शिक्षणाचा उदय प्रागैतिहासिक काळात झाला. सुरुवातीच्या काळात कुटुंब हे शिक्षणाचे केंद्र व आईवडील, विशेषत: आई, हे बालकाचे गुरू होते. पुढे हळूहळू जीवनव्यवहाराच्या कक्षा बदलल्याने आईवडीलांना चरितार्थासाठी घराबाहेर पडावे लागले. परिणामत: मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांना वेळ मिळेनासा झाला. पुढे उपजीविकेपुरते शिक्षण हा विचार बदलून लिहिणे, वाचणे व अंकज्ञान असे स्वरूप शिक्षणाला प्राप्त झाले. हे नवे स्वरूपही आईवडिलांना झेपेनासे झाले. त्यामुळे शिक्षण देणाऱ्या वेगळ्या यंत्रणेची गरज भासू लागली. त्यातूनच शाळा ही संस्था उदयास आली आणि शिक्षकी व्यवसायाला सुरुवात झाली. पुढे मानवाच्या विचारांची प्रगती होत गेली व जीवनातील समस्यांबाबत विचारवंत वेगवेगळे सिद्धांत मांडू लागले. मानवाचे सर्वसामान्य स्वरूप व त्याची प्रगती यांविषयीचे विचारही मांडण्यात येऊ लागले. शिक्षण म्हणजे, ज्ञान, कौशल्ये व अभिवृद्धी यांचे संपादन असल्याने तत्त्ववेत्त्यांनी शिक्षणविषयक सिद्धांत मांडण्याचे प्रयत्न केले. सुरुवातीच्या काळात शिक्षण ही एक कला मानली जाई; तथापि शास्त्राच्या प्रगतीचा शिक्षणविषयक विचारांवर प्रभाव पडून शिक्षण हे कलेबरोबर शास्त्रही आहे, असे मानण्यात येऊ लागले.
पदार्थविज्ञान, प्राणिविज्ञान, भूगर्भशास्त्र यांसारख्या निसर्गविज्ञांनाबाबत मानवाने कितीही माहिती मिळविली, तरी त्या शाखांतील कार्यतत्त्वे निसर्गनिर्मित आहेत. शिक्षणशास्त्राचे तसे नाही. ते मानवनिर्मित असल्याने त्याची कार्यतत्त्वे, त्याचा आशय व उद्दिष्टे मानवाने ठरविली आहेत. प्लेटो (Plato), ॲस्टॉटल (Aristotle) यांच्या काळापासून शिक्षण ही प्रक्रिया मानवाला माहीत असल्याने मानवाने आपल्या तात्त्विक विचारांनुसार शिक्षणाची व्याख्या बनविली आणि तात्विक विचार सतत बदलत राहिल्यामुळे शिक्षणाची व्याख्याही बदलत गेली.
व्याख्या : (१) प्रौढ माणसांनी आपल्या ज्ञानाची व अनुभवाची छाप लहान मुलांवर पाडणे म्हणजे शिक्षण. (२) अपक्व मनाचा परिपक्व मनाशी निकट संबंध येणे म्हणजे शिक्षण. (३) व्यवहारातील कामाचे वळण मुलांना लावणे म्हणजे शिक्षण. (४) शिक्षण म्हणजे आत्मशिक्षण होय. (५) जसा विकास झाला पाहिजे, तसा तो होण्यास मदत करणे, अशी व्याख्या , मारिया माँटेसरी (Maria Montessori), बर्ट्रंड रसेल (Bertrand Russell) व नील यांसारख्या निसर्गवाद्यांनी केली आहे. (६) योहान हाइन्रिक पेस्टालोत्सी (Johannes Hyinrich Pestalotse) यांच्या मते ‘शिक्षण म्हणजे मनुष्याच्या सर्व जन्मसिद्ध शक्तींचा समप्रमाण विकास’. (७) फ्रीड्रिख फ्रबेल (Friedrich Fröbel) म्हणतात की, ‘मनुष्याच्या अंतर्गत शक्ती बाहेर आणून त्यांचा विकास साधणे म्हणजे शिक्षण’. (८) हर्बर्ट स्पेन्सर (Herbert Spencer) म्हणतात की, ‘मनुष्याचे शील बनविणे म्हणजे शिक्षण’. (९) ज्यांचे तत्त्वज्ञानव्यावहारिक जीवनापुरते मर्यादित असते, अशांनी ‘शिक्षण म्हणजे उत्तम नागरिक बनविणे असे म्हटले आहे’. (१०) बीड यांनी ‘शिक्षण म्हणजे विश्वाच्या उभारणीची योजना होय’ असे म्हटले आहे. (११) टॉमस हक्सली यांनी, ‘सर्वांगसुंदर जीवन जगण्याची तयारी म्हणजे शिक्षण’ अशी व्याख्या केली आहे. (१२) जेम्स, ड्यूई, पीअर्स ईत्यादी तत्त्ववेत्ते विसाव्या शतकातील कार्यवादी तत्त्वचिंतक यांच्या मते, ‘शिक्षण म्हणजे भोवतालच्या नैसर्गिक वातावरणाशी व सामाजिक वातावरणाशी समरस होण्याची पात्रता मुलांच्या अंगी आणून देणे’. (१३) जॉन ड्यूई यांनी आपले म्हणणे अधिक स्पष्ट करून ‘शिक्षण म्हणजे लहान व असहाय मनुष्यप्राण्याला सुखी, नीतिमान व कार्यक्षम बनण्यास मदत करणे’, असे प्रतिपादन केले. ते असेही म्हणतात की, ‘शिक्षण म्हणजे भावी जीवनाची तयारी नव्हे, तर मुलांचे प्रत्यक्ष जीवनच होय’. (१४) अलीकडच्या काही तत्त्ववेत्त्यांच्या मते, उत्तम नागरिक तयार करणे, हेच शिक्षणाचे लक्षण मानले आहे. (१५) शिक्षण म्हणजे जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे होणारे सर्व सामाजिक वारशांचे संक्रमण असेही काहींनी म्हटले आहे. (१६) काही अध्यात्मवाद्यांच्या मते, ‘व्यक्तित्वावरून सर्वव्यापी तत्त्वाकडे मनुष्याचे मन ज्या योगे नेले जाते, ते शिक्षण होय’. ‘शिक्षण म्हणजे ईश्वरी इच्छेचे संशोधन’, असेही ते म्हणतात. (१७) प्लेटो यांच्या मते, ‘सत्य, शिव व सुंदर ही जी जीवनाची अंतिम मूल्ये आहेत, ती समजण्याची व अनुभवण्याची पात्रता मनुष्याला आणून देते, ते शिक्षण होय’. UNESCO च्या मते, ‘जीवनाच्या सर्व व्यवहारांकरिता महत्त्वाचे असणारे ज्ञान, कौशल्य व जाणीव संक्रमित करणारे संघटित व सातत्याचे अध्यापन म्हणजे शिक्षण’.
शिक्षणाचे हेतूही विविध तऱ्हेने विशद करण्यात आलेले आहेत; मात्र हे हेतू वा उद्दिष्टे स्थलकालनिरपेक्ष नाहीत. त्याचप्रमाणे त्यांच्यावर शास्त्रे आणि तंत्रज्ञान यांच्या विकासाचा, तसेच मानसशास्त्रातील अध्ययन प्रक्रियेसंबंधीच्या संशोधनाचा परिणाम झालेला आहे. सुरुवातीपासूनच परंपरागत सामाजिक अनुभवांचा वारसा जतन करणे, समृद्ध करणे आणि तो नवीन पिढीला प्रदान करणे, हे शिक्षणाचे महत्त्वाचे ध्येय मानले जात असे; मात्र परंपरेची चाकोरी सोडून पुरोगामी ध्येयविचारांचा प्राचीन ग्रीसमध्ये उदय झाल्यानंतर शिक्षणाच्या उद्दिष्टांचा पुनर्विचार होऊ लागला. ग्रीकांनी सामाजिक स्थैर्य व व्यक्तिविकास ही शिक्षणाची उद्दिष्टे ठरविली. तसेच प्लेटो व ॲरिस्टॉटल यांनी आदर्श नागरिक तयार करणे, हे शिक्षणाचे ध्येय ठरविले. ग्रीक रोमन शिक्षणाची ध्येये धर्मनिरपेक्ष होती. त्यांतील नैतिकतेचे स्वरूप धार्मिक नसून सामाजिक होते. शैक्षणिक ध्येयविचारांमध्ये धार्मिक व आध्यात्मिक अंगांचा अंतर्भाव झाला. तो ज्यूडो – ख्रिश्चन धर्मपरंपरेच्या प्रभावामुळे. यामुळे शैक्षणिक ध्येयाने दोन दिशांनी वळण घेतले. एका दिशेने शिक्षणाचे ध्येय धर्मनिरपेक्ष ज्ञानप्राप्ती हे मानले गेले. दुसऱ्या बाजूला मनुष्यमात्रात बीजरूपाने प्रमुख ध्येय बनले. दहाव्या शतकानंतर व्यापार व उद्योगधंद्यांची वाढ होऊ लागल्यामुळे ग्रामीण सरंजामदार व मठाधिपती यांच्या अधिकारांस उतरती कळा लागली. पश्चिमी प्रबोधनकाळात नागरी जीवनाला महत्त्व येऊ लागले. त्यामुळे सुसंस्कृत व सभ्य माणूस बनविणे, हे शिक्षणाचे ध्येय बनले, मात्र याच काळात स्ट्रॅसबर्ग येथील एक शिक्षक जॉन स्टर्म यांनी शिक्षणाचे ध्येय विवेकशील धर्मनिष्ठा होय, असे प्रतिपादन केले. मार्टिन ल्यूथर (Martin Luther) यांनी सामाजिक सुव्यवस्था व कौटुंबिक जीवनाचे शिक्षण हेच शिक्षणाचे ध्येय असले पाहिजे, असे सांगितले. नंतरच्या काळात बेकन आणि कोमिनिअस यांनी अखिल ज्ञानप्राप्ती या शैक्षणिक ध्येयाचा पुरस्कार केला. जॉन लॉक यांनी असा विचार मांडला की, कोणत्याही विषयाचे परिपूर्ण ज्ञान होणे, हे शिक्षणाचे ध्येय नव्हेच; तर गरज पडेल तेव्हा कोणत्याही विषयातील ज्ञानार्जन करण्याची पात्रता निर्माण करणे, हे शिक्षणाचे ध्येय असले पाहिजे. लॉक यांनी आपल्या सम थॉट्स कन्सर्निंग एज्युकेशन या ग्रंथात सद्गुण हेच शिक्षणाचे ध्येय मानले. फ्रान्समधील महाजनशाहीने अठराव्या शतकात शैक्षणिक ध्येयवादाचा एक नवा आदर्श सादर केला. तो म्हणजे शूर, प्रतिष्ठित व सन्माननीय पुरुष हा होय. अठराव्या शतकात ज्या सामाजिक, राजकीय चळवळी जगभर झाल्या, त्यांचे प्रतिबिंब शैक्षणिक क्षेत्रांतही उमटले. मार्क्वी दे काँदॉर्से यांनी शैक्षणिक ध्येयांचे क्रमश: स्पष्टीकरण केले आहे. प्रथमत: शिक्षण म्हणजे सर्व मानवी प्राण्यांना आपापल्या गरजा तृप्त करण्याचे सामर्थ्य देणारे, कल्याणाची हमी देणारे, हक्कांची जाणीव करून देऊन त्यांचा उपभोग घ्यायला शिकविणारे, आपल्या जबाबदारीची जाणीव करून देऊन ती पार पाडण्याची क्षमता निर्माण करणारे साधन. दुसरे ध्येय व्यक्तिनिष्ठ होते. ते म्हणजे, प्रत्येकाला आपल्या व्यक्तिगत कौशल्यांचा विकास करण्याची संधी व सोय उपलब्ध करून देणे, ज्या सामाजिक कार्यात भाग घेण्याची इच्छा असेल, त्यासाठी आवश्यक पात्रता निर्माण करणे हे होय. तिसरे ध्येय हे सामाजिक होते. तो म्हणतो, ‘शैक्षणिक धोरणांचा दिशा अशा प्रकारे निश्चित करावी की, समाजोपयोगी काम करणारे लोक अधिक प्रमाणात निर्माण होतील’. काँदॉर्से यांनी ज्या क्रांतिकारक ध्येयांचा पुरस्कार केला, त्यांना रूसो यांनी शिक्षणाची राष्ट्रीय ध्येये म्हणूनही मान्यता दिली; मात्र रूसो यांच्या मनात शासन व समाज या दोहोंबद्दल मुळीच आदर नव्हता. त्यामुळे शिक्षणाच्या ध्येयाची मांडणी सामाजिक संदर्भात न करता व्यक्तिसंदर्भात करावी, असे त्यांचे मत होते. रूसो यांच्या विचारांनी प्रभावित झालेले पेस्टालोत्सी व फ्रबेल यांनी मुलांच्या सुप्त शक्तींचा विकास व तद्वारा समाजसुधारणा असे शिक्षणाचे ध्येय मांडले. हर्बर्ट स्पेन्सर यांचे म्हणणे असे की, ‘शिक्षणाने आत्मरक्षणाची कला शिकवावी, उपजीविकेचा मार्ग शिकवावा. मुलांचे पालनपोषण करायला आवश्यक असे ज्ञान देऊन वंशसातत्य कायम ठेवण्याचे शिक्षण द्यावे. सामाजिक-राजकीय कर्तव्ये पालन करण्याची तसेच संस्कृती, कला, साहित्य इत्यादींमधील सौंदर्याचा आस्वाद घेण्याची पात्रता निर्माण करावी. अमेरिकन कार्यवादी जॉन ड्यूई यांनी मात्र शैक्षणिक ध्येय त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असावे, असे मत मांडले. दुसऱ्या महायुद्धानंतर विचारशक्तीच्या विकासाचे ध्येय शैक्षणिक ध्येयात अंतर्भूत करण्यात आले; मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर वैज्ञानिक व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अध्ययन-अध्यापनाच्या साधनांत आमूलाग्र सुधारणा झाली असली, तरी शैक्षणिक ध्येयांच्या बाबतीत महत्त्वाचा बदल घडलेला नाही.
