ज्ञानकोश म्हणजे काय ?
प्रथम कोशवाङ्मयाचा प्रकार लक्षात घेणे आवश्यक आहे. कोशवाङ्मयात याचे दोन प्रकार पडतात. एक, सर्वसाधारण ज्ञानकोश/विश्वकोश आणि दोन, विषयाचे ज्ञानकोश. सर्वसाधारण ज्ञानकोशाचे वाचक हे सर्वसाधारण वाचक / अभ्यासक असल्याने त्यातील नोंदींचे लेखन आणि त्या लेखनासाठी वापरण्यात आलेली संदर्भसाधने, त्या संदर्भसाधनातील वापरलेली माहिती देताना ‘सर्वसाधारण’ हा निकष अत्यंत महत्त्वाचा ठरतो. वाचकांच्या ज्ञानाला भर देताना येत नाही. मात्र, विषयाच्या ज्ञानकोशाचा वापर त्या त्या विषयाचे तज्ञ/जाणकार/अभ्यासक करणार असल्याने त्या नोंदीच्या लेखनासाठी वापरण्यात येणारी संदर्भसाधने शास्त्रीय, अवघड संकल्पनायुक्त अशी असणार हे नोंदलेखक व उपभोक्ता या दोघांनी गृहीत धरलेले असते. त्यामुळेच सर्वसाधारण ज्ञानकोशात ज्या विषयाच्या तांत्रिक नोंदी येतात, त्यांची पातळी ही विशिष्ट विषयाच्या कोशातील नोंदीपेक्षा सोपी, कोणाही वाचकाला समजून घेण्यास अवघड नसणारी, व्याख्या, संकल्पना, क्लिष्ट आकृत्या, ओळख, सांख्यिकी अशा जड तांत्रिक माहितीने युक्त नसलेली पण सोप्या तंत्राचा वापर केलेली माहिती, सुस्पष्ट, सोप्या भाषेचा वापर केलेली तरीही शास्त्रीय पाया ढळू न देणारी अशी नोंद असणे अपेक्षित असते.
मराठी विश्वकोश हा सर्वसाधारण ज्ञानकोश आहे. त्यामुळे त्यातील शास्त्रीय, तांत्रिक नोंदीसह सर्वच नोंदीच्या लेखनाला व त्या लेखनासाठी मिळवलेल्या संदर्भ साहित्याची निवड करताना नोंद लेखकाला सदर भान राखावे लागते.
लेखन प्रकार –
संदर्भ साधनांचे प्रकार समजण्यापूर्वी लेखनाचे स्वरूप व त्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे.
एखादया विषयासाठी वाचकाला कोणती लेखन साधने उपलब्ध असतात ? पुस्तिकेपासून ग्रंथापर्यंत आणि लेखापासून प्रबंधापर्यंत अनेक लेखन साहित्य अवतीभोवती उपलब्ध असताना, वाचकाचे ज्ञानकोशाच्या नोंदीचा लेखन प्रकार का निवडावा, असा प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवा. जी नोंद मी लिहिणार आहे, तिला पर्यायी लेखनसाहित्य उपलब्ध असेल तर त्या वाचकाने ती नोंद का पहावी ? का वापरावी ? तर त्याचे उत्तर असे आहे की, ज्ञानकोशाची नोंद त्या विषयाची सर्व व्याप्ती लक्षात घेउन वाचकाला थोडक्यात त्याचे स्वरूप विशद करुन सांगा. एखादा ग्रंथ वाचून एखादा विषय समजून घेण्याऐवजी नोंद वाचून तो विषय, व्यक्ती, घटना, इतिहास त्या वाचकाला पटकन लक्षात घेता यायला हवा, असे नोंदीचे स्वरूप असणे अपेक्षित आहे, हा सारांश असता कामा नये, तो लेखही असता कामा नये वा ते टिपणही असू नये. नोंदीला आराखडा असतो, रचनाशास्त्र असते व त्याचे स्वरूप नोंदीच्या प्रकारावरुन बदलत जाते, परंतु नोंदीच्या लेखन गुणाचे वैशिष्ट्य हे इतर लेखन प्रचारापेक्षा भिन्न व अनन्य असते. हे भिन्नत्व लक्षात घेतले तर त्याच्या लेखनासाठी मिळवावी लागणारी माहिती व त्याचे स्रोत विविध असतात व ते वापरावेही लागतात.
