लोक धारणाऱ्या करणाऱ्या पारंपरिक सूत्रांना लोकबंध किंवा लोकतत्व म्हटले आहे. इंग्रजीतील Element किंवा Type या शब्दांना पर्याय म्हणून भारतीय अभ्यासकांनी लोकबंध, लोकतत्त्व, लोकधर्म कल्पनाबंध (Motif), आदिबंध(Archetype),लोकाकार (Folktype) असे शब्द वापरलेले आहेत. ‘लोकबंध’ चे व्याख्यात्म्क स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देता येते – अनुभूतीतून तयार होत गेलेला; लोकधारणेसाठी कार्यान्वित झालेला; परंपरेत लवचिकतेने परंतु मुलभूततेने वाहत राहणारा, सनातनातून आलेला, वर्तमानात जाणवणारा; भविष्यकाळात प्रगटण्याची क्षमता असणारा; लोकमानसातील जाणीवेचा, आनंद किंवा सौंदर्यभावनाप्राप्त, कल्पनाप्रवाह किंवा सूत्र, म्हणजे ‘लोकबंध’ होय.
‘लोक’ मध्ये दैवते, पूजाअर्चा, धर्माधर्म, नीतिअनिती, ऐतिहासिक व भौगोलिक परंपरा, जन्मप्रथा, विवाहप्रथा, मर्तिकप्रथा, घरेदारे, खाणेपिणे, पेहराव, दागदागिने, केशभूषा, देवाणघेवाण, बाजारहाट, कलाकुसर, क्रीडा कसरत, नर्तन, वादन, गायन, शेतीभाती, व्यापारउदीम, गुरेढोरे, यंत्रअवजारे, भांडीकुंडी, भाषाव्यवहार, प्रतिमा, प्रतिके, खुणा, गुरेढोरे, डोंगर, दऱ्या, अंधारउजेड, सूर्यचंद्रतारे, ज्योतिष आरोग्य वैद्यय, ग्रामव्यवस्था, नगर व्यवस्था, न्याय निवडा, राजव्यवस्था, संरक्षण, जातव्यवस्था, जातपंचायत, नातेगोते सामाजप्रतिष्ठा, भुतेखेते, शुभाशुभ दळणवळण, भेटीगाठी, रागलोभमानपान, साधनांचा व्यवहार या व अशा, मानवी जीवनाच्या सर्व अंगांविषयी; ही धारणा सूत्रे, स्थलकालसापेक्षतेने, बदलासह, परंपरेत अस्तित्वात असतात. या धारणा सुत्रांमुळे विशिष्ट ‘लोक’ एकजिनसी पणाने आपले वेगळेपण व विश्र्वव्यापकपण सांभाळत असतो. लोकबंध नित्य व वर्तमान असल्यासारखा भासमान होतो. ताटात एखादा पदार्थ कोठे वाढायचा येथपासून, खुणां, संकेत हावभावांपर्यंत, माणसाच्या शाब्द, साधन आणि वर्तनात्मक परंपरांत, हे लोकबंध मानवी जीवन नियमित करीत असतात. या लोकबंधांच्या किंवा लोकतत्वांच्या (Folk type / Folk Element) धारणेमुळे; घटकलोक (व्यक्ति an individual or a person) अंगस्वरूप लोक (A Group with same cultural aspects) आणि विराटपुरुष लोक (The whole mankind in the universe) अशा त्रिविधतेने व्यक्तीचे सांघिक आणि वैश्विक अस्तित्व प्रकटने. लोकबंध संघमन सापेक्षच असतात.
‘लोकबंध’ मानवी जीवनाचे अंतरबाह्य दर्शन घडवितात हे लक्षात घेऊन; साहित्य व कलांची लोकतत्त्वीय किंवा लोकबंधात्मक समीक्षा (Folk typal Criticism) हा समीक्षा व्यवहार, सर्वांगीण समीक्षा व्यवहार म्हणून स्वीकृत झाला आहे.