बिदागी किंवा बक्षिसी देणाऱ्या यजमानाचे नाव सांगण्याची  सांकेतिक पद्धती. मूळात तो शब्द ‘करपल्लवी’ असा असावा पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या झाडीपट्टीच्या जिल्ह्यांतील दंडीगान करणारे दंडी लोककलावंतांमध्ये ही पद्धती प्रचलित आहे. कोठेही बाळाचे बारसे किंवा मृताची तेरवी असल्यास त्या ठिकाणी दंडी कलावंत अनाहुतपणे उपस्थित होतात आणि त्या कार्यक्रमाप्रीत्यर्थ आलेल्या पाहुण्यांपुढे आपली सेवा सादर करतात. त्यांच्या गायनावर लुब्ध होऊन गावकरी, घरधनी अथवा पाहुणा त्यांना बिदागी किंवा बक्षिसी द्यायला आपला हात पुढे करतो. आपल्या बसल्या जागेवरून ती व्यक्ती हातातील नोट दाखविते. तेव्हा या कलासमूहामधील प्रमुख पुढे होऊन तिच्या हातातील नोट स्वीकारायला पुढे जातो. त्या प्रसंगी तो त्या देणगीदाराचे नाव-गाव विचारतो. नंतर तो तेथूनच आपल्या सवंगड्याकडे हातवारे करू लागतो. त्यावरून त्याचे इतर साक्षीदार त्या दात्याचे नाव-गाव सहज ओळखतात आणि आपल्या गीतातून त्याचा साभार उल्लेख करतात, “रघुनाथ पाटील रेंगेपारवाले यांचेकडून दहा रूपये पावले हो ………”

करपावली वर्णाक्षर खुणा

प्राथमिक शाळेत गुरूजी मुलांना मुळाक्षरे शिकवितात. तेव्हा प्रत्येक अक्षराकरिता एखादी वस्तू दर्शविली जाते. उदा. आगगाडीचा आ, इडलिंबूचा इ. वगैरे… याच पध्दतीचा वापर करून दंडी कलावंतांची ही करपावली सिद्ध झालेली आहे.  प्रत्येक अक्षराकरिता आकारावरून एक वस्तू किंवा कृती ठरवून तिचे वर्णन हाताच्या बोटांद्वारे केले जाते.  करंगळी, अनामिका, मधले बोट, तर्जनी व अंगठा या पाच बोटांचा उपयोग करून प्रत्येक वस्तू किंवा कृती दर्शविली जाते. त्या कृतीचा किंवा वस्तूचा सहसंबध सवयीने सर्व सवंगड्यांना माहिती झालेला असतो.  त्यामुळे आपल्या म्होरक्याने केलेल्या करपल्लवीवरून संबंधित दात्याचे नाव-गाव हे सवंगडी तेवढ्या अंतरावरूनही अचूकपणे ओळखून सांगू शकतात.  या पद्धतीत हे लोककलावंत व्यंजन आणि स्वरसंकेतांचा वापर करतात अंगठा वर केला असता ‘अ’ या स्वराचा बोध होत असतो.  तर्जनीच्या साहाय्याने अन्य स्वरांचे संकेत दर्शविले जातात.  तर्जनीने उभी रेषा केली की ‘आ’ या स्वराचा बोध होतो. त्याचप्रमाणे तर्जनीने ‘ई’ दर्शविली जाते.  तर्जनीने पीळ दाखविला की ‘ऊ’ या स्वराचा बोध होत असतो.  तर तिरप्या रेषेने एकार सूचित होतो. उभ्या रेषेला वर तिरपी रेषा दाखवून ‘ओ’ या स्वराचा संकेत दर्शविला जातो.   ‘ज’ या व्यंजनाकरिता जाणे आणि ‘य’ या व्यंजनाकरिता येणे या दोन क्रियांचा अपवाद सोडला तर अन्य व्यंजनांच्या बाबतीत वस्तूंचेच संकेत वापरल्याचे आढळून येते. बदक, ससा व हत्ती हे प्राणी संकेताकरिता वापरले असून खड्ग, घंटा, चमचा, चक्र, डमरू, दऊत, फणी, भाला, मणी, लसूण व वाटी या वस्तूंचा उपयोग संकेतांकरिता केलेला आहे.  करंगळी, नख व मनगट हे अवयव वापरले आहेत. शिवाय झापड, टोला, तहान, थापड, पसा व रक्त यांचादेखील संकेतांकरिता वापर केलेला आहे. ‘च’ या व्यंजनाकरिता एकाच हावभावाचा अर्थ चमचा किंवा चक्र असा दोन संकेतांनी घेतला आहे. तर ‘म’ या व्यंजनाच्या संदर्भात दोन वेगवेगळे हावभाव घेऊन मणी व मनगट हे भिन्न संकेत दर्शविले आहेत.  एरव्ही आपण जसे वेगाने सरळ लिहीत असतो त्याचप्रमाणे दंडी कलावंत आपल्या दात्याचे नाव वेगाने हातवारे करून आपल्या सवंगड्यांना सूचवीत असतो. पाहणाऱ्याला तो एक नाचाचा प्रकार वाटावा असे त्याचे हस्तलाघव असते. किंबहुना अशा सफाईने नामनिर्देश करून सर्वांना आश्चर्यचकित करणे हाच त्या कुशल कलावंताचा या कृतीच्या मागचा उद्देश असतो. दंडी ही जातिवंत कलावंताची जमात आहे.  आपली कला आपल्या यजमानांना दाखवून तिच्या बदल्यात घवघवीत बक्षिसी लाभावी एवढीच माफक अपेक्षा या कलावंतांची असते.  पुरातन काळात हे कलावंत लोक राजाचे उत्तम हेर म्हणून चांगली कामगिरी पार पाडत असावेत असे त्यांच्या ‘करपावली’ नामक या हस्तकौशल्याकडे पाहून वाटायला लागते.  शत्रूच्या गोटातील गुप्त वार्ता प्रयत्नपूर्वक प्राप्त करून आपल्या दूरवर उभ्या असलेल्या साथीदाराला बिनबोभाट पोचविणे, तेही अगदी प्रत्यक्ष शत्रूसमक्षदेखील या कलावंतांना सहज शक्य होत असावे. म्हणजेच एका काळचे हे राजदरबारातील मान्यवर हेर असावेत.

संदर्भ :

  • बोरकर, हरिश्चंद्र ,लुप्तप्राय लोकाविष्कार , तारा प्रकाशन, साकोली, २००८.

This Post Has One Comment

  1. Pratiksha yewale

    He Dandi lokkalavantan barobar sampark sadhta yeu shakel Ka

Comments are closed.