लोकविधीप्रसंगी पूर्व विदर्भात गायला जाणारा गानप्रकार. विवाहप्रसंगी किंवा नामकरणविधीसमयी डाहाका गायनाचा जो विधी संपन्न होत असतो त्याला ‘रायनी’ किंवा ‘उतरन’ असे संबोधण्यात येते. रायनी शब्दाचे राहनी, राहानी व राहान असे तीन उच्चार ऐकायला मिळतात. डाहाका गायनातील पारंपरिक संस्कार हे प्रयोजन रायनी अथवा उतरन गायनामागे असते. वर्धा, नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यांत विवाहाच्या पूर्वी रायनी गाण्याची प्रथा अनेक जातींमध्ये दिसून येते. या प्रकाराला पारंपरिक धार्मिक अधिष्ठान लाभले आहे. रायनी किंवा उतरन हा विधिप्रकार करण्यामागे देवतांना आवतन, पितरांना आवतन ही दोन उद्दिष्टे असल्याने दिसून येेते. आपल्या इष्ट देवतांचे स्मरण करणे, त्यांचे स्तवन करून त्यांना आळविणेे आणि त्यांना त्या कार्याकरिता पाचारण करणे हा महत्वाचा उद्देश या विधीगायनामागे असतो. आपण करीत असलेले मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून केवळ आपल्या इष्ट देवतांनाच पाचारण करून येथे यजमानाचे समाधान होत नाही, तर आपल्या वंशात होऊन गेलेल्या आपल्या पितरांनादेखील या मंगल कार्याकरिता आवतन देणे हा महत्वाचा उद्देश या विधीच्या मागे असतो.

संदर्भ :

  • बोरकर, हरिश्चंद्र, विदर्भाचा डाहाका, तारा प्रकाशन, साकोली, २०११.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा