधिकाधिक स्पष्ट नोंद लिहूनही ती वाचकाला स्पष्ट होईलच याची हमी देता येणे  अशक्य आहे. त्यामुळे लेखनात पुरेशी स्पष्टता असावी आणि लेखन करताना साधे, सरळ, सोपे व सुगम शब्द वापरावे असे सांगणे उपचार म्हणून ठीक असते. पण कोणते शब्द सुगम व कोणते दुर्गम असा काटेकोर भेद करणे अवघड असते.

शब्द आणि त्याचा अर्थ एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. देवपूजेत ‘पाट’ हा शब्द आसन या अर्थाने तर, शेतीमध्ये ‘पाट’ हा शब्द पाण्याच्या प्रवाहाच्या अर्थाने वापरला जातो. यंत्रकामात ‘नट’ हा शब्द वेगळ्या अर्थाने तर नाट्यसृष्टीत तोच शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जातो. पण ही अगदीच ढोबळ आणि वरवरची उदाहरणे झाली. योग हा शब्द तर विविध विषयांत वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो.

समर्पक वाक्यरचना जे शब्दाबाबत सांगितले जाते तेच वाक्याबाबतही सांगता येते. सरळ व सोपी वाक्यरचना असावी. लांबलचक वाक्यरचना करून वाचकाला संभ्रमात पाडणे योग्य नसते. पण कमी शब्द वापरून सुटसुटीत लेखन करणे हे फार मोठे कसब आहे. ते भाषा अभ्यासकाला आणि भाषेच्या विद्वानालाच साध्य होऊ शकते. एखादा मनुष्य त्या त्या विषयाचा विद्वान भलेही असेल पण भाषेचा आणि व्याकरणाचा पुरेसा अभ्यास नसेल तर आपल्याला अपेक्षित वाक्यरचना करताना त्याचा गोंधळ उडणे स्वाभाविक असते. कसलेल्या विद्वानाचीही योग्य शब्दाची निवड करताना घोटाळा होण्याची  शक्याता असते.

आनुषंगिक माहितीचा समावेश एखाद्या विषयाचे विवेचन करताना त्यात आनुषंगिक माहिती अपरिहार्यपणे येत असते. ही अपरिहार्य माहिती आवश्यक तेवढीच देणे भाग असते. तसेच ती विषयरूपाने जर विश्वकोशात समाविष्ट होणार असेल तर केवळ त्या विषयाचा सूचक उल्लेख करून पुढे जाणे चांगले असते.

मुक्त लेखन आणि पुनरुक्तीची सवय लेखकांना मुक्त लेखन करण्याची सवय असते. काहींच्या लेखनात पुनरुक्तीचा दोषही असतो. त्याचप्रमाणे काही जणांना अकारण अनावश्यक शब्द वापरण्याची सवय असते. यामुळे नोंदीचा विस्तार वाढत जातो. अशा नोंदीचे संपादन करणे अवघड बनून जाते. तसेच नोंदीला संक्षिप्त करीत असतांना आवश्यक माहिती गाळली जाण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे लेखन करताना पुरेशी सावधानता घेतली तर नोंदीचा अनावश्यक विस्तार टाळता येऊ शकतो.

लेखकाचे भाषाविषयक भांडार लेखकाची भाषासंपदा आणि भाषासृष्टी हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. लेखकाचे भाषाविषयक भांडार मोठे असेल तर तो त्यातून योग्य शब्द मोजूनमापून आणि तोलून घेईल, पण त्याला मराठी ऐवजी हिंदी, इंग्रजी वा अन्य भाषेतून विचार करायची सवय असेल तर त्याला योग्य शब्द सापडत नाहीत व शब्दांच्या तुटवड्यापोटी त्याचे लेखन मोघम, अस्पष्ट वाटते आणि अर्थवाहीसुद्धा होत नाही. याला शब्दसंख्येचे बंधन मुळीच कारणीभूत नसते. यापुढचा विषय लेखकाची लेखनशैली व हातोटी हा होय. काही जणांना अवघड विषय हा सोपा करून सांगता येतो, पण निवेदनाच्या विचक्षण दृष्टीचा अभाव असल्यास सोपा विषयही अगम्य शैलीत मांडण्याची काही जणांना सवय असते. लेखकाच्या लेखनशैलीवरून ही बाब आपल्या लक्षात आल्यावाचून राहत नाही. अशा नोंदीचे संपादन करणे अथवा नाईलाजाने नोंदच नाकारणे या गोष्टी संपादकाला करणे भाग पडते. [भाषासंपादन].

