दृष्टबाधा : लोकसमजूत. लोकभ्रम आणि परंपरा यातून समाजजीवनात अनेक प्रकारच्या मानसिक धारणा उपजतात व त्यांचे अनुकरण केले जाते त्यालाच लोकभ्रम किंवा लोकसमजुती असे म्हणतात. अशीच एक सर्व परिचित आणि सर्वाना विदित असणारी लोकसमजूत म्हणजे ”दृष्टबाधा”होय. ग्रामीण भाषेत यालाच ”नजर लागणे”दृष्ट लागणे म्हणतात. वेद वाड़मयातील अथर्ववेदात याचा संदर्भ ”दृष्ट व भय उत्पन्न करणारी दृष्टी” असा आला आहे आणि या दृष्ट्बाधेवरील उपाय म्हणून काही मंत्रही आलेले आहेत. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाला दृष्ट लागण्याचा उल्लेख आढळतो तर महानुभाव साहित्यातही ही समजूत ग्रंथित झाली आहे.अजूनही अनेक धार्मिक परंपरा पाळताना व्यक्तींची ,देवतेची ,मूर्तीची विवक्षित पद्धतीने नजर उतरवली जाते. यासंबधी काही गीते गाऊनही दृष्ट उतरवली जाते.अशा गीतांना दृष्टगीत म्हणूनही संबोधण्यात येते..
एखाद्या माणसाची नजर वाईट ,पापी आणि विकार उत्पन्न करणारी असते अशी एक लोकसमजूत समाजजीवनात रूढ आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही ;परंतु पिढ्यानपिढ्या ही लोकसमजुत समाजजीवनात प्रवाहित,संक्रमित होत आली आहे.कोणत्याही आसक्तीने भारलेल्या ,बांधलेल्या एखाद्या व्यक्तीची नजर कोणत्याही वस्तूवर,किंवा व्यक्तीवर ,अथवा लहान बाळावर,नव्या घरावर ,अगर कोणत्याही नजरेत भरणाऱ्या व्यक्ती.प्रसंग,घटना ,वस्तू इत्यादीवर पडल्यास त्या व्यक्तीला अगर त्या वस्तूला ती नजर बाधते असे मानले जाते.अशी नजर लागल्यास ,बाधल्यास त्या व्यक्तीच्या दैनदिन जीवनावर विपरित परिणाम होतो.त्या व्यक्तीला शारीरिक वेदना आणि,पिडेलाही सामोरे जावे लागते उदा. .तीव्र डोकेदुखी ,ताप येणे,उलटी होणे,मानसिक संतुलन बिघडणे ,इत्यादी मानसिक व शारीरिक परिणाम अशा वेळेस संभवतात अशी याबाबत लोकमानसात धारणा आहे.विशेषतः लहान मुले,पाळीव दुभती जनावरे,सुंदर स्त्री-पुरुष ,मौल्यवान दागिने वस्तू,सुंदर वास्तू,शेतातील पाण्याचे स्त्रोत विहीर,आड इत्यादीनां[ बदलत्या सामाजिक परिवेशानुसार या यादीत आणखीही भर पडू शकते] दृष्ट्बाधा होते अशी सार्वत्रिक लोकसमजूत आहे.
दृष्ट्बाधेचे लोकसंस्कृतीमध्ये अनेक प्रकार व उदाहरणे रूढ झालेली दिसतात.उदा.तान्ह्या मुलाने मातेचे दुध पिणे एकाकी बंद करणे,गाय व म्हशीने एकाएकी दुध देणे बंद करणे,म्हणजेच ती आटणे,अचानकपणे आन्नावरची वासना उडणे ,अचानक एखाद्या सुंदर वस्तूला तडा जाणे ,झाडाची फळे एकाएकी गळून पडणे,असे ,निदर्शनास आले तर दृष्ट्बाधा झाली असे मानण्यात येते. बाहेरची कोणतीही बाधा घरात येऊ नये म्हणून जसे घराच्या उबरठ्याला मळलेली घोड्याची नाल बसवणे,,लहान बाळाला न्हाऊ घातल्यावर त्याच्या गालाला तिट लावणे.विवाह प्रसंगी वधू -वरांना दृष्ट लागू नये म्हणून त्यांच्या ओठाजवळ काळा ठिपका लावणे.नवीन व सुंदर वास्तूला नजरबाधा होऊ नये म्हणून त्या घराच्या दृश्य भागी काळी बाहुली,मिरच्या ,कवडी, लिंबू इत्यादी वस्तू लावणे.शेतावर किंवा बाहेरगावी गोड –धोड पदार्थ न्यायचे असतील तर त्यासोबत कोळस्याचा तुकडा टाकणे.सासरहून माहेरी आलेल्या माहेरवासीनीच्या अंगावर दारातच भाकरी-तुकडा, तांब्याभर पाणी ओवाळून टाकणे.दुभत्या जनावरांना दृष्ट लागू नये म्हणून त्यांच्या पायात काळ्या लोकरीत, काळा बिब्बा बांधणे..पैलवान अथवा काही प्रतिष्टीत माणसेही आपणास कोणाची दृष्ट लागू नये म्हणून गळ्यात अथवा दंडात गंडा बांधतात. विशेषतः कुस्तीगीर व्यक्ती हमखास आपल्या दंडात ताईत नि पायात काळा दोरा बांधतात .लहान मुलाची दृष्ट काढण्यासाठी मीठ मोहरी,केरसुणी यांना अंगावरून ओवाळून नजर उतरवली जाते.कुठे तर मीठ मिरच्या ओवाळून त्या चुलीत टाकून दृष्ट उतरवली जाते असे प्रादेशिकतेनुसारही दृष्ट्बाधे वरचे अनेक उपाय आढळून येतात.ही दृष्ट काढताना घरातील जुनी जाणती आजी अगर वयोवृद्ध स्त्री काहीतरी ओठातल्या ओठात पुटपुटत असते.दृष्ट काढल्यावर ह्या सर्व वस्तू पाण्यात टाकल्या जातात.कुठे तीन वाटेवरची माती आणून ती दृष्ट बाधित व्यक्तीवर ओवाळून टाकली जाते तर कुठे तुरटी ओवाळून विस्तवात टाकतात.लहान बाळ जर दुध पीत नसेल तर ते दुध त्या बाळावरून ओवाळून मांजरीला पाजले जाते व असे केल्याने बाळ पुन्हा दुध पिऊ लागते अशी एक समजूत लोकमानसात रूढ आहे. अशाप्रकारे दृष्ट लागण्याची ही लोकसमजूत पिढ्यानपिढ्या लोकजीवनात प्रवाहित होत आली आहे.
Nice 👌 👌