पाश्चात्य जगामध्ये दोन हजार वर्षांहून अधिक काळ कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शिक्षण सुरू आहे. त्यांचे काही कालखंड पडतात. ते म्हणजे प्राचीन काळ. मध्ययुगीन काळ, प्रबोधनाचा काळ, आधुनिक काळाची सुरुवात आणि अर्वाचीन काळ, प्राचीन काळात प्रामुख्याने ग्रीस व रोम येथील शिक्षण पद्धती आणि रोमचा पाडाव झाल्यानंतरची पद्धती यांचा समावेश होतो. ग्रीसमध्ये स्पार्टा आणि अथेन्स ही प्रमुख नगरराज्ये होती. स्पार्टामध्ये बलदंडशाही होती, तर अथेन्समध्ये लोकशाही. त्यात्या विचारांना धरूनच तेथील शिक्षणपद्धती होत्या. जन्मल्याबरोबर मूल सुदृढ आहे की नाही हे पाहूनच ते जिवंत ठेवायचे की नाही, याचा निर्णय स्पार्टामध्ये पंचमंडळी घेत असत. ते सुदृढ असल्यास आईने त्याचे पालन करायाचे, सातव्या वर्षी त्या मुलास इतर मुलांबरोबर सामुदायिक शिक्षणकेंद्रात पाठवायचे, तेथे सुमारे दहा वर्षे त्याला उत्तम सैनिक व नेतृत्व यांसंबंधीचे शिक्षण मिळायचे. अथेन्समध्ये लोकशाही असल्याने तेथे विचारस्वातंत्र्य होते; त्यामुळे शिक्षणातही विविधता होती. नव्या कल्पनांना वाव होता व पद्धतीमध्ये परिवर्तनीयता होती. ग्रीसने जगाला सॉक्रेटीस, प्लेटो, ॲरिस्टॉटल हे तत्त्वज्ञ; यूक्लिड हा गणिती, गेलेन हा वैद्य, आर्किमिडीज हा पदार्थवैज्ञानिक व त्यांच्यासारखे इतरही अनेक विद्वान दिले. टॉलेमी राजांनी ॲलेक्झांड्रिया येथे विद्यापीठ स्थापन केले आणि इ. स. चौथ्या शतकात त्याचा नाश होईपर्यंत त्या वेळेच्या जगात ग्रीसमधील ज्ञान पोहोचले. ग्रीकांच्या प्रगतीचा प्रभाव रोमच्या बलाढ्य राज्यावरही पडला. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात सुरू झाला आणि त्या शाळेच्या पहिल्या शिक्षकाचे नाव होते. स्पुरिअस कार्विलिअस सामान्यत: बाराव्या वर्षांपर्यंत मुलांना शाळा असे. त्यानंतर मात्र फक्त श्रीमंतांच्या मुलांचे शिक्षण चाले. वाङ्मय, व्याकरण हे विषय शिकवीत. त्यांच्या अभ्यासक्रमात इतिहास, भूगोल, धर्मशास्त्र यांनाही स्थान असे. रोमचा इतिहास १२ शतकांचा असला, तरी रोममध्ये प्लेटो यांच्या तोडीचे तत्त्वज्ञ उदयास आले नाहीत. रोमच्या पाडावानंतरच्या काळात मात्र सेंट टॉमस अक्वायूनस हे ख्रिस्ती धर्मगुरू प्लेटो यांच्या तोडीचा म्हणता येईल असे तत्त्वज्ञान सांगून गेला. सामान्यत: चौथ्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंतचा काळ हा मध्ययुगीन काळ समजण्यात येतो. या कालखंडात पूर्वीच्या ज्ञानाचे जतन झाले. सुरुवातीला बेनेडिक्ट यांनी जे शिक्षणकेंद्र सुरू केले, त्यात सहा तास काम, चार तास प्रार्थना आणि तीन तास धार्मिक ग्रंथांचे वाचन असा कार्यक्रम असे. हे ग्रंथ लॅटिन भाषेत असत. लॅटिन भाषेशिवाय व्याकरण आणि तर्कशास्त्र ही त्रयी यूरोपात अनेक शतके शैक्षणिक अभ्यासक्रमाचे अविभाज्य अंग होती. या कालखंडात बोईथिअस (इं. शी. ऑन द कन्सोलेशन ऑफ फिलॉसॉफी) ग्रंथ प्रसिद्ध झाला. तसेच या सुमारास व्याकरणाचे पहिले पाठ्यपुस्तक प्रसिद्ध झाले; मात्र असे असूनही सातव्या शतकाच्या सुरुवातीस ज्ञानार्जनास उतरती कळा लागली होती. जनजीवनात ख्रिश्चन धर्मगुरूंचा प्रभाव वाढत चालल्याने त्यांनी जुन्या अभिजात वाङ्मयावर टीका केली. एका बाजूस सरंजामशाही व दुसऱ्या बाजूस धर्मसत्तेचे वर्चस्व अशा कात्रीत जनता होती. शिक्षणात बलदंडपणा आणि दरबारी शिष्टाचार शिकण्याला महत्त्व आले. या कालखंडात इस्लामचा उदय झाला आणि अरबी ग्रंथांच्या लॅटिन भाषांतरास वाव मिळाला. त्यातून आरोग्यशास्त्राच्या ज्ञानाचा प्रसार झाला. मध्ययुगात समाजात धंदेशिक्षणासाठी कार्यशाळा सुरू झाल्या. इ. स. १११७ च्या सुमारास ऑक्सफर्ड येथे उच्चशिक्षणाची व्यवस्था सुरू झालेली असली, तरी जगातील पहिले विद्यापीठ नेपल्स येथे १२२४ मध्ये स्थापन झाले व हळूहळू यूरोपभर विद्यापीठे स्थापन झाली. पंधराव्या शतकापासून प्रबोधनाचा कालखंड सुरू झाला. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत पोपशासनाच्या सर्वंकष वर्चस्वास उतरती कळा लागली. शिक्षणातही व्याकरण, अंकगणित आणि लॅटिन यांच्याशिवाय इतरही काही अभ्यासक्रम असतो. याचा प्रत्यय आला. पंधराव्या शतकापासूनची पुढील तीन शतके नव्या ज्ञानाचे साक्षीदार आहेत. शिक्षणात विविध कला शिकवाव्यात, असा नवा विचार पुढे आला. या कालखंडात फ्रान्स आणि जर्मनीत शाळा सुरू झाल्या. अशी एक शाळा बॉर्दो येथील नागरिकांनी १५३४ मध्ये स्थापन केली. याच कालखंडात इरॅस्मस हा तत्त्ववेत्ता होऊन गेला. त्यांनी द प्रेझ ऑफ फॉली आणि Colloquia हे ग्रंथ लिहिले. त्यांचे शिक्षणविषयक विचार त्यांच्या लिबरल एज्युकेशन ऑफ चिल्ड्रेन या १५२९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात आढळतात. या ग्रंथात क्रीडन पद्धतीचा पुरस्कार केला आहे. त्या काळातील अभिजात शिक्षण देणारी जर्मन संस्था म्हणजे जिम्नॅशियम. हिचे