मराठी विश्वकोशातील नोंदींचे अद्ययावतीकरण करताना जुनी नोंदी अद्ययावत स्वरूपात लिहिल्यानंतर किंवा पूर्णपणे नवी नोंद लिहिल्यानंतर तिचं भाषासंपादन करण्यासाठी पुढील बाबींची माहिती असण आवश्यक आहे

भाषासंपादन म्हणजे काय ?

लेखकाला त्याच्या आशयातून वाचकाला जे सांगायचं आहे, तेच लेखकाच्या आशयातून वाचकापर्यंत पोहोचतंय ना हे तपासणं; आणि ते तसं पोहोचण्यात काही बाधा येत असेल, तर ती दूर करणं म्हणजे संपादन करणं. संबंधित पुस्तकाचा वाचकवर्ग डोळ्यांपुढे ठेवून त्या वर्गातल्या सर्वसामान्य वाचकालाही तो विषय वाचल्यानंतर चटकन समजेल अशा पद्धतीनी तो त्याच्यासमोर जाण्यासाठी पुस्तकातल्या भाषेचा तांत्रिक किंवा निश्चित अर्थाच्या दृष्टीने केलेला विचार आणि त्या विचारातून त्या पुस्तकात केलेले भाषिक बदल म्हणजे भाषासंपादन.

भाषासंपादनात भाषेच्या व्याकरणाबरोबरच वाक्यरचनेतल्या शब्दांचा क्रम चुकल्यास होणारा गोंधळ लक्षात घेऊन तो गोंधळ टाळून निःसंदिग्ध वाक्यरचना करावी लागते. तसेच लिहिण्याच्या ओघात कधीकधी काळ, लिंग, वचन या बाबींमध्येही बऱ्याचदा लेखकाचा गोंधळ होत असतो. कधी क्रियाविशेषण अव्ययाची जागा चुकते, तर कधी नाम-सर्वनामाच्या वापरात गोंधळ होतो. कधी औपचारिक-अनौपचारिक भाषेची सरमिसळ होते. कधी एकाच अर्थाच्या विशेषणांची द्विरुक्ती होते. कधी विभक्तिप्रत्यय, क्रियापदाचं आवश्यक रूप आणि संबंधित नामाचं किंवा सर्वनामाचं आवश्यक रूप ह्यांचा मेळ बसत नाही. कधी भलत्याच विभक्तीचा वापर केला जातो. कधी प्रथमपुरुष, द्वितीयपुरुष आणि तृतीयपुरुष यांच्या वापराबाबतीत एकवाक्यता राहत नाही. सर्वनामाच्या वापराच्या वेळी हा गोंधळ जास्त प्रमाणात होतो. कधी एकाच घटनेचं वर्णन करताना दोन वेगवेगळे काळ वापरले गेलेले दिसतात, त्यामुळे वाचकाचा गोंधळ होण्याची शक्यता असते. अशा वेळी लेखकाशी बोलून कोणत्यातरी एकाच काळाची निवड करावी लागते. कधी दर्शक सर्वनामाचा वापर न केल्यामुळे गोंधळ होतो.

कधी मथळ्यांत, उपमथळ्यांत आणि त्यांच्या अंतर्गत मजकुरात किंवा आशयात एकवाक्यता, सुसूत्रता नसते. चित्रं-छायाचित्रं, नकाशे, तक्ते, वंशवृक्ष, आकृत्या, तळटीपा, संदर्भसूची, मुद्देमांडणी या सगळ्यांचा मुख्य आशयाशी असणारा संबंध लक्षात घेऊन दोन्हीकडच्या मजकुरांमधली सुसंगती तपासावी लागते. चोखंदळ पद्धतीनी भाषिक संपादन करताना आशयाच्या बाबतीत यथोचित शंका उपस्थित होतातच. लेखकाकडून त्यांचं निरसन करून घ्यावं लागतं. त्याचबरोबर मजकुराच्या आकलनात अडथळे आणणारे वाक्यरचनेतले दोष लेखकाच्या शैलीला धक्का न लावता योग्य बदल करून दुरुस्त करावे लागतात.

गोंधळात पाडणाऱ्या वाक्यरचनेमुळे कधी अनेक विनोद घडतात, कधी अनपेक्षित अर्थ निर्माण होतात, तर कधी संपूर्ण वाक्यं अनाकलनीय होतं. भाषिक संपादन झालं नाही, तर वाचकाला मजकुराचं आकलन होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो आणि त्यामुळे ते लेखन कंटाळवाणं, रटाळ वाटू शकतं. आशय कितीही चांगला असला, तरी तो जर साध्या-सरळ भाषेत वाचकापर्यंत पोहोचला नाही, तर वाचक ते लेखन वाचत नाहीत; नाकारतात. असं होऊ नये असं वाटत असेल, तर भाषिक संपादन गरजेचं आहे.

वाक्यरचनेत कंसांचा वापर केला असल्यास त्याची गरज तपासून कंस काढून वाक्याची फेररचना करावी लागते. वाक्यरचनेमध्ये कंसांचा वापर शक्यतो टाळायचा असतो. कारण सलग आणि ओघवतं वाचन करून वाक्यार्थाचं आकलन करून घेण्यात कंस अडथळा निर्माण करतात. कंसांतील मजकुराची नितांत आवश्यकता असेलच, तर कंसाबाहेरचा मजकूर आणि कंसांतला मजकूर ह्यांच्या बांधणीची योग्य सांगड घातली आहे का हे तपासून ती तशी नसल्यास दुरुस्त करावी लागते. मराठी मजकुराच्या स्पष्टीकरणासाठी कंसांत इंग्लिश मजकूर घातला असेल, तर मराठी मजकूर आणि इंग्लिश मजकूर ह्यांच्या बांधणीची योग्य सांगड घातली आहे का हे तपासून ती तशी नसल्यास दुरुस्त करावी लागते.