नोंदीची सर्वंकषता विषयाची सर्वंकष माहिती विश्वकोशातील छोट्याशा नोंदीतून देता येऊ शकत नाही.  विश्वकोशातील नोंद म्हणजे त्या विषयात डोकावण्यासाठी एक खिडकी असते. एखाद्या खिडकीतून घराच्या आतील दृश्य जितके दिसू शकते अथवा घराच्या आतून बाहेरचे दृश्य जितके दिसू शकते तेवढेच एखाद्या विषयाचे दर्शन नोंदीतून घडू शकते. या खिडकीची चौकट म्हणजे नोंदीची शब्दसंख्या होय. एखाद्या विषयाला असलेले विविध पैलू, आयाम अथवा कंगोरे नोंदीत नमूद करता येतील, पण ते उलगडून दाखवता येणे अशक्य असते. पूरक वाचनासाठी संदर्भग्रंथांची सूची देऊन ही अपूर्णता काही प्रमाणात कमी करता येते. विश्वकोशातील नोंद सर्वंकष असावी, असे म्हणताना ही नोंद विहंगावलोकनाचाच आनंद देऊ शकते हे लक्षात असू द्यावे. विहंगावलोकनात जेवढे जेवढे आपण अधिक उंचीवर जाऊ तितके अधिक मोठे क्षेत्र आपल्या दृष्टीच्या आवाक्यात येत जाते, पण त्याचवेळी दृष्ट‍िपथात येणारा तपशील मात्र कमी होत जातो. त्याचप्रमाणे जेवढा विषय अधिक व्यापक तेवढा नोंदीचा आवाका मोठा होत जातो, मात्र तपशीलात घट होत जाते. कमी तपशील पुरवून मोठा आवाका मांडणे म्हणजेच नोंदीची सर्वंकषता असे म्हणता येईल.

नोंदीचे लेखन करीत असताना, शब्दसंख्या लक्षात घेऊन नोंदीच्या गाभ्याचा विचार करणे अपेक्षित आहे. नोंदीचा गाभा म्हणजे ज्या माहितीवाचून नोंदीला परिपूर्णता येणार नाही ती अत्यावश्यक माहिती. अशी माहिती कोणत्याही सबबीवर नोंदीतून वगळता कामा नये. वाचकांना मुख्यत्वे जी माहिती करून देण्यासाठी मुळात नोंद लिहिण्यात आलेली आहे, ती माहिती व्यवस्थित पद्धतीने करून देणे हे लेखकाचे मुख्य कर्तव्य असते. या नोंदीत येणारे आनुषंगिक विषय जर त्या नोंदीच्या शब्दसंख्येच्या मर्यादेत बसत नसतील आणि ते आनुषंगिक विषय जर अन्य नोंदीच्या माध्यमातून विश्वकोशात समाविष्ट होणार असतील तर मूळ नोंदीत विनाकारण त्या अनुषंगिक विषयांचा समावेश करण्याची काही गरज नसते. त्यामुळे मुख्य प्रतिपादित विषयाचा गाभा लक्षात घेऊन शब्दसंख्येच्या मर्यादेत योग्य शब्दांचा वापर करून नोंदीचे लेखन करणे यात खरे अपेक्षित आहे. या गाभ्याच्या विषयाभोवती अन्य आवश्यक माहितीची मांडणी केल्यास नोंदीला नक्कीच परिपूर्णता येऊ शकते.