निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यामध्ये अनेक पदार्थ मिसळले जातात, उदा., जमिनीवर पोहोचण्यापूर्वी पावसाच्या पाण्यामध्ये हवेतील धूलिकण, जीवाणू, पराग आणि कार्बन डाय-ऑक्साइड व ऑक्सिजन ह्यांसारखे वायू मिसळतात. जमिनीवरून पाणी वाहत असताना तिच्यावर असणारे पदार्थ पाण्याबरोबर वाहत जातात. जमिनीमध्ये मुरणाऱ्या पाण्यामध्ये मातीमधील कार्बनी (सेंद्रिय) व अकार्बनी पदार्थ विरघळतात. थोडक्यात, पाण्याचा कोणताही वापर करण्यापूर्वी त्याच्यामध्ये अनेक पदार्थ मिसळतात, त्यांमध्ये भर पडते ती पाण्याच्या विविध वापरांमुळे. असे प्रदूषित पाणी शुद्ध केल्याशिवाय कोणत्याच कामासाठी वापरता येत नाही. पाणी कोणत्या मर्यादेपर्यंत शुद्ध करावे हे त्याच्या वापरावर अवलंबून असते; उदा., घरगुती वापरासाठी पाणी रंगहीन, वासहीन, चांगल्या चवीचे आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षित असले पाहिजे. औद्योगिक वापरासाठी पाण्यामध्ये उत्पादन यंत्रणेवर अनिष्ट परिणाम करणारे आणि तयार मालाची प्रत बिघडविणारे पदार्थ असता कामा नयेत. शेतीसाठी वापरण्याच्या पाण्यामध्ये मातीवर आणि पिकांवर दुष्परिणाम करणारे पदार्थ असता कामा नयेत. पृथ्वीवरील पाण्याचा एकूण साठा तिच्या जन्मापासून आजपर्यंत थोडासुद्धा वाढलेला नाही, उलट वाढती लोकसंख्या आणि तिच्या अनुषंगाने वाढते औद्योगिकीरण आणि सतत उंचावत जाणारे राहणीमान ह्यांमुळे पाण्याची मागणी एकसारखी वाढत आहे, पण त्याची उपलब्धता मात्र मर्यादित आहे. म्हणून एकदा वापरलेल्या पाण्याचे शुद्धीकरण, त्याचा काटकसरीने वापर करणे आणि त्याचा पुनर्वापर करणे हे क्रमप्राप्तच होते.
पृथ्वीवरील पाण्याची उपलब्धता : पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या ९७.१% पाणी समुद्रामध्ये आहे. जमिनीवरील (दोन्ही ध्रुवांवरील बर्फ, गोड्या आणि खाऱ्या पाण्याच्या सरोवरांमधील, झरे व नद्या ह्यांमधून वहाणारे) पाणी एकूण पाण्याच्या २.२८%, भूगर्भामधील पाणी ०.६२% आणि वातावरणातील बाष्परूपात असणारे पाणी ०.०००१% इतके असून दैनंदिन वापरासाठी आपण फक्त जमिनीवरचे आणि भूगर्भामधील पाणीच वापरू शकतो.
शुद्धीकरणाच्या पद्धती : शुद्धीकरणाच्या पद्धतींचे दोन मुख्य गट करता येतात.
- यामध्ये फक्त भौतिक प्रक्रियांचा वापर केला जातो. उदा., चाळणे (screening), निवळणे (settling), गाऴणे (filtration), मिश्रण करणे (mixing), गोठविणे (freezing), परासरण (osmosis), पृष्ठशोषण (adsorption), वायुविनिमय (gas transfer), आयनविनिमय (ion exchange), प्रति-आयनीभवन (deionization), कणसंकलन (flocculation).
- यामध्ये रासायनिक प्रक्रियांचा वापर केला जातो. उदा. सामू सुधार (pH correction), किलाटन (coagulation), ऑक्सिडीकरण (oxidation), उदासीकरण (reduction), विरंजन (bleaching).