‘की आणि स्वल्पविराम’ ह्यांचा वापरही तपासून घ्यावा लागतो. ‘की’च्या आधी स्वल्पविराम, ‘की’च्या नंतर स्वल्पविराम, आणि ‘की’च्या मागेपुढे स्वल्पविराम येणारच नाही; अशा तीन बाबींचा विचार ह्या संदर्भात करावा लागतो. ‘आणि’च्या आधी स्वल्पविराम कधीच येणार नाही अशी सर्वसाधारण समजूत असते किंवा असं अयोग्य शिक्षण मिळालेलं असतं. प्रत्यक्षात मात्र काही ठिकाणी ‘आणि’च्या आधी स्वल्पविराम किंवा अर्धविराम नितांत गरजेचा असतो. आवश्यक तिथे ही दुरुस्ती करावी लागते.

‘हे आपण मागे पाहिले’ किंवा ‘हे आपण पुढे पाहणार आहोत’ असे उल्लेख येतील, तेव्हा मागचापुढचा संदर्भ तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्या लागतात. ह्यांशिवाय; पद्यरचना, कोष्टके, विशेषनामे, मांडणीचे धोरण अशा काही संकीर्ण परंतु महत्त्वाच्या बाबींना अनुसरून आवश्यक त्या दुरुस्त्याही कराव्या लागतात. अशा रीतीने ‘भाषासंपादन’ ही बाब एवढी विस्तृत आहे.

लेखकानी लिहिलेला कोणत्याही प्रकारचा मजकूर जेव्हा सार्वजनिक पातळीवर वाचकांसमोर जाणार असतो, तेव्हा हे लेखन सर्वांत आधी वाचकांसाठी आहे असं गृहीत धरून त्यात आवश्यक बदल केले गेले पाहिजेत. या बाबतीत भाषासंपादकानी वाचकाच्या सोयीचा विचार करून आवश्यक असणारे सर्व शक्य बदल करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. समृद्ध भाषेच्या दृष्टिकोणातून जे बदल करणं गरजेचं आहे, ते बदल आणि त्या बदलांमागची भाषा-संपादकाची भूमिका या दोन्ही गोष्टी भाषासंपादकानी लेखकापर्यंत पोहोचवल्याच पाहिजेत. त्यानंतर लेखक आणि भाषासंपादक ह्यांनी एकत्रितरीत्या विचार करून योग्य आशय समृद्ध भाषेत वाचकांसमोर कसा जाईल ह्याचा विचार करून लेखनात अंतिम बदल केले, तर ते लेखन ओघवतं आणि सहज समजणारं झाल्यामुळे प्रसंगी किचकट किंवा गंभीर विषयसुद्धा वाचक आवडीनी वाचतात.

भाषासंपादक हा वाचकांचा प्रतिनिधी, लेखकाचा मित्र आणि भाषेचा रक्षणकर्ता असला पाहिजे.

भाषासंपादनाची गरज का भासते?

‘भाषासंपादन’ करताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात हे आपण वर पाहिलं. ह्या बाबींमधल्या क्वचितच काही बाबींचं शिक्षण आपल्याला क्वचितच आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात मिळतं. त्यामुळे नोंदलेखन करताना नोंदलेखकाकडून ह्यातल्या अनेक बाबी अयोग्य पद्धतीनी लिहिलेल्या असण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे, लिहिण्याचा वेग आणि नोंद लिहिताना डोक्यात येणाऱ्या विचारांचा वेग ह्यांच्यात बरीच तफावत राहत असल्यामुळे काही ठिकाणी अनवधानानी काही गोष्टींमध्ये चुका होतात. ह्या सर्व चुका दुरुस्त करण्यासाठी भाषासंपादनाची गरज असते.

भाषासंपादनाचं ज्ञान कुठून आणि कसं मिळवायचं?

हे ज्ञान मिळवण्यासाठी खरं तर भाषासंपादनकौशल्याचा वर्ग करणं आवश्यक आहे. परंतु असा वर्ग कोणत्याही शिक्षणक्रमांतर्गत भरवला जात नाही. त्यामुळे निवडक संपादकांसाठी असा वर्ग विश्वकोश मंडळातर्फे भरवला जाईल. परंतु त्यासाठी इच्छुकांनी काही प्राथमिक ज्ञान मिळवून नंतर विश्वकोश मंडळातर्फे घेतली जाणारी एक छोटी प्रवेशपरीक्षा देणे आवश्यक आहे. हे प्राथमिक ज्ञान मिळवण्यासाठी इच्छुकांनी पुढील संदर्भपुस्तकांचा अभ्यास करावा – १) शुद्धलेखन मार्गप्रदीप, अरुण फडके, अंकुर प्रकाशन, ठाणे. २) शुद्धलेखन ठेवा खिशात, अरुण फडके, अंकुर प्रकाशन, ठाणे. ३) शुद्धलेखन नियमावली, भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई – ही तिसरी पुस्तिका ‘शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई इथे किंवा ‘शासकीय फोटोझिंको मुद्रणालय, पुणे इथे उपलब्ध होऊ शकेल.