माहितीचे विविध स्त्रोत –
कोणतेही लेखन करताना लेखकाला विविध प्रचरची माहिती जमा करावी लागते. व त्याचे विविध स्रोत उपलब्ध असतात. ते कोणते ? लेख, लेखांक, स्तंभलेखन, पुस्तिका, ग्रंथ, खंडात्मक ग्रंथ, प्रबंध, संदर्भसाधने उदा- कोश, शब्दकोश, चरित्रकोश, भौगोलिक साधने, वार्षिके, सूची वाङ्मय इत्यादी. या छापील साधनांच्या बरोबर ग्रंथेतर साहित्यही उपयुक्त ठरते. उदा- हस्तलिखिते, दैनंदिनी, अप्रकाशित/संग्रहित साहित्य, पत्रव्यवहार, प्रबंध, पत्रके, जाहिरनामे आणि संगणकीय साधने उदा- इंटरनेट, वेब, ब्लॉग, फेसबुक, मेल इत्यादी किंवा सीडी रॅम, ध्वनी फित/चित्रफित, दूरदर्शन वरील कार्यक्रम, युध्द वरीलसाहित्य, ई-बुक्स, ईजर्नल्स इत्यादी. तसेच शासकीय अभिलेखागारातील साधने, दप्तरखाने, वखरी, स्तभांचे वृत्तांत, छायाचित्रांचा संग्रह, कात्रणे, वस्तुसंग्रहालये, व्यक्तिगत संग्रह इत्यादी साधनांचाही लेखकाला वापर करावा लागतो. मौखिक साधनेही असतात. उदा- मुलाखती. लेखन करताना लेखनाच्या स्वरूपावरुन, खोली, उंची लांबी, व्याप्ती यांवरुन संदर्भसाधनांची निवड लेखकाला करावी लागते.
साधनांचा उपयोग –
ज्ञानकोशाच्या नोंदलेखकावर तर एक फार मोठीच जबाबदारी असते. कमी जागेत, विशिष्ट आकृती-रचना बंधात नोंदलेखकाला नोंद करावी लागते. लेख किंवा पुस्तकाची व्याप्ती, रचना व आकार आणि त्यासाठी लागणारी साधने यांचे स्वरूप व कोशाच्या नोंदीसाठी लागणारी साधने यात फरक पडतो. आकृत्या, रेखाटने, कोष्टके, तक्ते, आलेख, चित्रे, छायाचित्रे यांचा उपयोग केल्याने विषय अचूक व नेमका व कमी शब्दात व्यक्त करता येतो/होतो. ही साधने वाचकांशी थेट संवाद साधू शकतात. मात्र विषयांच्या विवेचनासाठी वापरायची साधने, तंत्रे नोंदीसाठी आवश्यक ठरतातच असे नाही. उदा- तळटिपा, संदर्भ टिपा देणे ही पुस्तकाची व एखादया संशोधनपर लेखाची मूलभूत गरज असते. मात्र नोंदीत टिपा/तळटिपा/संदर्भ टिपा देणे शक्य नसते. वा उचितही ठरत नाही. विषयाच्या विवेचनात येणारी ‘अवतरणे’ यांना जे संदर्भ दिले जातात ते पुस्तकात / लेखात तळाशी किंवा प्रकरणाच्या शेवटी वा टिपांच्या शेवटी दिले जातात. कोशाच्या नोंदीत असे संदर्भ देणे शक्य नसते, त्यामुळे अवतरणे व त्याचे संदर्भ विषय विवेचनातच, त्यांचा वाचताना अडथळा येणार नाही, असे चपखलपणे बसवावे लागतात. तो शैलीचाच एक भाग असावा लागतो. कोशाच्या नोंदीत तळाशी निवडक संदर्भ सूची देण्याची पध्दत असते. ही मात्र अगदी अत्यावश्यक असते. या संदर्भसूचीचा उपयोग वाचकाने त्या विषयाचे खोलात वाचन करावयाचे ठरविले तर त्याने कोणती पुस्तके वापरावित याचे त्याला मार्गदर्शन व्हावे. यादृष्टिने ही निवडक सूची दिलेली असते. या सूचीतल्या नोंदी करताना त्यातील लेख व ग्रंथ नवे, अद्ययावत असावेत.