स्वरूप तिच्या कॉलेज या फ्रेंच भावंडाप्रमाणेच होते. माफक शुल्क, लॅटिन आणि ग्रीक भाषांचे शिक्षण हे त्या वेळचे वैशिष्ट्य होते. जिम्नॅशियम ही संस्था आजही अस्तित्वात आहे. या शाळांतील अभ्यासक्रम १० वर्षांचा होता. १५१० ते १५१४ या काळात केंब्रिज विद्यापीठात इरॅस्मस यांना ग्रीक आणि लॅटिन भाषा शिकविण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. १५१० च्या लॅटिन भाषा शिकविण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. १५१० च्या सुमारास विल्यम लिली या इरॅस्मसयांना समकालीन शिक्षकाने लिलीज लॅटिन ग्रामर हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाची सुधारून वाढविलेली आवृत्ती १७५८ मध्ये ईटन लॅटिन ग्रामर या नावाने प्रसिद्ध झाली. पुढील शतकभर हे पुस्तक वापरले जात होते. त्याची अगदी अलीकडील आवृत्ती १९४५ मध्ये न्यूयॉर्क येथे प्रसिद्ध झाली. सामान्यत: असे म्हणता येते की, प्रबोधनकाळात पूर्वीचा पुस्तकीपणा, पाठांतरावर भर, कृत्रिमता यांचा लोप होऊन माणसाला शरीराबरोबर बुद्धी आणि भावना असतात, या विचारांना प्राधान्य मिळाले. हा ल्यूथर यांच्या शिकवणीतून सर्वसामान्य जनतेच्या शिक्षणाची जाणीव निर्माण झाली व त्यानुसार हॉलंड, स्कॉटलंड व जर्मनी येथे शाळा सुरू झाल्या. तत्कालीन परंपरागत पोपशासनाधीन शिक्षणाचा भर उच्चशिक्षणावर आणि धर्मोपदेशक निर्माण करण्यावर होता. १६४८ मध्ये दोन्ही पंथांमध्ये समेट झाला. दोघांनीही शिक्षणाविषयीची अतिरेकी भूमिका सोडून दिली. इ. स. १५४३ मध्ये कोपर्निकस यांनी दि रेव्होलूशन ऑफ हेवन्ली बॉडीज हा ग्रंथ लिहून विश्वाच्या केंद्रस्थानी सूर्य असतो आणि इतर ग्रह त्याच्या भोवती भ्रमण करतात, असे प्रतिपादन केले. बायबलच्या विरुद्ध मत मांडून कोपर्निकस यांनी नव्या विज्ञानयुगाची सुरुवात केली. पुढील काळात पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र इत्यादींत जे शोध लागले. त्यांनी शिक्षणाचा गाभाच बदलून गेला. भोवतालच्या परिसराची मुलांना सम्यक माहिती हवी, या उद्देशाने या शास्त्रांचा समावेश शिक्षणात झाला. सतराव्या शतकात जॉन मिल्टन, जॉन लॉक आणि कोमीनिअस इत्यादींच्या विचारांचा शिक्षणावर परिणाम झाला. कोमीनिअसच्या डायडॅक्टिक मॅग्ना या ग्रंथात अध्यापनशाखेची मांडणी होती. बालकाचे शिक्षण एकूण २४ वर्षे चालावे आणि प्रत्येक ६ वर्षांच्या शेवटी निश्चित उद्दिष्टापर्यंत त्याची प्रगती होऊन व्यक्ती चोविसाव्या वर्षी मिळवती नागरिक व्हावी, असे त्यांचे प्रतिपादन होते. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण, तर चौथ्या टप्प्यात व्यावसायिक शिक्षण अशी त्याची विभागणी होती. अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये बॉइल, कॅव्हेंडिश, न्यूटन इत्यादींनी लावलेल्या वैज्ञानिक शोधांमूळे समाजजीवनात आणि शिक्षणात परिवर्तन झाले. औद्योगिक क्रांतीचे आणि शिक्षणातील सुधारणांचे लोण यूरोपभर पसरले. अठराव्या शतकात रूसो, बेसडाऊ, पेस्टालोत्सी, हर्बर्ट स्पेन्सर, फ्रबेल, माँटेसरी इत्यादींच्या विचारांचा समाजावर परिणाम होऊन शिक्षण अधिक बालककेंद्री बनले. शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता पडू लागल्याने शिक्षक-प्रशिक्षणाच्या क्षेत्राचाही विकास झाला. पहिल्या महायुद्धानंतर यूरोपमध्ये जर्मनी, इटली आणि रशिया या देशांत हुकूमशाही राज्यव्यवस्थेमुळे शासनव्यवस्था सांगेल त्या प्रकारचे शिक्षण सुरू झाले; तर इंग्लंड, फ्रान्स यांसारख्या लोकशाही देशांनी शिक्षणाकडे शास्त्र या दृष्टीने अधिक लक्ष दिले. पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम, शिक्षक-प्रशिक्षण यांमध्ये आमुलाग्र सुधारणा झाल्या. दुसऱ्या महायुद्धामुळे मात्र यूरोप आणि आग्नेय आशिया बेचिराख झाला व तेथील संपूर्ण समाजव्यवस्थाच नव्याने उभारावी लागली. अमेरिकेच्या भूमीवर युद्ध झाले नसल्याने तुलनेने अमेरिकेत अधिक सुरक्षेचे वातावरण होते. त्यामुळे अवकाशविज्ञान, पर्यावरणशास्त्र, संगणकविज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स इत्यादींचा शिक्षणावर अनुकूल परिणाम झाला. अमेरिकेतील ही प्रगती विकसनशील देशांप्रमाणे विकसित देशांसाठी उपयोगी पडली. ब्रिटनमध्ये साध्या शाळा व विशेष शाळा (Grammar School) अशी विभागणी सतराव्या शतकापासूनच सुरू झाली. विशेष शाळा अधिक गुणवत्ता असलेल्यांसाठी असतात. अमेरिकेत आठवीमध्ये चांगल्या शाळांत प्रवेश मिळण्यासाठी सॅट १ आणि सॅट २ या परीक्षा द्याव्या लागतात. पदव्युत्तर शिक्षणासाठी GRE आणि अमेरिकेबाहेरील विद्यार्थ्यांसाठी रोफेल या परीक्षा द्याव्या लागतात. ब्रिटन व अमेरिकेतील या पद्धतींचे यूरोपातील व इतर देशांतील शिक्षणातही अनुकरण झाले आहे. सामान्यत: बारा वर्षांचे सर्वसाधारण शिक्षण व त्यानंतर तीन ते चार वर्षांचा पदवी-अभ्यासक्रम अशी रचना जगभर आढळते.