जलशुद्धीकरणामध्ये फक्त भौतिक किंवा फक्त रासायनिक प्रक्रिया वापरून अपेक्षित गुणवत्तेचे पाणी मिळू शकत नाही, म्हणून ह्या दोन्ही पद्धतींचे योग्य ते एकत्रीकरण करून, त्यांचा योग्य क्रम लावून शुद्धीकरणाचा आराखडा तयार केला जातो. प्रसंगी एखादा मार्गदर्शी प्रकल्प (pilot plant) चालवून प्रस्तावित शुद्धीकरण पद्धतीची परिणामकारकता पडताळून पहावी लागते.
वरील दोन गटांमधील कोणत्या प्रक्रिया शुद्धीकरणासाठी वापराव्यात हे पुढील माहितीचा उपयोग करून ठरविता येते.
पाण्याचा स्रोत : (अ) नदीतील किंवा कालव्यातील वाहते पाणी, (आ) बंधारा किंवा धरण बांधून अडविलेले पाणी, (इ) नैसर्गिक तळ्यामधील पाणी, (ई) भूगर्भातील पाणी.
पाण्याची उपलब्धता : पूर्णपणे पावसावर अवलंबून असते.
पाण्याची गुणवत्ता : वरील स्रोतांची गुणवत्ता अनुक्रमे पुढीलप्रमाणे बदलते.
- ऋतूमानाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर बदलते.
- गढूळपणा कमी असला तरी सूर्यप्रकाश आणि पाण्यामध्ये सेंद्रिय पदार्थ असल्यास प्रकाशसंश्लेषण (photosynthesis) होऊन शेवाळाची वाढ होते, त्यामुळे गुणवत्ता बदलते.
- गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर बदलत नाही.
- भूगर्भातील पाणी उथळ किंवा खोल विंधण विहिरीमधील निलंबित (suspended) घनपदार्थांचे प्रमाण खूप कमी असते, परंतु विरघळलेल्या (dissolved) पदार्थांचे प्रमाण जास्त असते. ऋतुमानानुसार गुणवत्तेमध्ये फार फरक पडत नाही.
शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर : (अ) घरगुती वापर : पिणे, अन्न शिजविणे, कपडे धुणे, प्रसाधन गृहामध्ये, अग्निशमन इ.
(आ) औद्योगिक वापर : कच्चा माल म्हणून, विद्रावक म्हणून, वाफ उत्पन्न करण्यासाठी, यंत्रे थंड ठेवण्यासाठी, बागकामासाठी, अग्निशमन, कारखान्यांमधील उपहारगृहे व स्वच्छतागृहे ह्यांमध्ये, कच्चा माल वाहून नेण्यासाठी, औद्योगिक अपशिष्टे वाहून नेण्यासाठी इ.
(इ) शेतीसाठी वापर : धान्य पिकवणे, फळभाज्या पिकवण्यासाठी, चारा उगवण्यासाठी, हरितगृहांसाठी इ.
(ई) मनोरंजनासाठी वापर : सार्वजनिक उद्याने, जलतरण तलाव, जलउद्याने(water parks) मध्ये.
शुद्धीकरणाच्या विविध प्रक्रियांमुळे उत्पन्न होणारे सांडपाणी आणि गाळ : (अ) गढूळता कमी करण्यासाठी निवळण आणि गाळणे ह्या प्रक्रियांमुळे अनुक्रमे गाळ (साधा किंवा रसायनमिश्रित) आणि गाळणी धुवून काढण्यासाठी वापरलेले पाणी.
(आ) आयन विनिमय आणि निरायनीकरण केल्यामुळे निष्प्रभ झालेल्या आयनांचे पुनरुज्जीवन (regeneration) करण्यासाठी वापरलेले रसायनयुक्त पाणी.
(इ) विरुद्ध परासरण (Reverse Osmosis) केल्यामुळे पाण्यामधून निघालेले क्षारयुक्त पाणी.
(ई) शुद्धीकरण केंद्रामधील प्रयोगशाळेतून बाहेर पडणारे रसायनयुक्त पाणी.