साधनांची निवड आणि काळजी –
कोशातील नोंद लिहिताना साधनांची निवड कशी करावी याचे तंत्र विकसित झालेले आहे.
नोंद लेखक ज्या विषयावरची नोंद लिहिणार आहे, त्या विषयातला तज्ञ आहे, त्याचा त्या क्षेत्रातला दीर्घानुभव लक्षात घेऊनच नोंदलेखक ठरविला जातो. त्याने त्या विषयाचा आवाका, त्यात निर्माण झालेले नवे नवे संशोधन, त्यावर झालेले वाद-विवाद, चर्चा, मतांतरे यांचा सर्व बाजूंनी विचार करुन नोंद लिहिणे आवश्यक असते, परंतु त्यात स्वत:ची मते लिहिण्याऐवजी अधिककृतता, विश्वसनियता, अद्ययावतपणा, ताजेपणा आणि सर्वस्पर्शी व्यापकता असायला हवी. अर्थात हे सर्व निर्माण होण्यासाठी संदर्भ साधनेच उपयोगात आणायला हवीत. त्यासाठी नोंदलेखक कोणत्या स्वरूपाची नोंद लिहित आहे याची लेखकाला जाण असायला हवी. उदा:-
१) सुधारीत नोंद – पूर्वीच कोशात आलेल्या नोंदीचे सुधारीत लेखन केले जाणार असेल तर संपादन शास्त्रासह नवीन माहितीची भर टाकणे गरजेचे असते. यासाठी एखादा संशोधनपर लेख, ग्रंथ, पुस्तिका, प्रबंध उपयुक्त ठरू शकतो. किंवा ज्याने नवीन भर टाकली असेल त्याची मुलाखतही उपयुक्त ठरु शकते. किंवा इंग्रजी भाषेतील एखाद्या विषयाच्या कोशातील नोंद ही उपयुक्त ठरु शकते.
२) भाषांतरित नोंद – काही वेळा इंग्रजी कोशातील नोंद किंवा एखादा लेख इतका चपखल असतो की, त्याच्या विश्वसनियतेची, अद्ययावतपणाची खात्री करून, स्वामीत्वाची काळजी घेऊन, त्यावर सदर नोंद या संदर्भ साधनावरून भाषांतर रूपात तयार करणे सहज साध्य होते.
३) नव्याने लिहावयाची नोंद – कोशामध्ये दर नव्या आवृत्तीला काही नव्या नोंदींची भर नेहमीच होत असते. अशा नव्या नोंदी कोशासाठी नव्या असल्या तरीही संदर्भ साधण्याच्या दृष्टिने अगदी नवख्या नसतात. त्या विषयावर जगभर संशोधन / लेखनाचे कार्य सूरुच असते. त्या संदर्भ साधनाचा शोध घेणे अत्यावश्यक असते. लेखसूची, निर्देशसूची, सारसूची अशा सूचींमधून विविध विषयांच्या नोंदीचे तपशील मिळवता येतात. असे तपशील प्राप्त झाल्यावर त्या लेखाची / पुस्तकाची / प्रबंधाची पूर्ण प्रत (fulltext) मिळवता येते.
४) आकडेवारीची भर – काही नोंदीमध्ये केवळ आकडेवारीचा तपशील बदलतो. उदा – वाढीव लोकसंख्या दर मागणी उत्पन्न, आवक-जावक, उत्पन्नाचा दर, रोजगारीची संख्या, बेकारीची संख्या इत्यादी. नोंदीतील सांख्यिकी तपशील, भौगोलिक तपशीलाची भर टाकावी लागते. अशा वेळी सांख्यिकीय माहिती देणारी साधने (उदा- Tata Mcgrawhill ची डायरी, yearbooks इत्यादी ) भौगोलिक कोश उपयुक्त ठरतात.
५) ग्रंथेत्तर प्रकारातील नोंद – मुद्रित वा अमुद्रित स्वरूपाची नोंदीची रचना वेगळया पध्दतीची असते. मल्टिमिडीयाचा वापर, हायपर लींक तंत्राचा आधार इत्यादी तांत्रिक बाजूनी युक्त अशा नोंदीचे लेखन व त्या लेखनासाठी लागणारी संदर्भसाधने यांचे स्वरूप त्याच्या तंत्रानुसार बदलत जाते. त्या नोंदीसुध्दा संदर्भसाधनांचा वापर मुद्रित नोंदीसारखा करावा लागतो, हे विसरुन चालत नाही.