आज औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण, दूरशिक्षण, आंतरजालकावरील शिक्षण, संपर्कमाध्यमांद्वारे शिक्षण असे नवनवे प्रवाह शिक्षणात उपलब्ध आहेत. त्यांमध्ये सतत सुधारणा होत आहेत. विशेषीकरण आणि आंतर्विद्याशाखीय (Interdisciplinary) शिक्षणाने शिक्षणक्षेत्र अधिक समृद्ध झाले आहे.
भारतातील शिक्षण :
प्राचीन काळ : सामान्यत: इ. स. पू. २५०० पासून इ. स. १००० पर्यंतचा काळ प्राचीन काळ समजण्यात येतो. या प्रदीर्घ काळाचेही विविध कालखंड पाडलेले आढळतात. उदा., वेदकाळ, वेदोत्तर कालखंड, महाभारत-रामायण कालखंड, बुद्धकाळ इत्यादी, प्राचीन भारतातील शिक्षण प्राय: हिंदूंच्या धार्मिक चालीरीतींशी व संस्कृतीशी निगडित आहे. तत्कालीन जीवनपद्धती, मूल्यव्यवस्था व ज्ञानविषयक संकल्पना यांचा शिक्षणावर प्रभाव होता. शिक्षण ही प्राय: वैयक्तिक बाब होती. तत्कालीन शिक्षण यज्ञसंस्थेभोवती गुंफलेले होते. ऋग्वेदकाळात पाठांतराने वेदांचे जतन करणे, हाच शिक्षणाचा प्रमुख हेतू होता. तप:सामर्थ्य प्राप्त होणे, हा ज्ञानाचा परमोच्च बिंदू मानत असत. वैदिक काळातील शिक्षणातून संस्कृत भाषा, विचार, तत्त्वज्ञान आणि अध्ययनपद्धती यांचा विकास झाला. स्त्रिया आणि क्षत्रिय यांना शिक्षण उपलब्ध होते. ते अध्यापनही करू शकत. त्या काळात गुरुकुलाची पद्धत असून गुरुगृही शिक्षण होई. वयाच्या आठव्या वर्षापासून मुलांचे शिक्षण सुरू होई व ते सुमारे बारा वर्षे चाले. गुरुकुले किंवा ऋषींचे आश्रम सिंधू, गंगा, यमुना, गोमती इत्यादी नद्यांच्या काठाकाठाने मात्र मनुष्यवस्तीपासून दूर असत. त्या काळात गुरूंना आचार्य म्हणत. गुरुकुलातील प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांचा उपनयन विधी करण्यात येई. शिष्याने ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणे अपेक्षित असे. अध्ययनात स्वाध्यायाला महत्त्व असले, तरी गुरूची आवश्यकता असे. गुरुगृही आचार्य हेच विद्यार्थ्यांचे अध्यापक व पिता असत. विद्यार्थ्यांना बौद्धिक पातळीनुसार त्यांचा अध्ययनकाल कमी जास्त होत असे. विद्यार्थ्यांना शारिरिक कष्टाची घरकामे करावी लागत. त्या बाबतीत श्रीमंत-गरीब असा भेद नसे. तत्कालीन काही आचार्य फिरस्ते असत. गुरुकुलाप्रमाणे चर्चामंडळे (वादविवाद सभा) आणि परिषदा ही अध्यापनाची केंद्रे असत. परिषदा आणि चर्चा संस्कृत भाषेतून होत. शिवाय ठिकठिकाणी यज्ञ-यागही होत असत. बौद्ध धर्माच्या उदयानंतर अध्ययन-अध्यापनात सुसूत्र वाङ्मयाचा उपयोग होऊ लागला. शिक्षा, छंद, व्याकरण, निरुक्त, कल्प आणि ज्योतिष आदींचा त्यांत समावेश होता. सूत्रकाळ हा पाणिनीपासून सुरू होतो आणि पतंजलीबरोबर संपतो. पाणिनीच्या काळात गुरुकुल, उपनयन, पाठांतर या गोष्टी होत्याच. स्त्रियांना शिक्षण घेता येत असे. जे विद्यार्थी अभ्यासक्रम पुरा करू शकत नसत, ते मध्येच सोडून जात. आचार्य किंवा विद्यार्थी यांची परस्परांबद्दल तक्रार असल्यास दाद मागण्याची यंत्रणा होती. सूत्रकाळात शिक्षण तात्त्विक विषयांवर आधारित होते. रामायण-महाभारताच्या काळात मात्र धर्म आणि तत्त्वज्ञान यांबरोबरच बलोपासना, धनुर्विद्या, अस्त्रविद्या या क्षत्रियांना आवश्यक असणाऱ्या विषयांचा शिक्षणात समावेश होऊ लागला. तत्कालीन शिक्षणाची केंद्रे म्हणजे गुरुकुल, वेदिक संघ, परिषद, चरक आणि मठ, दक्षिण भारतात मंदिरांच्या आश्रयाने शिक्षणकेंद्रे चालत. इन्नाइरम येथे ३४० विद्यार्थी आणि ११ शिक्षक ३०० एकर जागेवरील केंद्रात अध्ययन-अध्यापन करीत असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. तिरुबोरायर येथेही असेच केंद्र होते. काही केंद्रांत वसतिगृहाबरोबर रुग्णालयाचीही सोय होती. विद्वानांच्या वास्तव्यामुळे काही गावांमध्येही अभ्यासकेंद्रे तयार झाली. म्हैसूरमधील असे एक केंद्र बेलगामे येथे होते. बुद्धकाळातील शिक्षण मठांतून दिले जाई. सर्व शिक्षणव्यवस्था भिक्षूंच्या हाती असे. निवासी शिक्षणाची व्यवस्था बिहारांमध्ये असे. त्यांत अनेक शिक्षक व विद्यार्थी असत. ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे या शिक्षणाचे वैशिष्ट्य होय. विद्यार्थ्यांना माधुकरी मागावी लागे. बौद्ध भिक्षू आजाऱ्यांची सेवा करत. अनेक विहार कोरीव लेण्यांत असत. अध्ययन-अध्यापन प्राय: मौखिक असे. चर्चा आणि प्रश्नोत्तरे या पद्धतींनी अध्यापन करीत. विहारांत कला आणि हस्तकौशल्यांचे शिक्षणही दिले जात असे. जे भिक्षू अध्यापनाचे कार्य करीत, त्यांच्या प्रशिक्षणाचीही सोय होती. शिकणाऱ्यांसाठी खेळ आणि व्यायाम यांची सोय होती. शिक्षणात स्त्रियांनाही स्थान होते. जातक कथांतून तत्कालीन शिक्षणव्यवस्थेची माहिती मिळते. त्या काळात तक्षशिला आणि नालंदा ही उच्च शिक्षणाची विद्यापीठे जगप्रसिद्ध होती. तेथे तत्त्वज्ञानापासून धनुर्विद्येपर्यंतचे सर्व विषय शिकविले जात. विद्यार्थ्यांना ऐच्छिक विषय निवडता येत. तक्षशिला विद्यापीठात औषधशास्त्र, कायदा आणि युद्धशास्त्र यांचे अभ्यासक्रम उपलब्ध होते. काशी येथे संगीताचे शिक्षण देणारे केंद्र होते. फाहियान (इ. स. पाचवे शतक), ह्यूएन्त्संग व इत्सिंग (इ. स. सातवे शतक) या चिनी प्रवाशांच्या वृत्तांतांतून तत्कालीन शिक्षणव्यवस्थेचे वर्णन आढळते. त्यानुसार पुरुषपुरा (पेशावर), कान्यकुब्ज (गंगेच्या काठी) इत्यादी ठिकाणी शिक्षणाची पीठे होती, असे दिसते. तसेच बौद्धांच्या शिक्षणकेंद्रांतून संस्कृतचे अध्ययन चालत असे. आयुर्वेद, लष्करी शिक्षण, कुटिरोद्योग, हस्तव्यवसाय, मूर्तिकला व इतर चौसष्ट कला यांचे शिक्षण त्या काळात उपलब्ध असल्याचे पुरावे कादंबरी, नेपथ्य योग इत्यादी ग्रंथांवरून मिळतात. बऱ्याच कौशल्यांचे शिक्षण कुटुंबातूनच वंशपरंपरेने मिळत असे. त्या काळापासूनच जातिव्यवस्था व जातिविशिष्ट व्यवसायकौशल्ये समाजात दृढ होऊ लागली.
प्राचीन भारतात विद्यापीठीय पातळीवरील केंद्रे तक्षशिला, नालंदा, वलभी, विक्रमशिला, जगद्दला, उदंडपुर, मिथिला, नाडिया इत्यादी ठिकाणी होती. त्यांतील वलभी वगळता उरलेली केंद्रे गंगेच्या तीरावर बिहार-बंगाल मध्ये होती. या विद्यापीठांना राजाश्रय होता. या विद्यापीठांत चांगल्या इमारती, भरपूर शिक्षक व विद्यार्थिसंख्या, देशाच्या सर्व भागांतून व परदेशांतूनही येणारे विद्यार्थी असत. विद्यापीठांत चांगली शिस्त पाळली जात असे. भाषा, न्यायशास्त्र, तत्त्वज्ञान, विविध कलाकौशल्ये यांचे शिक्षण या विद्यापीठांतून चाले. मुसलमानांची आक्रमणे सुरू झाल्यानंतर ही विद्यापीठे हळूहळू बंद पडत गेली.
आधुनिक काळ : आधुनिक काळात प्राथमिक शिक्षणाबाबत विविध कालखंडांत वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. १८५४-१९०२ या कालखंडात प्राथमिक शिक्षणाचा वेग मंद होता, कारण ते सक्तीचे नव्हते. त्याची जबाबदारी स्थानिक मंडळींकडे होती आणि त्यापूर्वी भारतात प्रचलित असलेल्या ‘तात्या पंतोजी’ शाळांकडे दुर्लक्ष होते; मात्र या कालखंडात प्राथमिक शाळांसाठी इमारती बांधण्यास सुरुवात झाली, मुली व दलितांना शाळांतून प्रवेश मिळू लागला. छापील पाठ्यपुस्तकांचा वापर सुरू झाला, अभ्यासक्रमात सुधारणा झाली. अध्यापनाच्या नव्या पद्धती अमलात आल्या आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणात सुधारणा झाली. १९०२-१९२१ या कालखंडात प्राथमिक शिक्षणासाठी अधिक निधी उपलब्ध होऊ लागला. बडोदा संस्थानात सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले, गोपाळ कृष्ण गोखल्यांनी संपूर्ण हिंदूस्थानमध्ये हे धोरण असावे, असा आग्रह धरला. त्या वेळच्या मुंबई राज्य सरकारने प्रथमच ‘Bombay Primary Education Act’ १९१८ साली मंजूर केला. १९२१-३७ या कालखंडात बहुतेक राज्यांत प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे, असे कायदे झाले. प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आली. १९२२-२७ या कालखंडात प्राथमिक शाळा व विद्यार्थी यांच्या संख्येत वाढ झाली. १९३७-४७ या कालखंडात बहुतेक राज्यांत काँग्रेस मंत्रिमंडळे आली. त्यांनी महात्मा गांधींच्या मूलोद्योग (Basic) शिक्षणाचा पुरस्कार केला. १९४७ सालानंतर देशाने ६-१४ वयाच्या सर्व मुलांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण असावे, अशी तरतूद संविधानात केली. शिक्षण हा बालकाचा मूलभूत हक्क आहे, असा घटनेत बदल केला. शिक्षक प्रशिक्षित असावेत असा आग्रह धरला आणि