काही संदर्भ साधनांची तोंडओळख
१. लेख – नियतकालिकात प्रसिद्ध होणारा लेख / लेखमाला नोंद लिहिताना महत्वाचे साधन ठरते, कारण नियतकालिकातून चालू घटना, घडामोडी, चळवळी, संशोधन, शोध इत्यादींचे साधक-बाधक विश्लेषण असते. त्यामुळे सदर लेख महत्वचे ठरतात. अर्थात मनोरंजनपर साप्ताहिके/मासिके यांच्याऐवजी वैचारिक, संशोधनपर नियतकालिकांनाच नोंदलेखकाने प्राधान्य द्यायला हवे. आवश्यकता असल्यास नियतकालिकातील लेखनच्या लेखकाशी नोंद लेखक संर्पकही साधू शकते.
२. ग्रंथ – ग्रंथाचा खजिना तर नोंद लेखकाला विपुल प्रमाणात उपलब्ध असतो. मात्र ग्रंथ पारखून घ्यावा लागतो. सुधारीत नवी आवृत्ती, लेखकाचे त्या क्षेत्रातील योगदान, नावाजलेली प्रकाशन संस्था, त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची त्या ग्रंथास असणारी मान्यता विचारात घेऊन ग्रंथाची निवड करावी लागते.
नोंद म्हणजे लेखाचा / ग्रंथाचा सारांश नव्हे. नोंद ही नव्याने लिहिण्याची पध्दत आहे. नोंद विषयाशी निगडीत असणाऱ्या विषयाचा संपूर्ण आवाका, खोली, व्यापकता, व्यामिश्रता, गुंतागुत लक्षात घेऊन नोंदीत नव्याने मांडणी करावी लागते. असे लेखन एकाच ग्रंथाच्या आधारे होत असे नाही. अनेक ग्रंथाचे अवलोकन करून अशी नोंद पूर्णत्वास जाते.
३. संदर्भ ग्रंथ / संदर्भ साधने – नोंद लेखकाला नोंदीचे लेखन करताना, नोंदविषयाच्या संदर्भा पूर्वसाहित्यचा शोध घ्यावा लागतो. त्यातून आयत्या नोंदलेखनाला उपयुक्त ठरेल असा साहित्याची निवड करावी लागते. अशा वेळी पुढील साधने उपयुक्त ठरतात.
१. सूची वाङ्मय – विशिष्ट लेखकाची सूची, विशिष्ट विषयाची सूची, ग्रंथसूची, लेखसूची, विशिष्ट नियतकालीतील लेखांची सूची अशा विविध सूची ग्रंथरूपाने प्रकाशित झालेल्या आहेत. उदा- मराठी ग्रंथसूची संपादक शंकर मंगेश दाते किंवा मराठी नियतकालिकातील लेखांची सूची – प्रका. दाते सूची मंडळ, इत्यादी.
अशा सूचीचा वापर करुन आपल्या विषयातील अत्यावशक ग्रंथाची / लेखाची निवड करून नोंद लेखक त्यासंबंधीच्या अभ्यासाला / लेखन विचार कार्याला प्रारंभ करू शकतात.
२. ग्रंथालयातील तालिका – प्रत्येक वेळी नोंदलेखकाने निवडलेल्या विषयासाठी तयार, ग्रंथ वा लेखसूची प्रकाशित झालेली असेलच असे नाही. अशा वेळी कोणत्याही सुसज्ज ग्रंथालयातील ग्रंथांची तालिका पाहून नोंदलेखकाला त्या त्या विषयातील ग्रंथांची निवड करता येऊ शकते.
३. इंटरनेट – इंटरनेटवर अधिक भाष्य करावे असा हा अज्ञात विषय नाही. अलिकडे कोणत्याही विषयाची माहिती शोधण्यासाठी वाचकाचा / लेखकाचा हात प्रथम संगणकावर जातो. इंटरनेटवर महाप्रचंड ज्ञान उपलब्ध असते / होते. मात्र त्यातून विश्वसनीय माहिती पारखून घ्यावी लागते. शिवाय महाप्रचंड संख्येतून आणण्याला हवा असणारा नेमका संदर्भ इंटरनेटवर शोधणे हे एक कसब असते. त्यात प्राविण्य असावे लागते वा त्यासाठी जाणकार तज्ज्ञाची मदत घ्यावी लागते. ती जरुर घ्यावी.