एक किलोमीटर अंतराच्या आत प्राथमिक शाळा उपलब्ध असली पाहिजे, अशी योजना केली. १९६८ व १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक शाळांत पुरेशा वर्गखोल्या, प्रशिक्षित शिक्षक आणि किमान शैक्षणिक साहित्य असावे, असे ठरविले. त्याप्रमाणे खडू-फळा योजनेत शाळांना अनुदान देण्यात आले. सध्या मुलांची नोंदणी ९८ टक्के असली, तरी गळती-नापासाचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत आहे आणि शिकून बाहेर पडणाऱ्या मुलांची गुणवत्ता समाधानकारक नाही. १९७२ मध्ये महाराष्ट्र राज्याने १० + २ + ३ हा आकृतिबंध स्वीकारल्यानंतर पहिले सात वर्ग प्राथमिक शिक्षण, ८-१० माध्यमिक व + २ उच्च माध्यमिक अशी विभागणी करण्यात आली. १८५४ पासून माध्यमिक शिक्षणाचा विकास पुढील तऱ्हेने होत गेला. १८५४ मध्ये वुडचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि १८५५-५६ मध्ये वेगवेगळ्या प्रांतांत शिक्षणसंचालनालये सुरू झाली. तसेच शिक्षणासाठी अनुदानाची पद्धत सुरू झाल्याने भारतीयांनी माध्यमिक शाळा उघडल्या. १८८२ साली नेमलेल्या शिक्षणआयोगाने या धोरणास पुष्टी दिली. १८५७ मध्ये मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे स्थापन झालेल्या विद्यापीठांनी Matriculation परीक्षा घेण्यास सुरुवात केली. १९०२-२१ या कालखंडात माध्यमिक शिक्षणाचा झपाट्याने विकास झाला. व्यावसायिक शिक्षण तितकेसे लोकप्रिय झाले नाही. माध्यमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी हेच राहिले. १९२१-३७ या कालखंडात माध्यमिक स्तरावर भारतीय भाषांचे शिक्षण सुरू झाले. १९३७-४७ या कालखंडात मातृभाषा हे माध्यमिक शिक्षणाचे माध्यम झाले. या कालखंडात शिक्षण-महाविद्यालयांची संख्या लक्षणीय वाटावी अशी वाढली. स्वातंत्र्य मिळाल्यावर १९५२ मध्ये भारत सरकारने देशातील माध्यमिक शिक्षणाचा विचार करण्यासाठी सेकंडरी एज्युकेशन कमिशन नेमले. या कमिशनने दहावीनंतर शालांत परीक्षा घ्यावी, + २ स्तर सुरू करावा, त्या स्तरावर व्यावसायिक शिक्षण द्यावे, बारावीनंतर आणखी सार्वजनिक परीक्षा असावी व पदवीअभ्यासक्रम ३ वर्षांचा असावा, अशा प्रमुख शिफारशी केल्या. १९६१ मध्ये राष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) स्थापन झाली. ही संस्था प्रामुख्याने शालेय स्तरावरील पाठ्यपुस्तकनिर्मिती, अभ्यासक्रम, प्रशिक्षण आणि मूल्यमापन यांत संशोधन करते. १९६४-६६ च्या कोठारी आयोगाच्या अहवालाप्रमाणे माध्यमिक स्तरावर समाजोपयोगी उत्पादक कार्य शिकविण्यात येऊ लागले. कार्यानुभवाचीही सुरुवात झाली. कोठारी आयोगाने त्रिभाषासूत्राचा पुरस्कार केला. उच्च-माध्यमिक वर्ग काही राज्यांत शाळांना, तर काही राज्यांत महाविद्यालयांना जोडलेले आहेत. १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार NCERTने माध्यमिक स्तरासाठी नवा अभ्यासक्रम प्रसृत केला. पूर्वीच्या मानाने आता शालेय स्तरावरील पाठ्यपुस्तके गुणवत्तेच्या दृष्टीने चांगली असतात; मात्र शहरातील शाळांतून प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची भरमसाट (७०-८० पर्यंत) संख्या, परीक्षेच्या वेळेस सर्रास चालणारे अपप्रकार, ढासळती गुणवत्ता आणि शिक्षणपद्धती व मुलांचे भवितव्य यांबाबत वाढीस लागलेली चिंता ही शालेय स्तरावरील प्रमुख दुखणी आहेत. १९८० नंतर मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमाकडे लोकांचा कल असल्याने समाजात इंग्रजी माध्यमाचे आणि मातृभाषा माध्यमाचे दोन वर्ग तयार झाले आहेत. देशभर माध्यमिक शिक्षणाचा भरपूर प्रसार झाला असला, तरी नर्मदेच्या उत्तरेकडील बहुतांश राज्यांत राज्यशासनाच्या शाळा आहेत, तर दक्षिणेकडील राज्यांत स्वयंसेवी संस्थांनी चालविलेल्या बहुतांश शाळा आहेत. भारतातील उच्चशिक्षणाची सुरुवात १८५७ साली स्थापन झालेल्या कलकत्ता, मुंबई व मद्रास विद्यापीठांपासून झाली. १८६० च्या कायद्यान्वये या विद्यापीठांना पदवी व पदविका देण्याची परवानगी मिळाली. १८८४ च्या कायद्यान्वये ही विद्यापीठे सन्माननीय पदव्या देऊ लागली. १९०२ मध्ये भारतीय विद्यापीठ आयोग नेमण्यात आला व १९०४ मध्ये भारतीय विद्यापीठ अधिनियम पास झाला.
या अधिनियमाने सुचविलेले बहुतेक बदल भारतीयांना आवडले नाहीत. १९१३ मध्ये भारत सरकारने विद्यापीठे स्थापून त्यांची संख्या ५ वरून १२ वर नेली. १९१७ साली नेमलेल्या कलकत्ता विद्यापीठ आयोगाने विद्यापीठ शिक्षणाबाबत बऱ्याच शिफारशी केल्या. शासनाचे विद्यापीठांना मिळणारे अनुदान वाढले आणि विद्यार्थिसंख्याही वाढली; मात्र औद्योगिक क्षेत्रास त्या संख्येचा फारसा उपयोग झाला नाही. १९२५ मध्ये Inter University Board स्थापन झाले. १९३७ – १९४७ या कालखंडात ४ नवीन विद्यापीठे आणि असंख्य महाविद्यालये स्थापन झाली. कृषी, तांत्रिक, वैद्यकीय आणि स्थापत्य क्षेत्रांतील विद्यार्थिसंख्या वाढली; मात्र ती देशाच्या गरजेच्या मानाने अपुरी होती. स्वातंत्र्योत्तर काळातील डॉ. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील १९४८ मध्ये विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना झाली. उच्च-शिक्षण क्षेत्रातील हा महत्त्वाचा निर्णय होता. या आयोगाच्या शिफारशीप्रमाणे विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली. यानंतर नवी विद्यापीठे, नवी महाविद्यालये मोठ्या प्रमाणात उघडली गेली. प्राध्यापकांनी Ph. D., निदान M. Phil असावे. त्यांच्या वेतनश्रेणी सुधाराव्यात, त्यांना भविष्य निर्वाह निधी व तत्सम फायदे मिळावेत, परीक्षा पद्धतीत सुधारणा व्हावी, स्वायत्त महाविद्यालये असावीत, अध्यापनाचा व व्यवस्थापनाचा दर्जा सुधारावा इत्यादी सूचना मधल्या काळात झाल्या. आजची स्थिती अशी आहे की, उच्चशिक्षण पूर्णपणे शासनाच्या नियंत्रणाखाली आहे. विद्यार्थिसंघटनांचा दबाव पूर्वीसारखाच आहे, प्राध्यापकांना नोकरीची शाश्वती वाटत नाही; तर मुलांना हे शिक्षण निरर्थक तर नाही ना, अशी धास्ती वाटते. कोणालाही उच्च-शिक्षणापासून समाधान नाही. मुले महाविद्यालयात असतात, पण वर्गात मात्र क्वचितच असतात. १९६८ व १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यापीठ पातळीवरील शिक्षणात फारसा बदल झाला नाही. १९५६ – १९५८ यांदरम्यान मुंबई, मद्रास व कानपूर येथे स्थापन झालेल्या तांत्रिक संस्थांनी या देशातील तांत्रिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. यातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खाते व इतर खात्यांत नोकऱ्या मिळत. १९०४ मध्ये देशात १२३ औद्योगिक शाळा होत्या. त्यानंतर काही वर्षे इंग्लंडला जाणाऱ्या भारतीयांना तांत्रिक शिक्षणासाठी १५० पौंडाची वार्षिक शिष्यवृत्ती मिळे; मात्र देशांतील तांत्रिक शिक्षणाची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने देशाच्या सर्वच भागांत अधिकाधिक महाविद्यालये उघडली. धनबाद, कानपूर आणि मुंबई येथे विशिष्ट शिक्षण देणाऱ्या संस्था उघडल्या. All India Council For Technical Educationची स्थापना ही महत्त्वपूर्ण गोष्ट ठरली. वाढत्या उद्योगधंद्यांमुळे आणि वाढत्या सेवाकार्यामुळे जेव्हा स्थापित महाविद्यालये कमी पडू लागली. तेव्हा काही राज्य सरकारांनी खाजगी संस्थांना अशी महाविद्यालये सुरू करण्याआधी परवानगी दिली. ही महाविद्यालये विना-अनुदान तत्त्वावरील होती. त्यांतून देशात शिक्षण-सम्राट निर्माण झाले. मनास येईल ती देणगी घेणे, अपुरा पगार, सेवाशाश्वतीचा अभाव आणि राजकीय पाठिंबा यांमुळे सर्व नसली तरी अनेक तांत्रिक महाविद्यालये ही काळजी करण्याची बाब आहे. जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या या दिवसांत या महाविद्यालयांना चांगले तात्त्विक कवचही मिळाले आहे. जानेवारी २००३ मध्ये या महाविद्यालयांनी जे नवे शुल्कदर प्रसिद्ध केले आहेत, ते पाहता फक्त श्रीमंत किंवा दलित यांनाच यापुढे तांत्रिक शिक्षण घेणे शक्य होणार आहे.
तांत्रिक शिक्षणाप्रमाणेच वैद्यकीय, कृषी, व्यवस्थापन, गृह-विज्ञान, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र या शिक्षणांचे बाबतीत पूर्वीच्या शासकीय महाविद्यालयांप्रमाणे आता मोठ्या प्रमाणावर विना-अनुदान तत्त्वावर शिक्षणाची सोय झाली आहे.
संगणकांनी शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रांत क्रांती घडविली आहे. संगणकशास्त्र, माहितीतंत्रज्ञान यांमुळे जग जवळ आले आहे आणि त्याचा फायदा शिकणाऱ्यांना होत आहे.
महाराष्ट्र आणि बंगाल येथे स्त्री-शिक्षणाची मेढ रोवली गेली. राजा राममोहन रॉय (Raja RamMohan Roy), ईश्वरचंद्र विद्यासागर (IshwarChandra Vidyasagar) या समाजसुधारकाचे प्रयत्न यामागे होते. महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (Mahatma Jyotirao Govindrao Phule), सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), धोंडे केशव कर्वे (Dhondo Keshav Karve) यांनी केलेले कार्य महान म्हणावे लागेल. स्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण पुरुषांच्या बरोबरीने आहेत. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (Shreemati Nathibai Damodar Thackersey Women’s University) याने घेतलेल्या पुढाकाराने देशात अनेक महाविद्यालयांत स्त्रियांना उपयुक्त असे विषय शिकविण्याची सोय झाली आहे.
भारतीयांकडे शिक्षणखाते आल्यापासून, म्हणजे १९२१ पासून, देशात प्रौढ-शिक्षणाची चळवळ सुरू झाली. १९७८ मध्ये राष्ट्रीय प्रौढशिक्षण कार्यक्रम या देशव्यापी कार्यक्रमानंतर साक्षरतेच्या प्रमाणात वाढ झाली. शासनाने राष्ट्रीय साक्षरता मिशन स्थापन करून प्रौढशिक्षणाकडे सतत लक्ष राहील, असा संकल्प केला आहे.
१९६८ चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर आणि बरेचसे अमलात आल्यानंतर (त्या धोरणाच्या मसुद्यात ५ वर्षांनी आढावा घ्यावा असे नमूद केले असले तरी) १६ वर्षे या धोरणाचे पुनरावलोकन करण्यात आले नव्हते. १९८४ साली राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी NCERT या संस्थेला देशातील शैक्षणिक परिस्थितीचे वस्तुनिष्ठ चित्रण करावयास सांगितले. त्या संस्थेने शैक्षणिक आव्हाने, एक वस्तुनिष्ठ आढावा अशी पुस्तिका प्रसिद्ध केली. ती देशभर प्रसृत करून लोकांच्या त्यावर प्रतिक्रिया मागविल्या व त्या आधारे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६’ हा मसुदा जाहीर केला. त्याचबरोबर या मसुद्यातील तरतुदी अंमलात कशा आणावयाच्या, याचा एक कृतिकार्यक्रम प्रसिद्ध केला. राजीव गांधींचे सरकार पडल्यानंतर पुढे आलेल्या सरकारने आपल्या ध्येयधोरणांनुसार शैक्षणिक धोरणात बदल करण्यासाठी आचार्य राममूर्ती यांची समिती नेमली. ज्या दिवशी आचार्यांनी आपला अहवाल सादर केला, त्याच दिवशा ते सरकारही पडले. त्यानंतर आलेल्या पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारने जनार्दन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करण्यासाठी एक समिती नेमली. त्या समितीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९९६ (१९९२ सालच्या बदलांसह) मध्ये प्रसिद्ध केले व त्या बदलानुसार कृतिकार्यक्रमही प्रसिद्ध केला. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी देशांत सामान्यत: या धोरणानुसारच शैक्षणिक पुनर्रचना सुरू आहे.
समीक्षक – कविता साळुंके
खूप छान