इतर संदर्भसाधने –
१. शब्दकोश – हे एकाच भाषेचे वा व्दिभाषिक वा बहुभाषिक स्वरूपाचे असतात. अशा शब्दकोशांतून अचूक अर्थाचा शब्द शोधता येतो. शब्दाला असणाऱ्या विविध अर्थ छटा यातूनच शोधता येतात. विशेषत: भाषांतरासाठी असे कोश उपयुक्त ठरतात.
२. परिभाषिक शब्दकोश – तांत्रिक स्वरूपाची नोंद लिहिताना त्या त्या विषयाच्या संज्ञा, (Concept, Terms) वापराव्या लागतात. अशावेळी परिभाषिक कोश उपयुक्त ठरतात. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले विविध परिभाषिक कोश उपयुक्त आहेत.
३. समानार्थी कोश / वाक्यसंप्रदाय कोश – ज्ञानकोशात विविध कोश आहेत. त्यातील समानार्थी, विरुध्दार्थी शब्द कोशही उपलब्ध आहेत. व्युपत्ती कोश, वाक्यसंप्रदाय कोश आवश्यकतेनुसार वापरावे लागतात.
४. विषयाचे शब्दकोश – सर्वसाधारण शब्दकोशात विशिष्ट विषयातील शब्दांचे अर्थ सापडतातच असे नाही. अशावेळी विविध विषयांचे शब्दकोश नोंदलेखकाला उपयुक्त ठरतात. रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र इ.
५. कोश – सर्वसाधारण व विषयाचे ज्ञानकोश असतात. उदा- ब्रिटानिका, कोलियर्स इत्यादी तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी एन्सायाक्लोपिडीया वैगरे. नोंदलेखकाला असे कोश पाहणे अत्यावश्यक वाटते. इंग्रजी भाषेतील या कोशाच्या नोंदी आदर्शवत गणल्या गेल्या आहेत. नोंदीची लांबी, व्याप्ती, भाषेची शैली, रचना, आरखडा, चित्रे, ओळख इत्यादी तपशील याचाही अंदाज अशा नोंदी पाहून येऊ शकतो.
६. वार्षिके – यांना इंग्रजीत Year Books म्हणतात. कोशाची एक आवृत्ती प्रसिध्द झाल्यानंतर त्याच कोशाची दुसरी आवृत्ती प्रकाशित व्हायला बराच कालावधी जातो. या कालावधीतील दर वर्षातील प्रमुख माहिती, सांख्यकीय तपशील एकत्रित करुन अभ्यासकांची सोय केली जाते. अशा संदर्भसाधनातून त्या त्या वर्षातील विविध प्रकारची माहिती उपलब्ध होते. India – A Reference annual, महाराष्ट्र, मनोरमा इयर बुक, स्टेटसनन इयर बुक इत्यादी वार्षिके प्रसिध्द आहेत.
७. गॅझेटिअर्स / स्थळकोश / नकाशे इत्यादी भौगोलिक संदर्भ साधने – भौगोलिक तपशील देणारी अधिकृत साधने म्हणून अशा संदर्भ साधनाचा उपयोग केला जातो. राज्य शासन आणि केंद्र शासनातर्फे विविध राज्यांची, देशाची गॅझेटिअर्स प्रकाशित झालेली आहेत / होत असतात. नदया, डोंगर, जमीन, समुद्र, उंची, लांबी, रुंदी, पिके, पाऊस वारा इत्यादी तपशील अशा साधनांपासून उपलब्ध होतो. ऐतिहासिक तपशीलही अधिकृत समजला जातो.
८. सांख्यकी साधने अहवाल- जनगणना अहवाल, पहाणी अहवाल, शोध समिती अहवाल, चौकशी समिती अहवाल, प्रोजेक्ट रिपोर्ट, मतदार यादया, मतदार मोजणी अहवाल अशा अनेक प्रकारात परस्पर दरबारची माहिती अशा साधनांमध्ये समाविष्ट केली जाते.
संदर्भ साधने अनेक आहेत. त्यांचा वापर करताना वाचकाला अभ्यासकाला, नोंदलेखकाला, त्या साधनांची रचना, व्याप्ती, मर्यादा, लक्षात घ्याव्या लागतात. अशी साधने वापरण्याची सवय जडवून घ्यावी लागते.